• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मन:शांतीच्या मार्केटमधले सद्गुरू!

- तानाजी शेजूळ (भाग-१)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 30, 2023
in भाष्य
0

विरोध पाया पडण्याला नाही.. विरोध हा फक्त पाया पडून घेण्याला आहे.. वारकरी सुद्धा एकमेकांच्या पायावर डोकं ठेवतात.. नाही असं नाही. पण त्यांचा हा व्यवहार समान पातळीवर.. प्रेमाने चालतो. अहंकाराने नाही. वारकरी संप्रदाय हा समानतेच्या आधारावर चालतो. इथे लहान थोर असा भेद नाही. पण जग्गी शिष्यांना समानतेची वागणूक अजिबात देत नाहीत, माऊली म्हणतात तसं ते स्वतःचं स्थान भक्तांना देऊ इच्छित नाही.. त्यांना कायम आपल्या पायाशी ठेवण्याचं, त्यांना आपलं गुलाम बनवण्याचं त्याचं स्वप्न आहे.. त्याची देहबोलीसुध्दा तेच सांगते. (भाग-१)
– – –

आजच्या काळात समाजात सगळीकडे वेड्यांची संख्या खूप झपाट्याने वाढते आहे. ओशोंनी त्या काळातच सांगितलं होतं की, प्रत्येक चार व्यक्तींमागे तीन वेडे आहेत. वेडे म्हणजे मानसिक असंतुलनवाले लोक.
आता त्या काळात जर एवढे वेडे होते तर मग ह्या काळात किती असतील? तुम्हीच कल्पना करा.
लोकांचं स्वास्थ्य हरपत चाललंय हे खरं आहे. लोक प्रचंड तणावग्रस्त आहेत. अर्थात प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील.
पण हे असं का होतंय? काय चुकतंय नेमकं?
अतुल कुलकर्णी सर मागे एकदा म्हणाले होते, ‘माणसांचा हा प्रयोग फसलेला आहे.’
तसंही असेल… असो! आपल्याला काही इतक्या खोलात वगैरे शिरायचं नाहीये, त्यामुळे थोडं आटोपतं घेतो.
मुळात लोकांची अडचण अशी असते की ह्यांना कळतच नाही नेमकं काय करावं… कसं जगावं? काय चूक… काय बरोबर?
आता स्वतःला कळत नाही म्हटल्यावर कुणाला तरी विचारायला हवं. गुरू हवा. मार्गदर्शक हवा.
मग कुणाला विचारावं? कुणाला गुरू करावं?
तुकाराम महाराज म्हणतात,
‘टिळे टोपी माळा देवाचे गबाळ। वागवी ओंगळ पोटासाठी।।’
निव्वळ पोटासाठी सोंग करणारा, ढोंग करणारा गुरू नको. गुरूची निवड करण्यासंदर्भात अनेक अभंग आहेत तुकोबांचे…
पण न कळणार्‍याची अडचण अशी असते की त्याला काहीच कळत नाही. त्यामुळे आमच्या महाराजांना नेमकं काय सांगायचं आहे ते तरी कसं कळणार त्याला? नाहीच कळत. तो फसतो सोंगा ढोंगालाच. मग समाजातल्या अशा वेड्या बागड्या, न कळणार्‍या, सहज फसणार्‍या लोकांना भुलवायला काय लागतं हे धूर्त लोकांनी बरोबर हेरलेलं असतं. कारण लोकांना भुलवणे हा धंदाच असतो त्यांचा. या धंद्याचं गणितही त्यांना चांगलं माहीत असतं. स्वतःचं दुकान चालवण्यासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असतात ही मंडळी…
डॉ. श्रीराम लागूंसारखे नास्तिक मंडळी सरळ सरळ सांगून टाकतात, ‘देवाला आता रिटायर करा!’ त्यांचं म्हणणं असतं की, एक घाव दोन तुकडे करा. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी… हा झाला नास्तिक विचार.
पण हा विषय खरंच इतक्यात… एका वाक्यात संपण्यासारखा आहे?
– नाही.
ओशोंचा तर्क आपल्याला याच्याही पुढे घेऊन जातो. ओशो म्हणतात, ‘नास्तिकतेचं सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर तिथून पुढे खरा आस्तिकतेचा प्रवास सुरू होतो.’
त्यांच्या म्हणण्यानुसार, एखादी गोष्ट नाकारणे, नाही म्हणणे हे खूप सोपं असतं. पण ‘नाही’मधे आनंद नाही. आनंद हा ‘आहे’मधे आहे. त्यामुळे ‘नाही’च्या पलिकडे काय आहे त्याचा शोध घ्यावा लागेल, तेव्हा आनंद सापडेल.
