व्यापार्यांनी खंडणी द्यावी, यासाठी त्यांच्या भागातल्या गाड्या जाळून दहशत निर्माण करणं, खंडणीसाठी धमकावणं, ती दिली नाही, तर पुन्हा अशाच प्रकारचे काही गुन्हेगारी कृत्यं करणं, हाच या टोळीचा कार्यक्रम होता. ही टोळी उघडपणे वावरत नव्हती, पण त्यांच्या छुप्या कारवाया सुरू होत्या. या भागातले काही जण त्यांना लपूनछपून साथही करत होते, हेही पोलिसांच्या लक्षात आलं. या टोळीला जेरबंद करणं हे मोठं आव्हान होतं.
– – –
“साहेब, तुमचं सगळं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं, पण तुमच्या एकट्याची बाईक कुणी मुद्दाम जाळली असेल, असं अजूनही आम्हाला वाटत नाहीये!“ हवालदार डोईफोडे समोर बसलेल्या निरंजनला समजावून सांगत होते आणि तो अजिबात ऐकायला तयार नव्हता.
“अहो, ताईकडे मी काल राहायला आलो होतो. रात्री सोसायटीच्या बाहेर बाईक लावली होती. माझ्याबरोबर इतर बर्याचजणांच्या बाईक जाळल्या गेल्यायंत काल रात्री. आता त्यांनी तक्रार का केली नाही, हे मला काय माहीत? तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या आणि तपास करा ना!“ त्याने समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मोहिते नेहमीच्या पद्धतीने `कशाला नसती कटकट` म्हणून त्याला उडवून लावण्याच्या तयारीतच होते, तेवढ्यात इन्स्पेक्टर कुडाळकर पोलिस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी ही वादावादी ऐकली.
“काय झालंय, मोहिते? काय म्हणणं आहे ह्यांचं? माझ्या केबिनमध्ये घेऊन या ह्यांना!“ असा आदेशच त्यांनी दिल्यावर मोहितेंचा नाइलाज झाला.
निरंजन फारच अस्वस्थ होता, चिडलेला होता. कुडाळकरांनी त्याला आधी शांत बसवलं, पाणी प्यायला दिलं आणि काय घडलं, ते त्याच्याकडून नीट समजून घ्यायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं, त्यानुसार आदल्या दिवशी संध्याकाळीच तो `सप्ततारका` सोसायटीमधील त्याच्या बहिणीच्या, राधिकाच्या घरी राहायला गेला होता. त्याने त्याची बाइक सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर लावली होती. तिथे अन्य काही बाइक्सही होत्या. सकाळी ताईच्या सांगण्यावरून तो दूध आणि पेपर आणायला लवकर बाहेर पडला, तेव्हा त्याला त्याची बाइक जळालेली दिसली. त्याच्या आजूबाजूच्या काही बाइक्सही जळाल्या होत्या. निरंजन घाबरला, घाईघाईने घरी परत आला. राधिकाला सगळा प्रकार सांगितल्यावर तीही घाबरून गेली. तिने सोसायटीतल्या काही लोकांना गोळा करून या प्रकाराची माहिती दिली. सुमारे पाच ते सहा बाइक्सना आग लागल्याचं आणि त्यांचं नुकसान झाल्याचं निरंजनने स्पष्ट बघितलं होतं. त्या बाइक्स कुणाच्या, आग लागली होती की कुणी मुद्दाम लावली होती, यातलं काही कळायला मार्ग नव्हता. पटापट सगळं आवरून सगळ्यात आधी पोलीस स्टेशन गाठून तक्रार करायचं त्यानं ठरवलं होतं. पोलीस स्टेशनला येऊन त्यानं सगळी हकीकत सांगितली, तेव्हा हवालदार मोहितेंनी त्याच भागात असलेल्या त्यांच्या पोलीस पथकाला या ठिकाणी जाऊन पाहणी करायला सांगितलं. दोन पोलीस शिपायांनी तिथे पाहणी केली, तर जळाल्याच्या खुणा होत्या, पण जळालेली एकच बाइक तिथे त्यांना आढळली होती.
