प्रबोधनकार स्वदेशहितचिंतक नाटक कंपनीच्या खामगाव मुक्कामात पोचले, तेव्हा त्यांना भेटायला थोर नाटककार श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर भेटायला आले. पुढे कंपनीचा पुढचा मुक्काम यवतमाळला गेला, तेव्हा तात्यासाहेबांचे मोठे बंधू दत्तात्रय कृष्ण उर्फ दादासाहेब कोल्हटकर भेटायला आले. ते अकोला शहरातले प्रसिद्ध डॉक्टर होते. पहिल्या भेटीतच त्यांची प्रबोधनकारांशी गट्टी जमली. एका रात्रीच्या प्रयोगानंतर दोघे अकोल्याला दोन दिवस मुक्कामाला गेले. तेव्हा दादासाहेबांचे सगळ्यात धाकटे भाऊ दिगंबर कृष्ण कोल्हटकरदेखील यवतमाळात सबजज्ज म्हणून काम करत होते. दत्तांची नावं असणार्या या तिन्ही भावांशी प्रबोधनकारांची जवळची मैत्री झाली.
दादासाहेबांचं अकोल्याला स्वतःचं घर होतं. दवाखाना जोरात सुरू होता. रोज सकाळी आठ वाजताच त्यांना दवाखान्यात पोचावं लागे. पण त्यांचा स्वभाव मात्र दानशूर होता. गरीबांना ते सढळ हातांनी मदत करत. त्यांच्या दवाखान्यात रोग्यांबरोबरच देणग्या मागणार्यांची रीघ लागलेली असायची. गोरक्षणवाले, फंडवाले म्हणजे वर्गणी मागणारे, अनाथ विद्यार्थी मदत मागण्यासाठी येत असत. प्राथमिक चौकशी करून दादासाहेब कम्पाऊंडरला हुकूम सोडायचे, याला एक रुपया दे, याला पाच रुपये दे. आधीच कम्पाऊंडरला कॅशियरचं एक्स्ट्रा काम असायचं. त्यात दान देण्याचं आणखी एक काम मागे लागलेलं असायचं. अनेकदा मदत मागायला येणार्यांमध्ये फसवणारेही असत. कम्पाऊंडर त्याची जाणीव करून द्यायचा. त्यावर दादासाहेबांचं म्हणणं असे, `अरे, त्याचं कर्म त्याच्याबरोबर.’ त्यामुळे कम्पाऊंडर दादासाहेबांच्या बायकोकडेही या अजागळ व्यवहाराची तक्रार करायचा. बायकोने त्यावर अप्रत्यक्षपणे छेडलं तर दादासाहेबांचं उत्तर असायचं, `असं धरून चालावं की आपण त्याचं काही देणं लागतो.’ या उत्तराबरोबर गडगडाटी मोकळं हास्यही असायचं.
दादासाहेबांचा मुलगा फक्त दीड दोन वर्षांचा होता. घरात गप्पा मारण्यासाठी बायकोशिवाय दुसरं कुणी नव्हतं. त्यामुळे घरी जेवणासाठी कुणी पाहुणा असेल तर त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांच्या घरी नेहमी कुणी ना कुणी पाहुणा असायचाच. प्रबोधनकार सांगतात तसा काव्यशास्त्रविनोदाचा महापूर यायचा. हे सगळं आटोपल्यानंतर ते भजनासाठी रोज वेगवेगळ्या मित्रांच्या घरी भजनासाठी जात. दहा बारा जणांचं भजनी मंडळ होतं. अकोल्याच्या मुक्कामात प्रबोधनकारही दादासाहेबांबरोबर भजनाला जात. दादासाहेब फक्त भजनाना गेले कीच नाही, तर एरव्हीही भजन गुणगणत. त्यात त्यांची तंद्री लागायची. दादासाहेब धार्मिक असले तरी सुधारकी विचारांचा सन्मान करणारे होते. ते त्यावर प्रबोधनकारांसारख्या मित्रांशी चर्चाही करत.
