क्षणोक्षणिं गडे, उडे जरि कुठें, कष्टे बापडा,
कसें बल सेवूनि, सतत गाठिया फाफडा
किती घळघळां गळे घर्म कोमलांगातुनी
तरीहि नित उष्मा सहत फ्लडलाइटातुनी.
म्हणे निजभक्तूंप्रती, ‘अधिक बोलवेना मला,
अजंडा अजि अंतिचा असत एक मी आणिला;
पहा पुन्हा हा! चला, लागतो कामा एकदा,
करू जतन हा पुढे नव ठेका नाथां सदा!
अहा! मधुर थापुनी रमविलें सकळहि जनां,
कृतघ्न मज ट्रोलतील नच ही मनीं कल्पना,
देशास्तव कागद पसरुनि खास यानांतरी
क्षणैक बसलो न, शिरत टोमणे मम ट्वीटरीं
निघून मित्रद्वयिला रमविण्यांत गेल्या टर्म,
म्हणून छळिती मला! किति पहा! छेदिती वर्म!
उदार बहु शूर मी जन-जीवावरी जाहलो
हरुन जन-वित्ता रॉबिंगहूडपदा पावलो!
म्हणाल, भुलला जगा, विसरला जत्रा एअरा
म्हणून अतिसंकटे उडत चाललो, केली त्वरा
नसे लस इष्ट जरि, नच मनांत भीती जरा,
स्मरा मज अवतारी, आणि विषाणु कचरा.
असो; चर्चा होऊनी गच्च भरो मीडिया तरी
म्हणून दिधली किल्ली भरूनि, ही मजा खरी.
घ्ऊवंत बहु बोलकें किति सुरम्य पोष्यदल,
असें पदरि पाळिलें, खचित थोर बुध्दि, बल!
खुर्चीत ते पसरले अतिटम्म रूप,
केले वरी उदर तुंदिल (कॅमेरा
ऑफ़)
तोंड तसेंच उघडें पद लांबविले,
निश्चेष्ट देह पडला! घोरणे दुमदुमले!