कुडाळकरांनी हा काय प्रकार आहे, हे शोधून काढायचं ठरवलं. एक माणूस आपल्याकडे येऊन एवढ्या पोटतिडकीनं काहीतरी सांगतोय तर त्यात तथ्य असणार, निदान त्याची दखल घ्यावी, एवढं तरी त्यांना लक्षात आलं होतं.
“कुणीतरी बाइक मुद्दाम जाळली आहे, हे तुम्हाला कसं कळलं?“ जाता जाता गाडीत त्यांनी निरंजनला विचारलं.
“साहेब, काल रात्री मी खिडकीतून खाली पाहिलं, तेव्हा गुंडांचं एक टोळकं तिथे घुटमळत होतं. ते दारू पीत होते, गाड्यांकडे बघून खाणाखुणा करत होते.“
निरंजन खोटं सांगत नसावा, याबद्दल कुडाळकरांना विश्वास होता, पण त्याचीच बाइक का जाळली, हा प्रश्न होताच. इतरही बाइक जाळल्या असल्या, तर त्या गेल्या कुठे? त्याबद्दल कुणी तक्रार का केली नाही, हे कळायला मार्ग नव्हता. कुडाळकरांनी घटनास्थळाची पाहणी केली. निरंजनच्या बाईकचा फक्त सांगाडाच शिल्लक होता. कुणीतरी मुद्दाम पेट्रोल टाकून ती जाळलेय, हे त्यांच्या लक्षात आलं. आजूबाजूलाही आगीची धग लागली होती. जळालेल्या इतर बाइक्स मात्र जागेवर नव्हत्या.
“मोहिते, ह्या भागात कुठे सीसीटीव्ही आहेत का चौकशी करा,“ अशा सूचना देऊन कुडाळकर स्वतः सोसायटीच्या वॉचमनची खबर घ्यायला गेले.
“रात्री तुमच्या सोसायटीच्या बाहेर काही जणांनी बाइक्स जाळल्या, आग पेटली, तेव्हा तुम्ही कुठे झोपा काढत होतात?“ त्यांनी दरडावून विचारलं. शिवराम आणि अविनाश या दोन्ही वॉचमननी माना खाली घातल्या. आपण रात्री थोडा वेळ सोसायटीच्या मागच्या बाजूला गेलो होतो, तिकडेच गप्पा मारत बसलो होतो, हे त्यांनी कबूल करून टाकलं. सोसायटीच्या सुरक्षेची काय अवस्था असणार, हे कुडाळकरांना लगेच लक्षात आलं.
हा प्रकार रात्री उशिरा झाला होता आणि आजूबाजूला कुणालाच लक्षात आला नव्हता. पुरावे मिळाले नसले, तरी इतर बाइक्स गेल्या कुठे आणि त्याबद्दल काहीच तक्रार का आली नाही, हे गूढ मात्र कायम होतं. कुडाळकरांनी निरंजनला सर्व प्रकारे मदत करायचं आश्वासन दिलं, धीर दिला. चौकशीतून फारसं काहीच निष्पन्न झालं नाही.
पुन्हा काही दिवसांनी साईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असाच प्रकार घडल्याचं कानावर आलं, तेव्हा मात्र गुन्हेगारांना जरब बसवण्याची गरज आहे, हे कुडाळकरांनाr गांभीर्यानं घेतलं. यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारची गफलत नको होती. रात्रीच्या अंधारात समाजकंटकांनी काही बाइक्स जाळल्याचं स्पष्ट लक्षात येत होतं. यातल्या काही बाइक्स त्या भागातल्या व्यापार्यांच्या, रहिवाशांच्या होत्या. पोलिसांनी बाइक्सच्या मालकांचा पत्ता काढून त्यांच्याकडे चौकशी केली. कुणी त्रास देत होतं का, कुणी हे मुद्दाम केलंय का, कुणावर संशय आहे का, अशा अनेक प्रकारे माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण ठोस असं काहीच हाती लागलं नाही. व्यापारी सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगत नाहीयेत, हे मात्र कुडाळकरांच्या लक्षात आलं होतं. आता वेगळ्या प्रकारे माहिती काढून घेण्याची गरज होती. त्यांनी पथकाला एकेका व्यापार्यावर नजर ठेवायला सांगितलं, याच भागातले त्यांचे प्रतिस्पर्धी व्यापारी हेरून त्यांच्याकडून काही माहिती मिळवता येते का, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. खबरीही कामाला लावले.
