संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे बेरजेचं राजकारण करण्यात वाकबगार नेते. त्यांची महाराष्ट्राच्या सत्तेवर मजबूत मांड होती. काही काळ ते पंतप्रधानपदाचेही दावेदार मानले जात. दिल्लीमध्ये त्यांनी उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. १९७७ साली आणीबाणीनंतर दिल्लीचे म्हणजे उत्तरेचे वारे कसे वाहात आहेत, याकडे यशवंतराव लक्ष ठेवून होते, तर यशवंतराव काय करताहेत, याकडे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील हे लक्ष ठेवून होते, याचं अतिशय मार्मिक दर्शन बाळासाहेबांनी या व्यंगचित्रातून घडवलं आहे… आज राज्याच्या सत्तास्थानावर यशवंतराव किंवा वसंतदादा यांच्याशी बरोबरी करणारे नेते नाहीत, मात्र, दिल्लीचे वारे कसे वाहतायत याकडे यांचेही लक्ष आहे आणि त्यांचेही… शिवाय आळीपाळीने दोघे एकमेकांवरही लक्ष ठेवून आहेतच…