बहिणाबाईंच्या ओळी म्हणजे अस्सल बावनकशी सोने… त्यांनी दोनच ओळीत जीवन सुटसुटीत करून सांगितले आहे.
`आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर!’
श्वास सुरू असणे म्हणजेच वातावरणातील हवा शरीरात घेऊन बाहेर सोडता येणे, हाच जिवंत असण्याचा पुरावा आहे. जगण्यासाठी हवेइतकेच अन्नपाणी देखील महत्त्वाचे, पण माणसाला, प्राण्यांना अन्नपाणी जेवढे कष्ट करून मिळवावे लागते तसे कष्ट हवेसाठी मात्र घ्यावे लागत नाहीत. हवेसाठी एकमेकांसोबत स्पर्धा करावी लागत नाही. हवा सर्वांनाच विनासायास उपलब्ध आहे असे असणे हे निसर्गाचे मानव प्रजातीवर फार मोठे उपकार आहेत. पण हे उपकार लक्षात ठेवेल तर तो आधुनिक मानव कसला? माणसाने स्वतःला आधुनिक आणि समृद्ध करण्याच्या हव्यासापोटी जगण्यास सर्वात आवश्यक असणारी हवा प्रदूषित केलेली आहे. हवेचे सतत वहन होत असल्याने प्रदूषित हवा थोडीफार ठीक होण्याची सोय आहे, नाहीतर माणसाच्या मूर्खपणामुळे सजीवसृष्टीचा विनाश अटळ होता… भविष्यात कदाचित तो अटळ असेलही.
कोविडमध्ये मुंबईचे हवामान जे अचानक शुद्ध जाणवत होते ते प्रदूषण नसल्यामुळेच. हवा शुद्ध आहे का ती प्रदूषित आहे हे हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) किती आहे यावर ठरते. हा निर्देशांक जितका कमी असेल तितकी हवा चांगली तर तो जितका जास्त तितकी हवा खराब. एक्यूआय पन्नासपर्यंत असेल तरच हवा चांगली समजली जाते, एक्यूआय शंभर ते दोनशेपर्यंत असेल तर हवा खराब आणि प्रदूषित समजली जाते. हा एक्यूआय दोनशे ते तीनशे असेल तर हवा रोगट समजली जाते, तीनशे ते चारशेचा एक्यूआय आरोग्यासाठी धोकादायक तर चारशेपार गेला तर तो अतिधोकादायक समजला जातो. भारतातील उटकमंड, कोहिमा, ऐझवाल, तिरूनेलवेल्ली, इंफाळ वगैरे मोजकीच शहरे ही एक्यूआय पन्नासखाली असल्याने चांगल्या शुद्ध हवेची शहरे आहेत. तर, दिल्ली, पैâजाबाद, पाटणा, गाझियाबाद, गुलबर्गा, भिवंडी, सोनीपत, रोहतक ही एक्यूआय सतत तीनशे आणि चारशेपार असल्याने सर्वात प्रदूषित हवेची शहरे आहेत. महाराष्ट्रातील मुंबई (१९४), पुणे (१८३), नागपूर (१४४), नाशिक (१३९), छत्रपती संभाजीनगर (१२३) ही शहरे खराब हवेची शहरे आहेत. अर्थात कोणी असेही म्हणेल की दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातील शहरांची हवा कमी प्रदूषित आहे, म्हणजे आपली स्थिती बरी आहे, तर हे अर्धसत्य ठरेल. कारण हा लेख लिहीत असताना मुंबईतील बोरीवलीचा एक्यूआय चारशेपार गेला होता. म्हणजेच सरासरी एक्यूआय जरी दोनशेच्या आत असला तरी कोठे ना कोठे कधी ना कधी तो चारशेपार जात असतो. एक्यूआय हा निरंतर बदलत असतो, कारण हवेतील प्रदूषण वाढू लागले की एक्यूआय झपाट्याने वाढू लागतो. उदा. एखाद्या ठिकाणी वाहतूककोंडी झाली, तेथील एखाद्या बांधकामाच्या जागेतून प्रचंड धूळ उडाली की तिथला एक्यूआय वाढू लागतो. एरवी अत्यंत शुद्ध हवा असणारे उटकमंड म्हणजे हे थंड हवेचे ठिकाण शनिवार-रविवारी स्वतःची हवेची गुणवत्ता घालवून बसते. कारण पर्यटकांची व वाहनांची वर्दळ वाढते. थोडक्यात मुंबईतील एक्यूआय सातत्यपूर्ण दोनशेच्या आत असला तरीदेखील मुंबईतील बरेच भाग हे एक्यूआय चारशेपार गेल्याने धोकादायक ठरतात. एखाद्या ठिकाणी पाणी प्रदूषित असेल तर तिथे ते पिणे तात्पुरते टाळता येईल, पण भिवंडीत हवा प्रदूषित आहे म्हणून मी विक्रोळीपर्यंत श्वास घेणार नाही असे होऊ शकत नाही… खराब असली तरी हवा शरीरात घ्यावी लागते तिथे पर्याय नाही.
