अलिबाग ते पुणे व पुणे ते अलिबाग हा मी वारंवार केलेल्या प्रवासांपैकी सर्वात जास्त केलेला एक प्रवास आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. लहानपणी वर्षातून किमान दोनवेळा तरी कुमीआजीकडे फेरी असायचीच. नंतर दहावी बारावीचे उन्हाळी सुट्ट्यांमधले वर्ग, मग अकोला-गुलबर्ग्याचा प्रवास करतानाचा मधला टप्पा व नंतर नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाल्याने अव्याहत सुरू असलेल्या याच मार्गावरचा प्रवास, दोन्ही बाजूने तितकाच आवडणारा आणि कायमच पोहोचण्याच्या ठिकाणाची मनोमन ओढ असलेला! प्रवासाची माध्यमं मात्र कालानुरूप बदलत गेलीयेत. लाल एसटीने एकेरी रस्ता असताना खंडाळा घाटातून केलेला, संपतोय की नाही असं वाटणारा प्रवास कधीच मागे पडला. मग स्वच्छ एशियाड बसच्या मोठ्या खिडक्यांमधून तोच खंडाळा घाट जास्तच देखणा दिसू लागला. एक्प्रेस-वे आला नी जुन्या रस्त्याचा सहवास नकळत मागे पडला. नवा गुळगुळीत व सरळसोट रस्ता सोयीचा झाला. सुरुवातीला स्वतः गाडी चालवत नसताना समजायचं नाही, पण आता विचाराल तर गाडी चालवायची सर्वात जवळची व आवडती जागा, नक्की हीच! बाकी बदल खूप झाले, पण काही गोष्टी त्रिकालाबाधित असल्यासारख्या टिकून आहेत, बरोब्बर ओळखलंत, लोणावळ्याच्या चिक्कीबद्दलच बोलतोय मी!
लोणावळ्याच्या स्थानकात बस शिरली रे शिरली की दोन पाच चिक्कीवाले हमखास धावत यायचे. भुकेसाठी गरम वडापाव खुणावत असला तरी पुढच्या प्रवासातील विरंगुळा म्हणून चिक्की लागायचीच. अगदी पाच-दहा रूपयांपासून मिळणारी चिक्की खात आलोय आम्ही, मगनलाल चिक्की असं नाव मात्र घेताना आवर्जून बघत असू! मग थोडा मोठा झाल्यावर, गाडी पंधरा मिनिटं म्हणजे पुरेशी थांबते ही जाणीव झाल्यावर पटकन कोपर्यावरच्या ए-वनमधली चिक्की आणायला जाण्यात वेगळा आनंद मिळे. स्वच्छ चकचकीत दुकान व आत शिरल्याबरोबर नाकात जाणारा चिक्कीचा गोडमिट्ट सुगंध… अहाहा!! शेंगदाणे, डाळ्या व खोबर्याच्या चिक्कीपेक्षा आकर्षण वाटे ते काजू बदाम वगैरे चिक्क्यांचं. तकतकीत कांतीच्या, गुळगुळीत व सुक्यामेव्याचा कण नी कण व केशराची प्रत्येक काडी दाखविणार्या त्या अर्धपारदर्शक चिक्क्या खाण्यापूर्वीच मन तृप्त करायच्या!
आता लोणावळा गावात जायला वाट वाकडी करावी लागते, पण मॉलवरचे चिक्कीचे स्टॉल मात्र ओसंडून वाहात असतात, मीही त्या गर्दीचा एक भाग असतोच की!
सहसा विकत घेऊनच खाल्ली जाणारी ही चिक्की बनवायची म्हटलं तर फारशी कठीण नाहीये मंडळी. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याची म्हणजे गुळदाण्याची ताजी चिक्की खाण्याची मजा औरच. एकपट खमंग भाजून सोललेले शेंगदाणे घेतले तर पाऊणभर गूळ व साखरेचं मिश्रण घ्यावं. जाड बुडाच्या कढईत हे गूळसाखर बुडेल एवढं पाणी घालून गोळीबंद पाक करावा आणि त्यात दाणे मिसळून तूप लावलेल्या ताटात ते चिक्कीचं मिश्रण थापावं. किंचित निवलं की वड्यांच्या आकारात कापाव्यात आणि गार झाल्या की काढाव्यात. नुसत्या गुळाची चिक्की जरा निस्तेज दिसते म्हणून साखरेनी चमक आणायची, नाहीतर नुसता गूळ वापरायला पण हरकत नाही बरं. सगळा पाकाचा खेळ, पण वरकरणी कडक अन खुटखुटीत तोंडात विरघळणारी चिक्की म्हणजे निव्वळ आनंद! अर्थात आनंदाबरोबरच सुका मेवा व गूळ यांची शक्तीपण देते बरं ही चिक्की!! स्वतःच्या बाह्यरुपासारखीच ही चिक्की खाणार्याला कणखर नी शक्तिमान बनवते!
शरीराएवढीच किंबहुना मनाची खंबीरता कणभर जास्तीच महत्वाची. दरवेळीच ही मनाची स्वतःची स्वतः उभारी घेणं प्रत्येकाला साधतेच असं नाही, मग त्यावेळी एकमेकांसाठी चिक्की बनायला काय हरकत आहे मंडळी? वरकरणी कठोर रुप, पण अंतरंगी गोडवा व सहज परिवर्तित होणारी सकारात्मकतेची ऊर्जा असेल तर माणूसपणाच्या वाटचालीचा पुढचा टप्पा साधला म्हणायचा आपण!
दरवेळी समोरच्याला सगळं सहजसाध्य करुन देण्यापेक्षा त्याला स्वतःच्या क्षमतांचा पुरेपूर वापर करायची संधी देणं पण लाभदायी ठरतं. लहानपणी आईबाबा अभ्यास घेताना किंवा कोणतंही नवीन काम करताना सांगायचे की, बघ आम्ही हे सहज करू शकतो, कसं करायचं सांगूही शकतो, पण काहीच करणार नाही. तू ठरव कसं नी काय करायचं, प्रयत्न कर. नाहीच जमलं तर आहोतच की आम्ही. तेव्हा वाटायचं की का ते दरवेळी परीक्षा घेतात? सांगून मोकळे व्हावं की यांनी. झटपट पुढे सरकेल गाडी. मात्र त्यामागची कळकळ व शुद्ध हेतू आता जाणवला की मन कृतज्ञतेनी भरून येतं.
परिस्थिती व परमेश्वरही बरेचदा असंच वरकरणी कठोर वागतात, नकोशा प्रसंगांना सामोरं जायची वेळ आणतात. मात्र त्यातून तरून जायची शक्तीपण तेच नकळत देतात. आपल्या सर्वांगीण विकासाच्या कळकळीपोटीच म्हणे तो शनिदेव पण साडेसातीचे खेळ खेळतो. ‘बल हेच जीवन, दुर्बलता हाच मृत्यू’. एकदा का हे मूलभूत तत्त्व अंगिकारले व स्वीकारले की ते बळ अंतरंगात उतरते. मनाची खंबीरता व शक्ती कार्यरत होते नी आयुष्याची गोडी जास्त जाणवायला लागते. जिभेवर विरघळणार्या चिक्कीसारखीच!