
हिम्मत, जिद्द, स्वाभिमानाचा साक्षात्कार म्हणजे २३ जानेवारी शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस. याच दिवशी ‘सामना’ दैनिकाचा शुभारंभाचा १९८९ साली मुहूर्त ठरला. प्रबोधन प्रकाशनाच्या ‘मार्मिक’ साप्ताहिकासोबत ‘सामना’ हा मराठी माणसांचा लढवय्या सैनिक म्हणून निघाला. उद्धवजी ठाकरे आणि सुभाष देसाई यांची कुशल प्रशासकीय दूरदृष्टी असल्याने त्याचे एका ताकदीत रूपांतर झाले. पत्रकारिता तसेच राजकारणात एक इतिहास रचला गेला… त्यातले एक पर्व आज पूर्ण झाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार, राजकीय नेते आणि त्याहीपेक्षा संपादक म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख होती आणि ती जवळून तीस एक वर्ष अनुभवण्यास मिळाली हे माझं भाग्य! दैनिक ‘सामना’च्या पहिल्या दिवसापासून ‘संपादक-बाळ ठाकरे’ हे बिरुद आम्हा पत्रकारांच्या पहिल्या फळीच्या माथ्यावर झळकले त्याचा जबरदस्त करिष्मा आज ३७ वर्षांनंतरही कायम आहे.
‘सामना’साठीच्या मुलाखतीचा पहिला दिवस आठवतो. त्यावेळी ‘सांज तरुण भारत’ दैनिकातून ज्येष्ठ पत्रकार अशोक पडबिद्री यांनी मला आणि किरण हेगडे या तरुणांना हेरले. थेट ‘मातोश्री’वर आम्हा दोघांना घेऊन गेले. साहेबांची पहिली प्रत्यक्ष भेट अक्षरश: भारावून सोडणारी. ‘घरात कोण आहे? ते काय करतात? लग्न झाले का? कुठे राहता?’ असे घरगुती प्रश्न साहेबांनी विचारले. तरुण पत्रकारांबद्दल त्यांना असणारा जिव्हाळा, काळजी त्यात दिसत होती.
‘मार्मिक’च्या येत्या अंकासाठी मुंबई बेस एखाद्या विषयावर लेख द्या. तो ‘मार्मिक’मध्ये प्रसिद्ध झाला तर तुमची नोकरी पक्की, असं सांगून त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला. काही मिनिटांतच मुलाखत आटोपली. आम्ही चक्रावून गेलो. अनुभव, शिक्षण, प्रशस्तीपत्रके, लेख व बातम्यांची कात्रणे याच्या बंद फाईल बंदच राहिल्या. त्या घेऊन आम्ही दोघेजण ‘मातोश्री’बाहेर पडलो. ‘मार्मिक’साठीचा लेख ही आमची लेखी प्रश्नपत्रिका ठरली!

कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री यांच्या केबिनमधला तो दिवस आठवतो. दैनिक सामनाचे पान एकचे ‘मास्क’ मंजुरीसाठी टेबलावर आले. तिथे साक्षात साहेब बसलेले. संपादकांना ते दाखविले. तेव्हा त्यांनी ‘संपादक – बाळासाहेब ठाकरे।’ या अक्षरातील ‘साहेब’ या शब्दांवर फुली मारली. मी स्वतःला माझ्या पेपरमध्ये ‘साहेब’ म्हणून कसं काय वदवून घेणार? ते हवं तर जगानं म्हणावं. मी फक्त बाळ ठाकरे!’
-अन् ‘संपादक- बाळ ठाकरे’ ही अक्षरे सामनाच्या ललाटी झळकली !
***
माणसं ओळखण्याची जबरदस्त दैवी ताकद त्यांच्या नजरेतून प्रत्येक भेटीत दिसायची. समोरच्याच्या मनातलं अलगद बाहेर पडायचं. शब्द त्यांचे व्हायचे. ते ‘बोलविता धनी’ बनायचे. बड्या वर्तमानपत्रातील ‘सो कॉल्ड’ पत्रकारांची प्रारंभी ‘सामना’त येण्यास नकार दिला. अनेक कारणे पुढे केली. पण तरीही साहेब खंबीर होते. आशावादी होते. ‘दैनिक नव्हे सैनिक!’ – अशा भिंती जागोजागी रंगविल्या होत्या. पत्रकारांच्या काही मैफलीत त्यावरुन चेष्टाही होत होती. हे दैनिक लवकरच बंद होईल. काही महिन्यात आटोपतं घेईल. निवडणुकीपुरते आहे! – अशाही चर्चा रंगल्या. पण त्या सार्या शिळोप्याच्या गप्पाच ठरल्या. ३७ वर्षापूर्वी वाजत-गाजत सुरू झालेल्या मराठी बाण्याच्या या दैनिकाने अनेक चमत्कार घडविले. स्वप्ने सत्यात आणली. त्यामागे साहेबांची कुटुंबप्रमुख म्हणून नजर होती. हिमालयाची सावलीच सर्वांवर होती.