प्रबोधनकारांना त्यांच्या घराच्या एका भागाचं बांधकाम अर्धवट दिसलं. त्याचं कारण विचारल्यावर दादासाहेबांनी एका आगीत तो भाग जळला होता, असं त्रोटक उत्तर दिलं. नंतर दादासाहेबांच्या बायकोने त्या आगीची गोष्ट सांगितली, जी आवर्जून सांगायलाच हवी अशी आहे. एकदा दादासाहेब नेहमीप्रमाणे रात्री भजनाला गेले. इथे भजन रंगलं होतं आणि तिथे घराला आग लागली. त्यांची बायको मुलगा आणि पैशांची पेटी घेऊन बाहेर पडल्या. आगीचे बंब आले. पाण्याचा मारा सुरू केला. पण यात दादासाहेब कुठेच नव्हते. दादासाहेब कोणाच्या घरी भजनासाठी गेलेत, याचा शोध सुरू झाला. छडा लागताच एकजण धावत धावत भजनाच्या ठिकाणी गेला. घाबर्या आवाजात त्याने आगीची बातमी दादासाहेबांना सांगितली. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती, `बरं येतो जा.’ भजन पुन्हा सुरू झालं. दादासाहेब येत नाही म्हटल्यावर दुसरा आला. तिसरा आला. दादासाहेबांनी त्यांना सांगितलं, `अरे हो रे बाबांनो, भजन अर्धवट कसं टाकायचं? झालं. आलोच आटोपत ते. निघालोच मी सांगा. आमची मंडळी पडली आहेत ना बाहेर? बस्स तर. आलोच मी. व्हा पुढे.’ भजन आटोपलं. दादासाहेब नेहमीप्रमाणे सावकाश चालत घराजवळ पोचले. बायको आणि मुलाला बघून म्हणाले, तुम्ही सुखरूप बाहेर पडलात ना? आणखी काय पाहिजे. बंबवाल्यांनी आग विझवली होती. दादासाहेबांनी बायकोजवळची पैशांची पेटी घेतली. त्यातले सगळे पैसे बंबवाल्यांत वाटून टाकले. त्यातल्या प्रत्येकाला शाबासकी दिली. ते बघून बायकोला धक्का बसला. त्यांनी विचारलं, `हे काय केलंत? घरापरी घर गेलं नि तिजोरीही खलास केलीत?’ जणू काही घडलंच नाही अशा स्थितप्रज्ञ वृत्तीने दादासाहेबांनी उत्तर दिलं, `यात रडण्यासारखं आहे तरी काय? जळण्यासारखं आहे तेच जळतं. जळलं घर तर पुन्हा बांधू. पैश्यांचंही तेच. रोज येतोय नि जातोय. पण या बहाद्दरांनी आग विझविण्यात जे तातडीचे श्रमसाहस केले. त्याची बूज आपण नागरिकांनी ठेवायची नाही, तर कोणी? चला घराचं काय काय उरलं आहे ते पाहू.’ हे लिहून झाल्यानंतर प्रबोधनकार आपलं मत नोंदवतात, स्थितप्रज्ञ वृत्तीचा हा कळसच नव्हे का?
