शिवसेना मुस्लिमद्वेष्टी आहे. मुस्लिमविरोधी भूमिका घेऊन शिवसेना राजकारण करते. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडते. ती ‘सर्वधर्मसमभाव’ या धोरणांची खिल्ली उडवते असे एक ना अनेक आरोप शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेवर केला जातोय. परंतु शिवसेना ही राष्ट्रवादी मुसलमानांच्या विरोधात कधीच नव्हती आणि नाही. परंतु ती राष्ट्रद्रोही मुसलमानांच्या विरोधात निश्चितच आहे. जे हिंदुस्थानात राहून पाकचे गोडवे गातात, पाकधार्जिणे आहेत त्यांच्या विरोधात शिवसेना आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानचा क्रिकेट सामना चालू असताना आणि पाकिस्तान संघ विजयी झाल्यावर फटाके वाजवतात, मोहल्ल्या-मोहल्ल्यात जल्लोष करतात, अशा मुसलमानांवर नेहमीच शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. मुस्लिम विचारवंत पै. एम. सी. छगला, हमीद दलवाई, राष्ट्रपती अब्दुल कलाम अशा अनेक राष्ट्रवादी विचारसरणींच्या मुसलमानांचे शिवसेनेने नेहमीच स्वागत केले आहे. शिवसेनेत अनेक शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख मुसलमान आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून साबीर शेखसारखे राष्ट्रवादी मुसलमान सेनेत होते. ते जिल्हाप्रमुख, आमदार आणि शिवशाही सरकारमध्ये मंत्री होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे मंत्री होती. शिवसेनेने कधीही हिंदू-मुस्लिममध्ये फूट पाडली नाही, तर उलट इतर राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी दोघांनाही झुंझवतच ठेवले. पण मुसलमानांविषयी शिवसेनाप्रमुखांनी वेळोवेळी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली आहे.
१९७९ साली महाराष्ट्रात एक राजकीय चमत्कार घडला. भगवा आणि हिरवा रंग आकाशात उधळला गेला. शिवसेना आणि मुस्लिम लीग यांची युती झाली. मार्च १९७९मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे नेते गुलाम महम्मद (जी.एम.) बनातवाला यांची जाहीर सभा दक्षिण मुंबईत मस्तान तलाव येथे झाली. तुम्ही ‘जय महाराष्ट्र’ बोला तुम्हाला सर्व काही मिळेल, असे स्पष्ट आवाहन शिवसेनाप्रमुखांनी मस्तान तलावाच्या भव्य पटांगणात उपस्थित असलेल्या हजारो मुस्लिम बांधवांसमोर केले.
सदर मेळाव्यास ठिकठिकाणचे मुस्लिम तरुण मिरवणुकीने ट्रकने आले होते. ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘मुस्लिम लीग झिंदाबाद’, ‘बाळासाहेब झिंदाबाद’ अशा घोषणा ते मुस्लिम तरुण देत होते. मस्तान तलाव पटांगण व सारा परिसर भगव्या व हिरव्या ध्वजांनी बहरला होता. सर्वत्र हे झेंडे काठीला काठी लावून डौलाने फडकत होते. शिवसेनाप्रमुखांचे नेबरहूड हॉलपासून मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठावर मुस्लिम तरुणांनी मिरवणुकीने भव्य स्वागत केले. असा हा सोहळा देशातील इतिहासात प्रथमच घडत होता. व्यासपीठावर मुस्लिम लीगचे खासदार जी.एम. बनातवाला, अध्यक्ष जैदी, नगरसेवक पटेल, जिलानी व शिवसेना आमदार मनोहर जोशी, नगरसेवक सर्वश्री छगन भुजबळ, चंद्रकांत पडवळ, हरिश्चंद्र पडवळ, दत्ता नलावडे व अनेक मुस्लिम नेते उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुख भाषणात म्हणाले, ‘यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील. आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता कुठे निवडणूक नाही की काही नाही. ना आगे ना पिछे! कोणाच्या मतांचा विचार करायचा तर तसंही नाही. आजच्या या जुलूसमध्ये मी सामील झालो. शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी सर्व जातीजमातीमधील बांधवांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. धर्माच्या नावाखाली कोणीतरी भडकवतोय तेव्हा डोक्यात शांतता ठेवून आणि एकदिलाने काम करा. जातपात विसरून जा.’
