गव्हात किंवा तांदळात खूप टोके झाल्यावर किंवा फ्रीज शिळ्या आणि ताज्या पदार्थानी खचाखच भरल्यावर जसं आपल्याला अस्वस्थ वाटतं तसं यांना घरी हा खूप पैसा असल्यावर वाटत असेल का, असं मला कधीकधी कोथिंबीर निवडता निवडता वाटून जातं… मग विचारांच्या भिरकीत मी देठ इकडे आणि कोथिंबीर देठांमधे भिरकावून देते. मग परत सगळी उस्तवार करत बसते, हे भ्रष्टाचाराचे साइड इफेक्ट्स आहेत.
—–
कुठल्याही फील्डवर न जाता घरी बसल्या बसल्या बातम्या बघायच्या म्हटल्या, तरी आताशा डोळे बिलबिलायला लागलेत…
…दहा सुपं तांदूळ एकाच टायमाला बघितले तरी डोळे बिलबिलणार्या आम्ही भाबड्या बायका… आणि घरात लपवलेले एवढे ढिगांनी पैसे बघून डोळे पांढरे होण्याची वेळ आली… दोन कोटी सत्तावन लाख रुपये ही रक्कम होती. (ज्यांचं हृदृय कमजोर आहे, त्यांना ही दृश्ये विचलित करू शकतात, असा वैधानिक इशारा या ठिकाणी दिला पाहिजे… असा मोलाचा सल्ला मला आत्ताच ताजा सुचलेला आहे).
गंमत म्हणजे नोटा स्वच्छ निर्मळ करकरीत दिसल्या. मळक्या, घड्या पडलेल्या, फाटलेल्या अजिबात नव्हत्या. टापटीपेने नीट रचलेल्या दिसल्या. बेशिस्तपणा कुठेही दिसला नाही. यावरून त्यांचा नीटनेटकेपणा हा गुण दिसून येतो.
शिवाय साधारण पाच किलोचा डबा (हिंडालियमचा) भरेल एवढे दागिने होते. ते त्यांनी खरेदी केलेले होते. थोडे पैसे खर्च करून की पैशांऐवजी दागिन्यांवरच भागवून घेतलं, हा संशोधनाचा विषय आहे. त्यांनी डायरेक्ट दागिनेच घेतले असतील तर वजन करून खरेखोटे पारखून घेतले असतील का, यावर उहापोह व्हायला पाहिजे.
मी दोनतीनदा टीव्हीवर फोटो बघितले. पण मला त्यांचं डिझाईन काही आवडलं नाही. एकही दागिना ‘वा! काय सुंदर डिझाईन आहे’ असा नावाजावासा काही वाटला नाही. गळ्यात घालायचा सोडूनच द्या, हातात पण घ्यावासा वाटला नाही (दागिने विकत घेतले असतील तर मग जरा च्युझी व्हायला हवं होतं. पैसे फुकटचे असले तरी दागिन्यांसाठी लाखो दमड्या मोजाव्या लागल्याच असतील ना? दागिने पंचाहत्तर लाखांचे होते म्हणे).
अर्थात जरा सविस्तरपणे दाखवायला हवे होते दागिने! हिर्यांचे दागिने काही मला दिसले नाहीत… कदाचित ते ढिगाच्या खाली लपवले असतील… उत्खनन करायला हवे.
जर चौवीस तास न्यूज चॅनेलं सुरू असतील तर असे इनोवेटिव्ह कार्यक्रम आखायला काय हरकत आहे? रात्री बारा ते एक हा दागिने दाखवण्याचा कार्यक्रम असता तर मी जागून हा कार्यक्रम बघितला असता. अजून चारजणींना बोलावून मसाला दूध पीत चांगला एन्जॉय केला असता. लोकं त्याच त्या बातम्या बघून कंटाळतात… अशी व्हरायटी आणण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे. कल्पकता दाखवायलाच पायजेल हाय!
