(कल्याणचा भुईकोट किल्ला, सुभेदार इकमालखान सिद्दीक दरबार हॉलमधी सिंहासनाला पुढे चारदोन एक्स्ट्रा फळकुटा लावून त्याचा पलंग करून त्यावर उताणा पहुडलेला, छाताडावर खान-ए-सामान गोचिडी काढत बसलेला. त्या गोचिडी तो शुभ्र काचेच्या हिरेजडित झाकणाच्या बरणीत टाकतोय. एक सेवक बाण घेऊन खानाच्या दातात अडकलेले हाडाचे तुकडे काढतोय. बाजूला रेडिओ शीवेलोणवर गाणं वाजतंय, ‘एक तरफ तंदूर होगा, एक तरफ बोटियां….।’ आणि ह्या सगळ्यावर तीक्ष्ण नजर राखलेली चहापन्हा नौरंगजेब यांची करारी तसबीर सिंहासनामागे लटकतेय…)
खानेसामां : हुजूर, गोचिड आपका खून चूसता हैं। फिर आपने इन्हें क्यों संभाल रखा हैं?
इकमाल : अँ? (दाताशी अजून सेवक झटापट करतोय, त्याने खानाला बोलता येईना. तोच महत्प्रयासाने सेवक लेगपीसचं हाड काढून कुत्र्यापुढे फेकतो. कुत्रा ते उचलून पळतो. कुत्र्याकडे पाहात) अब नहीं भौकेगा ये चार दिन। (नजर खानेसामांकडे वळवून) क्या है ना? इन्हें देखकर चहापन्हा को लगा के ये मेरी फ़ौज हैं और मुझमें क़ाबिलियत है बगावत करनेकी। जो मैंने कर दिखाई। (बरणीकडे प्रेमानं पाहतो.)
खानेसामा : लेकिन आपने इन्हें मनसब दिलाई…।
इकमाल : बस! यहीं तो हैं दौलत मेरी। इनकी वजह से मैं सुभेदार बन पाया। अगर ये पन्नास… पचास किल्ले न होते? तो क्या हमें ये जागीर या सुभेदार बनाया जाता?
खानेसामा : पण दिवाण फुलचंद डबीर? ते किती दिवस गप्प बसतील? उनके तो पूरे सौ क़िलेदार है?
इकमाल : जोवर वजीर अमानतुल्ला शामेनी और चहापन्हा नौरंगजेब मुझपे खुश हैं। तोवर…
खानेसामा : लेकिन काज़ी मु़फ्ती चाँदइस्माइल कोई फ़तवा निकालने की फ़िराग में हैं… वो?
इकमाल : हे फारशी शब्द मला एक दिवस फाशी घ्यायला लावतील. हे बघ, मी सुंता केली मज़हब बदलने के लिए। त्याच्याने लगेच मला फारशी कशी येईल? मग सांग हे फतवा म्हणजे काय?
खानेसामा : फतवा म्हणजे निर्णय. हा काजी स्वतःला रामशास्त्री समजतो. त्याच्या पुढे हुजूर आपण काफ़िर असल्याचे काही पुरावे सादर केले गेलेत…
इकमाल : देखेंगे वज़ीर शामेनी से बोलके। उनसे बहोत सारे काजी डरते हैं, ऐसा सुना है मयने। तिकडे कोकण प्रांती…..
खानेसामा : रेहमतउल्ला खुर्रम मिनार गिरने से गड़बड़ा गए हैं।
इकमाल : हं!
खानेसामा : सबके सब क़िले ढहने की कगार पर है…..।
इकमाल : तू मराठीत नाही बोललास तर तुझं मुंडकं उडवायचा आदेश देईन! और तू फ़िक्र ना कर। जोवर वजीराने पाठवलेल्या ऐदीरामच्या फौजा शत्रू सैन्याच्या किल्लेदार, सरदारांच्या बायका-मुलांना उचलून ओलीस ठेवतायत, तोवर आम्ही शत्रूवर भारीच पडू! (भिंतीवर फिरणारं झुरळ भाल्यानं मारू बघतो. तसं ते तसबिरी आड लपतं.)
खानेसामा : माफी हुजूर! तिकडे फुलचंदपंतांना तुम्ही वहिनीसाहेबांच्या लुटीस गारदी पाठवल्याचा संशय येतोय…
इकमाल : (चेहर्यावर टाळण्याचे हावभाव) ये जाहिरात अच्छी है ना? ‘फ़ैसला तेजतर्रार, दख्खन की रफ्तार।’
खानेसामा : (खानाकडे दुर्लक्ष करत) त्यात रयतेत नाराजी आहे, अवकाळी पावसाने नुकसान केलंय शेतीचं…
इकमाल : उनके लिए हैं मेरे पास कुछ…!
खानेसामा : क्या है ऐसा? त्याने त्यांचं समाधान होईल?
इकमाल : भाषण!
खानेसामा : और वो मान जाएंगे? शत्रूला सामील होणार नाहीत?
इकमाल : ऐक तर खरं! (उताणा अवस्थेत बोलू लागतो) तर मातांनो भगिनींनो आणि भावांनो! तुमच्या स्वप्नातला दख्खन निर्माण करण्यासाठी आम्ही बगावत केलीय. तुम्हाला ठाऊक असेलच! चहापन्हा नौरंगजेब यांच्या प्रेरणेतून आपण विविध कामं करतोय, वेळेअभावी मी फार खोलात जात नाही! आता तुम्ही बघताय पुर्या दख्खनात गारा पडताय, पण तसं नाहीय हे! अरे हे खास काश्मीरहून मागावलेलं हिम आहे… आपल्याकडे बर्फ म्हणतात त्याला! मी खास चहापन्हांना विनंती केली, हा दख्खन मला जन्नतपेक्षा सुंदर करायचाय, मला इथं बर्फ, बारमाही खळाळणार्या नद्या, असं सगळं पाहिजे. आणि बघा, इथं बर्फ आलाय. बाकी गोष्टी पण आपण इथे आणू. इथले डोंगर हिमालयापेक्षा मोठे बनवू. पण खरं सांगायचं तर एवढी कामं करायला हे…. मोठ्ठं काळीज लागतं, आणि म्हणून…
खानेसामा : हुजूर आपल्याला झोप लागतेय!
इकमाल : अय!!! हळू! हे तुला माहितीय! कुणाला सांगू नको! कुणी विचारलं तर सांग, सुभेदार सदरेवर मागील पत्रव्यवहार बघायला गेलेत, वो रात दिन काम करते, ऐसा बोलनेका। आणि रातच्याला जरा मोठा बोकड शिजव! कलेजी असेल तर बेष्ट!
खानेसामा : आणि ह्या गोचीड? चेवंदून मारू?
इकमाल : उनसे मुझे जुदा ना कर! मेरे चालीस मनसबदार हैं वो। (आणि झोपेच्या अंमलात इकमालचा हात रेडिओवर पडतो, बटन फिरतं, रेडिओचं चॅनेल रेडिओ बीसी लागतं, त्यावर बातमी चालू असते, ‘मुलाजिमों की हडताल खत्म हो गई।…)