पनवती हा शब्द खरंतर ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे. पनवती, साडेसाती या संज्ञा ग्रह राशींच्या स्थळकालानुसार या शास्त्रात सांगितल्या जातात. पनवती म्हणजे अपशकुनी… पनवती नावाची कुठली देवीही पुराणात असल्याची कथा आहे म्हणे. आता अशा नाकर्तेपणाचं खापर फोडण्यासाठीही त्या संज्ञेला स्त्रीरूपच द्यावंसं वाटावं हा खरंतर पुरुषसत्ताक समाजाचा अत्यंत चालूपणाच म्हणायला हवा.
कुणा व्यक्तीमुळे शकुन-अपशकुन होतो म्हणणं हा अंधश्रद्धाळूपणाच म्हणायला हवा. पण सध्या ज्या राजकीय संदर्भात आपण या विषयाची चर्चा करणार आहोत तिथे हा मुद्दा तेवढ्यापुरता मर्यादित नाहीय. हा पनवती शब्द देशाच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून धुमाकूळ घालत आहे. सुरुवात झाली भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकप फायनलपासून. सोशल माध्यमांवर अगदी मॅच संपण्याच्या आधीच हा शब्द ट्रेंडिंग होता. नंतर राहुल गांधींनी राजस्थानातल्या सभेत हा शब्द उच्चारला आणि त्यावरुन प्रकरण अगदी निवडणूक आयोगापर्यंतही पोहचलं. देशाच्या पंतप्रधानांना कुणी पनवती म्हणत असेल तर साहिजकच कुणालाही हळहळ वाटेल, राजकीय चर्चेच्या घसरलेल्या दर्जाबाबत वादविवाद करावेसे वाटतील. पण दुर्दैव असं की अशी चर्चा करायची म्हटली तरी त्याची सुरुवात पंतप्रधानांपासूनच करावी लागेल, असा त्यांच्या आजवरच्या वक्तव्यांचा इतिहास आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर आणि त्यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या नात्याबद्दल बोलताना ‘सौ करोड की गर्लफ्रेंड’ असा शब्दप्रयोग पंतप्रधानांनी केला होता. काँग्रेस सरकारच्या काळातल्या महिला, बालकल्याण विधवांसाठीच्या योजनांबद्दल बोलताना हा पैसा काँग्रेसच्या कुठल्या विधवेच्या खात्यात जातो, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सोनिया गांधींवर अत्यंत खालच्या स्तरावरची टीका केली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या वेळी तर ममता बॅनर्जी यांना ज्या लहेजामध्ये ते भर सभांमध्ये ‘दीदी ओ दीदी’ असं संबोधत होते, ते नाक्यावरच्या टपोरी भाषेची आठवण करून देणारंच होतं. यातली कुठलीच भाषा देशाचं सर्वोच्च सत्तास्थान भूषवणार्या नेत्याला शोभणारी नाही. त्या त्या वेळी या दर्जाहीन भाषेचा पंचनामा झाला असता तर आज कदाचित राजकीय संस्कृती इतकी रसातळाला गेल्याची चिंता करावी लागली नसती.
पंतप्रधानांच्या अशा वक्तव्यांचा शोध घेताना फार मागे जायची तसदीही घ्यावी लागत नाही. ज्या विधानावरून राहुल गांधींना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली त्याच्या अगदी चारच दिवस आधी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभेत राहुल गांधींचा उल्लेख ‘मूर्खों का सरदार’ असा केला होता. देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पातळीवर टीका करणं खरंतर योग्य नाही. पण राहुल गांधींनी ‘पनवती’ म्हटल्यावर राष्ट्रीय डिबेट करणारी माध्यमं पंतप्रधानांच्या या विधानावेळी मात्र चिडीचूप होती. त्यात कुणाला काहीही वावगं वाटलं नव्हतं. कदाचित पंतप्रधानांच्या अशा विधानांची सवय झाली असावी.
पनवती वादाची सुरुवात झाली समाजमाध्यमांवर. ज्या माध्यमांचा उपयोग करत भाजपनं राहुल गांधींच्या विरोधात एक सुनियोजित कॅम्पेन २०१४च्या आधी राबवलं होतं, तेच अस्त्र त्यांच्यावर उलटताना दिसलं. ‘पप्पू कॅम्पेन’साठी तर अगदी कॉर्पोरेट स्टाईल प्लॅनिंग झालं होतं, त्यावर बराच पैसाही खर्च झाला. यावेळी ‘पनवती कॅम्पेन’ आपोआपच वणवा लागल्यासारखं पेटलं. मैदानात सामन्याचा निकाल लागण्याआधीच हा शब्द सोशल माध्यमांवर ट्रेंडिंगमधे होता. भारत विश्वविजेता ठरावा असं कुणाला वाटणार नाही? त्यात आपल्याच नावाच्या स्टेडियममध्ये भारताला वर्ल्डकप जिंकताना बघण्याची संधी मिळावी ही तर पंतप्रधानांसाठी किती मोठी पर्वणी (प्रचाराची?) ठरली असती, हे काही वेगळं सांगायला नको. पण खेळात हार जीत होत असतेच. त्यासाठी पंतप्रधानांचा पनौतीचा इतिहास शोधण्याची काय गरज? चांद्रयान १ मोहीमेवळी ते स्वत: इस्रोच्या कार्यालयात हजर होते, पण त्यावेळी ते यशस्वी होऊ शकलं नाही. चांद्रयान २च्या वेळी मात्र ते विदेशात असताना ते यशस्वी झालं याचा तसा काही संबंध असतो का? पंतप्रधान ज्या-ज्या विदेशी राष्ट्रप्रमुखांना प्रेमानं अलिंगन देतात ते नंतर सत्ता गमावून बसले असं म्हणत यादी काढणं हा तर शुद्ध वेडेपणाच.