“इथल्या व्यापार्यांनी आपल्याला बर्याच गोष्टी सांगितल्या नाहीयेत, साहेब,“ दोन-चार दिवस नीट चौकशी केल्यानंतर मोहिते विश्वासाने सांगायला उभे राहिले.
“काय आलंय कानावर?“ कुडाळकरांनी उत्सुकतेनं विचारलं.
“या भागात गुंडांची एक टोळी व्यापार्यांकडून खंडणी वसूल करण्याचे उद्योग करते. काही जणांना धमकावून, दरडावून पैसे वसूल केले जातात. व्यापार्यांनी पैसे दिले नाहीत, तर दहशत माजवण्यासाठी दमबाजी केली जाते. बाइक्स जाळणं हासुद्धा या दहशतीचाच एक प्रकार आहे,“ मोहितेंनी मिळवलेली सगळी माहिती सांगून टाकली.
व्यापार्यांनी खंडणी द्यावी, यासाठी गाड्या जाळून दहशत निर्माण करणं, खंडणीसाठी धमकावणं, ती दिली नाही, तर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हेगारी कृत्यं करणं, हाच या टोळीचा कार्यक्रम होता. ही टोळी उघडपणे वावरत नव्हती, त्यांच्या छुप्या कारवाया सुरू होत्या. या भागातले काही जण त्यांना लपूनछपून साथ देत होते, हेही पोलिसांच्या लक्षात आलं. आधीही याच हद्दीत एक दोन ठिकाणी या टोळीनं अशा गाड्या जाळायचे धंदे केले होते, तेव्हा त्याबद्दल तक्रारी नोंदवल्या गेल्या नव्हत्या, हे पोलिसांना तपासात दिसून आलं.
“सप्ततारका सोसायटीच्या बाहेर काही दिवसांपूर्वी जो प्रकार घडला, तोसुद्धा ह्याच टोळीनं केलेला असणार. निरंजन जे सांगत होता, ते सगळं खरंच होतं,“ कुडाळकर म्हणाले. याचा अर्थ तिथेही आणखी काही गाड्या जाळल्या गेल्या होत्या, मात्र त्या भागातल्या लोकांनी घाबरून त्याबद्दल तक्रारी दिल्या नव्हत्या. शिवाय तिथून जळलेल्या गाड्याही हलवल्या होत्या.
“या टोळीची एवढी दहशत आहे, त्या अर्थी हे गुंड त्यांना सतत त्रास देत असणार, हे उघड आहे. या टोळीवर लक्ष ठेवून त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवाय,“ कुडाळकर संतापून म्हणाले. टोळीचे धंदे लक्षात आले असले, तरी त्यांना पोलिसी बडगा दाखवण्यासाठी पुरावे आवश्यक होते. त्यांना रंगेहाथ पकडायची गरज होती. शिवाय नेमकी कुठली टोळी हे उद्योग करतेय, याबद्दल पोलिसांना ठोस काही समजलं नव्हतं.
आधी ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या, तिथे जाऊन पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला. व्यापार्यांशी चर्चा केली. ज्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. मात्र व्यापारी, रहिवासी माहिती देत असले, तरी तक्रार देण्याचं कुणाचं धाडस होत नव्हतं. तिथे मात्र सगळे एक पाऊल मागे येत होते. तक्रार केली तर आपलं काही खरं नाही, असाच त्यांचा ठाम समज होता. ज्या पद्धतीने ही टोळी या भागात दहशत निर्माण करत होती, त्यावरून त्यांना कुणाचीच भीती नाही, हा समज आणखी घट्ट होणंही साहजिक होतं.