या सभेनंतर थोड्याच दिवसात जनता सरकारने गोरगरीब जनतेवर लादलेली जुलमी करवाढ रद्द न केल्यास ‘फुकट प्रवास व जेल भरो आंदोलन’ सुरू होईल असा कडक इशारा शिवसेनाप्रमुख आणि बनातवाला यांनी संयुक्त मोर्चासमोर केलेल्या भाषणात दिला. सदर मोर्चाने आझाद मैदानावरून ठीक साडेतीन वाजता विधानसभेकडे जाण्यास प्रारंभ केला. रेल्वे दरवाढ त्वरित रद्द करा! देवनारची पद्धत रद्द करा! भाववाढीला आळा घाला! झोपडी रहिवाशांना सुखसोयी द्या! आदी घोषणांनी फोर्ट विभाग दणाणून गेला होता. प्रबुद्धनगर जळीतग्रस्त झोपडी संघ, श्रमिक झोपडी सुधार संघ, दारूखाना रहिवासी झोपडी संघ, रेतीबंदर झोपडी संघ, गणेश नगर झोपडी संघ, साईबाबा झोपडी संघ या मोर्चात सामील झाले होते, तसेच महिलाही खूप संख्येने सामील झाल्या होत्या. महिलांच्या कडेवर लहान मुलेही दिसत होती. मोर्चाच्या अग्रभागी एका ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराचा सुरेख देखावा सजवण्यात आला होता. माननीय शिवसेनाप्रमुख, मुस्लिम लीग प्रमुख, वामराव महाडिक, आमदार मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, झैदी, जिलानी, साबीर शेख, छगन भुजबळ ही नेतेमंडळी मोर्चाच्या आघाडीवर होती. हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांतील देशप्रेमी लोकांची युती झाली होती. दोन्ही समाज एकत्रितपणे समाजकारण आणि राजकारण करीत होता. हे राज्यकर्त्यांना पाहावले गेले नाही. त्यामुळे त्या दोघात काही काळानंतर वितुष्ट निर्माण केले गेले.
भारतीय जनता पक्ष मुस्लिम समाजाला विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व देत नाही. भाजपचा एकही मुस्लिम खासदार लोकसभेत नाही. एकही केंद्रीय मंत्री मुस्लिम समाजाचा नाही. मुख्तार अब्बास नक्वी यांना या खेपेस केंद्रीय मंत्रीपद दिले नाही. राज्यसभेवरही पुन्हा पाठवले नाही. उत्तर प्रदेशसह अनेक भाजपशासित राज्यात एकही मुस्लिम मंत्री नाही, देशात भाजपचे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही मुस्लिम लोकप्रतिनिधी नाहीत. टोकाच्या मुस्लिमद्वेष्ट्या धोरणांमुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवायला हवे. सारेच मुस्लिम राष्ट्रद्रोही व पाकधार्जिणे आहेत अशी भाजपाची मानसिकता घातक आहे.
‘जातीयवाद मग तो अल्पसंख्यांचा असो की बहुसंख्यांचा तो देशहिताच्या आड येत असेल तर त्याचा तीव्र शब्दात निषेध सर्वांनीच करायला हवा. हिंदू-मुस्लिम प्रश्नांचा केवळ पक्षीय वा राजकीय दृष्टिकोनातून विचार करून किंवा उकल करून ते सुटणार नाहीत. मूलतः हा प्रश्न हिंदू व मुस्लिम समाजाच्या मानसशास्त्राचा आहे. या मनाला गेल्या हजार वर्षांतील घटनांचे तिढे व पीळ आहेत. ते सोडवण्यास तितकीच कल्पनाशक्ती, संयम व सहनशीलता हवी व तितकाच खंबीरपणा हवा. या प्रश्नांच्या सोडवणुकीवर अक्षरशः भारताचे व पाकिस्तानचेही भवितव्य अवलंबून आहे. ‘एक घाव दोन तुकडे’ या थाटाच्या वक्तव्याने अखेरीस अनेक ‘घाव दोन तुकडे’ व (देशाचे) अनेक तुकडेच फक्त हाती येतील.’ जातीयवादावर-धर्मांध वृत्तीवर बाळासाहेबांचे हे सुस्पष्ट विचार आहेत. त्याच मार्गावरून उद्धव ठाकरे मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे शिवसेना आज संकटात असताना अनेक मुस्लिम संघटना, कोकणी मुसलमान, मुस्लिम खाटीक समाज, बोहरी समाज हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमागे भक्कमपणे उभा राहिला आहे.