सारी वात्रट गँग कान टवकारून बसली आणि नथ्याची शिकवणी सुरू झाली. मुलांनो, तुम्ही शाळेत कितीतरी पाढे शिकता. मटक्याच्या अभ्यासात फक्त १ ते ९ आणि शून्य या दहा आकड्यांचाच सखोल अभ्यास करून मटका लावून नशीब अजमावायचे असते. यात ७ या आकड्याला लंगडा तर शून्याला मेंढी हे टोपणनाव आहे. मुंबई तसेच उपनगरातील प्रत्येक भागातील गल्ल्यांमध्ये मटक्यावर पैसे लावण्याचे अड्डे भर रस्त्यावर तसेच काही दुकानांमध्ये आहेत. तिथे टेबलावर पैसे घेऊन पावतीही दिली जाते. समोर फुटपाथच्या भिंतीवर रंगवलेल्या फळ्यावर पहिल्या भागात रात्री ९ वाजता आलेला ओपनचा आकडा आणि रात्री बारा वाजता दुसर्या भागात क्लोजचा आकडा लिहिला जातो.
—-
एक दिवस चाळीतल्या वात्रट पोरांनी खबर आणली की पहिल्या मजल्यावरच्या हातिसकरांच्या खोलीतील बाजूच्याच गिरणीत कामाला असलेला सडाफटिंग खानावळी नथ्या जिन्याच्या बाजूला असलेल्या दहा बाय दहाच्या गॅलरीत रोज रात्री अंथरुण घेऊन झोपल्यावर भिंतीवर खडूने कसली तरी आकडेमोड गॅलरीतील बल्बच्या उजेडात करत असतो. त्याच्या हातात दहाबारा छापील कागद असतात. शिक्षणाचा फारसा गंधही नसलेल्या नथ्याचे हे उद्योग गुपचूप पाहून चाळीतल्या मुलांचीही उत्सुकता वाढली.
नथ्याची सुट्टी नेमकी रविवारी असायची़ त्यामुळे रविवारी त्याला गच्चीवर बोलावून रात्री गॅलरीत झोपल्यावर तुम्ही कसली आकडेमोड आणि हिशोब तासन्तास करता असे विचारले. नथ्याही घाबरला नाही. तो म्हणाला, आपल्या चाळीत झिलग्यांच्या खोलीत रजेच्या आदल्या दिवशी पैसे लावून पत्त्यांच्या रमीचा जुगार खेळतात ना, तसाच हा जुगार आहे. म्हटलं तर नशिबाचा, म्हटलं तर अभ्यासाचा, त्याला मटका म्हणतात. तो कसा खेळतात, त्याची किती केंद्रे कुठे आहेत, त्याची पद्धतशीर यंत्रणा किती प्रामाणिकपणे काम करते आणि यात गरीब, व्यसनी लोकच नव्हे तर श्रीमंत व्यक्ती तसेच अनेक महिलाही पैसे लावून अनेक पट पैसे कमावण्याच्या मोहाने एकदम धनवान होतात नाहीतर बरबाद तरी होतात, ही माहिती नथ्याने दिली.
मात्र तुम्ही या मटक्याच्या मोहात पडू नका. अभ्यास करा आणि खूप शिकून चांगल्या मार्गाने पैसा कमवा, असा पोक्त सल्ला नथ्याने दिला.
-नथ्या, तू आम्हाला उपदेश करतोस हे ठीक आहे, पण तू का याच्या नादात इतका गुरफटलास?
-यात जितके खोलात जाल ना, तितके याच्यात अधिक गुंतत जाल. या वयात तुम्हाला ते सांगणे नकोच.
-मग सांगाच. नाहीतर आम्ही तुझे ते अंथरुण त्यातील कागद, खडू खाली गटारात फेकून देऊ.
-नको नको सांगतो. आपण याला मटक्याची शिकवणी म्हणू.
सारी वात्रट गँग कान टवकारून बसली आणि नथ्याची शिकवणी सुरू झाली. मुलांनो, तुम्ही शाळेत कितीतरी पाढे शिकता. मटक्याच्या अभ्यासात फक्त १ ते ९ आणि शून्य या दहा आकड्यांचाच सखोल अभ्यास करून मटका लावून नशीब अजमावायचे असते. यात ७ या आकड्याला लंगडा तर शून्याला मेंढी हे टोपणनाव आहे. मुंबई तसेच उपनगरातील प्रत्येक भागातील गल्ल्यांमध्ये मटक्यावर पैसे लावण्याचे अड्डे भर रस्त्यावर तसेच काही दुकानांमध्ये आहेत. तिथे टेबलावर पैसे घेऊन पावतीही दिली जाते. समोर फुटपाथच्या भिंतीवर रंगवलेल्या फळ्यावर पहिल्या भागात रात्री ९ वाजता आलेला ओपनचा आकडा आणि रात्री बारा वाजता दुसर्या भागात क्लोजचा आकडा लिहिला जातो. वरळी बाजार आणि कल्याण बाजार असे मटक्याचे दोन स्वतंत्र बाजार आहेत. त्यांचा कारभार आणि यंत्रणाही वेगवेगळ्या आहेत.
-नथ्या, पण हे आकडे जाहीर कोण करतो?
