उत्कर्षाला आत्ता जोगदेवांच्या घरापाशी हे सगळं आठवलं आणि ती थोडी अलर्ट झाली. नीरज नक्की कशामुळे असा उदास असेल? जोगदेव दांपत्य लोकांपासून काही लपवत होतं का? त्यांनी त्याला काही शिक्षा केली होती की आणखी काही? निगडे महाराजांकडे जाण्याचं कारण काय होतं? उत्कर्षाला आता ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं वाटू लागलं.
—-
नव्या जलदगती मार्गाच्या कामाला विरोध करायला ललिताबाई जोंधळे येणार, म्हणून उत्तमनगरमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला होता. ललिताबाई आक्रमक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अनेक आंदोलनं करून त्यांनी सामाजिक प्रश्न मार्गी लावले होते. त्यांनी एखादी भूमिका घेतली की त्या जिद्दीने तो लढा लढतात आणि प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत, अशी ख्याती होती. आजपर्यंतच्या वाटचालीत पाणी, गावांचा विकास, अनधिकृत बांधकामांविरुद्धचा लढा, असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते.
शेतातून जाणार्या जलदगती मार्गाला पंचक्रोशीतल्या सगळ्याच गावांचा विरोध होता. काही महिने हे आंदोलन सुरू होतं आणि आता त्यात ललिताबाईंनी लक्ष घातलंय, म्हटल्यावर ते यशस्वी होणार, याबद्दल सगळ्यांना खात्री होती. ललिताबाई आल्या आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला.
“ग्रामस्थ एकजुटीचा विजय असो!’’
“ललिताबाई झिंदाबाद!’’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
ललिताबाईंनी जोरदार भाषण ठोकलं आणि सरकारनं परस्पर नव्या मार्गाला मंजुरी दिल्याबद्दल जोरदार निषेध केला. शेतकर्यांचा विरोध डावलून हा रस्ता केला तर आमरण उपोषणाचा इशाराही दिला. दिवसभर आंदोलन सुरू राहिलं आणि भूमिपूजन कार्यक्रम रद्द करावा लागला.
ललिताबाईंच्या कारकिर्दीत आणखी एका यशस्वी लढ्याची भर पडली. सगळ्यांच्या मनातली त्यांची प्रतिमा आणखी उजळली. सामाजिक प्रश्नांसाठी त्या जिवाची पर्वा न करता लढतात, सगळ्यांना न्याय मिळवून देतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
फक्त उत्तमनगरातलाच नाही, तर राज्याच्या कुठल्याही भागातला सामाजिक प्रश्न असेल, तरी ललिताबाईंनीच त्यात लक्ष घालावं आणि तो सोडवावा, यासाठी त्यांच्याकडे सतत संपर्क केला जात असे. त्यांच्याच जवळच्या भागात निगडे महाराजांचं प्रस्थ अलीकडे वाढू लागलं होतं. अंधश्रद्धेच्या विरोधात लढणारी एक सामाजिक संघटना त्यांच्याविरोधात सातत्यानं आंदोलन करत होती. ललिताबाईंना या विषयात लक्ष घालावं, यासाठी त्यांना गार्हाणं घालण्यात आलं.
“तुम्ही म्हणत असाल, तर मी या प्रश्नात नक्की लक्ष घालेन. त्या महाराजांनी काही चुकीचं केलं असेल, तर त्यांना कठोर शिक्षा होईल.’’ असं आश्वासन त्यांनी दिल्यामुळे कार्यकर्त्यांना हायसं वाटलं.
काही दिवस गेले, ललिताबाई या महाराजांना भेटूनही आल्या. मात्र त्यांच्या आश्रमात काहीच चुकीचं घडत नसल्याची त्यांची खात्री पटली. त्यांनी तसा निर्वाळाही देऊन टाकला. निगडे महाराजांबद्दलच्या तक्रारी मात्र अधूनमधून सुरूच होत्या. आश्रमात काही धनिक लोक जातात, त्यांच्याकडून काही अनैतिक कामे करवून घेतली जातात, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकारही महाराज सुचवतात आणि ही धनिक मंडळी ते पार पाडतात, अशा तक्रारी होत्या. त्याबद्दल पुरावे मात्र कधीच समोर आले नव्हते. पोलिसांकडे तक्रारी झाल्या, तरी पुरावे नसल्यामुळे पोलिसांनी काही कारवाई केली नव्हती. महाराजांना समाजातून पाठिंबा असल्यामुळे त्यांच्याविरोधात मोठं आंदोलनही उभं राहत नव्हतं.