भ्रष्टाचार करण्यात तर कल्पकता ओतप्रोत भरलेली असते. कधी? कसे? कुठे? किती?… किती किती बेत करावे लागतात! परत ती संपत्ती लपवायची कुठे? गुंतवायची कुठे? उपभोगायची कधी? किती ताप असतो डोक्याला! शी! त्यापेक्षा पैसा न खाल्लेलाच बरा… असंही एखाद्याला वाटत असेल (म्हणजे वाटायलाच हवं).
खरं तर मोठ्या बौद्धिक कौशल्याचं हे काम आहे. प्रचंड शूरतेचं काम आहे. फक्त ही ताकद अनाठायी खर्ची पडते एवढंच!
गव्हात किंवा तांदळात खूप टोके झाल्यावर किंवा फ्रीज शिळ्या आणि ताज्या पदार्थानी खचाखच भरल्यावर जसं आपल्याला अस्वस्थ वाटतं तसं यांना घरी हा खूप पैसा असल्यावर वाटत असेल का, असं मला कधीकधी कोथिंबीर निवडता निवडता वाटून जातं… मग विचारांच्या भिरकीत मी देठ इकडे आणि कोथिंबीर देठांमधे भिरकावून देते. मग परत सगळी उस्तवार करत बसते, हे भ्रष्टाचाराचे साइड इफेक्ट्स आहेत.
बरं या माणसाला एवढे लाखो रुपये दिले कोणी? उद्या होणार्या शिक्षकांनी? ही परत एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
तुकाराम या नावाला तरी जागायला पाहिजे होतं! आवलीचं याबद्दल काय मत आहे? तुकाराम मुंढे साहेब बघा कसे तडफेने राहतात. तुकाराम महाराजांना तर धन मृत्तिकेसमान होतं, हे यांना समजावून सांगणार कोण? भ्रष्टाचारात अडकलेल्या अशा लोकांच्या सविस्तर मुलाखती व्हायला हव्यात. खूप छान मोठी सिरिज करता येईल. बाकी त्यान्ला कोणतीच शिक्षा द्यायची नाही. बस बोला आणि जगप्रसिद्ध व्हा!
हां, तर तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली?
पहिल्यांदा मिळालेल्या मोठ्या रकमेचं काय केलं?
एक हजारमधला एक रुपयाचा तरी दानधर्म करता का? अशी काही आपली तत्वं आहेत का?
किती पैसे साठवायचं अंतिम उद्दिष्ट होतं?
कुठली महत्वाकांक्षा पूर्ण करायची होती?
मार्केटमधे भाजी घेताना तुमची पत्नी घासाघीस करायची का?
ती ऐकताना तुम्हाला हसू यायचं का?
कुठलीही वस्तू घेताना उरलेले पैसे घ्यायचात की…
कपडे घेताना जे जास्तीत जास्त महागडे असतील ते घ्यायचा की रंग वगैरे बघायचा?
चांदी किलोवर घ्यायचा की टनावर?
पुस्तकं किती रुपयांची विकत घ्यायचा?
एखाद्या गोरगरीब मुलाचं शिक्षण केलं का?
एखादं छोट्टसं साहित्य संमेलन एक टक्का पैसे खर्च करून घ्यावसं वाटलं काहो? (हा प्रश्न शिक्षणक्षेत्रातील मंडळींना विचारता येईल.)
असे कितीतरी प्रश्न विचारता येतील आणि मुलाखत अगदी रंजक होऊन जाईल. फक्त त्यांनी उत्तरं प्रामाणिकपणे दिली पाहिजेत. नेहमीसारखा नकोत.
मला आपलं वाटतं की आता हा जप्त केलेला पैसा कवितेकडे वळवला तर हजारो सुंदर कवी संमेलनं सुखात घेता येतील! हजारो जुईच्या कळ्यांनी वेल जशी बहरते तसा महाराष्ट्र कवितांनी लगडून जाईल. सोन्याचे दागिने सध्या तरी मोडायलाच नकोत. तोपर्यंत ते हिंडालियमच्या डब्यातच राहू देत. मध्ये मध्ये फक्त ऊन दाखवायचं. पुसुनबिसून परत नीट ठेवून द्यायचे. नाहीतर ते तरी दागिने बघण्याशिवाय दुसरा काय उपयोग करत होते?