प्रस्थापितांमधल्या कट्टरांना रट्टे मारण्याचं प्रबोधनकारांचं वैशिष्ट्य अनेक लेखांमध्ये दिसून येतं. ते जसे ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांची सालटी काढतात, तसंच ब्राह्मणेतरांमधल्या स्वार्थी मराठा पुढार्यांवरही टीका करतात आणि धर्मप्रसारासाठी आंधळ्या झालेल्या मुस्लिम कट्टरतावाद्यांनाही सोडत नाहीत.
– – –
प्र बोधनच्या चौथ्या वर्षात म्हणजे एप्रिल १९२५ ते मे १९२६ या बारा अंकांत बावला मुमताज प्रकरणावरचे लेख प्रामुख्याने आहेत. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातले जातभेद, देशी संस्थानिकांचे प्रश्न, भारतीय पत्रकारिता, ब्राह्मणी कावेबाजपणा यावर त्यांनी खोलात जाऊन मांडणी केलेली आढळते. या धावपळीच्या काळात शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र हे पुस्तक लिहून प्रकाशित करण्याचा विचार बाजूला ठेवून प्रबोधनकारांनी सातार्याच्या राज्यक्रांतीच्या संदर्भात, विशेषतः रंगो बापूजींची अनेक ऐतिहासिक कागदपत्रं प्रबोधनमध्ये छापण्याची सुरुवात केली. तीही या वर्षात बरीच आहेत. त्याशिवायही प्रबोधनकारांनी विविध विषयांवर वेगळी मांडणी केली आहे.
घड्याळाची टक टक हा लेख प्रबोधनकारांच्या आकर्षक लेखनशैलीचा वेगळा नमुना आहे. चावीच्या घड्याळाची रचना समजावून सांगता सांगता ते भारतीय समाजरचना आणि ब्रिटिश सत्ता यांचा घड्याळाच्या रचनेशी असलेलं साधर्म्य मांडत जातात. त्यात केलेलं वर्णन आजही लागू होतं, हिंदी मनोवृत्ती विशेषतः हिंदू मनोवृत्ती म्हणजे शेकडो शतकांच्या जुन्यापुराण्या भल्याबुर्या संस्कारांचा एक टोलेजंग उकिरडाच म्हटले तरी चालेल. श्रेष्ठ कनिष्ठाची हाडके, साक्षर नाक्षरतेच्या चिंध्या, स्पृश्यास्पृश्यत्वाचा चिखल, ब्राह्मणांच्या ब्रह्मसुखोत्वाचा धुरोळा, वकीलांची स्वार्थी कावेबाजी, व्यापार्यांची गळेकापू दगलबाजी, नटव्या पुढार्यांची थापेबाजी, तुरळ्या अल्लड तरुणांची हुल्लडबाजी, अशा लाखो घाणेरड्या चिजांची एकेक चीज सर्वत्र उधळून काही काळ दिशा धुंद करतात. वावटळ मंदावले की जिकडे तिकडे स्मशानशांतता!
वाईची प्राज्ञ पाठशाळा ही फक्त ब्राह्मणांसाठी आहे, त्यामुळे ती सार्वजनिक किंवा राष्ट्रीय कशी ठरू शकते, असा प्रश्न विचारणारं एक स्फुटही प्रबोधनकारांनी लिहिलं आहे. अशा प्रकारे प्रस्थापितांमधल्या कट्टरांना रट्टे मारण्याचं त्यांचं वैशिष्ट्य अनेक लेखांमध्ये दिसून येतं. ते जसे ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांची सालटी काढतात, तसंच ब्राह्मणेतरांमधल्या केवळ स्वार्थाचा विचार करणार्या मराठा पुढार्यांवरही टीका करतात, शिवाय धर्मप्रसारासाठी आंधळ्या झालेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन कट्टरतावाद्यांनाही सोडत नाहीत.