महाराष्ट्रात मिंधे सरकार आल्यानंतर राजकीय हवा खराब झालेली आहेच, पण मिंधे सरकारच्या काही नेत्यांनी बेजबाबदारपणे जातीपातीचे कार्ड खेळत राजकारणासोबत जातीय सलोख्याचे वातावरण देखील खराब केले आहे. एकीकडे महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक हवा खराब झालेली असताना महाराष्ट्रातील जनतेसाठी नव्हे, तर सर्व सजीवसृष्टीकरता अत्यावश्यक असणारी हवा देखील थंडीत अत्यंत खराब झालेली आहे, हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे एयर क्वालिटी इंडेक्स दर्शवीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व शहरातील हवा खराब आहे आणि ती शुद्ध करण्याची जबाबदारी ज्यांनी घ्यायची त्या राज्यकर्त्यांनीच तर गेली दोन वर्षे महाराष्ट्रातील राजकीय हवा खराब करून ठेवली आहे. नाही म्हणायला न्यायालय वारंवार वायू प्रदूषणावर गंभीर टिप्पणी करते आहे, निकाल देते आहे पण न्यायालयाने दिवाळीत फटाके उडवण्यावर घातलेली बंधने अकार्यक्षम गृहखात्याने फसली. माध्यमातून असेल, समाजमाध्यमातून असेल, हवेच्या प्रदूषणावर कोणीच गंभीरपणे बोलत नाही. राजकीय पटलावर तर संपूर्ण देशात शिवसेनेचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे एकमेव नेते सोडले तर पर्यावरण, प्रदूषण यावर अभ्यास असणारा एक तरी नेता आहे का असा प्रश्न पडतो. राजकीय हवा खराब करून आज निवडणुकीत जिंकता येते तर कोण खराब हवेचा अवघड मुद्दा घेईल?
आपले स्वयंघोषित विश्वगुरू हवेच्या प्रदूषणावर कधी बोलल्याचे आठवते आहे का? सर्व विषयातले तज्ज्ञ असल्याचा ते जो आव आणतात तसा आव ते एक डिसेंबरला दुबई येथे होणार्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामानबदल कृती परिषदेत नक्कीच आणतील. तिथे टेलिप्रॉम्प्टर असेल तर पंतप्रधानांचे भाषण देखील अत्युत्कृष्ट होईल. त्यांच्या भाषणांपेक्षा त्यांनी गेल्या नऊ वर्षात मित्रांचा विकास करण्यासाठी देशाच्या पर्यावरणाची जी तिलांजली दिली आहे ती जास्त बोलकी आहे. अगदी एकच उदाहरण द्यायचे झाले तर नवी मुंबई विमानतळाच्या निर्मितीसाठी आजवर पर्यावरणाचा जो सत्यानाश केला गेला आहे, प्रदूषणांच्या अधिनियमांना फाट्यावर मारून तिलांजली दिली जात आहे, ते पाहता नवी मुंबईची जनता फुफ्फुसांचे रोग होऊन मेली तरी चालेल, पण विमानतळ झालाच पाहिजे असाच मोदी सरकारचा अट्टाहास दिसतो आहे. असे प्रकार मोठ्या प्रकल्पांत सर्रास होत आहेत.
