नोव्हेंबर १९९४मध्ये नाशिक येथे शिवसेनेचे चौथे शिबीर संपन्न झाले. १९९५ साली होणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘शिवसेना-भाजप युतीचा भगवा विधानसभेवर फडकणारच!’ असा निर्धार शिवसेनाप्रमुखांनी केला. शिवसैनिकांत अपूर्व उत्साह संचारला. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा क्षेत्राप्रमाणे संघटनात्मक बांधणी झाली होती.
शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महाराष्ट्रातील गरीब जनता, शेतकरी, बेरोजगार तरुण, सामान्य जनता काँग्रेसच्या सरकारला कंटाळली होती. १९९२-९३ची हिंदू-मुस्लिम दंगल आणि अतिरेक्यांनी मुंबईत घडवून आणलेले बॉम्बस्फोट यामुळे मराठी जनतेच्या व हिंदूंच्या मनात काँग्रेस सरकारवर राग होता. सर्वत्र सत्ताधारी विरोधी वातावरण होते. महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा होता.
दरम्यान, महाराष्ट्रात फेब्रुवारी १९९५ साली विधानसभा निवडणूक घेण्याचे ठरले. मग महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रचाराची पहिली सभा ३१ डिसेंबर १९९४ रोजी घेण्यात आली. गिरगाव चौपाटीवरील विराट सभेने प्रचाराचा झंझावात सुरू झाला. शिवसेनाप्रमुख आणि अडवाणी यांच्या आशीर्वादाने व उपस्थितीत विराट सभेत विधानसभेवर भगवा फडकविण्याचा संकल्प करण्यात आला. या प्रचारसभेत बाळासाहेबांनी ग्वाही दिली की महाराष्ट्र व गुजरातमध्ये आपण विधानसभा जिंकल्या, तर केंद्रात भाजप सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही. युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात गरीबांना एक रुपयात झुणका-भाकर, पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव आणि २७ लाख बेरोजगारांना रोजगार यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख होता.
शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्र पिंजून काढला, तर उद्धवजी ठाकरे हे निवडणूक प्रचाराची व्यूहरचना पाहत होते. त्यांनी तयार केलेली ‘अजिंक्य’ ही व्हिडिओ टेप सर्वत्र गाजली. निवडणुकीचा निकाल लागला. मुंबईत ३४ पैकी ३० मतदारसंघातून युतीचे उमेदवार निवडून आले, तर संपूर्ण महाराष्ट्रातून युतीचे १३८ आमदार निवडून आले. शिवसेना ७३ जागांवर विजयी झाली. शिवसेना-भाजप युतीने सत्ता स्थापनेचा दावा केला. मंत्रालयावर युतीचा भगवा फडकला आणि शिवसेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. जनतेचे प्रश्न सुटू लागले. जनतेला आपले सरकार वाटू लागले. १९९५-९९ हा काळ शिवशाही सरकारचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
पक्षीय बलाबल असे होते. एकूण जागा- २८८, शिवसेना- ७३, भाजप- ६५, काँग्रेस- ८०, जनता दल- ११, समाजवादी पार्टी- ३, नाग विदर्भ आंदोलन समिती- १, मा.क.प- २, अपक्ष- ४५, शेकाप- ६, महाराष्ट्र विकास काँग्रेस- १, भारिप- १.
सर्वसामान्य जनता, शिवसैनिक यांच्याच बरोबरीने शिवसेनाप्रमुखही या क्षणाची वाट पाहत होते… विधानसभेवर भगवा फडकण्याची. तो महाराष्ट्राच्या भाग्याचा क्षण येऊन ठेपला. आई भवानीच्या आशीर्वादाने १४ मार्च १९९५ रोजी शिवतीर्थावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना नेते प्रिं. मनोहर जोशी यांनी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तमाम शिवसैनिकांच्या व जनतेच्या साक्षीने शपथ घेतली. १९९५मध्ये महाराष्ट्र शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार झाले! एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला.
मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे तर नक्की झाले. ‘जोशी’ मुख्यमंत्री होणार हेही ठरले. पण मनोहर की सुधीर जोशी कुठले जोशी होणार याविषयी उत्सुकता शिवसैनिकांत होती. सुरवातीस सुधीर जोशी यांचे नाव आघाडीवर होते. शिवसेनेतील एक सुशिक्षित, सुसंस्कृत, मृदू स्वभाव आणि लोभस व्यक्तिमत्त्व सुधीर जोशी यांचे होते, तर उच्चशिक्षित, प्रशासकीय अनुभव आणि सर्वांना बरोबर घेऊन प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी असणारे मनोहर जोशी होते. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार प्रथमच महाराष्ट्रात सत्तेवर येणार होते. तेव्हा कणखर भूमिका घेणारी व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर असावी असा निष्कर्ष युतीच्या नेत्यांनी काढला असावा. त्यावेळी अशीही चर्चा होती की शरद पवार, प्रमोद महाजन यांनी मनोहर जोशींच्या नावाचा आग्रह धरला. सुधीर जोशींपेक्षा मनोहर जोशींचे नेतृत्व हे राज्याचा गाडा हाकण्यास कुशल आहे हे शिवसेनाप्रमुखांना पटवून देण्यात यशस्वी ठरले आणि मुख्यमंत्रीपदाची माळ मनोहर जोशी यांच्या गळ्यात पडली. शिवसेना-भाजप युतीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शिवसेना भवनमध्ये घेण्यात आली. या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी मनोहर जोशी यांचे, तर उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांचे नाव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते.
दुसर्याच दिवशी १४ मार्च १९९५ रोजी शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी जोशी-मुंडे यांना शपथ दिली. शिवसेनेचा मुख्यमंत्री १४ मार्च १९९५ रोजी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ भव्य सोहळ्यात घेणार म्हटल्यावर युतीमधील शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांत पराकोटीचा उत्साह संचारला होता. मुंबई आणि उपनगरांतून ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर वगैरे ठिकाणांहून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतील, शाखाशाखांतील शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने झुंडीच्या झुंडीने भगवी निशाणे फडकवीत आणि भवानीमाता, शिवसेनाप्रमुख, शिवसेना आणि मनोहर जोशी यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत शिवतीर्थाच्या दिशेने जात होते. वातावरणातील उत्साह, जल्लोष आणि आनंद शब्दातीत होता. शिवतीर्थावर व्यासपीठाच्या दृष्टीने मोक्याची जागा बैठकीस मिळविण्याचा सार्यांचाच प्रयत्न होता. लेझीम, ढोल, ताशे, झांजा आणि टाळ्या वाजवीत जथ्थेच्या जथ्थे दुपारपासून गुलालाची उधळण करीत, भगवे ध्वज उंचावीत आणि फडकवीत शिवतीर्थाच्या दिशेने जाताना दिसत होते. वातावरणास एक विलक्षण उत्साहाची, उन्मादाची आणि आनंदाची झिंगच आलेली होती. रस्त्यावर मोठमोठे फलक, बॅनर्स, पताका आणि कमानी उभारलेल्या होत्या. या देदीप्यमान सोहळ्यास एक लाखाहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.
शिवतीर्थावरील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या देखण्या व भव्य पुतळ्याजवळ भव्य, उंच आणि रूंद व्यासपीठ उभे केलेले होते. व्यासपीठासमोरच्या पहिल्या रांगेत शिवसेनेचे भाग्यविधाते आणि ‘किंगमेकर’ शिवसेनाप्रमुख अतिशय प्रसन्न, तृप्त अशा हास्यमुद्रेने बसलेले होते. शिवतीर्थावर गेल्या तीस वर्षांत व्यासपीठासमोर श्रोत्यांत व प्रेक्षकांत ते प्रथमच बसलेले असावेत! गळाबंद पांढरा शुभ्र झब्बा आणि सलवार, गळ्यात रुद्राक्षांची एक पदक असलेली दुहेरी माळ, काळ्या मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि कपाळावर उभा ठसठशीत कुंकुमतिलक! स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या डोळ्यांतून आणि हसण्यातून प्रतीत होत होता.
