ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या स्थापनेनंतर बराच अवधी जाहीर सभा झाली नव्हती. कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते, या कार्यकर्त्यांना एकत्रित भेटण्यासाठी शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे ठरले आणि त्याचा मुहूर्त ठरला दसरा मेळावा!
१९ जून १९६६ला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ३० ऑक्टोबर १९६६ला पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता. दरवर्षी या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांना याच दिवशी वर्षभरासाठी कार्यक्रमांची रूपरेषा सांगत. त्यामुळे निष्ठावंत शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासात दरवर्षी बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर न चुकता येत होते. मात्र या परंपरेत तीन वर्ष खंड पडला होता. २००६ साली अतिपावसामुळे दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता. याशिवाय २००९ व २०१४मध्ये विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा झाला नव्हता. हे अपवाद वगळल्यास आजतागायत दसरा मेळाव्याची परंपरा कायम आहे.
२०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात भाषण केले होते. अकोलकर यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरेल की नाही अशी भीती बाळासाहेब ठाकरे यांना वाटत होती. म्हणूनच निदान समोर प्रेक्षक दिसावेत अशा विचाराने पार्कच्या कडेऐवजी मधोमध व्यासपीठाचा मंच उभारण्यात आला होता. या पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या अपेक्षेच्या उलट प्रचंड गर्दी झाली होती. यानंतर ना शिवसेनेकडून कधी व्यासपीठाची जागा बदलली ना कधी शिवसैनिकांची गर्दी ओसरलेली पाहायला मिळाली.
दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची तोफ अनेकदा कडाडली होती, शिवसैनिकांच्याच नव्हे तर देशभरात सर्वांच्या कायम लक्षात राहतील असे अनेक क्षण या शिवतीर्थाने पाहिले आहेत. १९७५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविण्याचा क्षण असो वा १९९१मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या सामन्याला विरोध करायचा असो, असे अनेक महत्त्वाच्या घोषणा बाळासाहेबांनी या शिवतीर्थावर केल्या होत्या. १९७८च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर बाळासाहेबांनी, ‘तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तर मी शिवसेना सोडून जातो,’ असं मुंबईकरांना सुनावलं होतं. या एका वाक्याचा थेट परिणाम १९८५च्या महापालिका निवडणुकीत दिसला आणि पहिल्यांदा शिवसेनेने स्वबळावर महापालिकेत भगवा फडकवला.१९९१ साली बाळासाहेबांनी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा दिला होता, यानंतर शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन पिच खोदून वर डांबर टाकलं. परिणामी तिथे मॅच होऊ शकली नव्हती.
दरम्यान, २०१० मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा समावेश ‘सायलेंट झोनमध्ये’ केल्यावर ‘सामना’तून बाळासाहेबांनी या निर्णयावर कडाडून टीका केली होती, ज्यांनंतर हायकोर्टाने पक्षाला वार्षिक सभा शिवाजी पार्कात घेण्याची परवानगी दिली होती. आता यंदा हे मैदानात खरे शिवसैनिक दसरा मेळावा घेणार आहेत. इथला फोटो ८-१०-२०१९ चा आहे ज्यावेळी शेवटचा दसरा मेळावा झाला होता तेव्हा पण गद्दार अशीच मान खाली घालून होते आणि आजही आहेत उद्या पण असेच राहतील.