अशी आहे ग्रहस्थिती
राहू-हर्षल मेषेत, मंगळ -वृषभेत, बुध (वक्री), शुक्र-रवि कन्येत, केतू- तुळेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन मीन राशीत, चंद्र- वृश्चिकेत, त्यानंतर धनु-मकर आणि सप्ताहाच्या अखेरीस कुंभेत.
दिनविशेष – २ ऑक्टोबर गांधी जयंती, ५ ऑक्टोबर दसरा, ६ ऑक्टोबर पाशांकुश एकदाशी.
मेष – आगामी काळ नोकरी करणार्यांसाठी अनुकूल राहणार आहे. रवीबरोबर होणारा नवपंचमयोग त्यामुळे यंत्र उद्योग, अवघड उद्योग, यामध्ये काम करणार्या मंडळींना उत्तम काळ राहणार आहे. याखेरीज रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगले लाभ मिळू शकतात. शनि-बुध यांचा होणारा नवपंचमयोग यामुळे एखाद्या कामात कागदपत्रात गडबड होण्याची दाट शक्यता आहे. हिशेबाची कागदे हाताळताना काळजी घ्या. बोलताना वाणीमध्ये गोडवा ठेवा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या मंडळींना चांगली संधी मिळू शकते. कामगारांचे नेते म्हणून काम करणार्या मंडळींना अच्छे दिन अनुभवायला मिळतील.
वृषभ – आपल्या व्यभिचारी वृत्तीला लगाम लावा. प्रेमप्रकरणात अपयश येईल. विद्यार्थी वर्गासाठी उत्तम काळ रहाणार आहे. संततीकडून चांगल्या प्रकारची यशप्राप्ती होईल. संगीत, कला, अभिनय या क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी चांगला काळ राहाणार आहे. पंचमात वक्री बुध त्यामुळे चंचलपणा, वेळकाढूपणा अशी वृत्ती टाळा, अन्यथा एखाद्या कामात नुकसान होऊ शकते. वक्री शनी भाग्यात, शनि-मंगळ नवपंचम योग त्यामुळे कृषी, विज्ञान, या क्षेत्रात काम करणार्यांना चांगले यश मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वात काही बदल घडू शकतो.
मिथुन – कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने येणारा काळ उत्तम राहणार आहे. बुध विक्री स्वराशीतून सुखस्थानात. समाजसेवा करणारी मंडळी, कलावंत, क्रीडापटू यांच्यासाठी उत्तम काळ राहाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात चांगले लाभ मिळतील. मानसन्मानाचे योग आहेत. नवी गुंतवणूक कराल, त्यामध्ये भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. दशम भावावर वक्री शनिची दृष्टी त्यामुळे व्यवसायाच्या गाडीचा वेग जर मंदावला असेल, तर त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. मंगळाची षष्ठम भावावर दृष्टी त्यामुळे थोडया बहुत प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुकृपेमुळे अडचणीतून मार्ग सापडेल.
कर्क – बंधुवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. मंगळाचे लाभातील भ्रमण त्यामुळे अनपेक्षित लाभाच्या दृष्टीने उत्तम काळ राहणार आहे.सप्तम भावातील वक्री शनि-प्लूटो यामुळे तुम्ही भागीदारी व्यवसायात असाल तर त्या ठिकाणी मतभेदाचे प्रसंग निर्माण होतील. शनि-राहू-केतू केंद्रयोग यामुळे नियमाच्या विरुद्ध काम करण्याचे टाळा. नोकरीच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. राहत्या घरापासून दूर जावे लागू शकते. खेळाडूंना मैदानी स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. एखादी महत्वाची वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. मामा, मावशीच्या संदर्भात एखादी बातमी कानावर पडू शकते. शत्रूपीडा होण्याची शक्यता आहे. महिलांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो.
सिंह – व्यापारी वर्गासाठी अत्यंत लाभदायक काळ रहाणार आहे. रवीचे धनस्थानातील भ्रमण सोबत शुक्र, वक्री बुध. अनपेक्षित धनलाभाचे योग जुळून येत आहेत. शेअर बाजार, कमिशन एजन्ट, जमिनीची खरेदी-विक्री करणारे ब्रोकर, यांना चांगले लाभ मिळतील. उत्तम आठवडा जाईल. राजकीय मंडळी, सरकारी क्षेत्रात काम करणारी मंडळी यांच्यासाठी प्रतिष्ठा वाढवून देणारा काळ राहील. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्या. १ ते ३ ऑक्टोबर हा काळ विशेष शुभदायी राहणार आहे. जुने मित्र भेटतील. काही जणांना संसर्गजन्य आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सतर्क राहा…
कन्या – कोणत्याही विषयावर आपण घेतलेले निर्णय हे उपयुक्त रहाणार आहेत. रवि-शुक्राची जोड मिळाल्यामुळे हे निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. २ ते ४ ऑक्टोबर रोजी होणारे गुरु-चंद्र गजकेसरी योग आहे. यामुळे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळालेले दिसेल. पंचम भावातील वक्री शनीमुळे संततीची पिछेहाट झालेली दिसेल. दाम्पत्य जीवनात असमाधानकारक स्थिती राहील. विदयार्थी वर्गाने शिक्षण क्षेत्रात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीची नवीन संधी मिळू शकते.
