दोन हजार सालात ‘यदाकदाचित’चा जन्म व्यावसायिक रंगभूमीवर झाला. आज चक्क तेवीस वर्षे उलटली तरीही त्यातली जादुगिरी कमी झालेली नाही. एखादा तरबेज जादुगार डबा रिकामा असल्याचे दाखवितो आणि बघता बघता त्यातून फुलांपासून ते सुंदरीपर्यंत सारेजण अवतरतात, तसा मंतरलेला ‘जादुई डबा’ संतोष पवारकडे कायम सज्ज आहे, ज्यातून एकांकिकेपासून ते आज नाटकांपर्यंत एकेक आविष्कार आकाराला येताहेत. ‘डबा’ मात्र कायम आहे. त्याची क्रेझ रसिकांमध्येही आहे. ‘डबा’ म्हणजे त्याच्या नाटकाची विलक्षण शैली! आणि तीच त्याची हुकमी युक्ती ठरलीय.
मूळ ‘यदाकदाचित’ तुफान गाजले, कारण त्यात रामायणात महाभारत आणि महाभारतात रामायणाची घुसखोरी होती. त्यातून हसता-हसता पुरेवाट व्हायची. एका मध्यंतरानंतर म्हणजे २००४च्या सुमारास ‘यदाकदाचित भाग दोन’ या टायटलखाली पुन्हा नवा डाव मांडला गेला. त्यात गाजलेल्या व्यक्तिरेखांना एकत्र आणून त्यांची घुसखोरी दाखवली गेली. ‘नटसम्राट’, ‘ती फुलराणी’, ‘पुरुष’, ‘विच्छा’, ‘हसवाफसवी’ यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा आणून हसवणुकीचा खेळ रंगविला गेला. नंतर वीसेक वर्षांच्या मध्यंतरानंतर पुन्हा ‘यदाकदाचित रिटर्न्स’ आले. पण काही अडचणींमुळे त्याचे प्रयोग थांबले, कोरोनाही डोकावला आणि २०२३ या वर्षात पुन्हा एकदा ‘रिटर्न्स’ नव्या ताकदीने अवतरलंय. अशा प्रकारे २००० वर्षापासून या नाटकाला, शैलीला, टायटलला पुनर्जन्म मिळाला. नाट्य वाटचालीत असे हे अमरत्व दुर्मिळच म्हणावं लागेल.
आता कथानकाबद्दल… अर्थात कथेपेक्षा सादरीकरणाचाच नेहमीप्रमाणे वरचष्मा ठरतो. कसंही करून हसवायचंच हेच पक्कं ठरवून सारा ‘नाट्यखेळ’ रचण्यात आलाय. बाहुबली आणि कटप्पा या चित्रपटात गाजलेल्या व्यक्तिरेखा यात येतात. चित्रपटातील प्रसंगांना त्यातून उजाळा मिळतो. शिवकाळातला शाहिस्तेखान. ज्याची बोटं कापली गेलीत तोही बिनबोटाचा ‘खान’ येतो. रामायण, महाभारत याचेही विस्मरण कथानकाला झालेलं नाही. महाभारतातले बाबाश्री, आयेश्री, शिशुपाल तसेच बाहुबलीतील देवसेना, भल्लाळदेव सारे प्रगटतात. एकेकाळी ‘चांदोबा’ या प्रसिद्ध मासिकात गाजलेल्या विक्रम-वेताळमधला वेताळ एकेकाच्या पाठीवर बसण्यासाठी धडपड करतोय. अकबर राजाच्या दरबारातील बिरबल येतो. आजची गाजलेली शांताबाई, क्रिकेटपटू, डोळे बांधलेली न्यायदेवता, अशा एक से बढकर एक व्यक्तिरेखा इथे एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकाच्या तर्हा म्हणजे अजबच! घुसखोरीचा कळसच!!
यात दोन गट आहेत. शत्रुत्व आहे. कौटुंबिक कलह आहेत. हक्कांसाठी स्पर्धा आहे. मोठा बंधू बाहुबली आणि छोटा भाऊ भल्लाळदेव. हे दोघे एकमेकांसमोर उभे असतात सत्तेच्या खुर्चीसाठी. दोघांच्या गटात अन् गोटात जुंपते. वारसदार कोण? नेतृत्व नेमकं कुणाकडे यासाठी अखेर क्रिकेटचा सामना सुरू होतो. देवसेना आपल्या दिराला पराभूत करते. सत्तेच्या मागे न लागता शेती करण्यासाठी आयेश्री, बाबाजी शेतीवर जातात. पण श्रीमंतीत, वैभवात असलेल्यांची कष्टाची कामे करतांना तारेवरची कसरत होते. शेतकरी, कष्टकरी यांच्या वेदना, दुःख, जगणं हे त्यातून प्रकाशात येते.