मग या ‘नाही’च्या पलीकडे काय आहे?
– परमेश्वर.
आता तो कसा शोधायचा?
हिंदू धर्मामधे गुरू परंपरेचं खूप महत्व सांगितलं जातं.
‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः’
गुरूला साक्षात परब्रम्ह मानतो आम्ही.
गुरू हा संत कुळीचा राजा। गुरू हा प्राण विसावा माझा।
गुरूविन देव दुजा। पाहाता नाही त्रैलोकी।।
गुरू हाच देव. त्याला शरण गेलं की विषय संपला.
विषय संपला?
– नाही.
आता हा गुरू कसा शोधायचा? हा प्रश्न आहेच की.
पण खरं म्हणजे सर्वसामान्य माणूस हा विचार करत नाही. त्याला हा प्रश्नच पडत नाही. आणि म्हणूनच निरनिराळे ढोंगी लोकं त्याची फसवणूक करत राहतात.
गुरू कुणाला म्हणायचं?
तुकोबा सांगतात, ‘शिष्याची जो नेघे सेवा। मानी देवा समान।।’, ‘सेवा’ याचा अर्थ सर्व प्रकारची सेवा… त्यामधे पैशांच्या सेवेचा सुध्दा समावेश आहेच.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सद्गुरू म्हणवून घेणार्‍या जग्गी वासुदेव यांच्या कार्यक्रमात एखाद्याला सहभागी व्हायचं असेल तर त्याकरता पन्नास हजार रुपयांपर्यंत तिकीट लावलेलं असतं. त्यांची प्रत्येक गोष्ट विकत असते. अर्थात तिथे चालणारे अन्नदान, महाप्रसाद वगैरे कार्यक्रम सोडून. पण ते पैसे घेतात ही गोष्ट खरी आहे. यावर त्यांच्या अनुयायी मंडळींचं म्हणणं असतं की, ‘त्याशिवाय एवढी मोठी संस्था कशी चालणार?’ लोकांकडून पैसे घेऊन तुम्ही तुमची संस्था चालवता हे ठीक आहे, पण मग स्वतः जग्गी वासुदेव छानछौकीचं आयुष्य (लक्झरियस लाईफ) जगतात. ते कुणाच्या पैशांवर?
मी ना. स. इनामदारांची ‘शहेनशहा’ ही कादंबरी वाचत होतो. त्यातून असं कळलं की, औरंगजेब बादशहा टोप्या विकून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता. मग स्वतःचा उदरनिर्वाह वगैरे चालवण्यासाठी हे जग्गीजी तसं काही करतात का?
तुकारामांचं एक उदाहरण सांगतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नजराणा पाठवला होता. त्यावेळी तुकारामांनी काय केलं? ‘दिवट्या छत्री घोडे। हे तो बर्‍यात न पडे।।’ असं सांगून त्यांनी तो नजराणा परत पाठवला.
गुरू कसा असावा?
ज्ञानेश्वरीमधे एक खूप सुंदर ओवी आहे..
मला गुरू कसे लाभले याबद्दल स्वतः माऊली सांगतात, ‘आपुले पदी बैसविले..’ माझ्या गुरूंचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की त्यांनी मला त्यांचं आसनच देऊन टाकलं बसायला, असं माऊली म्हणतात.
थोडक्यात गुरू हा आपल्या शिष्याला समानतेची वागणूक देणारा असावा. अशी संतांची भूमिका आहे.
हे जग्गीजी आपल्या शिष्यांना कशी वागणूक देतात?
त्यांची ‘सन्निधी साधना’ पाहा. ह्या पॅकेजमधे त्यांच्या पायाचा फोटो, ठसा ते आपल्या भक्तांना पाठवून देतात आणि तो फोटो त्याच्या देव्हार्‍यात ठेवायला सांगतात. देव्हार्‍यात देव वगैरे काही ठेवायचा नाही.. फक्त त्या जग्गी वासुदेव यांच्या पायाचा फोटो. ‘आता इथून पुढे तुम्ही फक्त माझीच पूजा करा. मीच तुमचा देव.’
ही अहंकाराची परिसीमा आहे.
पण त्यांना मानणार्‍यांना त्याचं हे म्हणणंही मान्य आहे. त्याचा हा अहंकार देखील त्यांना मान्य आहे.
मला खरंच कळत नाही हा काय प्रकार आहे?
‘पंढरीसी लोका नाही अभिमान।
पाया पडे जन एकमेका।।’