***
१९९४च्या दसरा-दिवाळी सामना अंकात ‘मुक्काम पोस्ट बेहरामपाडा’ या शीर्षकाखाली माझा एक लेख प्रसिद्ध झाला. दंगलीची त्याला तणावपूर्ण पार्श्वभूमी. दोन दिवस बेहरामपाड्यात मुक्काम ठोकून त्यात शब्दांकन केलं होतं. सत्यघटनेचा एक थरार त्यात भरलेला. अंक प्रसिद्ध झाला. पोलिसांनी माझी भेट घेतली. वाचकांची दाद मिळाली. पण संपादक साहेबांचा फोन आला. ते म्हणाले-‘अंकातला लेख सकाळीच वाचून घेतला. अशा ठिकाणी एकटे जात जाऊ नका. शिवसैनिकांना बरोबर ठेवा. तुमच्या धाडसाचं कौतुक जरूर आहे. पण स्वतःच्या जिवाला जपा. तुमच्यासह घरच्यांचीही जबाबदारी असते आमच्यावर!’ साहेबांचे हे बोल माझ्यातल्या पत्रकाराला हत्तीचे बळ देऊन गेले आणि त्यांनी सतर्कही केलं. त्यातून वडीलकीचं एक पवित्र नातं जणू जुळलं गेलं.
त्यानंतर काही दिवसातच ‘मातोश्री’च्या एका भेटीत ‘हे बघा बेहरामपाड्यातले झब्बेवाले!’ असा माझा उल्लेख मिश्किलपणे त्यांनी केला. जमलेल्यांमध्ये हशा पिकला. त्यावेळी मी कायम झब्बा वापरत असे. रोज हजारो माणसांना भेटणारा हा महान नेता आणि त्यांची एवढी बारीक नजर! एका संपादकाचं हे श्रेष्ठत्वच. त्यांनी केलेला उल्लेख मला ‘त्या’ लेखासाठी पुरस्कारच देऊन गेला.
***
मराठी नाटक, सिनेमा यातील रंगकर्मींशी साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते हे सर्वश्रुतच. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वीची जुळवाजुळव सुरु होती. मुख्यमंत्री कोण? खातेवाटपात कोण आहे? याली उत्सुकता शिगेला पोहचलेली. रात्री ‘मातोश्री’वर मनोहर जोशी, सुधीर जोशींसह बैठक रंगलेली. चर्चा संपत नव्हत्या. तेवढ्यात शाहीर दादा कोंडके आत आले.
‘दादा योग्य वेळी आलात. तुम्ही मुख्यमंत्री होता का?’ हा थेट सवाल साहेबांनी विचारला. दादा पाच फूट उडालेच. दक्षिणेत राजकारणात अनेक कलाकार आहेत म्हणून असा प्रश्न केला असाव्ाा. त्यावर दादांनी- ‘साहेब तुम्ही कोणतं पद घेणार?’ असं विचारलं. साहेब म्हणाले, ‘मी शिवसेनाप्रमुखपदीच राहणार!’ दादाही पक्के हजरजवाबी- ‘मी देखील तुमचा शिवसैनिकच राहाणार!’ काही अधिक न बोलता दादा तिथून माँसाहेबांना भेटीसाठी आत पळालेच!
‘मुख्यमंत्री कोण?’ या बातमीसाठी दबा धरून बसलेल्या आम्हा पत्रकारांना उत्तर मिळालं नाही. पण दादांनी न छापण्याच्या अटीवर हा किस्सा सांगितला.
***
पु.ल. देशपांडे हे साहेबांचे आवडते लेखक. पुलंचा विषय निघाला की जाहीर सभा असो वा भेटीगाठी, ते भरभरून बोलायचे. एकदा मॉरिशसहून महाराष्ट्र मंडळाचे शिष्टमंडळ भेटायला आले होते. ती बातमी कव्हर करायला तिथे पोहोचलो. ‘मराठीतली कुठली पुस्तके वाचावीत?’ असा प्रश्न शिष्टमंडळातील एका तरुणीने केला. पुलंची पुस्तके उद्या सकाळी तुमच्या हॉटेलच पोहोचतील, असे साहेबांनी सांगितले. मग काय. आमची ‘टीम’ कामाला लागली. गिरगाव ते दादर आणि दादर ते विलेपार्ले अशी बाईकवरून ‘पु.ल. शोध मोहीम’ निघाली. पुलंच्या निवडक पुस्तकांच्या पन्नासएक प्रतींची खरेदी केली. ती हॉटेलपर्यंत त्याच दिवशी पोहचविली.
