पोक्या म्हणजे माझा मानलेला परमप्रिय मित्र… कधीकाळी तो मुख्यमंत्री व्हावा, असं मला मनापासून वाटतं. कारण त्याच्यात त्या पदासाठी लागणारे गुण तुडुंब भरलेले आहेत. त्या बाबतीत मी म्हणजे किस झाड की पत्ती. आता तो आणि मी भाजपमध्ये असलो तरी राजकारणाचे फासे असे काही पडत असतात की उद्या काय होईल ते सांगता येत नाही. पोक्या तसा धोरणी आहे. परिस्थितीशी आणि परस्त्रीशी जुळवून घेण्यात हुशार आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार तो स्वत:मध्ये हवा तसा बदल घडवू शकतो. महाराष्ट्राला जर खरोखरच जगाच्या अत्युच्च स्थानी नेऊन बसवायचा असेल तर मुख्यमंत्री पदाला पोक्याशिवाय पर्याय नाही.
याबाबतीत पोक्या माझ्या घरी आल्यावर त्याच्याशी थोडी दीर्घ आणि बरीच लघु बातचीत केली. पोक्या मला बराच सकारात्मक दिसला. मागे मंत्रालयात सर्व मंत्र्यांची झालेली निबंध स्पर्धा आणि त्यात दाढीवाल्यांचा त्याने चोरून वाचलेला पेपर त्याला आठवत होता. तरीही पोक्याचे विचार फारच वेगळे आणि चित्ताकर्षक होते. त्याच्याकडे व्यक्तीविकासाच्या आणि राज्य विकासाच्या भन्नाट योजना होत्या. त्याचा शिक्षणाशी आणि अकलेशी काहीही संबंध नव्हता. आपल्याला आपल्या पद्धतीने चीनशी स्पर्धा करायची आहे. होनोलूलूशी नव्हे, हे लक्षात ठेवून कामाला लागायचे आहे हे माझे मुख्यमंत्री म्हणून जनतेला पहिले आवाहन असेल, असे उत्तर त्यांनी पहिल्या प्रश्नाला देताच पुढील प्रश्नोत्तरे सुरत आणि गोहाटीच्या प्रचंड वेगमर्यादेत झाली.
– सर्वप्रथम आपण शिक्षणाबद्दल बोलू. शिक्षणात काय बदल हवे असे आपणास वाटते?
– जेवणात जसे लोणचे चवीला असते तेच स्थान शिक्षणाला हवे. कशाला हवे शिक्षण? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि नोटा मोजता आल्या की विषय संपला. स्वत:चे नाव लिहिता आले, चेकवर सही करता आली की विषय संपला.
– पण लिहिता, वाचता तर आले पाहिजे ना?
– फार नाही आले तरी चालेल. फार तर आपण चौथीपर्यंत शाळा ठेवू. लक्षात ठेवा आपल्याला महाराष्ट्राला रामायण, महाभारत काळात न्यायचे आहे. धनुर्विद्येपुढे सार्या विद्या व्यर्थ आहेत. मग ती विद्या बालन असो वा विद्या सिन्हा. आपण अशी शस्त्रे घडवू की ती आजच्या क्षेपणास्रांना जेरीस आणतील. महाभारतातील अस्त्रांचे आणि दिव्य शक्ती असलेल्या एकेका संहारक मंत्राची नावे आठवून पहा. आपण द्रोणाचार्य, भीष्म, अर्जुन, भीम यांच्यासारखे गुरु आणि लढवय्ये आणि राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नसारखे वीरपुरुष निर्माण करू. आपला एक श्रीकृष्ण सार्या शत्रूंना पुरुन उरेल.
– पोक्या, मला हे सारं कठीण वाटतं.
– आणि मला का सोपं वाटलं? मस्करी केली मी. पण प्रत्येक विद्यार्थ्याला पहिलीपासून लष्करी शिक्षण देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार. आपण गँगस्टर होतो, पण प्रत्येक विद्यार्थी सैनिक बनलाच पाहिजे. सगळा पाठ्यपुस्तके रद्द करून त्या जागी संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास आणि सर्व संतांची ग्रंथसंपदा अभ्यासक्रम म्हणून मी लावणार आहे. सर्व भाषेतल्या संतांच्या ग्रंथांची भाषांतरे करून सर्व भाषिक विद्यार्थ्यांना ती शिकण्यास भाग पाडणार आहे. राष्ट्रीय एकात्मता काय असते हे आपण दाखवून देऊ. संस्कारक्षम विद्यार्थी घडवू.
– पोक्या, केवढा बदल झालाय तुझ्यात. पण मला खरं सांग, सध्या जे काही चाललंय त्या बॅकग्राऊंडवर राजकारणातल्या नीतीशिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे असे वाटत नाही का तुला?
