□ ‘सहकारा’बद्दल आम्हाला कोणी सल्ला देऊ नका – अमित शहा
■ तुम्हाला सल्ला देण्याचा वेडपटपणा कोण करणार? कशाबद्दलचा सल्ला तुम्ही ऐकता?
□ ‘योगी हे उपयोगी’: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा
■ तसं उत्तर प्रदेशच्या जनतेला वाटलं, तर फायदा!
□ उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या खासदाराने युवा कुस्तीगीराच्या कानशिलात भडकवली…
■ जनता कानफटवायला बसली की कळेल यांना!
□ दारूमुक्त राहून मतदान करा: डॉ. अभय बंग
■ मतदार राजा हुशार आहे, तो एकाकडून बाटली घेतो, दुसर्याकडून पाकीट घेतो, तिसर्याकडून साडी घेतो, चौथ्याच्या पैशाने तीर्थयात्रा करून येतो… पण मत बरोब्बर हवं त्यालाच देतो!
□ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा केंद्र सरकारचा रिमोट कंट्रोल नाही- सरसंघचालक मोहन भागवत
■ मोदींचे विमान तुमच्या संदर्भात ऑटो पायलटवरच आहे सुरुवातीपासून… त्याचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हाती आहे ते जनता जाणते भागवत साहेब!
□ शिवाजी महाराजांचा पुतळा तरूण पिढीला सतत प्रेरणा देत राहील- अमित शहा
■ काय सांगता? तुमच्या पक्षाचे ते बोम्मई महोदय पाकिस्तानात राहतात का? त्यांना हे माहितीच नाही.
□ विनामुखपट्टी फिरणार्यांचे प्रमाण वाढले, दिवसाला पाच-सहा हजार जणांवर कारवाई
■ त्यांचा दोष नाही… देशाच्या सर्वोच्च नेत्यांचा आदर्श घेतला असणार त्यांनी.
□ पुस्तकांमध्ये माणसांना बदलवण्याची ताकद – डॉ. आनंद नाडकर्णी
■ त्यासाठी ती उघडून वाचायला हवीत मात्र.
□ मी नारळफोड्या तर तुम्ही घरफोड्या: खासदार उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर टीका
■ घराणं कोणतं आपलं ते लक्षात ठेवा, काढू नका फुटकळ खोड्या!
□ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संयम शिकण्यासारखा: पंकजा मुंडे
■ पंकजाताई नेमक्या कोणत्या विषयातल्या संयमाबद्दल बोलतायत कोण जाणे! ‘मी पुन्हा येईन’ आणि ‘पुन्हा मीच येईन’ या चक्रातून ते अजून बाहेर आलेले दिसत नाहीत…
□ विराट भांडखोर स्वभावाचा – सौरव गांगुली
■ काळ बदलला की विशेषणं बदलतात, कालपर्यंत जो ‘संघर्षशील’ होता, त्याला आज भांडखोर म्हणतात.
□ व्होट बँकेसाठी देशातील लोकांना गरीब ठेवण्याचे प्रयत्न – अरविंद केजरीवाल
■ या गरीबांनीच देशात अनेक मस्तवाल सत्ताधीशांना धडा शिकवला आहे, हे कोणी विसरू नये.
□ ऐश्वर्या रायला ईडीचे बोलावणे, दिल्ली कार्यालयात चौकशी
■ अमिताभने सरकारी पोपटपंचीला नकार दिला की काय?
□ भाजपला लवकरच वाईट दिवस येतील – जया बच्चन यांचा शाप
■ …नेमका त्याच दिवशी कोलकाता महानगरपालिकेचा निकाल यावा! काय हा योगायोग!
□ गुजरातमध्ये ४०० कोटींचे ड्रग जप्त; पाकिस्तानी बोटीसह सहा जण ताब्यात
■ गुजरात ही देशाची आर्थिक राजधानी बनवण्याचे प्रयत्न या थरावरून सुरू आहेत की काय?
□ कर्नाटक सरकारची दडपशाही, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीच्या हालचाली
■ चिंता नको. आपले मराठी भाजपेयी आहेत की! ते महाराष्ट्रद्रोही नसले तर अमित शहांना सांगून बोम्मईकाकांना निश्चित दम भरतील…
□ आधी आमचे उद्योग पळवणं बंद करा : अमित शहांना राज्याचे उद्योग मंत्री, शिवसेना नेते सुभाष देसाई यांचं चोख उत्तर
■ देसाई साहेब, त्यांचा नाईलाज आहे, इकडून पळवले नाहीत तर तिकडे आपणहून जाणार आहे का कोणी!
□ संभाजीनगरात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर एका लग्नात नोटांचा पाऊस: व्हिडिओ व्हायरल
■ खोट्या नोट्या असणार हो त्या, उगाच ‘आणखी’ जलील करू नका!
□ संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली स्त्रियांना स्वयंपाकघरात डांबण्याचा कट- कवयित्री नीरजा यांची टीका
■ चूल आणि मूल यांतच स्त्रीजीवनाचं सार्थक मानणार्यांच्या राज्यात वेगळं काय अपेक्षिणार नीरजा ताई?
□ तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करा: नवाब मलिक यांची खोचक टीका
■ म्हणजे काय, ते ओएसडी नाहीत?… हीच एक मोठी बातमी आहे मग!
□ हिंमत असेल तर १०५ आमदारांचे राजीनामे द्या: खासदार, शिवसेना नेते संजय राऊत यांचे अमित शहांना उत्तर
■ तसं कसं करणार राऊतसाहेब! राजीनामे दिल्यावर आयात केलेल्यांतले पाच तरी राहतील काय तिकडे!