हे चित्र अमर आहे… १९७७ सालातले हे चित्र आहे… ४५ वर्षांपूर्वीचे… पण, ते कधीही शिळे होऊ शकत नाही… प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात ते कोरले गेले आहे… शिवसेनेवर प्रेम करणार्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दर दसर्याला जे भावनांचे सीमोल्लंघन होते, त्याचे दर्शन घडवणारे हे चित्र आहे… वरवर पाहाल तर किती साधं चित्र… एक धट्टाकट्टा युवक उभा आहे आणि हाताची मूठ वळून लोकांना आवाहन करतो आहे… त्याच्यामागे लाट उसळली आहे… भगव्या लाटेचे दर्शन घडवा, असे त्याचे आवाहन आहे… या वर्षी तर या चित्राला वेगळं महत्त्व आहे… भारतीय जनता पक्षाच्या तथाकथित महाशक्तीच्या जोरावर बेडकीचे बैल झालेल्या गद्दारांच्या मिंधे सेनेने शिवतीर्थ आणि शिवसेना यांची फारकत करण्याचा नीच प्रयत्न केला… त्या कटात महानगरपालिकेलाही सामील करून घेतले… पण, न्यायदेवतेचे डोळे फुटलेले नाहीत… आमचीच शिवसेना खरी, म्हणून आम्हालाच मैदान हवे, असे सांगून आडून आपला खुंटा बळकट करू पाहणार्यांना त्या खुंट्याचा भलताच ‘सदु’पयोग झाल्याचे लक्षात आले आणि बोंब मारायचीही सोय राहिली नाही… शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, तिथे शिवसेना पक्षप्रमुखांचे ज्वलंत विचार ऐकायला अलोट गर्दी होणार… ही परंपरा अबाधित राहणार… हे चित्र अमर आहे, ते अमरच राहणार…