हसत-खेळत, नाचत-गातं चाललेलं हे कथानक शेवटच्या प्रसंगात धक्कातंत्राने अक्षरशः रडविते आणि हीच खासियत ‘संतोष’रूपी नाटककाराची आहे. नाटकात नव्या पिढीचे बिनचेहर्याचे ताकदीचे कलाकार निवडून दिग्दर्शकाने बाजी मारली आहे. त्यात कुठेही उजवा-डावा करण्याची वेळ येत नाही, एवढी ऊर्जा या ‘टीम’मध्ये भरगच्च भरलीय. खुद्द संतोष पवार या आपल्या ‘होम पिच’वर तुफान उभं करतो. सात-आठ भूमिकांतून तो वेगळेपणा साकार करतो. त्यात मावशी, मद्रासी, शीख, रामशास्त्री प्रभुणे या भूमिका लक्षवेधी ठरतात. देहबोली आणि भाषेचा लहेजा अप्रतिमच! प्रत्येक एन्ट्रीला त्याची दमछाक उडते, पण वेग कमी केला तर नाटकाची ताकद थांबेल, या काळजीपोटी तो सारी ‘सर्कस’ पार पाडतो. ती यशस्वीही होते.
बाहुबलीच्या भूमिकेत रोहन कदम आणि कटाप्पा (दर्शन बोरेकर) याचं बेअरिंग चांगलं आहे. भल्लाळदेव बनलेले प्रदिप वेलांडे यानेही अनेक हक्काच्या जागांवर हसे वसूल केलेत. अनिकेत कोथरूडकर याचा बिरबल शोभून दिसतो. शेतकर्याची ‘गोष्ट’ सांगण्यास सदैव सज्ज असलेला वेताळ (अभिषेक औटी) याला टायमिंगची उत्तम जाण आहे आणि सोबत निकिता सावंत (न्यायदेवता), गौरी देशपांडे (चंद्रमुखी), ओमकार गावडे (तुतारीवाला), अद्वैत हातवळणे (बाबाश्री), ओशिन साबळे (देवसेना), हर्षदा कर्वे (शिवगामिनी) यांनीही चांगली साथ दिलीय. सार्यांच्या अंगात चैतन्य भरलेलं आहे. बर्याच तालमींमुळे प्रत्येक प्रसंगात नेमकेपणा आलाय. एखाद्या व्यंगचित्राप्रमाणे सारेजण हसवत राहतात. एकापेक्षा एक सरस कलाकार, ही यातील जमेची बाजू म्हणावी लागेल.
पहिल्या ‘यदाकदाचित’ने मराठी रंगभूमीला ताकदीचे कलाकार दिले आहेत. संजय खापरे, भरत सावले, समीर चौघुले, कमलाकर सातपुते, पौर्णिमा अहिरे, किशोर चौघुले, राजेश मालवणकर यांची आठवण येत राहते. याही ‘टीम’मध्ये नव्या पिढीचे दमदार कलाकार आहेत, जे संधी मिळाल्यास आपला रंगठसा निश्चितच उमटतील यात शंकाच नाही. नाटक हे नटाला मोठ करतं, अस्ां म्हणतात, पण इथे ही ताकदीची नट मंडळी ही नाटकाला मोठं करतात (चेहरा नवीन असला तरीही!)
संहिता, दिग्दर्शन, गाणी, वेशभूषा आणि अभिनय या पंचमुखी जबाबदार्या दस्तुरखुद्द संतोष पवार याच्या हाती असल्याने त्याने चौफेर मजल मारली आहे. रामायण, महाभारत, चित्रपट, लोककला, राजकारण, प्रशासन या सर्वांवर यात भाष्य आहे. प्रादेशिक भाषा, बोलीभाषा यात असलेला गोडवा यातून गुंतवून ठेवतो. त्याच्याएवढा लोककलेचा समर्थ वापर आजवर कुणीही केलेला नाही. दोन अडीच तास यातलं नाट्य मनोरंजन नगरीची सफर घडविते आणि शेवटी शेतकर्यांची कथा-व्यथा मांडून एक सामाजिक भान अधोरेखित करते, हे महत्वाचे. पण तरीही हे नाटक नाटककारापेक्षा दिग्दर्शकाचे आहे, हेच सादरीकरणातून दिसते.
संतोषचं ‘यदाकदाचित’, पुरुषोत्तम बेर्डे यांचं ‘जाऊबाई जोरात’, केदार शिंदे याचं ‘सही रे सही’ ही नाटके तशी एकाच सुमारास रंगभूमीवर आलेली. जी तरुणाईच्या वेगळ्या संकल्पनेतून गाजलेली. ‘हाऊसफुल्ल’मुळे विक्रमी ठरलेली. आजही ही नाटके आणि त्यातला विषय हा फ्रेश वाटतो. या नाटकांनी त्याच्या लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांनी एक दबदबाच नाट्यसृष्टीत उभा केलाय. हे नोंद घेण्याजोगे.