ब्राह्मणेतर पक्षाचे एक महत्त्वाचे नेते बॅ. रामराव देशमुख यांनी मराठ्यांना आरसा दाखवून देत सर्व बहुजन समाजांना मराठ्यांनी सोबत घेण्याचा आग्रह धरला होता. कारण काही स्वार्थी मराठा पुढारी ब्राह्मणेतरांच्या नावाने फक्त स्वतःच्या जातीची तुंबडी भरून घेत होते. त्याविषयी प्रबोधनकार लिहितात, सार्वजनिक भटांच्या विरुद्ध कोणी कांही लिहिले की हा पहा देशद्रोही म्हणून सगळे भटमंडळ कावळ्याप्रमाणे काव काव करीत असे, हा धंदा आता ब्राह्मणेतरांनी उर्फ मराठे पुढारी व पत्रकारांनी हुबेहूब तसाच उचलला आहे… भिक्षुकशाहीचे राष्ट्रीय ब्राह्मणेतरांना डोके वर काढून देत नाहीत. त्यांच्या स्वतंत्र मताची पायमल्ली करतात. कोणी विरुद्ध बोललाच किंवा सत्य प्रगट करू लागलाच तर त्याची ससेहोलपट करतात म्हणून ब्राह्मणेतर पक्ष निघाला. त्यातही पेशवाई घाशीरामीच! ब्राह्मण पक्षात चित्पावन शिरजोर, तर ब्राह्मणेतरांत हे सुशिक्षित मराठे पुढारी पत्रकार शिरजोर. आपल्या विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा ब्राह्मणी कावा किमान शंभर वर्ष जुना असल्याचं आपल्याला यातून सापडतं. त्याचबरोबर प्रबोधनकार ब्राह्मण असो वा ब्राह्मणेतर, प्रत्येक वर्चस्ववाद्याला एकाच तागडीत तोलतात हेही दिसून येतं.
याविषयी पुढे लिहिताना प्रबोधनकारांनी छत्रपती शाहू महाराजांची एक महत्त्वाची आठवण सांगितली आहे. तिची नोंद होणं गरजेचं आहे, ती अशी, `कै. राजर्षि शाहू छत्रपती हयात असताना प्रस्तुत लेखकाने त्यांच्याशी मुंबई मुक्कामी मुद्दाम चर्चा केली होती, आपल्या ब्राह्मणेतर चळवळीचा हेतू फक्त मराठा समाजाला जागृत करण्यापुरताच आहे की अखिल ब्राह्मणेतर हिंदू समाजाच्या उद्धारार्थ आहे? असा प्रश्न विचारला असता राजर्षि म्हणाले, अखिल ब्राह्मणेतर हिंदूंत मराठा समाज बहुसंख्य असला तरी माझी चळवळ मराठ्यांपुरतीच संकुचित नाही. असली जातीपुरती चळवळ करायला छत्रपति कशाला? माझ्या चळवळीने ब्राह्मणेतर स्पृश्य हिंदूंचेच काय, पण महार, मांगादि अस्पृश्यांचाहि उद्धार व्हावा, अशी माझी इच्छा व धोरण आहे. ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मणेतर, मग ती कोणत्याही जातीचा असो, तो माझा भाऊ, मी जातपात ओळखीत नाही, वाटेल त्याच्या हातचे मी खातो पितो. ब्राहमणेतर चळवळ करून मराठ्यांना ब्राह्मणेतरांतले चित्पावन बनविण्याची मला इच्छा नाही. मराठ्यांना तरी मी काय कमी दिले आहे? स्वतःच्या जातीची उन्नति करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. याप्रमाणे मराठा शिक्षण परिषद व मराठा राजकीय परिषद त्यांची आहेच. जातीच्या उन्नतीसाठी ही दोन शस्त्रे मराठ्यांना पुरेशी आहेत. माझ्या ब्राह्मणेतर चळवळींत जातिवर्चस्वाचे विष ओतण्याचे चित्पावनी काम ते कधीच करणार नाहीत, असे मला वाटते.