इन्स्पेक्टर कुडाळकरांनी या टोळीचा बंदोबस्त करायचा ठाम निश्चय केला होता. आपल्या सगळ्या यंत्रणेला त्यांनी अलर्ट केलं होतं. पोलिसांच्या पुढाकारामुळे लोकांनाही थोडा दिलासा मिळाला होता. आता आपल्या भागात अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा घडणार नाही, अशी आशा त्यांना वाटत होती. मात्र त्यांचा अंदाज चुकीचा आहे, हे लवकरच लक्षात आलं. पोलीस स्टेशनच्या अगदी जवळ, भालके चौकात पुन्हा काही गाड्या जाळण्याचा प्रयत्न झाला आणि हा परिसर पुन्हा दहशतीच्या छायेत गेला. सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. आता पोलिसांनी लक्ष घालूनही आपला भाग सुरक्षित नाही, अशाच प्रकारची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. काही सजग नागरिकांनी पोलिसांची भेट घेऊन ही भीती त्यांच्यापाशी व्यक्त केली. इन्स्पेक्टर कुडाळकरांनी सगळ्यांना शांत केलं आणि काही दिवसांतच या टोळीच्या मुसक्या आवळू, असं आश्वासन दिलं. मात्र यावेळी नागरिकांची पोलिसांवरची नाराजी स्पष्टपणे दिसत होती. पोलिसांसमोरचं आव्हान आणखी अवघड झालं होतं.
दिवसभर ही चर्चा सुरू राहिली आणि रात्र झाल्यावर सगळं शांत झालं. बारा वाजून गेले, तशी रस्त्यावरची वर्दळही कमी झाली. एक-दीडच्या सुमारास तर रस्ते अगदीच सामसूम झाले. भालके चौकात एका कोपर्यात काही मंडळी जमा झाली होती. त्यांच्यात आपापसात काही चर्चा सुरू होती. हळूहळू त्यांचा आवाज वाढत गेला. कुणीतरी एक जण तावातावाने इतरांना सूचना देत होता. बहुतेक आदल्या रात्री याच ठिकाणी जाळल्या गेलेल्या गाड्यांबद्दलच तो चिडला होता. काही क्षण गेले आणि सगळेच चवताळून उठल्यासारखे दिसेल त्या गाड्यांवर पेट्रोल, रॉकेलचे कॅन रिकामे करताना दिसू लागले. यावेळी त्यांच्या अंगात्ा जास्तच जोश आला होता, जणू ते पिसाटलेच होते. अनेक गाड्यांवर इंधन ओतून झाल्यानंतर लायटर लावणार, तेवढ्यात कुठूनतरी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अचानक समोर येऊन सगळ्यांची गचांडी धरली.
“धरा रे, ठोका साल्यांना… ठेचा… एकालाही पळून जाऊ देऊ नका… मोहिते, पाटील, देशमाने, धरा त्यांना… फटकवा…!“ अशा सूचना दिल्या गेल्या आणि एकच कोलाहल झाला. गाड्या जाळायला निघालेले गुंड चारही बाजूंनी पोलिसांनी घेरले गेले आणि आपण जाळ्यात अडकल्याचं त्यांना लक्षात आलं. सूचना देणारा तो आवाज इन्स्पेक्टर कुडाळकरांचा होता. त्यांनीच हा सापळा रचला होता. आदल्या दिवशी ज्या दोन-तीन गाड्या जाळण्याचा प्रयत्न झाला, तो या गुंडांच्या टोळीला पकडण्यासाठी त्यांच्याच कल्पनेतून रचला गेलेला सापळा होता.
या भागात गाड्या जाळण्याचे गुन्हे करणारी ही टोळी होती जगदीप कोंढरे नावाच्या गुंडाची. त्यांना चिथावण्यासाठीच हा सापळा रचला गेला होता. आपल्या भागात आपल्याशी स्पर्धा करणारी दुसरी कुठली टोळी निर्माण झाली, या विचारानेच कोंढरे टोळी सैरभैर झाली आणि बरोबर ह्या सापळ्यात अडकली. खंडणी वसूल करण्याबरोबरच बांधकामाचं साहित्य चोरण्यासह इतरही काही गुन्हे केल्याचं ह्या टोळीतल्या गुंडांनी कबूल केलं. पोलिसांच्या दक्षतेमुळे आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे गुन्हेगारांना पुन्हा एकदा वचक बसला.