• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सोवळ्याची घडी

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

marmik by marmik
February 26, 2026
in विशेष लेख
0
सोवळ्याची घडी

 

काय बा करिशी सोवळे ओवळे।
मन नाही निर्मळ वाऊगे चि ।।१।।
काय बा करीसी पुस्तकाची मोट।
घोकीता हृदयस्फोट हाता न ये ।।२।।
काय बा करीसी टाळ आणि मृदंग।
जेथे पांडुरंग रंगला नाही ।।३।।
काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी।
करणी नाही पोटी बोलण्याची ।।४।।
काय बा करीसी दंभलौकिकाते।
हित नाही माते तुका म्हणे ।।५।।

पठ्ठे बापूराव हे महाराष्ट्रातील महान लोकशाहीर. त्यांचा जन्म ब्राह्मण घरातला. बालपणापासूनच त्यांना तमाशाची आवड होती. उच्चवर्णातला जन्म असल्यानं त्यांना तमाशाला जाता येत नव्हतं. त्यांनी तमाशाला जाण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यात यश आलं नाही. अखेर त्यांनी बंड पुकारलं. घराशेजारच्या तमाशा कलावंत मंडळीत ते जायला लागले. बहुतेक तमाशा कलावंत मंडळी दलित जातींतली होती. बापूराव त्यांच्यात मिसळून गेले. त्यांना लावण्या लिहून द्यायला लागले. पुढे त्यांनी तमाशाचा फड उभा केला. परिणामी ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं. त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी बंडाची मशाल पेटवली होती.
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असूनि
सोवळे ठेवले घालूनि घडी।
मशाल धरली हाती तमाशाची
लाज लावली देशोधडी ।।

पठ्ठे बापूरावांनी लिहिलेल्या आत्मचरित्रपर लावणीतलं हे कडवं. त्या कडव्यात आपल्याला अजूनही बंडाच्या मशालीची धग जाणवते. जवळपास १५० वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा लोकशाहीर एवढ्या ताकदीने सोवळ्याची घडी घालून बंडाचा झेंडा हातात धरतो हे विलक्षण आहे. काशीत जाऊन शुद्धीकरण करून परत त्यांना जातीत घेण्याची तयारी चालली होती. त्यासाठी गावातल्या लोकांनी वर्गणी काढून त्यांच्या हातात तीनशे रुपये दिले होते. त्याला बापूरावांनी दाद दिली नाही. अनेक शाहीर प्रतिष्ठेसाठी अखेरच्या काळात कीर्तनकार बनत. डफ फोडून तमाशाच्या फडातून कीर्तनाच्या फडाकडे वळत. लावणी सोडून वेदांती ग्रंथ वाचत. त्यामुळे ओवळे मानलेले शाहीर सोवळे बनून समाजात प्रतिष्ठित होत. पठ्ठे बापूराव त्या मार्गाने गेले नाहीत. मन निर्मळ असेल तर सोवळ्याची गरज नाही हे त्यांनी ओळखलं असावं. त्यामुळेच त्यांनी एकदा सोवळं फेकलं ते परत जवळ केलं नाही.

बापूरावांच्या या बंडखोरीची मुळं आपल्याला वारकरी विचारातच सापडतात. त्यांच्यावर तो संस्कार केला होता जंगली महाराजांनी. जंगली महाराज हे मूळचे सोलापुरातल्या होनमुर्गी गावचे. ते जन्माने मुसलमान. जवळपास सात-आठ भाषा त्यांना अवगत होत्या. अनेक धर्मग्रंथांचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाचा विशेष प्रभाव होता. त्यामुळेच ते बराच काळ देहूत राहिले होते. देहूत धर्मशाळाही बांधली होती. संतांच्या आणि विशेषत्वाने एकनाथ महाराजांच्या ब्राह्मण्याची चिकित्सा करणार्‍या भारुडांवर त्यांचा भर होता. जातिभेद आणि सोवळ्या-ओवळ्याच्या भ्रामक कल्पना त्यांना नामंजूर होत्या. पुण्यातला जंगली महाराज रोड त्यांच्याच नावाचा आहे. त्यांचा असाच एक मठ रेठरे हरणाक्ष या पठ्ठे बापूरावांच्या गावातही होता. बापूरावांना त्यांचा सहवास आणि अनुग्रहही लाभला होता. एका लावणीत ‘माझा गुरु आहे जंगलीवली पीर पीर पीर’ असं बापूरावांनी म्हटलं आहे तर एका ठिकाणी ‘रेठरे हरणाक्ष माझे घर। जंगलीबाबाचा हात शिरावर।’ असं म्हटलं आहे.

