महाराष्ट्रातील निवडणुकीचा सावळा गोंधळ आणि तमाशा संपल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या ताबडतोब भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला निघाला. त्याच या प्रतिक्रिया…
– नमस्कार मुख्यमंत्री साहेब. काय वाटतं निकालाविषयी?
– काय वाटणार! आमच्या सगळ्याच्या सगळ्या शीट लाखालाखाच्या आघाडीने निवडून येणारच. नाही आल्या तर ही दाढी छाटून हिमालयात निघून जाईन मी.
– पण सर्वेक्षणाचे अंदाज…
– तेल लावत गेले ते अंदाज. लक्षात ठेव, जोपर्यंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत आमच्याच असली शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार बिनधास्त निवडून येणारच. लिहून घ्या. आमच्यासाठी मोदीजींनी जेवढ्या प्रचारसभा घेतल्या, रॅली काढल्या तेवढ्या देशातल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने महाराष्ट्रात काढल्या नाहीत.
– हो ना. घाटकोपरला होर्डिंगचा एवढा भीषण अपघात होऊन वीसच्या वर निष्पाप लोक चिरडून मारले गेले, तरी तुमच्या मोदींनी त्या अपघात स्थळाजवळून मोठ्या उन्मादात नाचत, घोषणा देत असलेल्या हजारो अंधभक्तांच्या गराड्यात हात हलवून दाखवत उत्साहात रॅली काढलीच ना. केवढी ही विजयाची हाव. कसे होता तुम्ही एवढे निष्ठूर. – हे बघ पोक्या, मोदीजींविषयी बोलायची तुझी लायकी आहे का? केवढा मोठा माणूस? माझ्या खांद्यावर जेव्हा हात ठेवतो, तेव्हा माझ्या अंगात हजारो हत्तींचं बळ येतं.
– हत्तींचं नव्हे, रेड्यांचं येत असेल…
– अभद्र बोलू नकोस. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोडून माझ्या असली गटाच्या आणि भाजपाच्या सगळ्या जागा निवडून येतील हे लिहून ठेव. मिठाई खायला ये ४ जूनला.
– नमस्कार फडणवीस साहेब. अंदाज काय निकालाचा?
– मी तर निवडणुकीपूर्वीच सांगितलाय तो. देशात अब की बार चारसौ बीस पार.
– आणि महाराष्ट्रात…?
– अजितदादा आणि एकनाथ शिंदेंच्या सोडून भाजपाच्या सगळ्या…
– म्हणजे?
– काँग्रेसचे पंजे… अरे, अजितदादा आणि एकनाथजींचा पक्ष म्हणजे अळवावरचं पाणी होतं आणि आहे. त्यांना वेळीच बाजूला केलं पाहिजे. अरे, ज्यांच्या जिवावर आम्ही मोठे झालो, त्या संघाला बाजूला करायला आम्ही घाबरत नाही, तर हे नकली पक्षांचे नकली बाजीराव कोण?
– तेही बरोबरच आहे. म्हणजे मोदीजी सत्तेच्या घोड्यावर बसतील एवढा तगडा घोडा आहे तुमच्या भाजपाचा! मग एवढे घाबरल्यासारखे का दिसतात तुमचे चेहरे?
– खूप ताण पडलाय ना दोन महिन्यांत. दिल्लीलाही गेलो होतो ना शेवटच्या टप्प्यात भाषणं करायला. आमचे तिथले नेते म्हणाले की, उद्या तुम्हीही पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असाल. तोंडात सोनपापडी पडो त्यांच्या. मोदीजी त्या पदावर असताना मला त्याचा मोह नाही. २०४७ साली पंतप्रधान झालो तरी हरकत नाही. नंतर २१५०पर्यंत आमचं वेळापत्रक तयार आहे. ४ जूनला पुण्याच्या त्या भीषण अपघातस्थळावरून विजयी रॅली काढायचीय. त्याचीच तयारी करायला पुण्याला जायचंय. भेट तू नंतर. दिल्लीचा पेठा खायला.
– अजितदादा, नमस्कार. काय प्रतिक्रिया?
– एक शब्द काढू नकोस. इथे पक्षाची उत्तरक्रिया करण्याची वेळ आलीय.
– एवढी कसली गोची झालीय?
– एका आगीतून बाहेर पडलोय, तर दुसर्या फुफाट्यात फेकला गेलोय.
– काय झालंय तरी काय?
– होणार काय कप्पाळ? काकांच्या विरोधात उठलो, पण साडेसाती मागे लागलीय तेव्हापासून. तो त्या पोराने केलेला अपघात… त्या आमच्या आमदाराने नस्ती उठाठेव केली, पण मी बदनाम झालो ना त्यापायी.
– पण निवडणूक निकालाचं काय?
– खड्ड्यात गेले ते निकाल. सगळीकडून गोची झालीय माझी. कुठली झक मारली आणि या निवडणुकीच्या भानगडीत पडलो.
– म्हणजे निकालाविषयी काही बोलणार नाही तुम्ही तर…
– अजिबात नाही. जेवढा चिखलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत गेलो तेवढा अधिकच गाळात रुतत चाललोय मी. काय होणाराय माझं तेच कळत नाही. तोंड काळं करायलाही जागा नाही, इतकं आधीचं काळं झालंय ते.
– नमस्कार विनोदजी तावडे.
– नमस्कार.
– काय अंदाज वाटतो निकालांचा?
– मी एक महिना आधीच वर्तवला होता तो अंदाज. म्हणून तर एवढी धावपळ केली ना राज्यात आमच्या नेत्यांनी. बहुतेक जागा धोक्यात होत्या महाराष्ट्रात आमच्या. आता मोदीजींनी दौर्याचं पाव शतक पूर्ण केल्यावर किती फरक पडलाय निकालात ते कळेलच.
– तरी तुम्हाला काय वाटतं?
– चित्र फारसं बदललं असेल असं नाही वाटत. आम्ही वरवर उड्या मारताना दिसत असलो तरी मनातून धास्तावलो आहोत. जनता आपल्याबरोबर का नाही याचा अंदाज अगदी शेवटी शेवटी आला तेव्हा गयावया करून काही उपयोग होत नसतो. तेव्हाच तोल सावरायला हवा. लोकांच्या जिव्हाळ्याच्या समस्यांवर न बोलता नको ते विषय, नको ते आरोप, नको ती आश्वासनं देऊन काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे फटका बसणारच.
– नमस्कार शेलारमामा.
– नमस्कार, बोला.
– काय अंदाज आहे ४ तारखेचा.
– अगदी शंभर टक्के आमच्या जागा महाराष्ट्रात चाळिशी पार करणार.
– ज्या अर्थी तुमची बत्तीशी तिला साजेल असा तोंडाळपणा करतेय त्या अर्थी नक्कीच भाजपाला आणि महायुतीला धोका वाटतो.
– सोडून द्या. देशाला असा पंतप्रधान पाहिजे की तो जगाला टांग मारू शकेल.
– बरोबर आहे. स्वत:च्या देशातील जनतेला जो उत्तम टांग मारू शकतो तो जगालाही टांग मारू शकतो. पण असे टांगमारीचे धंदे किती दिवस चालणार?
– देश स्वयंपूर्ण होईपर्यंत.