– हो. वाटते ना. पहिला धडा म्हणजे मोठे झाल्यावर दाढी वाढवू नये. कारण त्यामुळे आपले अनेक डुप्लिकेट तयार होऊन आपल्याला धोका देऊ शकतात. दुसरे, खाल्ल्या अन्नाला जागावे. आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर करून आपल्यावर विश्वास ठेवणार्या सहकार्यांचा गळा कापू नये किंवा पाठीत खंजीर खुपसू नये. माशाने पाण्यातच पोहावे, पाण्याबाहेर आल्यावर विनाश अटळ असतो हे लक्षात ठेवावे. वाल्याचा वाल्मिकी एकदाच होतो हे ध्यानात असू द्यावे. पंचपक्वान्नांचे ताट पुढ्यात असले तरी त्यावर हावरटासारखा हात मारू नये. जन्मदात्रीला मारण्याचा प्रयत्न करून दुसर्याच्या जीवावर मोठे होण्याचा प्रयत्न करू नये. ज्या झाडाच्या एका फांदीवर बसून आपण त्याची गोड फळे खाल्ली, त्या फांदीवरून झाडाच्या खोडावर कुर्हाड चालवू नये. अशाने खाली पडून कपाळमोक्ष होतो. बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नाही आणि बैलोबाही स्वत:च्या अकलेने नांगर चालवू शकत नाही. गर्वाचे घर नेहमीच खाली असते. आपल्या आईला उपाशी ठेवून तिच्या वाट्याचे अन्न ढेकर देत असलेल्या आपल्या मित्राला देण्याचा कृतघ्नपणा करू नये. उठसूठ दिल्लीत जाऊन स्वत:च्या स्वार्थासाठी दिल्लीतील सत्ताधार्यांचे पाय धरणे सोडावे. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तडे जातात. लोकप्रिय होण्यासाठी अंगात प्रामाणिकपणा, लोकांचा विश्वास आणि उपकारकर्त्याविषयी कृतज्ञता असावी लागते. लांडी-लबाडी, खंडणी-वसुली आणि पूर्वजांच्या पुण्याईने कोणी मोठे होत नाही. जसे कर्म तसेच फळ मिळते. देवावर चित्रपट काढून दानवाला आपली पापकृत्ये झाकता येत नाहीत. तसेच पतिव्रतेचा आव आणून बाजारबसवीला फार काळ आपला चेहरा लपवता येत नाही.
– पोक्या, काय बोलतोस काय! किती कटू आहे हे.
– कटू असले तरी सत्य आहे ना. मग झाले. मनात सूडाची आग धुमसत असली की तिचा धूर नाकातोंडात जाऊन माणूस कसा वेड्यासारखा वागतो ते पाहातो आहेस ना? प्रत्येक पक्षाला काही मान, काही सन्मान असतो. कोणीही सोम्या-गोम्या शेंदूर लावल्यामुळे देव बनत नाही. तो दगडच असतो. जेव्हा त्याच्या देवपणाचा बुरखा हळूहळू फाटत जातो आणि त्याचे मूळ रुप उघडे पडते तेव्हा लोक त्याला लाथाडतात. वि. वा. शिरवाडकरांचे एक नाटक आहे ‘आमचं नाव बाबुराव’. त्यात बाबुराव नावाचा केशकर्तनालयातील केस कापणारा नाभिक योगायोगाने संपूर्ण राज्याचा राजा बनतो. पण त्याचा मूळ स्वभाव काही जात नाही. राज्यकारभाराची त्याला काहीही माहिती नसते. हजामत, गुळगुळीत, तुळतुळीत, सफाचट, कटिंग, शेव्हिंग, साबण, वस्तरा, चमनगोटा, सोल्जर कट हे सलूनमध्ये वापरले जाणारे शब्दच तो सलूनमधून राज्यकारभार चालवताना वापरत असतो. त्यातून जी धमाल उडते ती त्यावेळचे विनोदी नट शंकर घाणेकर यांनी बाबुरावाच्या राजाच्या भूमिकेतून दाखवत धमाल उडवली होती. सध्याच्या बाबुरावांची तारांबळ पाहताना अशी वेळ शत्रूवरही येऊ नये, असे वाटून जाते. मी मुख्यमंत्री झालो तर मात्र अशी वेळ येऊ देणार नाही. स्वामीनिष्ठा हा कोणत्याही प्रमुख मंत्र्याच्या कर्तव्याचा भाग असतो. छत्रपतींच्या काळातही त्यांना स्वामीनिष्ठेला कलंक लावणारे घरभेदी आणि गद्दार भेटले, पण हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्या त्या घरभेद्यांना आणि गद्दारांना महाराजांनी त्यांची योग्य ती जागा दाखवली. आपल्या शूर, वीर सरदार आणि विश्वासू मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याचा सूर्योदय जनतेला दाखवला. म्हणूनच राज्याच्या मूळावर येणार्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी माझ्यासारख्या मुख्यमंत्र्याची गरज आहे. जय महाराष्ट्र.