प्रबोधनकारांनी समर्थन केलेल्या बॅ. रामराव देशमुखांच्या मांडणीवर ब्ोळगावच्या राष्ट्रवीर या साप्ताहिकाने तीन अग्रलेख लिहून टीका केली. १९२१ पासून सुरू झालेलं हे साप्ताहिक ब्राह्मणेतर पक्षाचं सर्वाधिक लोकप्रिय मुखपत्र बनलं होतं. शामराव भोसले, कृष्णाजी घाटगे आणि शामराव देसाई या जाणकार संपादकांमुळे त्याचा महाराष्ट्रभरातल्याबहुजन चळवळीवर प्रभाव होता. प्रबोधनकारही त्यात अधूनमधून लिहित. पण `राष्ट्रवीर`ने घेतलेली भूमिका प्रबोधनकारांना पटणारी नव्हती. मराठेतरांना मराठ्यांशी जुळवून घ्यावं लागेल, अशी धमकीच राष्ट्रवीरने दिल्याची टीका त्यांनी केली. तरीही त्यानंतर चार महिन्यांनी `राष्ट्रवीर`ने पुन्हा एकदा अशीच एककल्ली भूमिका घेतली. त्यांनी कायस्थ प्रभूंनाही ब्राह्मणांच्या बरोबरीने बहुजन समाजाचे शत्रू ठरवलं. त्यामुळे प्रबोधनकार दुखावले गेले. ब्राह्मणेतर चळवळीतली ही फूट त्यांना आवडली नाही.
महाराष्ट्रात ३८ वर्षांत डेप्युटी कलेक्टरच्या ४४ जागा भरण्यात आल्या होत्या. त्यांची जातवार मोजणी करून त्यात हिंदूंच्या वाट्याला आलेल्या १७पैकी १२ जागांवर ब्राह्मण आणि प्रभू असल्याचा दावा `राष्ट्रवीर`ने केला. त्यावर टीका करताना प्रबोधनकारांनी कायस्थ प्रभूंच्या इतिहासातल्या ब्राह्मण्यविरोधी लढ्याचा हवाला दिला. तसंच कायस्थ प्रभू समाज बहुजनांच्या भल्यासाठी कोणताही त्याग करू शकतो, याची ग्वाही दिली, १४० लाख देशबांधवांची अधोगती जर केवळ प्रभूंच्या सरकारी नोकरदारीने होत असेल, तर त्या नोकरदारी मोक्षावर थुंकण्याची त्यांची केव्हाही तयारी आहे… सरकारी नोकरी ही काय गौडबंगाली चीज आहे व तिजमुळे कसल्या धर्तीचा आत्मोद्धार होतो, याचा अनुभव या जातीने आजपर्यंत इतका घेतला आहे की दीनदयाळ मराठे बांधवांनी त्यांना या आत्मोद्धाराच्या गर्तेतून उचकून फेकण्याचा प्रत्येक यत्न त्यांना आनंददायी वाटेल.
यानिमित्ताने प्रबोधनकारांनी ब्राह्मणेतरांच्या नावाने फक्त मराठ्यांचा स्वार्थ पाहणार्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. ब्राह्मणेतर पक्षाच्या वैचारिक भोंगळपणा उघड केला आहे. अस्पृश्यांनी त्यांच्या समाजातीलच नेतृत्व मान्य करावं कारण स्पृश्य आणि अस्पृश्य यांचे हितसंबंध सारखे नाहीत, असं पुन्हा एकदा सांगितलं होतं. बहुजनांमधली फूट टाळण्यासाठी त्यांनी समानसत्तावादाचा विचार दिला आहे. सर्व जातींना त्यांच्या विकासाची आणि प्रमाणानुसार सत्तेच्या वाट्याची संधी मिळावी, असा हा विचार आहे. प्रबोधनकार लिहितात, हिंदू समाजात जोपर्यंत जातीद्वेष चालू आहे, सामाजिक उच्चनीचपणा, धर्माची खोडसाळ कल्पना, जन्मप्राप्त वरिष्ठ कनिष्ठपणा आणि या सर्व महापातकांची जन्मभूमि जी ब्राम्हणी खुनशी मनोवृत्ती आहे, तोपर्यंत हिंदूजनांनी आपल्या अस्तित्वाची अतःपर फारशी आशा धरू नये. हिंदूंना हिंदू म्हणून जगावयाचे असेल, तर त्यांनी ताबडतोब सर्व वादांची होळी करून, समानसत्तावादाला देव म्हणून कायावाचामने पूजला पाहिजे.