एकदा एका मुलाचा बळी देण्याच्या प्रकरणात निगडे महाराजांचा हात असल्याची तक्रार पोलिसांकडे आली आणि पोलिसांना दखल घेणं भाग पडलं. त्यांनी महाराजांच्या सगळ्या कारभाराची कसून चौकशी सुरू केली. इन्स्पेक्टर जमादार यांच्याकडे तपासाची सूत्रं आली. प्रकरण नाजूक होतं, महाराजांचा भक्तपरिवारही मोठा होता, त्यामुळे ते नीट हाताळावं लागणार, याची जमादार साहेबांना कल्पना होती. त्यांनी स्वतः थेट लक्ष न घालता विश्वासू माणसांकडून सगळी माहिती मिळवण्याचं तंत्र अवलंबलं. यावेळी मात्र ललिताबाईंनी लगेच लक्ष घातलं. महाराज दोषी असतील, तर त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, अशी ठाम भूमिका घेतली. पोलिसांवर आणखी दबाव वाढला, पण कसून तपास करूनसुद्धा पुरावे मात्र मिळाले नाहीत. निगडे महाराजांच्या आश्रमावर आलेलं गंडांतर टळलं. पुन्हा सगळे व्यवहार सुरळीत सुरू झाले.
ललिताबाईंच्या बरोबर सामाजिक आंदोलनांमध्ये हल्ली एक तरुणी दिसू लागली होती. ती त्यांची मानलेली मुलगी आहे, असं सगळे म्हणत. त्याही तिच्यावर तेवढीच माया करत, कधीकधी तिचा सल्लाही घेत. सहा महिन्यांत तिनं मोठी प्रगती केली होती. काही वेळा ललिताबाई दुसरीकडे कुठे गुंतलेल्या असतील, तर आंदोलन स्वतःच्या जिवावर पार पाडण्याएवढी ताकदही तिनं कमावली होती. गरीबीतून वर आलेली ही मुलगी होती उत्कर्षा गोंदकर. उत्कर्षा आता ललिताबाईंच्याच बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये राहत होती. अर्थात, कुठलेही उपकार म्हणून राहायचं नाही, असं तिचं तत्त्व होतं, म्हणूनच तो ललिताबाईंनी नाकारलं तरी ती त्यांना नियमित भाडं देत असे.
एका गरीब कुटुंबाच्या घरावर आलेलं संकट टाळण्यासाठी ललिताबाईंनी पुढाकार घेतला होता. त्या कुटुंबाचं घरच अनधिकृत असल्याचा सरकारी अधिकार्यांचा दावा होता, त्याविरोधात ललिताबाई खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून दिला. तेव्हापासून ते जोगदेव दांपत्य नियमितपणे ललिताबाईंना भेटायला येत असे. त्यांना तीन वर्षांचा नीरज नावाचा गोड मुलगाही होता. उत्कर्षालाही या नीरजचा लळा लागला होता. आईवडील ललिताबाईंशी बोलत असताना छोटा नीरज उत्कर्षाताईबरोबर अंगणात, तिच्या घरात खेळत बसे. ताईबरोबर तो एवढा रमत असे, की जाताना निघायचं नावही काढत नसे.
हल्ली काही दिवसांपासून मात्र नीरज येईनासा झाला होता. जोगदेव दांपत्यही थोडं काळजीत दिसत होतं. उत्कर्षाने विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधी नीट उत्तर दिलं नाही. हे दांपत्य अधूनमधून निगडे महाराजांकडेही जातं, असं उत्कर्षाच्या कानावर आलं. काहीतरी गडबड असावी, असं तिला वाटलं. ललिताबाईंच्याही कानावर याबद्दल घालावं असा विचार तिनं केला, पण तो विषय राहून गेला.
