अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, केतू-मंगळ वृश्चिकेत, रवी-शुक्र (वक्री) धनूमध्ये, शनी-बुध-प्लूटो मकरेत, गुरू-नेपच्युन कुंभेत, चंद्र वृश्चिकेत, त्यानंतर धनू आणि मकरेत आणि सप्ताहाच्या अखेरीस मीनेत, हर्षल (वक्री) मेषेत.
दिनविशेष – २ जानेवारी रोजी मार्गशीष अमावस्या.
मेष – नव्या वर्षाची सुरुवात कष्टदायक होणार आहे. हातातले काम पूर्ण करण्यासाठी खूप घाम गाळावा लागणार आहे. केतू अष्टमात, चंद्र-केतू-मंगळ ग्रहण आणि अंगारक योग अशी ग्रहस्थिती राहणार आहे. लेखा विभागात काम करणार्या मंडळींना कोणताही आर्थिक व्यवहार करताना पारदर्शकता ठेवावी लागणार आहे. अन्यथा एखाद्या विपरीत प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकते. कोणालाही जामीन राहताना दहा वेळा विचार करा. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होतील. त्यानिमित्ताने प्रवास घडण्याचे योग आहेत. नवदाम्पत्याला सासुरवाडीकडून चांगला लाभ होईल. कलाकार मंडळींसाठी सन्मानाचा काळ आहे. विद्यार्थीवर्गाला शिष्यवृत्ती मिळण्याचे योग आहेत. याबरोबरच उच्चशिक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी उत्तम काळ आहे. विवाहेच्छु मंडळींसाठी अत्यंत शुभदायक काळ आहे.
वृषभ – येणारा आठवडा संमिश्र स्वरूपाचा जाणार आहे. शुक्राचे अष्टमात वक्री भ्रमण, शनी भाग्यात, त्यामुळे स्वतःच्या हुशारीबद्दल व्यर्थ वल्गना करणे टाळा. अन्यथा मित्र, आप्तेष्ट यांच्यात हसू होऊ शकते. सप्तमात अंगारक योगात मंगळ असल्यामुळे जोडीदार-भागीदार यांच्याबरोबर बोलताना नमते घ्या. गुरुकृपा लाभेल. आर्थिक-कौटुंबिक सौख्य अनुभवायास मिळेल. कवी, संपादक, लेखक यांच्यासाठी उत्तम आठवडा आहे. वडीलधार्या मंडळींसोबत व्यावहारिक वाद असतील तर त्यावर चर्चा करणे तूर्तात टाळा. ६ आणि ७ तारखेच्या दरम्यान प्रवासात नव्या ओळखी होतील.
मिथुन – पैसा मिळवण्यासाठी नव्या योजना हातात घ्याव्या लागतील, तरच चांगले पैसे मिळतील. पत्नीकडून चांगले लाभ मिळतील. परदेशातील व्यक्तीबरोबर संबध जुळून येतील. प्रेमप्रकरणात चांगले अनुभव येतील. घरात धार्मिक कार्य जुळून येईल. विदेशात व्यापाराच्या संदर्भात बोलणी सुरू असतील तर त्यात घवघवीत यश मिळेल. त्यातून चांगले आर्थिक लाभ होतील. महिलांना अनपेक्षित लाभ होतील.
कर्क – आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस मानसिक अस्थिरतेचे जाणार आहेत. खेळाडूंसाठी उत्तम यश देणारा आठवडा आहे. जबाबदारीची कामे कुशलतेने पार पाडाल. वकील मंडळींना येणारा काळ चांगला जाईल. षष्ठ भावातील वक्री शुक्र आणि रवी यामुळे व्यसनाधीनतेकडे झुकणे, पैशाची उधळपट्टी असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे त्यापासून दोन हात लांबच राहा. भावंडांचे सहकार्य मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विरोधकांना नमवण्याची नामी संधी मिळेल.
सिंह – कलाक्षेत्रात काम करणार्या मंडळींना येणारा आठवडा विशेष लाभदायी जाणार आहे. रवी पंचमात वक्री शुक्राबरोबर त्यामुळे नाट्य, साहित्य, गायन, चित्रकला यात काम करणार्या मंडळींना हा काळ मस्त जाईल. सरकारी पातळीवर सन्मान मिळण्याचे योग आहेत. अत्तरे आदींचा व्यवसाय करणार्या मंडळींना चांगले आर्थिक लाभ मिळतील. मंगळ सुखस्थानात केतूसोबत आहे, त्यामुळे कौटुंबिक क्लेश निर्माण होतील, परंतु सप्तमातील गुरुकृपेमुळे गंभीर प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडाल. विद्यार्थीवर्गास लाभदायक काळ राहणार आहे.