तूळ – शुक्राचे व्ययातील भ्रमणामुळे खर्च वाढणार आहे. त्यामुळे पैसे जरा जपूनच खर्च करा. नव्याने गुंतवणूक कराल त्याचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. कुंडलीत गुरु-बुध-शुक्र विपरीत राजयोग होत आहे. त्यामुळे विपरीत परिस्थितीत चांगले यश मिळू शकते. अष्टमातील मंगळामुळे थोडी आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. पत्नीसाठी अनावश्यक पैसे खर्च करावे लागतील. घनिष्ठा नक्षत्रातील वक्री शनिमुळे कौटुंबिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे कौटुंबिक निर्णय घेताना समंजसपणाची भूमिका ठेवावी लागेल.
वृश्चिक – तुम्ही घेतलेल्या अचूक निर्णयाचा चांगला फायदा झालेला झालेला दिसेल. लाभातील रवि-शुक्र-बुध या ग्रहांमुळे अनपेक्षित लाभ मिळणार आहे. पंचमातील वक्री गुरु संततीसाठी भलताच लाभ मिळवून देणारा राहाणार आहे. प्राध्यापक, शिक्षक, इंजिनीअर या मंडळींसाठी एकदम उत्त्ाम काळ राहणार आहे. समाजात मान सन्मान मिळेल. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. कर्ज काढून सण साजरा करू नका. नोकरीच्या ठिकाणी चांगली स्थिती राहू शकते. नवीन जबाबदारी मिळू शकते.
धनु – व्यवसायाची घोडदौड चालू राहणार आहे. नवीन जोडधंदा सुरु होऊ शकतो. स्टेशनरी, कापड, मेडिकल या व्यवसायात असणार्या मंडळींना चांगला काळ राहील. व्यवसायात चांगली प्रगती होतील. संततीची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्या मंडळींसाठी चांगला काळ राहील. विवाहेच्छुक मंडळींचे लग्न जमण्याचे योग आहेत. नोकरीच्या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या जोरावर पदोन्नती मिळण्याचे योग आहेत.
मकर – पाण्यात पडला आहात त्यामुळे तुम्हाला हात मारावे लागणार आहेत. समोर आलेल्या परिस्थितीबरोबर जुळवून घेत त्यामधून मार्ग काढावा लागणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. बुध-शुक्र-रवि परिस्थितीवर मात करण्याची ताकत देतील. संततीसाठी उपयुक्त काळ राहणार आहे. विद्यार्थ्यांना नव्या संधी चालून येतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. सरकारी कामे झटपट पूर्ण झालेली दिसतील.
कुंभ – शनि वक्री व्यय भावात, त्यामुळे खर्च वाढलेला दिसेल. कर्ज फेडताना अडचणी येतील. पत्नीकडून मदत होईल. पराक्रम भावातील राहुमुळे बंधुवर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल. वात पिडा असणार्या मंडळींना त्रास होण्याची शक्यता आहे. कामामध्ये लक्ष केंद्रित करा, चांगला फायदा झालेला दिसेल. संततीकडून कौतुकास्पद कार्य होईल. योगशास्त्र, ध्यानधारणा यामधून आनंद मिळेल. अध्यात्मिक क्षेत्रात रमाल.
मीन – भागीदारी व्यवसाय-नोकरीतील मंडळींसाठी आठवडा उत्तम राहणार आहे. विवाहाच्या बाबतीत सकारात्मक बातमी समजेल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल. दूरवरच्या प्रवासाचे योग आहेत. मामा, मावशींकडून लाभ होईल. इस्टेट, मालमत्तेच्या संदर्भात लॉटरी लागेल. मित्र-मंडळींच्यामध्ये बाचाबाची होण्याची शक्यता आहे. संततीसाठी उत्तम काळ राहणे आहे. २ ते ४ हे दिवस गुरु-चंद्र जगकेसरी योग शुभ घटनांचा काळ अनुभवायला मिळणार आहे.