• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ही नामुष्की का ओढवली?

प्रशांत केणी ( खेळियाड)

marmik by marmik
May 22, 2026
in खेळियाड
0
ही नामुष्की का ओढवली?

यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या विजयी सामन्याचा जल्लोष वानखेडेवर साजरा केल्यानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी खालावत गेली. हा संघ विजेता होऊ शकतो, हे फक्त कागदावरच वाटत होतं. प्रत्यक्ष मैदानावर संघाचं नित्य पानिपत होताना पाहायला मिळत होतं. एकापेक्षा एक दिग्गज रथी-महारथी खेळाडूंच्या अस्त्र-शस्त्रांना गंज चढल्यासारखं वाटत होतं. अखेरीस मुंबई इंडियन्सचं आव्हान अपेक्षेप्रमाणे संपुष्टात आलं. ही नामुष्की का ओढवली?…

अखेरीस ज्याची भीती होती, ते वास्तवात घडलं. मुंबई इंडियन्सचं आव्हान आयपीएलच्या १९ व्या हंगामातील साखळी टप्प्याचे दोन आठवडे शिल्लक असतानाच संपुष्टात आलं. काय नव्हतं मुंबई इंडियन्स संघात? एकापेक्षा एक दिग्गज रथी-महारथी खेळाडूंचा समावेश. २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईला सलामी देतो. ताज्या ट्वेंटी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा हे तारेसुद्धा इथून खेळतात. याशिवाय क्विंटन डीकॉक, ट्रेंट बोल्ट, केशव महाराज, मिचेल सँटनर अशा परदेशातील काही नामांकितांचाही संघात समावेश. मग तरीही ही नामुष्की का ओढवली? तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे खूप सार्‍या तारांकित खेळाडूंमुळेच मुंबई इंडियन्स अपेक्षित यशापासून दुरावलं.

समाज माध्यमांवर एव्हाना मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं शल्यविच्छेदन सुरू झालंय. कर्णधार हार्दिक संघाची मोट बांधण्यात अयशस्वी ठरल्याचे खापर त्याच्या माथी फोडलं जातंय. मागील दोन सामने तो संघासोबत असूनही त्याला का खेळवलं जात नाही, याबाबतच्या अफवांचं पीक आलंय. अशा भल्या-बुर्‍या चर्चांसोबत काही आकडेवारीही चर्चेत आहेत. २०१०च्या दशकात मुंबई इंडियन्स २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असे एक वर्ष आड विषम वर्षाला विजेते झाले होते. तसंच २०२०च्या दशकात सम वर्षांची विचित्र लाट आलीय. २०२२, २०२४ आणि २०२६ या तिन्ही हंगामांमध्ये साखळीतच गारद होणारा पहिला संघ हा नकोसा मान या संघाला मिळालाय.
मुंबई इंडियन्सच्या विश्लेषणाचा पहिला मुद्दा आहे तो नेतृत्वाचा. रोहित शर्माला ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान दिला गेला आहे तो त्याच्या मुंबई इंडियन्ससाठीच्या पराक्रमामुळे. यात त्याच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या पाच आयपीएल विजेतेपदांचा समावेश आहेच, शिवाय त्याच्या झंझावाती फटकेबाजीलाही या बहुमानाचं श्रेय जातं. पण भविष्याचा विचार करून या बड्या संघानं नवनेतृत्वाची योजना २०२४च्या हंगामाआधी आखली. म्हणजेच रोहितचा वारसदार तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करीत तो प्रत्यक्षात राबवण्यात आला. गुजरात टायटन्सच्या यशाचा शिल्पकार हार्दिक पंड्या याला पुन्हा संघात आणण्यात आलं आणि कर्णधारपदाचा मुकुट त्याच्या माथ्यावर चढवण्यात आला. हे क्रिकेट चाहत्यांना अजिबात आवडलं नाही.

मैदानावरही हा प्रयोग पहिल्याच वर्षी फसला. मुंबई इंडियन्सच्या वाटचालीपुढे साखळीतच पूर्णविराम मिळाला. पण तरीही हार्दिकवर विश्वास व्यक्त करण्यात आला. २०२५ मध्ये हार्दिकने संघाला प्ले-ऑफ्सपर्यंत नेत तो सार्थही ठरवला. त्यामुळे यंदाच्या हंगामात त्याच्याकडे पुन्हा आशेनं पाहिलं जाऊ लागलं. वानखेडे स्टेडियमवर मुंबईनं हंगामाचा प्रारंभ झोकात केला. कोलकाता नाइट रायडर्सवर दिमाखात विजय मिळवला आणि प्रत्येक हंगामातील पहिला सामना गमावण्याची १३ वर्षांची परंपरा खंडित केली. पण पुढे काय झालं? पहिले पाढे पंचावन्न हेच पुन्हा सिद्ध झालं. विजयाचा दुष्काळ पाचवीला पुजलेला.

मुंबई इंडियन्सनं ११ सामन्यांत एकूण २४ खेळाडू आजमावले. म्हणजे दोन संघांहून अधिक खेळाडूंना संधी दिली. तीन सामने बाकी असताना फक्त नव्यानं सामील झालेला केशव महाराज आणि मोहम्मद इजहार हे दोनच खेळाडू अद्याप खेळलेले नाहीत. हा आकडा अतिशय जास्त आहे. ही परिस्थिती का ओढवली…? याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे प्रयोग आणि दुसरं दुखापती. दुखापतीमुळे पर्यायी खेळाडू उतरवण्याची अपरिहार्यता निर्माण झाली. रोहितवर संघाच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त होती, पण तो मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे जेमतेम सहा सामने म्हणजे अर्धाच हंगाम खेळू शकला. कर्णधार हार्दिकसुद्धा पाठीच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांत खेळू शकला नाही. तर मुळातच उशिरा संघात दाखल झालेला सँटनर फक्त चार सामने खेळला आणि खांद्याच्या दुखापतीमुळे तो एव्हाना न्यूझीलंडला मायदेशी पोहोचलाही.