अशाच आणखी एका स्थितप्रज्ञ वृत्तीचं उदाहरण प्रबोधनकारांना नाटक कंपनीच्या अमरावती मुंक्कामात अनुभवता आलं. या किश्श्याचे हिरो सर्कसवाल्या विष्णुपंत छत्र्यांचे तितकेच कर्तृत्ववान चिरंजीव काशीनाथपंत छत्रे आहेत. छत्रेंची सर्कस तेव्हा अमरावतीत आली होती. महान शास्त्रीय संगीत गायक उस्ताद रहिमतखां हे तेव्हा काशीनाथपंतांच्या आश्रयाला होते. रोज सकाळी ८ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत उस्तादांचं गाणं सुरू असायचं. प्रबोधनकारांनी त्याचं वर्णन असं केलंय, `खांसाहेबांच्या गंधर्व गायनाचा मुक्तद्वार जलसा काशिनाथपंत नियमित करत असत. शेकडो गायनप्रेमी जन सर्कस कंपनीच्या बिर्हाडी शिस्तीने जमायचे. खांसाहेब समाधीच्या तन्मयावस्थेत गात आहेत. समोर काशिनाथपंत वा, वाहवा, खाशी असं उत्तेजन देत जेठा मारून बसले आहेत. सगळे लोक कानाच्या ओंजळी करून रहिमतखांचे गायनामृत निःशब्द वृत्तीने प्राशन करत आहेत. असा तो अवर्णनीय देखावा माझ्या स्मृतिफलकावर स्पष्ट कोरलेला आहे.’
एकदा गायनाचा मैफिल रंगलेली असताना सर्कस कंपनीचे मॅनेजर बापट हातात कसलीतरी गुलाबी रंगाची चिठ्ठी घेऊन काशिनाथपंतांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते. ते अस्वस्थपणे आतबाहेर करत होते. पण काशिनाथपंत तर उस्तादांच्या गाण्यात रंगून गेले होते. त्यांचं दुसरीकडे लक्षच नव्हतं. त्यामुळे बापट आणखीच अस्वस्थ झाले होते. शेवटी कुणीतरी काशिनाथपंतांना हळूच म्हटलं की बापटांना आपल्याला भेटायचं दिसतंय. त्यांनी बापटांना हातानेच काय आहे असं विचारलं. त्यावर बापटांनी आलेली तार त्यांच्याकडे पोचवली. तार जबलपूरहून आली होती. तिथे छत्रेंच्या सर्कस कंपनीची वेगळी टीम प्रयोग करत होती. तारेत लिहिलं होतं, `एकाएकी आग लागून सर्कसीचा तंबू जळून खाक झाला. माणसं, जनावरे मात्र सुखरूप आहेत.’
ते बघूनही काशिनाथपंत शांतच होते. ते हसत हसत म्हणाले, `यात चिंतातूर होण्याइतकं काय आहे? आपली माणसं, जनावरं परमेश्वराच्या कृपेने सुखरूप आहेत. पब्लिकलाही काही दगाफटका झाला नाही. तंबू जळाला. जळणारीच वस्तू असते ती. ताबडतोब नवा करून घ्या. जबलपूरला तंबू फार छान होतात. वाचले नव्हते का मराठी दुसर्या पुस्तकात तुम्ही? चला कामाला लागा. हा चलने देव.’ असं म्हणून ते गाणं ऐकून पुन्हा एकदा मिसळून गेले. जसं काही घडलंच नाही, अशा माहौलमधेच मैफल पुढे दोन तास चालली. सगळे श्रोते काशिनाथपंतांची ही स्थितप्रज्ञ वृत्तीचं आश्चर्य करत घरोघर गेले. प्रबोधनकार सांगतात, मी तर नेहमी ही आठवण मनाशी गुणगुणत असतो.
माणूस घराबाहेर पडला की त्याला नवनवे अनुभव मिळत जातात. अनेक मोठमोठी माणसं अनुभवता येतात. त्यातून तो माणूस घडत जातो. प्रबोधनकारांनी आयुष्याच्या उतारवयात असेच अनुभव नोंदवलेले आहेत. ते त्यांच्या मनात कोरलेले असल्यामुळे त्यांच्या आत्मचरित्राचा भाग बनलेत. प्रबोधनकार तसे तापट स्वभावाचे. पण तेही त्यांच्या आयुष्यात स्वाभिमानामुळे स्थितप्रज्ञपणे वागलेले दिसतात. ते त्यांच्या मोठेपणाचं लक्षण होतंच. पण त्यावर अशा अनुभवांचाही प्रभाव होताच.
– सचिन परब
(लेखक ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटचे संपादक आहेत.)