माझ्यावर या वारकरी संप्रदायाचे संस्कार झालेले असल्याने माझे विचार हे या पद्धतीचे झालेले असतील… कदाचित…
विरोध पाया पडण्याला नाही.. विरोध हा फक्त पाया पडून घेण्याला आहे.. वारकरी सुद्धा एकमेकांच्या पायावर डोकं ठेवतात.. नाही असं नाही. पण त्यांचा हा व्यवहार समान पातळीवर.. प्रेमाने चालतो. अहंकाराने नाही. वारकरी संप्रदाय हा समानतेच्या आधारावर चालतो. इथे लहान थोर असा भेद नाही.
पण जग्गी शिष्यांना समानतेची वागणूक अजिबात देत नाहीत, माऊली म्हणतात तसं ते स्वतःचं स्थान भक्तांना देऊ इच्छित नाही.. त्यांना कायम आपल्या पायाशी ठेवण्याचं, त्यांना आपलं गुलाम बनवण्याचं त्याचं स्वप्न आहे.. त्याची देहबोलीसुध्दा तेच सांगते.
मुळात स्वतःच स्वतःला ‘सद्गुरू’ म्हणवून घेणं म्हणजे केवढा हा अहंकार ह्या माणसाचा..
संत परंपरेतील एकही संत स्वतःला हे असं सद्गुरू, जगद्गुरु वगैरे म्हणवून घेत नाहीत.. त्यांचे अभंग पाहा म्हणजे तुम्हाला कळेल.. काय म्हणतात ते स्वतःला? ‘तुका म्हणे’.. ‘नामा म्हणे’.. ‘नामयाची दासी’.. खर्‍याखुर्‍या संतांच्या अंगी ही विनम्रता दिसून येते.
संत सांगतात, ‘आधारावाचून काय सांगशी कहाणी…’ जग्गी म्हणतात, ‘मी गीता वेद शास्त्र वगैरे काही वाचत नाही. मला त्याची गरज नाही.’ तरीसुद्धा अगदी कट्टर धर्माभिमानी मंडळीही यांच्या विरुद्ध ब्र उच्चारायला तयार नाहीत. का कुणी त्याच्या विरोधात बोलायला तयार नाही? राजकारणी मंडळींना वाटतं ह्याच्या माध्यमातून गठ्ठा मतदान मिळतं.. मग चालू द्या. काळ्या पैशावाल्यांना वाटतं.. ह्यांच्या ट्रस्टमधून काळ्याचा पांढरा होतो पैसा.. तर मग चालू द्या.. प्रत्येकाला त्याच्यापासून काहीतरी फायदा दिसतो आहे म्हणूनच त्याच्या विरोधात कुणी बोलत नाही.
पण माझ्यावर ज्या संत परंपरेचे संस्कार झालेले आहेत त्या संस्कारांच्या विपरित ह्या जग्गीचं वागणं दिसतं म्हणून मी बोलतो. मी बोललं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, ओशोंचं काय? ओशो नाही का आलिशान जीवन जगले? त्यांनी नाही का स्वतःला भगवान म्हणवून घेतलं? खरं आहे. पण मला वाटतं यावर मी काही बोलण्यापेक्षा स्वतः ओशोंनीच लाओत्सेचं एक उदाहरण सांगून हा सगळा विषय स्पष्ट करून सांगितलेला आहे… ‘लुक अ‍ॅट दि मून डोण्ट बाईट माय फिंगर’. ओशो म्हणतात, ‘मला तुमचा गुरू बनण्यात स्वारस्य नाही. तुम्ही माझं बोट पकडण्याचा प्रयत्न करूच नका, मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तिकडे लक्ष द्या. मी तुम्हाला तुमच्या मुक्तीचा मार्ग दाखवतो आहे. तुमच्या जुन्या धारणांपासून मुक्ती.. बुरसटलेल्या विचारांपासून मुक्ती… बंधनापासून मुक्ती…’
ओशोंना लोकांचा गुरू व्हायचं नव्हतं हे स्पष्ट आहे. ओशो स्वतःबद्दल सर्व काही प्रामाणिकपणे सांगून मोकळे होतात. जग्गी वासुदेव मात्र स्वतः भोवती एक गूढ वलय तयार करू पाहतात. अर्थात ओशोच्या सरसकट सर्वच मुद्द्यांचं समर्थन करता येत नाही आणि मी ते करणारही नाही. कारण मी जसा जग्गी वासुदेवचा भक्त नाही तसाच ओशोचाही भक्त नाही.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सध्या समाजात लोकांना मनःशांतीची खूप गरज आहे. प्रत्येक जण फक्त तिच्याच शोधात आहे. ‘कुठे मिळेल आम्हाला ही मनःशांती?’ प्रत्येक जण फक्त हेच विचारतो आहे. मग उत्तराच्या शोधात कुणी ध्यान वर्गाला पळतो आहे. कुणी योग शिबिराला तर कुणी विपश्यना साधनेला वगैरे. थोडक्यात काय तर हे ‘मनःशांतीचं मार्वेâट’ सध्या जोरात आहे. जग्गी वासुदेव हा पक्का धंदेवाईक माणूस असल्यामुळे त्याने हे मार्वेâट बरोबर ओळखलं आहे.