महत्त्वाच्या खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा केल्यास रोहित जे सामने खेळला, त्यात त्यानं फलंदाजीतून आपली भूमिका चोख बजावली. सहा सामन्यांत ४८.६० च्या सरासरीनं २४३ धावा आणि १७७.३७ चा स्ट्राइक रेट ही त्याची कामगिरी. रोहित नसताना डीकॉक आणि दानिश मालेवारलाही सलामीला आजमावण्यात आलं. रोहितशिवाय रियान रिकल्टन, अल्लाह गजनफर आणि नमन धीर या आणखी तीनच खेळाडूंमध्ये कामगिरीत सातत्य आढळलं. बाकीच्या खेळाडूंमध्ये सातत्याचा अभाव आढळून आला.

ट्वेंटी-२० विश्वचषकाचा ताण यशस्वीरित्या हाताळल्यानंतर त्या कामगिरीची पुनरावृत्ती चारही खेळाडूंकडून झाली नाही. सूर्यकुमारनं ११ सामन्यांत फक्त १९५ धावा काढल्या. त्याची सरासरी २० चा टप्पाही ओलंडत नाही. यात एकमेव अर्धशतक. या ११ डावांपैकी तब्बल ९ वेळा तो वेगवान ग्ाोलंदाजांचा बळी ठरलाय. ‘मिस्टर ३६०’ हे बिरुद आता त्याला शोभत नाही. सुपलाची नजाकत आता अधिराज्य गाजवत नाही. परिणामी भारताच्या आगामी ट्वेंटी-२० संघात तो खेळाडू म्हणूनही स्थान मिळवेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जातेय. यानंतर क्रमांक लागतो, तो जगातील अव्वल वेगवान गोलंदाजाच्या कामगिरीचा. बुमराला ११ सामन्यांत मिळाल्या, त्या जेमतेम ३ विकेट्स. त्याला यंदा पहिली विकेट घेण्यासाठीसुद्धा अतिशय धडपडायला लागलं. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांच्या हमखास विकेट्स काढणार्‍या गोलंदाजाची उणीव तीव्रतेनं भासली. बुमराच्या या नैराश्यमय कामगिरीत एकच सकारात्मकता होती, ती म्हणजे ८.५१ची इकॉनॉमी.

मग क्रमांक लागतो हार्दिकचा. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही प्रांतात त्याचं कर्तृत्व दिसलं नाही. ८ सामन्यांत २०.८६च्या सरासरीनं १४६ धावा. यात एकही अर्धशतक त्याच्या खात्यावर जमा झालं नाही. गोलंदाजीतही फक्त ४ विकेट्स. त्यामुळे हार्दिकचा दबदबा मैदानावर जाणवलाच नाही. विश्वचषकात झगडणारा तिलक वर्मा आयपीएलमध्येही धावांसाठी संघर्ष करतोय. एक शतक आणि एक अर्धशतक नोंदवलेले सामने वजा केल्यास बाकीच्या सामन्यात त्याची बॅट तळपलीच नाही. ११ सामन्यांत २६.१०ची सरासरी ही त्याला साजेशी नव्हती.

बोल्टला ५ सामन्यांत फक्त २ बळी मिळाले. त्यामुळे फारसे सामने त्याच्या वाट्याला आले नाहीत. पहिल्या सामन्यात ३९ धावांत ३ बळी घेऊन लक्ष वेधणारा शार्दुल ठाकूर त्यानंतरच्या सामन्यात प्रभाव पाडताना दिसला नाही. हीच गत अश्वनी कुमार, रघू शर्मा आणि राज अंगड बावाची. अनुभवी दीपक चहरला ५ सामन्यांत ३ बळी मिळवता आले.

रविवारी झालेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची रणनीती आणि सूर्याचं नेतृत्व हे उघडे पडले. दुसर्‍या डावात गोलंदाजी करताना रोहित शर्माच्या जागी प्रभावी खेळाडू म्हणून रघू शर्माला मैदानावर आणण्यात आलं. रायपूरच्या खराब खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज उत्तम कामगिरी करीत होते. त्यामुळे ठाकूरला संघात स्थान देणं अधिक हितकारक ठरलं असतं. बुमरानं १९वं षटक उत्तम टाकलं. पण २०वं षटक कोण टाकणार, हा प्रश्न सोडवणं कठीण गेलं. कारण बुमरा, चहर आणि कॉर्बिन बॉश यांच्या गोलंदाजीचा कोटा इथवर संपलेला. परिणामी महागडा ठरलेल्या बावाकडे नाईलाजस्तव चेंडू द्यावा लागला. त्यानं दडपणाखाली वाईड आणि नोबॉल टाकून सामना लांबवला आणि शेवटच्या चेंडूवर तो निसटला. मुंबई इंडियन्सच्या एका निराशाजनक हंगामाची सांगता झाली.
तूर्तास, हंगामातील आणखी काही सामने बाकी आहेत. प्रयोग तर आधीच खूप झालेत. पण पुढील वर्षीच्या २०व्या हंगामासाठी योग्य आखणी आतापासूनच करावी लागणार. यात संघबांधणी ही अतिशय महत्त्वाची असेल. त्यामुळे सध्या तरी मुंबई इंडियन्सच्या शोकपर्वात सामील होऊ या!

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

वाशिष्ठी पुनरुज्जीवनाची जलक्रांती!

Next Post
वाशिष्ठी पुनरुज्जीवनाची जलक्रांती!

वाशिष्ठी पुनरुज्जीवनाची जलक्रांती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.