देशाला कोरोनापेक्षा जास्त भयंकर संसर्ग भ्रष्टाचाराचा झालेला आहे… ब्राइबशील्ड, ब्राइबव्हॅक्सिन, ब्रुटनिक अशी एखादी लस देता येईल का त्याच्यावर?
सोमनाथ गवळी, लातूर
– अहो भ्रष्टाचाराच्या संसर्गाची हर्ड इम्युनिटी प्राप्त करून आपल्यालाच काय आख्ख्या जगाला युगं लोटली. दर सेकंदाला त्याचे लाखो करोडो म्युटंट निर्माण होत असतात. मानवाने जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजनला निर्माण केलेला तो एकमेव पर्याय आहे. या लसीचा प्लांट टाकायचा झाला तर, सरकार तो आधी उल्हासनगरला टाकेल.
तरूण मुलं भिकार्यांसारखे फाटके कपडे फॅशन म्हणून का घालत असतील?
कमल मुळीक, डहाणू
– श्रीमंतीच्या प्रदर्शनाचे त्या त्या वयाचे असतात असे काही षौक.
आपल्या देशात स्त्रीला देवी मानलं जातं, तर तिच्यावरच्या बलात्कारांचं, अत्याचारांचं प्रमाण इतकं का आहे?
सुगंधा करपे, अंबड
– दैत्यांमध्ये असलं काही मानत नाहीत.
सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेपाचं प्रमाण वाढत चाललं आहे, त्याचा त्रास तुम्हालाही झाला असेलच कधी ना कधी? हे थांबवायचं कसं?
विश्वनाथ सोमण, काळेवाडी
– कधी ना कधी? अहो उगाच घरी बसलोय का आत्ता मग? आमच्या अनेक संस्था, मंडळं, परिषदा अनुदानं मागायची बंद झाली, की थांबायला हरकत नाही ते कधीतरी.
प्रेमिकांना भेटण्यासाठी शहरांमध्ये जागाच नाहीत. शहरांमध्ये खरं तर फक्त प्रेमिकांसाठी राखीव प्रेमोद्याने असली पाहिजेत ना? तुमचं काय मत?
अन्वर सिराज, घाटकोपर
– अहो ती बनवली की तुमच्या मागण्या सुरु होणार दुसर्या क्षणापासून; अशा उद्यानांना उंच भिंती बांधून द्या, चांगले आडोसे करून द्या, एसी पाहिजे होता, प्रेमी लोकांच्या मागण्या संपतात होय कधी? कारण आत्ताची राहती घरं, सोसायट्या, कॉलन्या, वसाहती या कधी ना कधी उद्यानंच होती. आणि प्रेमभावने व्यतिरिक्तही उद्यानांची गरज असलेला समाज आहे अहो अजून.
आयुष्यातल्या अनेक माणसांकडे पाहून वाटतं की स्वभाव बदलण्याचं एखादं औषध असतं तर त्यांना द्यावं. असं काही औषध तयार होईल का नजीकच्या भविष्यात?
सोनाली शिंदे, पन्हाळा
– अहो त्यापेक्षा आपली मनोवृत्ती बळकट करण्यासाठी बरेच वेगळे उपाय आहेत. कशाला उगाच इतरांवर खर्च करून पैसे वाया घालवताय?
सत्यमेव जयते असं आपल्या देशाचं ब्रीद आहे, तरी इथे खोटारडेपणा पावलापावलावर आढळतो. खोटारडी माणसं यशस्वीही होतात खोटं बोलून. मग सत्यमेव जयतेला अर्थ काय?
विक्रम शेलार, सानपाडा
– अहो असं काहीतरी ब्रीदवाक्य आहे याची तुम्हाला कल्पना आहे; हेही खूप आहे की! अजून काय हवंय?
नवरात्रात रात्री उशिरापर्यंत गरबा खेळण्याची खूप आवड आहे मला. पण आईबाबा परवानगी देत नाहीत. मी काय करू?
दमयंती कासार, अंबरनाथ
– मग मित्र मैत्रिणींना बोलवून उशिरापर्यंत घरीच खेळायला लागा. बघा दुसर्याच दिवशी बाहेर काढतात की नाही ते.
तुम्हाला भोंडला आवडतो की दांडिया?
सुनील पांचाळ, तेली गल्ली
– भोंडल्याचं अजून बाजारुकरण होऊ शकलेलं नाही, ही एक मराठी माणसाची उणीवच म्हणायला हवी. त्यामुळे उगाच डीजे बीजे लावून डोक्याला उशिरापर्यंत ताप नाही. आणि तिकीट काढून वगैरे खर्चाची अजूनतरी डोकेदुखी नाही. त्यावर कुणीतरी मादक आयटम गर्ल घेऊन भोंडल्यावरचं उत्तान गाणं अजूनतरी सिनेमात आलं नसल्याने अजूनही आपल्या मुली एक लिंबू झेलत, हणमंताच्या निळ्या घोडीवरून, ऐलमा पैलमा करत सासर माहेरची वैश्विक स्पर्धा टिकवून आहेत हे एक उपकारच म्हणायला हवेत. मराठी संस्कारात वाढल्याने भोंडलाच प्रिय. आणि गरबा खेळायला कधीच गेलो नसल्याने गरब्याला उगाच विरोधही नाही.
टीव्हीवर गाण्याचे एवढे शोज आहेत. तिथे नामांकित परीक्षक जवळपास प्रत्येक गाण्यावर रडून दाखवतात, उभे राहून टाळ्या वाजवतात, स्पर्धकांना बोलावून मिठ्या मारतात… देशात खरोखरच इतके महान गायक निर्माण होतायत की हे सगळं कॅमेर्यासाठी? आम्हाला भावुक बनवून मूर्ख बनवण्यासाठी?
त्रिविक्रम रेंदाळकर, बेळगाव
– अहो हल्ली फ्रोझन फूड मध्येही घरी आणून तळून खाण्यासाठी ताजे पॅकबंद बटाटे वडे, खरवसाची पावडर, तळलेलं आईस्क्रीम वगैरे अनेक कल्पनातीत पदार्थ बाजारात विक्रीला आलेले आहेत. तिथं या अशा कार्यक्रमांचं काय घेऊन बसलाय तुम्ही?