आजच्या तरुणांमध्ये हा माणूस लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्याचा तो जगप्रसिद्ध असा ‘इनर इंजिनियरिंग’चा कोर्स. जग्गी शिष्यांना शांत समाधानी जीवन कसं जगावं हे शिकवतात. त्यांना मनःशांतीचे पाठ शिकवत असतात. अर्थात त्यांचा स्वतःच्या मनावर किती ताबा आहे हे काही तुम्ही विचारू नका. हे ‘सद्गुरू’ एका लाइव्ह कार्यक्रमात एका पत्रकारावर कसे भडकले होते हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे.
लोक ह्या ‘सद्गुरू’कडे जीवन कसं जगावं हे शिकायला जातात. अर्थात केवळ हा एकच सद्गुरू नाही. असे अनेक आहेत शिकवणारे. लोक त्यांच्याकडेही जातात. आता यावर ओशोंचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो. ओशो म्हणतात, काय शिकायचंय तुम्हाला? आपलं जीवन कसं जगावं ही काय दुसर्‍याला विचारण्याची गोष्ट आहे का? आणि खरोखरच जर तुम्हाला हे शिकण्याची वगैरे गरज पडत असेल तर मग हे तर मुल्ला नसरुद्दीनच्या त्या एका गोष्टी सारखंच झालं की…
मुल्ला नसरुद्दीनला मासेमारी करताना शिपायांनी पकडलं. कारण तो एका प्रतिबंधित क्षेत्रात मासेमारी करत होता.
पकडल्यावर शिपायांनी विचारलं त्याला,- ‘का रे, तुला माहीत नाही का हे राजाचं तळं आहे.. इथे मासेमारी करायला परवानगी नाही म्हणून?’
नसरुद्दीन म्हणाला, ‘तुम्हाला कुणी सांगितलं मी मासेमारी करतो आहे म्हणून?’
‘कुणी सांगायला वगैरे कशाला हवं? तुझ्या बादलीतले मासेच सांगतायत की..’
नसरुद्दीन म्हणाला, ‘अच्छा.. हे मासे होय.. अहो, हे मासे काही खाण्यासाठी वगैरे पकडलेले नाहीत मी.. मी तर यांना पोहायचं कसं ते शिकवत होतो.’
ओशोंच्या म्हणण्यानुसार, ‘जीवन हे स्वतःच एक गुरू आहे. इथे वेगळ्या गुरूची गरजच काय? जीवनावर प्रेम करा.. तेच तुम्हाला सगळं काही शिकवेल. जीवन हीच प्रार्थना आहे.. जीवन हाच परमात्मा आहे. पण लोक हे मानायला तयार नाहीत. ते म्हणतात, आम्हाला गुरू पाहिजेच. आम्ही त्याशिवाय ऐकणारच नाही. मग त्यांच्यासाठी हे असे मुल्ला नसरुद्दीनसारखे गुरू आहेतच.. गळ टाकून बसलेले.’
आमच्या समाजाचं दुर्दैव हे की, ‘आनंदाचा ठेवा तुमच्याजवळ. तुमच्या आतमध्येच आहे. त्याला शोधायला वगैरे कुठे जाण्याची गरजच नाही.’ असं सांगणारे ओशो आम्हाला कळालेच नाहीत.
पण मग आम्हाला ‘तुझे आहे तुजपाशी। परी तू जागा चुकलासी।।’ असं सांगणारे तुकाराम तरी कळाले आहेत का?
‘तैसा हृदयामध्यें मी रामु। असतां सर्वसुखाचा आरामु।..’ असं सांगणारे ज्ञानदेव आम्हाला कळाले आहेत का?
‘अत्त दीप भव’ म्हणणारे बुद्ध कळाले का आम्हाला?
श्रीशंकराचार्य ‘विवेकचूडामणि’तील पुढील श्लोकात सांगतात-
‘सर्वत्र प्राणिनां देहे जपो भवति सर्वदा।
हंसः सोऽहमिति ज्ञात्वा सर्वबन्धैर्विमुच्यते।।’
आणि
‘सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।’ असं सांगणारा कृष्ण… तो तरी कुठे कळाला आम्हाला?

Previous Post

शिवसेना-मुस्लिम लीग युती

Next Post

गोचीड आणि सुभेदार

Next Post

गोचीड आणि सुभेदार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.