-त्यांचा बॉस. एका मातीच्या मडक्यात बावन पत्ते घालून नऊच्या सुमारास तो ते घुसळून त्यातून तीन पत्ते काढतो. त्यावर असलेल्या अंकांची बेरीज करून उजवीकडील अंक ओपनचा आकडा म्हणून जाहीर केला जातो आणि फोनवरून सार्या शहरात तो पाच मिनिटात कळतो. फळ्यावर तो लिहिला जातो. त्याला चार आण्याला सव्वा दोन रुपये मिळतात. शिवाय ज्या तीन पत्त्यांवरील आकड्यातून तो तयार झाला ते तिन्ही आकडे त्याखाली लिहिले जातात. ते तिन्ही ज्यांनी अचूक लावले असतील त्यांना चार आण्याला नऊशे रुपये मिळतात. रात्री बारा वाजता अशाच प्रकारे दुसरा क्लोजचा आकडा जाहीर होतो आणि त्याच्या तीन पत्त्यांचे आकडेही त्याच प्रकारे लिहिले जातात. ज्यांनी ओपन आणि क्लोजचे दोन्ही सिंगल आकडे अगदी अचूक लावलेले असतील, उदाहरणार्थ दुर्रीशी सत्ता किंवा चौक्याशी पंजा. त्यांना चार आण्याचे एक्याऐशी रुपये मिळतात. यात पैसे देण्यात कुठेही फसवाफसवी होत नाही की गोलमाल होत नाही. ज्यांना मटक्याचा आकडा सिंगल किंवा डबल लागतो त्यांची पैसे घेण्यासाठी रांग लागते.
-पण हा एवढा मोठा कारभार चालवतो कोण?
-मटकाकिंग रतन खत्री हा कुप्रसिद्ध गुंड आणि त्याची टोळी हे एक नाव मला माहित आहे.
-मग तू त्या कागदाचा अभ्यास करून कसली आकडेमोड करत असतोस रात्रभर.
-तो तर केवढा मोठा अभ्यास आहे मटक्याचा. त्या छापील कागदांना मटक्याच्या डेलीज म्हणतात. त्यात गेल्या महिनाभरात रोज आलेल्या मटक्याच्या ओपन-क्लोज आकड्यांची आणि तीन पत्ती आकड्यांची तारीखवार नोंद असते. त्यावरून ती वाचून आणि तिचा अभ्यास करून कोणता आकडा आठवड्यातून, पंधरावड्यातून महिन्यातून किती वेळा, कधी आला याची ओपन टू क्लोज संगती लावण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यातून आकडेमोड करून मी कधी ओपनला कधी क्लोजला तर कधी एकदम दोन्हीकडे आकडे लावतो. कधी हरतो. कधी जिंकतो. पण टाइमपास म्हणून हा खेळ बरा. जुगार म्हणून नव्हे. तुम्ही चांगल्या घरातील मुले आहात. या असल्या भिकेचे डोहाळे लावणार्या मटक्याच्या नादाला कधीच लागू नका.
एवढे सांगून नथ्या निघून गेला, पण आमची वात्रट वानरसेना काही गप्प बसेना, शिवलकरांचा बाब्या म्हणाला, ते काही असले तरी मी उद्या नाक्यावरच्या अड्ड्यावर ओपनला चार आणे तरी लावणारच. आपण एक ते नऊ आणि शून्य आकडे लिहून चिठ्ठ्या टाकू. डोळे बंद करून त्यातील एक उचलू आणि तिच्यात जो असेल तो आकडा लावू. बब्यानेच चिठ्ठी काढली. दोन आकडा आला होता. बब्या ओरडला- दुरीऽऽऽ. दुसर्या दिवशी बब्याने तो आकडा लावण्याची कामगिरी फत्ते केली. रात्री नऊच्या सुमारास जेवल्यावर नाक्यावर केळी खाण्याचे निमित्त करून वात्रट गँग निघाली. तिथे नाक्यावर मटक्याच्या अड्ड्याच्या भिंतीवर ओपनला दोन म्हणजे दुरीच आली होती. हा निव्वळ योगायोग होता पण सारी वात्रट गँग खूष झाली. मिळालेल्या सव्वा दोन रुपयात लस्सी पिऊन सारे घरी आले.
दुसर्या दिवशी हाच प्रयोग पुन्हा करूया का, असा विचार बब्याच्या मनात आला. तो म्हणाला आज ओपनला चार आणे नको एक रुपया लावू या. म्हणजे आकडा लागला तर त्याचे नऊ रुपये येतील. मग हॉटेलात पार्टी करू; पैसे तर कुणाकडेच नव्हते. शेवटी अरूणने त्याच्या आईकडून वही आणायची असे खोटे सांगून एक रुपया घेतला आणि चिठ्ठ्या टाकायचा मागचा प्रयोग पुन्हा केला. आता सात या आकड्याची म्हणजे लंगड्याची चिठ्ठी आली होती. बब्याने अड्ड्यावर जाऊन आकडा लावण्याची कामगिरी पार पाडली होती. रात्री नऊ वाजता सारेजण रिझल्ट बघायला गेले तर ओपनला एक्का आला होता. बब्याचा एक रुपया बुडाला होता. आणि पार्टीच्या आशेवर आलेल्या सर्वांनाच
शॉक बसला होता. तेव्हा सर्वांनी कानाला खडा लावला की हा नाद चांगला नाही.
काही महिन्यांनी सरकारने मटक्यावर बंदी आणली आणि मटक्याच्या साम्राज्याने गाशा गुंडाळला. मग सरकारी लॉटरी सुरू झाली. सर्वच राज्यांच्या कोटीकोटीच्या लॉटर्यांची तिकीटे स्टॉलवर दिसू लागली. त्यातही झटपट लॉटरीसारखे प्रकार सुरू झाले आणि नंतर चोरीछुपे अनेक प्रकारच्या जुगारांचे पेव फुटले. आता गिरण्याही गेल्या. मटकाही गेला आणि मटकाबहाद्दरही गेले. नथ्याही गावाला जाऊन बसला. आता ते तीस-चाळीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले की नथ्याची मटक्याची शिकवणी आठवते आणि आताचे आधुनिक नवनवे जुगार डोळ्यासमोर येतात.
– श्रीकांत आंब्रे
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)