“त्या दोघांची निगडे महाराजांवर भक्ती आहे. आता महाराजांबद्दल आपल्या कानावर काय काय येत असतं, तेच मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण गरीब, भोळी माणसं आहेत. त्यांच्या मनातले समज दूर करणं एवढं सोपं नाही,’’ ललिताबाईंनी स्वतःच उत्कर्षाला समजावलं. तिलाही ते पटलं असावं. “बघू, आपण प्रयत्न करूच,’’ ललिताबाईंनी आश्वासन दिलं.
दरम्यानच्या काळात महाराजांच्या आश्रमात कसलीतरी तयारी सुरू आहे, अशा चर्चाही गावात सुरू होत्या. नेमकं काय, याबद्दल मात्र कुणालाच माहिती नव्हती.
बरेच दिवसांत नीरज भेटला नाही, म्हणून उत्कर्षानं स्वतःच त्याच्या घरी भेटायला जायचं ठरवलं. ती जोगदेवांच्या घरी पोहोचली, पण ते सगळेच कुठेतरी गावाला गेल्याचं शेजारी सांगण्यात आलं. असे अचानक कुठे गेले असतील, असा तिला प्रश्न पडला. हल्ली तिचा जोगदेव दांपत्याशी काही संबंध आला नव्हता, पण तिनं चारच दिवसांपूर्वी नीरजशी बोलण्यासाठी त्यांच्या घरी फोन मात्र केला होता. नीरज भेटला नाही, निदान त्याच्याशी फोनवरून तरी बोलू द्या, असा आग्रह धरला होता. नीरज फोनवर आला, पण त्याचा नेहमीसारखा मूड नाही, हे उत्कर्षाला लक्षात आलं. तिनं त्याला खुलवण्यासाठी काही प्रश्न विचारले, पण नीरज मात्र गप्प गप्प होता. शेवटी त्याला बरं नाहीये, असं सांगून त्याच्या आईनेच त्याच्याकडून फोन काढून घेतला.
उत्कर्षाला आत्ता जोगदेवांच्या घरापाशी हे सगळं आठवलं आणि ती थोडी अलर्ट झाली. नीरज नक्की कशामुळे असा उदास असेल? जोगदेव दांपत्य लोकांपासून काही लपवत होतं का? त्यांनी त्याला काही शिक्षा केली होती की आणखी काही? निगडे महाराजांकडे जाण्याचं कारण काय होतं? उत्कर्षाला आता ह्या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्त्वाचं वाटू लागलं. तिनं आसपास चौकशी केली आणि तिथून मिळालेल्या माहितीवरून मनाशी काहीतरी निश्चित केलं. घाईघाईनं एक फोन केला.
संध्याकाळची वेळ होती. गावाबाहेरच्या एका निवांत ठिकाणी असलेल्या छोट्याशा बंगलेवजा घरापाशी सामसूम दिसत होती. बाहेर एक दोन माणसं उभी होती. आत कुणी येत नाही ना, यावर त्यांची नजर होती. बंगल्यात कसलीतरी तयारी सुरू असावी, असं दिसत होतं. एक दोन माणसं आतबाहेर ये-जा करत होती. थोडा आणखी अंधार झाल्यावर आतली लगबग वाढली. हळूहळू पूर्णच अंधार झाला. अमावस्येची रात्र होती, त्या जागेच्या आसपास फारशी वस्ती नव्हती, त्यामुळे तिथे काय चाललंय, याची खबर कुणाला लागण्याचा प्रश्न नव्हता. थोडावेळ गेला आणि एक मोठी गाडी दारापाशी उभी राहिली. गेट उघडलं गेलं, गाडी आत गेली आणि गेट पुन्हा बंद झालं. गाडीतून काही मंडळी उतरून बंगल्यात गेली.
साधारण दहा-साडेदहाच्या सुमारास गेटपाशी पुन्हा गडबड झाली. बाहेरच्यांना अडवण्यासाठी तिथे उभ्या असलेल्या गार्डसना कुणीतरी हटकत होतं. त्यांच्याशी वादावादी झाली आणि गाडर््स ऐकत नाहीत, म्हटल्यावर बाहेरून आलेल्या मंडळींनी त्यांना धरून बाजूला नेलं, जबरदस्तीनं एका गाडीत कोंबलं. आता चार पाचजण दबक्या पावलांनी बंगल्याच्या आवारात आणि मग बंगल्यात घुसले.