प्रत्येक मराठी माणसाने ‘पु.ल.’ वाचलाच पाहिजे. विनोद म्हणजे काय याची प्रचिती येईल, असं सांगून त्यांनी पुलंचे गाजलेले, वाचलेले, ऐकीव विनोद शिष्टमंडळाला सांगितले. सार्यांनी खळखळून हसून त्याला दादही दिली. गुणांच्या पूजकाचे सामर्थ्य दिसले. पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ पुस्तक गंगाराम गवाणकर यांने ‘वस्त्रहरण’ हे नाटक. शाहीर दादा कोंडके यांचा ‘ पांडू हवालदार’ हा चित्रपट आणि आशा भोसले यांची गाणी… यावर साहेब तपशीलासह बोलत होते. त्यांच्यातल्या एका दर्दी मर्हाठी रसिकाचे सार्यांना दीड दोन तास दर्शन झाले…

***
एक हजार कश्मीरींची मुंबईत घुसखोरी; तरुणांचा घरोंदा करण्याचा इरादा, आणखीन पाच हजार निघाले!’ अशी मेन लीड म्हणजे मुख्य बातमी दैनिक ‘सामना’त मंगळवार १८ जानेवारी २००२ला प्रसिद्ध झाली. बांद्रा उड्डाण पुलाखाली रेल्वे रुळाला खेटून असलेल्या मैदानात पन्नासएक तंबू उभारले होते. मी आणि आमचा छायाचित्रकार एकनाथ कदम आम्ही हा परिसर पिंजून काढला. फोटो काढले. ‘मातोश्री’हून चक्रे फिरली. पोलिसांना जाग आली. या कश्मीरी घुसखोरीच्या बातमीवर साहेबांनी एका जाहीर सभेत गृहखात्याला त्यांच्या शैलीत सुनावले. आवाज दिला. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रोखठोक विचार मांडले आणि दोन हजार दोननंतर अशी कश्मीरींची तंबूवसाहत पुन्हा कधी दिसली नाही. एका पत्रकाराला यापेक्षा अधिक काय हवं असतं? मध्यरात्रीची भटकंती भरून पावली! साहेबांसारखा ‘संपादक’ असल्याने हे सारं घडलं. मेहनत सार्थकी लगली.
हा विषय इथेच थांबला नाही तर शिवसैनिकांना जागं करून घुसखोरीच्या बाबतीत दक्ष राहा, हे सांगण्यासाठी २७ जानेवारी २००८च्या ‘मार्मिक’ अंकात एक लेख तत्कालीन कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी संपादकांशी बोलणं झाल्याप्रमाणे माझ्याकडून लिहून घेतला आणि प्रकाशितही झाला तो ‘मार्मिक’चा शिवसेनाप्रमुखांचा ८१ वा वाढदिवस अंक होता! हा ही एक योगायोगच.
***
‘पडद्याआडून’ हे नाट्यसमीक्षेचं सदर चालविण्याची जबाबदारी माझ्या हाती आली. एखाद दुसर्या नाटकाची समीक्षा झाली होती. एका वृत्तसंकलनाच्या निमित्ताने साहेबांची भेट झाली. ‘मातोश्री’बाहेर पडणार तेवढ्यात साहेबांनी रोखले.
‘नाट्यसमीक्षा तुम्ही करता ना?’
हो.
हे बघा. मराठी नाटकावर अनेकांची घरे जगतात. नाटकांची दुनिया मी जवळून बघितली आहे. समीक्षेत तुम्ही चिमटे काढा, पण जखमा करू नका. नाटकावर त्याचा विपरित परिणाम होता कामा नये! मराठी नाटके जगली पाहिजेत!’ असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्या काळी प्रत्येक नाटकावर सडकून टीका करणार्या एका ज्येष्ठ नाट्य समीक्षकाबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर माझी जवाबदारी अधिकच वाढली. अनेक वर्तमानपत्रातील नाट्यसमीक्षाही साहेब आवडीने वाचतात हे देखील दिसले.
***
संपादक-बाळ ठाकरे
काल होते. आज आहेत. उद्याही असतीलच.
साहेबांची आठवण मुद्दाम काढावी लागत नाही. कारण ते कायमच सोबत असतात. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठीचा हा हिमालयच… त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी गर्दीची वादळे पेटून उठायची.. त्यांच्या शिदोरीवर शेकडो लाखोंची गुजराण होतच आहे… जनतेच्या हृदयावरल्या एका अलौकिक सम्राटाच्या चरणी विनम्र अभिवादन!