भारतातील नव्हे तर जगातील श्रीमंतीत जगणारा दहा टक्के चंगळवादी वर्ग हा पन्नास टक्के पर्यावरणाच्या बरबादीला जबाबदार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा अहवाल दर्शवतो की जवळजवळ सर्व जागतिक लोकसंख्या (९९टक्के) प्रदूषित हवेत श्वास घेते. जगभरात, सुमारे २.४ अब्ज गरीब लोक आजदेखील घन इंधन (जसे की लाकूड, पिकाचा कचरा, कोळसा आणि शेण) वापरून स्वयंपाक करतात. भारतात देखील उज्वला योजना फक्त जाहिरातबाजीसाठी आहे. कारण घरगुती गॅस हा प्रचंड किमतीमुळे परवडत नसल्याने गरीब परत जळाऊ सरपणाकडे वळाला आहे. या सरपणाच्या धुरात सूक्ष्मकणांचे प्रमाण १०० पट जास्त असू शकते, जे श्वासावाटे आत घेतले जातात. अशा घरांतून स्त्रियांमध्ये व लहान मुलांत श्वसनाचे रोग व त्यामुळे होणारे मृत्यू अधिक आहेत. हवेचे प्रदूषण आरोग्यासाठी किती घातक आहे ते भोपाळची विषारी वायुगळतीची दुर्घटना आठवली तर समजेल. काही तासांत संपूर्ण शहरावर मरणकळा आणण्याची संहारकता या हवेतील विषारी घटकात असते हे तेव्हा आपण अनुभवले. आज कमी अधिक प्रमाणात आपण ‘स्लो भोपाळ’ दुर्घटनेचा भाग बनतो आहोत हे लक्षात कोण घेतो? पक्षाघात, हृदयरोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि अस्थमासह दीर्घकालीन आणि तीव्र श्वसनरोगांचे ओझे आज आरोग्ययंत्रणेवर का वाढू लागले आहे? फक्त हवेच्या प्रदूषणामुळे २०१९मध्ये जगभरात ४.२ दशलक्ष अकाली मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. हवेतील सूक्ष्म कणांच्या संपर्कामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात, श्वसनमार्गाचे रोग होतात व काही प्रकारचे कर्करोग देखील होतात. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की २०१९मध्ये वायू प्रदूषणामुळे जे अकाली मृत्यू झाले त्यात सुमारे ३७ टक्के हृदयरोगाने आणि पक्षाघाताने होते, १८टक्के मृत्यू श्वसनमार्गाच्या रोगाने, २३टक्के फुफ्फुसे निकामी झाल्याने आणि ११टक्के मृत्यू कर्करोगामुळे झाले होते.
आपणास फक्त धूर आणि धूलिकण असणे म्हणजेच हवेचे प्रदूषण वाटते, पण हवेची प्रदूषके अनेक प्रकारची आहेत. अतिसूक्ष्म कण (काजळी, धूर, डांबर, धूळ), विषारी वायू (कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स, सल्फर ऑक्साइड्स, क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन), धातू (शिसे, जस्त, लोह, क्रोमिअम), औद्योगिक प्रदूषके (बेंझिन, इथर, ऑसिटिक ऑसिड, सायनाइड संयुगे इत्यादी), कृषी प्रदूषके (कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके, रासायनिक खते), फोटोकेमिकल प्रदूषके (ओझोन, अल्डिहाइड्स, इथिलीन, पेरॉक्सी अॅसिटिल नायट्रेट) आणि किरणोत्सर्गी प्रदूषके (किरणोत्सारी घटक, अणू विस्फोटामधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग), असे एक ना शेकडो घटक सातत्याने हवा प्रदूषित करत असतात. त्या घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी एक्यूजी म्हणजेच एयर क्वालिटी गाइडलाइन अर्थात हवेच्या गुणवत्तेसाठी ही प्रदूषके किती प्रमाणात असावीत याबाबत मार्गदर्शक तत्त्वे पाळली पाहिजेत. स्वच्छ वाहतूक, स्वच्छ इंधनातूनच स्वयंपाक, उर्जाबचत करणारी कार्यालये, हरित वीजनिर्मिती, प्रदूषणमुक्त उद्योगधंदे, बांधकामात पर्यावरण नियमांची कडक सक्ती, योग्य घनकचरा व्यवस्थापन अशा बर्याच आघाड्यांवर ही लढाई लढायची आहे. यात दिवाळीत फटाके न फोडणे हे देखील आलेच. न्यायालयीन आदेशाला न जुमानता दिवाळीत रात्रभर फटाके फोडणारे महाभाग आणि त्याचे बनावट धार्मिक, सांस्कृतिक समर्थन करणारे लोक हे समाजकंटक म्हटले तर वावगे नाही.