‘सफरचंद’ नाटकातील नेपथ्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेले कल्पक नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य हे भव्य महाल किंवा राज दरबार याचा भास-आभास निर्माण करते. त्यातील देखणेपणा तसेच श्रीमंती थाट सुरेखच. अनिकेत जाधव याला लोकनृत्याची चांगली जाण असल्याने कोकणपट्टीतला ताल चांगला पकडला आहे, तो रसिकांना ठेका धरायला भाग पडतो. प्रणय दरेकर याचे संगीत आणि शीतल तळपदे याची प्रकाशयोजना चांगली आहे. संतोषची नेहमीची ‘टीम’ असल्याने भट्टी मस्त जुळली आहे. वेशभूषा-रंगभूषा या बाजू यात तितक्याच महत्वाच्या ठरतात. कारण पुराणकाळापासून ते वर्तमानकाळापर्यंतचा काळ असल्याने त्यावर विशेष लक्ष दिले आहे. ‘अॅनक्शन ड्रामा’ म्हणून रंगत त्यातून अधिकच वाढते.
एकाच प्रकारच्या शैलीच्या बंधनात अडकलेला नाटककार, दिग्दर्शक म्हणून संतोष पवारवर आज शिक्का मारला जातो. पण वेगळ्या शैलीची नाटकेही त्याच्या लेखणीतून दिग्दर्शनातून साकार झालीत. हेदेखील विसरून चालणार नाही. बबन प्रभू यांच्या गाजलेल्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या फार्सचे दिग्दर्शनही त्याने केले होते. ‘आम्ही सारे लेकुरवाळे’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ अशी अनेक नाटके त्याच्या नाट्य वाटचालीतली साक्ष आहेत. नव्या, बिनचेहर्याच्या रंगकर्मींना सोबत घेऊन त्याची नाटके सदैव सज्ज असतात, हेदेखील विसरून चालणार नाही.
मराठी माणसाला राजकारणाचे वेड आहे. काहींना राजकारण हे जरी कळत नसले, तरी तो त्यावर अधिकारवाणीने जाहीरपणे भाष्य करण्यात मागेपुढे पाहात नाही. याही नाटकात त्याने सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चांगले चिमटे काढून अनेकांच्या राजकीय टपल्या उडविल्या आहेत. ज्या हमखास हशे वसूल करतात. धनुष्यबाण, मशाल, खोके, पळापळ, हॉटेल-ओके अशा एक ना दोन… सत्तांतरावरही विडंबन बोचरे आहे. अर्थात त्यातून कुणी दुखावणार नाही, याची पुरेपूर खबरदारीही त्याने घेतल्याचे दिसते.
कॉमन माणसाच्या मनातला राजकीय कौल हा त्यातून नजरेत भरतो. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांतून मिळतो.
पावसाळ्यात मुंबई-पुणे इथली तरुणाई ही धबधब्याच्या शोधात जशी घराबाहेर पडते आणि मन भरेपर्यंत त्यात आनंद घेते. त्याचप्रकारे संतोषचं नाटक म्हटलं की गेल्या दोन पिढ्या नाट्यगृहाकडे वळतात. मग त्यात नाच-गाणी, हसणं-खिदळणं, नकला, शेरेबाजी, फिरकी-गिरकी याचा यथेच्छ आनंद घेतात. तरुणांसोबत वडीलधारी मंडळीही दोनघटका या ‘मार्मिक’तेला दाद देतात. एका झपाटलेल्या नाट्यानुभवाचा आस्वाद त्यातून मिळतो, जो नाटक संपलं तरी त्यातली ‘गंमत-जंमत’ ही आठवणीतून ताजीतवानी होते. आणि हेच वैशिष्ट्य आहे ‘यदाकदाचित रिटर्न्स’ या आगळ्यावेगळ्या आणि मोकळ्याढाकळ्या शैलीचं! ‘पवार’ची ‘पॉवर’ असलेल्या या नव्या चैतन्यदायी ‘रिटर्न्स’चे स्वागत…
यदाकदाचित रिटर्न्स
लेखन, दिग्दर्शन : संतोष पवार
नेपथ्य : संदेश बेंद्रे
प्रकाश : शीतल तळपदे
संगीत : प्रणय दरेकर
नृत्ये : अनिकेत जाधव
गीते, वेशभूषा : संतोष पवार
सूत्रधार : श्रीकांत तटकरे
निर्मात्या : मानसी किरण-केळकर
निर्मिती संस्था : सोहम/ भूमिका थिएटर्स.