□ मथुरेची जनता राखी सावंतलाही खासदार बनवेल : कंगना राणावतची मथुरेतून निवडणूक लढवण्याची इच्छा ऐकून हेमामालिनी यांची मिष्कील टिप्पणी.
■ राखीसुद्धा कंगनापेक्षा कमी आक्रस्ताळी आणि अधिक कृतीशील असेल हो हेमाकाकू!
□ रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात १ ऑक्टोबरपासून वाढ होणार.
■ सीएनजीचे दर पाहता भाडेवाढ अटळ होतीच, पण त्याबरोबर जवळची भाडी नाकारणार नाही, प्रवासात मोबाइलवर सतत बोलणार नाही, मोठ्या आवाजात गाणी लावणार नाही, अशा काही प्रवासीहिताच्या गोष्टींचं तरी आश्वासन घ्यायचं होतं प्रशासनाने.
□ पक्षनेतृत्त्वाने कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असते, माणसांना मोठे करायचे असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ एका रिक्षावाल्याला पद, प्रतिष्ठा हे सगळे दिलेच की, एवढे बळ देऊन तुम्ही काय केलेत?
□ पालकमंत्र्यांच्या यादीत शिंदे गटाच्या तोंडाला पाने; फडणवीसांचाच वरचष्मा.
■ मिंध्यांना जागा दाखवून दिली जाणारच कायम!
□ मॉल्समध्ये वाइनविक्री होणार.
■ महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला तेव्हा राज्य दारूडे होणार म्हणून छाती पिटणारी कमळाबाईच आता साकी बनून वाईन पाजायला तयार झाली! निर्लज्जपणालाही काही सीमा असते हो!
□ न्यूज चॅनेल्सच्या अँकर्सकडून सुरू असलेल्या विखारी प्रचाराचे साक्षीदार बनू नका : सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकारची कानउघाडणी.
■ साक्षीदार कसले, परात्पर मालक आहेत ते या न्यूज चॅनेल्सच्या अँकरांचे. हे सर्वोच्च न्यायालयाला माहितीच नाही?
□ ‘फोन पे’चे कार्यालय मुंबईतून कर्नाटकात.
■ सुपारीच तशी घेतलेली आहे मिंध्यांनी. आता कर्नाटकच कसे योग्य आहे ‘फोन पे’साठी याची कौतुकारती गाऊ लागतील भक्तगण!
□ दिवसभर वाट पाहूनही मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान भेटलेच नाहीत…
■ माणसाचे सोडा, महाराष्ट्राचा अपमान आहे हा!
□ मुख्यमंत्र्यांना गिरीश महाजन प्रॉम्प्टिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल.
■ त्यांच्या तालावर नाचायचं ठरल्यावर आता तबला कोण वाजवतंय, याने काय फरक पडतो?
□ सरसंघचालक मोहन भागवत हे तर राष्ट्रपिता आणि ऋषी : इमाम परिषदेच्या अध्यक्षांची स्तुतिसुमने.
■ त्याच दिवशी पीएफआयवर छापे पडत होते आणि ऋतंभरा बाई जगभर मुस्लिमद्वेषाची आग ओकायला निघाल्या होत्या, हे निव्वळ योगायोग.
□ युक्रेनवरील हल्ला तीव्र करण्याचा रशियाचा निर्णय, राखीव फौजही रणांगणात उतरवणार.
■ अरेरे, व्लादीमीर पुतीन हेही विश्वगुरूंचे कसे मित्र आहेत, त्यांचं किती ऐकतात, याच्या ज्या बातम्या भक्तीभावाने पसरवल्या गेल्या, त्या फोलच ठरल्या तर. ही वेळ युद्धाची नाही, असं सांगितलं होतं ना त्यांनी पुतीनना?
□ रामदास कदम यांना वेड्यांच्या हॉस्पिटलात पाठवा : भास्कर जाधव यांचा सल्ला.
■ हे वेडे नाहीत, भास्करराव, पक्के शहाणे आहेत हे. मिंध्यांकडून पेढे खाण्यासाठी वेडे बनतायत.
□ पूर्वी गँगस्टर्सकडून धमकी द्यायचे, आता ईडी सीबीआयचा वापर केला जातोय : मुंबई सत्र न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद.
■ हेही वेषांतर केलेले गँगस्टरच आहेत.
□ एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसतो आणि त्यांची बदनामी होईल असे वर्तन करतो म्हणून त्यांच्यासारख्या दिसणार्या डुप्लिकेटवर पुण्यात गुन्हा.
■ ओरिजिनल आणि डुप्लिकेट यांच्यात फरकच ओळखू येत नाही म्हणजे सोंग किती अस्सल असेल?