नेता गावात आला की लावली दहा हजाराची माळ हे ज्या देशात चालते, तिथे वायू प्रदूषण या मुद्द्यावर निवडणुका लढल्या जातील हे केवळ अशक्य आहे. पण. श्वासात श्वास राहावा म्हणून आता या मुद्यावर जनतेला आक्रमक व्हावे लागेल. १९८१च्या कायद्यातील अधिनियमात ६ नोव्हेंबर १९९६ रोजी बदल करत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे प्रदूषण नियंत्रण कक्षेत आणले गेले, पण त्याने प्रदूषणावर नियंत्रण आले नाही तर फक्त प्रदूषण नियंत्रण महामंडळातील बाबू लोक व महामंडळाचे अध्यक्ष मालामाल झाले. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराने सर्वात जास्त प्रदूषित झालेले महामंडळ असेच या महामंडळाचे वर्णन करता येईल. पर्यावरणविषयक असंवेदनशील आणि गेंड्याची कातडी असणारे अधिकारी असलेले, वाळवी लागलेले हे महामंडळ बरखास्त करून अत्यंत प्रभावी नवीन सरकारी यंत्रणा अस्तित्वात यायला हवी. लहान मुलांनाच गंमत वाटेल अशी जलतुषार उडवणारी वाहने खरेदी करून हवेतील प्रदूषणावर नियंत्रण आणता येईल का? नाक्यावर प्रदूषण दाखवणारे फलक लावून नक्की काय साध्य होते? उपाय पण असे शोधतात की प्रत्येक उपायात काहीतरी लाभांश निघावेत. मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी जो निधी आहे त्यातील ८० टक्के निधी इलेक्ट्रिक वाहनखरेदीसाठी वापरला जाईल. जणू इलेक्ट्रिक बस आली की संपले प्रदूषण असाच याचा अर्थ होईल. बस विकत घेणे हे परिवहन खात्याचे काम, महाराष्ट्रात ते पर्यावरण खाते करणार की काय? हे असले नकली उपाय न करता उद्योगांसाठी स्वच्छ तंत्रज्ञानाची सक्ती करणे, शहरी आणि शेतीतील कचर्याचे व्यवस्थापन करून बायोगॅस बनवणे, सौरऊर्जेचा वापर वाढवणे व त्यासाठी गरीबांना उपकरणे मोफत देणे, वाहतुकीसाठी विजेवरची वाहने परवडतील अशा किंमतीत निर्माण करणे, शहरांमध्ये वाहतूक कोंडी टाळणे, सायकलींसाठी मार्गिका करणे (आणि तिच्यावर मोटरसायकली अतिक्रमण करणार नाहीत हे काटेकोरपणे पाहणे), शहरे अधिक हिरवीगार आणि लहान आकारांची बनवणे, वीज निर्मितीसाठी हरित पर्याय वापरणे (सौर, पवन किंवा जलविद्युत), कचरा कमी करणे, कचरा वेगळा करणे, पुनर्वापर करणे किंवा पुनःप्रक्रिया करणे असे शेकडो उपाय सातत्यपूर्ण करत राहणे, हे यापुढे भारतासमोरचे मोठे आव्हान आहे जे पेलणे आजच्या वाचाळवीर नेतृत्वाचे काम नाही.
महाराष्ट्रातील राजकीय हवा भाजपा आणि मिंध्यांनी खराब केली. या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक हवा खराब करणारी प्रदूषके म्हणजेच शिवसेनेशी गद्दारी करणारे चाळीस धूलिकण आणि देशभर पसरलेला भाजपासारखा विखारी राजकीय वायू. या राजकीय प्रदूषकाचा नायनाट केला तर महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण कायमचे स्वच्छ होऊ शकते. त्याचबरोबर जनतेला महाराष्ट्रातील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणारे संवेदनशील राज्यकर्ते सत्तेवर आणावे लागतील. अन्यथा, महाराष्ट्रातील खराब हवा सुधारणे इतके सोपे नाही…
बहिणाबाई म्हणतात,
`दीस गेला कामामधी रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता जलमाची जाग आली’
हवेच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर घेतलेली निद्रा जनतेने सोडावी… जनतेला जलमाची जाग आली तरच खराब हवा सुधारेल… नाहीतर चिरनिद्रेची तयारी ठेवलेली बरी!