१९२५ सालच्या गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम दंगल झाली होती. अकोल्यात तर गणपतीमूर्तीचं वेळेत विसर्जनही होऊ शकलं नव्हतं. तो संदर्भ देऊन प्रबोधनकारांनी लिहिलेला ब्राम्हण्याभिमान्यांनो, इस्लामी बडग्याचा विचार करा हा स्फुटलेखही महत्त्वाचा आहे. हिंदूंमध्ये जातीपातींमुळे एकी नसल्यामुळे इस्लामी आक्रमणातून हिंदू समाज उद्ध्वस्त होईल, अशी भीती प्रबोधनकारांनी दाखवली आहे. पण इस्लामी आक्रमण आलं तरी ब्राह्मण मात्र केवळ स्वार्थातच रममाण राहतात. उलट या आक्रमणाचा फायदा घेऊन बहुजनांवर वर्चस्व वाढवून घेतात, असा दावा करत प्रबोधनकारांनी त्यांना सुधारण्याचा इशारा दिला आहे. तो असा,
ब्राम्हणांना आज इस्लामियांची दरकार नाही. त्यांना ब्राह्मणेतरांना आज चेचावयाचे आहे. त्यांना मराठ्यांच्या घरादारांवर गाढवाचे नांगर फिरवून ब्राम्हण्य संरक्षण करावयाचे आहे. कायस्थ प्रभूंना स्वराज्यविध्वंसक व स्वधर्मघातकी ठरवून त्यांना आपली प्रतिष्ठा वाढवायची आहे. ब्राम्हण मुसलमानांना भीत नाहीत. कडवा इस्लामी इंगा फिरलाच तर ते इंग्रज सरकारच्या मागे लपून केवळ वैदिक शापाच्या फुत्कारासरसे मुसलमान दंगेखोरांच्या ठिकठिकाणी लोथी पाडतील. ब्राम्हण्यसंरक्षणार्थ वेळ पडली तर ते मुसलमानांशी वाटेल त्या अटींचा तह करतील, मुसलमान होतील किंवा मुसलमानांना ब्राम्हण करतील, पण या मरगठ्ठ्यांना आणि त्यांच्या चळवळीशी सहानुभूती दाखवणार्या सुधारकांना आणि ब्राम्हणेतरांना ते बळीप्रमाणे पाताळांत चिरडून गाडून टाकतील. सनातन वैदिक धर्मोक्त वर्णश्रेष्ठत्वावर आणि भागवत धर्मोक्त टाळचिपळ्यांवर इस्लामी चांदतार्याची झांप झपकन अवचित येऊन पडलीच, तर ब्राम्हण्यसंरक्षक सर्व परिषदांचे सर्व ठराव प्रत्येक ब्राम्हणबच्चा व त्याचा ब्राम्हणेतर बगलबच्चा धडधड पाठ म्हणून त्या झापेची झेप वरच्यावर उधळून लावील, पण मराठ्यांशी व ब्राह्मणेतरांशी तो कधी नमते घेणार नाही. सारे ब्राम्हणेतर क्रिस्ती किंवा मुसलमान किंवा अस्पृश्य झाले, अगर ठार मेले तर त्याची ब्राम्हणांना पर्वा नाही.
प्रबोधनकारांना कोणताही भेद नकोय, ते समतेच्या मार्गाने शेवटच्या माणसाचा विकास मागत आहेत. त्याच्या विरोधात येणार्या सर्व विषमतावादी विचारांवर जोरात हल्ला चढवत आहेत. म्हणून त्यांचे विचार काळाला हरवून अभंग उरले आहेत आणि महाराष्ट्राला आजही प्रेरणा देत आहेत.