शिवसेनाप्रमुख १५ मार्च १९९५ रोजी मंत्रालयात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. त्यांनी शिवतीर्थावर अफाट महासागराच्या, मावळत्या सूर्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने शपथ घेतल्यानंतर हातात भगवा झेंडा घेऊन मंत्रालयात प्रवेश केला होता. सर्वत्र उत्सावाचे वातावरण होते आणि ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा ऐकू येत होत्या. दोन्ही नेते मंत्रालयात येताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली आणि आज बाळासाहेब मंत्रालयात आल्याने शासकीय कर्मचार्यांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले. नंतर १४ मंत्र्यांचा शपथविधी झाला. हा शपथविधी राजभवनावर झाला आणि त्यात सुधीर जोशी, अण्णा डांगे, प्रमोद नवलकर, हशू अडवाणी, शोभा फडणवीस आदी मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. शिवसेना-भाजप युती सरकारला १२ अपक्ष व शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा मिळाला, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ‘बहुमत सिद्ध करण्यास कोणतीही अडचण येणार नाही,’ असे आत्मविश्वासाने जाहीर केले.
जनतेला न्याय देणारा शिवशाही सरकारचा कारभार
राज्यात जातीय तंटा होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम समाजाच्या नेत्यांची बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बोलावली. या बैठकीत ए. ए. खान, मौलाना गुलजार आझमी, सबदरअली वहीद अली, फाजल अहमद शहा, शबाब अहमद यांसारखी प्रमुख, प्रतिष्ठित मुस्लिम मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना संरक्षणाचे आश्वासन दिले.
दरम्यान, ‘बॉम्बे’ हा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित करण्यास मुस्लिम संघटनांनी विरोध केला. चित्रपटातील नायिका मुंबईला परतत असताना कुराणातील काही आयतीचे वाचन सुरू करते, असे दृश्य चित्रपटात होते. त्याला मुस्लिम समाजाचा आक्षेप होता. मुख्यमंत्र्यांनी अल्पकाळासाठी चित्रपटाला स्थागिती दिली. गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी टाडा कायदा कायम ठेवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीमाप्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्या प्रतिमेचे दहन कर्नाटकात बंगलोर येथे करण्यात आले. ‘मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतर पाकिस्तानशी युद्ध करायला हवं होतं. पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याची ही वेळ होती,’ या मुख्यमंत्र्यांच्या एका विधानावरून पुन्हा खळबळ उडाली.
मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. नव्या गृहनिर्माण मंत्र्यांसह त्यांनी शिवसेना भवनामध्ये जनता दरबार घेतला. असंख्य नागरिकांच्या तक्रारी आणि गार्हाणी त्यांनी स्वीकारली. जवळजवळ चार तास मुख्यमंत्री निवेदने स्वीकारीत होते. नंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात परदेशी गुंतवणूक वाढावी म्हणून अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंड या देशांचा दौरा केला. त्यांच्याबरोबर सरकारी अधिकारी सुद्धा गेले. दौर्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री जोशी यांचा मूळ गावी नांदवी परिसरात जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, राज्यातील जनतेला पोटभर अन्न-पाणी देण्यावर माझा भर राहील. मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला.
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की, ‘केंद्राच्या आदेशाची वाट न पाहता राज्यात समान नागरी कायदा आणू.’ मुख्यमंत्र्यांनी १९८५ ते १९९५च्या दरम्यान दाखल करण्यात आलेले शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवरचे सर्व खटले मागे घेतले. चर्मकार समाजाच्या हितासाठी त्यांनी चर्मकारांना भागभांडवल देण्याची घोषणा तसेच आयटीआयसारखी केंद्रे स्थापन करण्याची घोषणा आणि गटई कामगारांना स्टॉलसाठी जागा देण्याची घोषणा केली. युती सरकारचे काम एवढे धडाक्याने सुरू होते की सभागृहातील सर्वच्या सर्व ४० अपक्षांनी शिवशाही सरकारला पाठिंबा दिला आणि म्हणून जेव्हा एकदा ६ डिसेंबर १९९५ रोजी सभागृहात विश्वासदर्शक ठराव आला, त्यावेळी तो ठराव दणदणीत १७४ मते युतीच्या बाजूला पडून मंजूर झाला.