बंगल्याच्या मागच्या बाजूला जास्त गडबड होती. आत घुसलेली माणसं थेट तिथे गेली. बहुधा त्यांनी आधीच काहीतरी ठरवलं होतं.
“महाराज, तुमचा खेळ खलास! मुकाट्यानं स्वतःला आमच्या स्वाधीन करा. अंधश्रद्धा पसरवून मुलाचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय,’’ इन्स्पेक्टर जमादारांचा करडा आवाज त्या जागेत घुमला. नरबळी देण्यासाठी सगळी तयारी करून बसलेल्या निगडे महाराजाची पाचावर धारण बसली. त्यानं उठून पळायचा प्रयत्न केला, पण आधीपासूनच सावध असलेल्या पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदारांना तिथेच अडवलं. महाराजांच्या एका दांडगट रक्षकाच्या एवढ्या जोरात कानाखाली मारली गेली, की तो खालीच पडला. त्यानं वर बघितलं, तर थोबाडीत मारणारा तो कणखर हात पुरुषाचा नाही, एका तरुणीचा होता. त्याच तरुणीनं मग एका कोपर्यात घाबरून बसलेल्या नीरजकडे धाव घेतली. त्याला उचलून घेतलं. तिच्याकडे बघून नीरजचे डोळे चमकले.
“उत्तूताई, तू…?’’ तो म्हणाला. उत्कर्षाच्या डोळ्यांत पाणी आलं.
“हो, तुझी उत्कर्षाताई. आता मी आलेय. अजिबात घाबरायचं नाही,’’ तिनं नीरजला धीर दिला, मग थोडंसं रागानं आणि नाराजीनं त्याच्या आईवडिलांकडे बघितलं.
“तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी या कोवळ्या पोराचा बळी द्यायला निघाला होतात? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला!’’ तिनं दोघांना सुनावलं. ते फक्त मान खाली घालून अश्रू ढाळत राहिले.
“वेल डन, सबइन्स्पेक्टर उत्कर्षा!’’ इन्स्पेक्टर जमादारांनी तिच्याकडे बघून शाबासकी दिली आणि जोगदेव दांपत्याला आश्चर्याचा धक्का बसला. आपण पोलीस दलातच असल्याचं आणि त्यांच्या मदतीसाठीच इथे आल्याचं उत्कर्षानं त्या दोघांना सांगितलं.
“सर, आणखी एक काम बाकी आहे ना. महत्त्वाच्या आरोपीला पकडण्याचं!’’ असं म्हणून उत्कर्षानं जमादार आणि बाकीच्या पोलिसांना खूण केली. या जागेच्या मागच्याच बाजूला आणखी एक छोटी खोली दिसत होती. पोलीस पथकानं तिथेही फिल्डिंग लावलीच होती. जमादार आणि उत्कर्षा तिथे घुसले. ते बाहेर आले, ते ललिताबाईंना घेऊनच.
“तुमच्या व्यवसायात बरकत यावी, यासाठी तुम्ही या भोंदू महाराजाच्या नादाला लागलात. या गरीब जोडप्याच्या निरागस मुलाचा बळी देण्याचा तुमचा इरादा होता. त्यासाठी त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतलात! तुमच्या खोट्या समाजसेवेचा बुरखा आम्ही टराटरा फाडलाय, ललिताबाई! समाजाला तुमच्यासारख्या खोटारड्या, लबाड माणसांची नाही, सबइन्स्पेक्टर उत्कर्षासारख्या लढाऊ आणि प्रामाणिक माणसांची जास्त गरज आहे!’’ जमादारांनी त्यांना सुनावलं.
सगळ्या आरोपींना गाडीत कोंबून पोलिसांची गाडी रवाना झाली. घाबरलेल्या नीरजला सबइन्स्पेक्टर उत्कर्षाताईनं त्याच्या मावशीकडे सोपवलं. आता कुणाचीही भीती न बाळगता नीट शाळेत जाणार, खेळणार आणि नेहमी भेटायला येणार, असं प्रॉमिसही केलं. चॉकलेट दिल्यावर त्याचा चेहरा आणखी खुलला आणि उत्कर्षाताईनं गोड पापी घेऊन त्याचा निरोप घेतला.
– अभिजित पेंढारकर
(लेखक चित्रपट आणि मालिकालेखनात कार्यरत आहेत.)