पण मुद्दा पंतप्रधानांना पनौती ठरवणं योग्य आहे का हा नाही, तर त्यावरून आता जो गदारोळ होतोय तो त्यांनी इतरांच्या बाबतीत असेच दर्जाहीन शब्द वापरल्यावर का होत नाही, हाही आहे. निवडणूक आयोग सध्या केवळ विरोधकांच्याच भाषणांवर नजर ठेवून आहे का? गेल्या महिनाभरात काँग्रेसच्या प्रियंका वाड्रा आणि आपचे अरविंद केजरीवाल या दोन प्रमुख नेत्यांना आयोगानं नोटीस बजावली. पंतप्रधान मोदींनी भेल ही सार्वजनिक कंपनी आपल्या उद्योगपती मित्राला देऊन टाकल्याची टीका प्रियंका यांनी केली होती. पंतप्रधान केवळ आपले उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्यासाठीच काम करत असल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ आम आदमी पक्षानं ट्विट केला होता. या दोन विधानांवरून निवडणूक आयोगानं तातडीनं नोटीस बजावली. पण राजस्थानमधे दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करतील अशा पद्धतीनं जुन्या हत्याकांडाची आठवण करुन देणारी कार्टून प्रसिद्ध करणार्या भाजप नेत्यांवर मात्र आयोग काहीच कारवाई करताना दिसला नाही. पंतप्रधानांनी भर संसदेत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही खिल्ली उडवली होती. रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला तर फक्त मनमोहन सिंग यांना जमू शकते, असं विधान त्यांनी नोटबंदीबद्दलच्या टीकेला उत्तर देताना केलं होतं. देशाच्या माजी पंतप्रधानांबद्दल अशी निरर्गल टीका केल्यानंतरही तेव्हा कुणी भाषेच्या दर्जाची चिंता केली नव्हती.
राहुल गांधींना पंतप्रधान मोदींबद्दल पनवती आणि खिसेकापू हे दोन शब्द वापरल्यानं निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. त्यातल्या पनवतीबद्दलच चर्चा, राग अधिक आहे. जणू पंतप्रधान खिसेकापू आहेत हे सगळ्यांनी मान्य केल्याप्रमाणेच माध्यमांवर त्याची फारशी चर्चा होत नाहीय. खिसेकापू कधी एकटा येत नसतो, एकजण लक्ष विचलित करतो, एकजण हळूच खिसा कापतो त्याप्रमाणे उद्योगपती गौतम अदानी हे देशवासियांचा खिसा कापतात आणि पंतप्रधान मोदी सगळ्यांना गुंगवून ठेवतात असा त्यांचा आरोप होता. या दोन्ही विधानांबद्दल राहुल गांधींना आयोगात उत्तर सादर करायचं आहे. याआधीही भर सभेत ‘सारे चोर मोदी क्यों होते हैं’ असा सवाल केल्यानं राहुल गांधींना काही काळासाठी खासदारकी गमवावी लागली होती. त्याहीवेळी आपल्या यंत्रणा किती वेगानं काम करतात याची प्रचिती आलीच होती. आताही निवडणूक आयोगानं तीच तत्परता दाखवली आहे. भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांतच राहुल गांधींना नोटीस बजावली आहे.
अर्थात, पंतप्रधान मोदी अशा विधानांना राजकीय संधीच म्हणून पाहत असतात. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘चौकीदार चोर है’ हे काँग्रेसचं कॅम्पेन त्यांनी त्यांच्यावरच उलटवलं होतं. आताही या विधानाचा वापर ते राजकीय संधी म्हणून करतील यात काही शंका नाही. काँग्रेसनं आत्तापर्यंत आपल्याला ९० वेळा शिव्याशाप दिले असं जाहीर विधान त्यांनी केलं होतं… त्यामुळे ही गणती ते करत असतात हे दिसून आलेलं होतं. पनवती संबोधून असं त्यांना क्रिकेटमधल्या जय पराजयाबद्दल जबाबदार ठरवणं चूकच आहे, पण कल्पना करा जर भारतानं वर्ल्डकप जिंकला असता तर त्याचा वापर राजकीय माहौल उभा करण्यात भाजपनं काही कसूर ठेवली असती का? त्या स्थितीत खरं क्रेडिट खेळाडूंचं आहे हे सत्य कुठल्या कुठे विरून गेलं असतं. मग विजयात सहभाग नसताना श्रेय घेणार्यांना पराजयाचं अपश्रेयही स्वीकारावं लागणारच दिसतेय. ‘पप्पू ते पनौती’ असं एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं यानिमित्तानं दिसतं आहे.