कन्या – बुधाचे पंचमातील भ्रमण विद्याव्यासंगी बनवेल. एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. त्यामुळे कौतुक होईल. पोलीसदलात काम करणार्या मंडळींना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. स्वपराक्रमाने नावलौकिकात भर पडेल. भावाकडून अभिमानास्पद कामगिरी घडेल. कामाच्या ठिकाणी अधिकारप्राप्ती होईल. शेअरबाजार, सट्टा यामधून चांगले अर्थाजन होईल.
तूळ – आठवड्याच्या सुरुवातीचे दोन तीन दिवस कटकटीचे जाण्याची शक्यता आहे. विनाकारण शीघ्रकोपी, अविचारी वृत्तीमुळे संकट ओढवून घेऊ शकता. वादविवादाचे प्रसंग, अनावश्यक चर्चा टाळाच. हेकट वृत्ती दुसर्यावर लादू नका, ते महागात पडू शकते. पती-पत्नीमध्ये लहान कारणामुळे वाद होतील. पंचमातील गुरू विद्यार्थीवर्गास पोषक वातावरण निर्माण करेल. भावंडासंदर्भात गैरसमजूत निर्माण होईल. मालमत्तेची कामे मार्गी लावण्यासाठी चांगला काळ आहे. वकिलांसाठी शुभ काळ आहे. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे योग आहेत.
वृश्चिक – कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मानसिक स्थिती कमकुवत होणार आहे. त्यामुळे मन अशांत होणे, चिडचिड होणे असे त्रास सहन करावे लागू शकतात. सुखस्थानातील गुरूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल. त्यामुळे चिंता करू नका. उद्योग-व्यवसायाची गाडी रुळावर येईल. इतकेच नाही तर नवीन व्यवसायाची दालने खुली होतील. त्यामधून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. घरात भावंडाचे सहकार्य मिळेल. बुद्धिचातुर्याचा दुरुपयोग करू नका. नियमबाह्य कामापासून दोन हात लांबच राहिलेले बरे.
धनू – आर्थिक क्षेत्रात काम करणार्या मंडळींनी व्यवहारात चोखपणा ठेवणे गरजेचे आहे. पारदर्शक व्यवहार पतप्रतिष्ठा जपतील, अन्यथा निराशा पदरी पडू शकते. धनस्थानात शनी-बुध आहेत. साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू आहे, हे विसरून चालणार नाही. आरोग्याची काळजी घेण्याचा काळ आहे. विद्यार्थीवर्गास परदेशगमनाची संधी मिळू शकते. वायफळ खर्च करणे कटाक्षाने टाळाल तर ते फायद्याचे राहील. अंधपणाने पैशाचे व्यवहार करू नका, दिवाळखोरीचे प्रसंग येऊ शकतात. काळजी घ्या.
मकर – साडेसातीचा काळ सुरू असला तरी काही शुभकार्ये आपसूकच पार पडतील. अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. नवीन वास्तू घेण्याचे योग जमून येतील. नवीन चारचाकी वाहन खरेदी करू शकाल. विमा किंवा अन्य कोणत्या सल्लागार क्षेत्रात काम करत असाल तर त्यात चांगले लाभ होतील. राजकीय क्षेत्रात काम करत असाल तर कटकारस्थानापासून सांभाळा. क्रीडाक्षेत्रात चांगले यश मिळेल. मार्वेâटिंग क्षेत्रात काम करणार्यांना परदेशप्रवासाचे योग जुळून येत आहेत.
कुंभ – काही बाबींमध्ये यशस्वी घोडदौड कराल, त्यातून अनपेक्षित लाभ मिळतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. लग्नातील गुरूच्या भ्रमणामुळे संततीसुख, वैवाहिक सौख्य याबाबतीत शुभ काळ राहणार आहे. धार्मिक कार्ये पार पडतील. दानधर्म, अन्नदानासारखे पुण्यकार्य होईल. राजकारणी व्यक्तींना महत्वाचे पद मिळेल. अध्यात्मिक क्षेत्रांत काम करणार्या मंडळींसाठी विशेष लाभदायक काळ राहील. डोळ्याचा त्रास उद्भवू शकतो. वैद्यकीय क्षेत्रासाठी फायद्याचा काळ राहणार आहे.
मीन – गुरूचे भ्रमण व्ययातून, लाभात शनी-बुध, दशमातील रवी-शुक्र, भाग्यात मंगळ-केतू त्यामुळे आगामी काळ भरभराटीचा जाणार आहे. नोकरदार मंडळींसाठी पदोन्नतीचा काळ आहे. सरकारी सेवेत काम करणार्या मंडळींना उच्च दर्जा मिळेल. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ राहणार आहे. आईकडून बक्षीसस्वरूपात लाभ मिळेल. ४ ते ६ जानेवारीचा काळ हा विशेष लाभदायक सिद्ध होईल.