पठ्ठे बापूराव वाळीत पडले तरी त्यांच्या मनात अपराधित्वाची भावना नव्हतीच. उलट साधुत्वाच्या नावाने ढोंगबाजी करणार्‍या वेषधार्‍यांवर ते संतांप्रमाणेच हल्ला चढवतात.

‘बुवाबाजीचा थाट मनाचा।
डोई राखल्या जटा जटा।
सोंग घेऊनी ढोंग दावितो।
जग भुलले अशा नटा।’

असं लावणीतून प्रखरपणे सांगण्याची हिंमत बापूरावांनी दाखवली त्याचं मूळ जंगली महाराजांच्या शिकवणुकीतच आहे. याच महाराजांनी आणखी एक महान व्यक्तित्व घडवलं होतं ते कृष्णराव भालेकरांचं. कृष्णराव हे महात्मा फुल्यांसोबतचे सत्यशोधक. फुले आणि भालेकर जंगली महाराजांसोबत जातिभेदाच्या विरोधात वैचारिक चर्चा करत असत. भालेकरांनी महाराजांवर पोवाडा रचला होता. साहजिकच जंगली महाराजांच्या बंडखोर विचारांचा अनुग्रह मिळाला असल्यानं बापूरावही बंडखोर बनले होते.

बापूरावांनी सोवळ्याची घडी घालून ठेवली नसती तर त्यांच्यासारखा महान कलावंत महाराष्ट्राला मिळाला नसता. प्रस्तुत अभंगात तुकोबाराय सांगतात की सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेत फसण्यापेक्षा मनाच्या निर्मळतेला महत्त्व दिलं पाहिजे. सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेविरुद्ध संतांप्रमाणेच सत्यशोधकांनीही आवाज उठवला. सत्यशोधक समाज हा उच्चवर्णीयांच्या धार्मिक-सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांना आणि स्त्रियांना मुक्त करण्यासाठी निर्माण झाला होता. मुकुंदराव पाटील हे आघाडीचे सत्यशोधक पत्रकार. कृष्णराव भालेकरांचे ते चिरंजीव. त्यांनी ‘सोवळ्याचा महारोग’ या नावाने अग्रलेख लिहिला होता. वर्णश्रेष्ठत्वाचं खूळ हेच सोवळ्याच्या रोगाचं मूळ असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. समाजात उच्चनीचपणा, स्पर्शास्पर्श अशा हिणकस भावना निर्माण करून लोकांना मानसिक गुलाम बनवणार्‍या सोवळ्याला तात्काळ नष्ट करा असं आवाहन त्यांनी केलं होतं. असाच एक लेख सत्यशोधक भाऊसाहेब पवार यांनी ‘विजयी मराठा’ पत्रात ‘सोवळ्याचे बंड’ या नावाने लिहिला होता. त्यात जातिभेदाला जन्म देणारे सोवळे नष्ट झाल्याशिवाय हिंदू धर्मात समता, बंधुता आणि स्वतंत्रता निर्माण होणार नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. या लेखात भाऊसाहेबांनी तुकोबारायांच्या ‘काय बा करिशी सोवळे ओवळे’ या प्रस्तुत अभंगाचा दाखला दिला आहे.

वारकरी संप्रदायातील सत्पुरुषांनीही सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना धुडकावून लावल्या. वारकरी भाष्यकार दादा महाराज सातारकर एकदा मारुतीरायाच्या देवळासमोर बसले होते. तेवढ्यात एक पुजारी हातात नैवेद्याचे ताट घेऊन लगबगीने मंदिरात चालला होता. वाटेत त्याला एक वाळलेलं हाड पडलेलं दिसलं. त्यानं त्या हाडाचा स्पर्श होऊ नये अशा रीतीने बाजूने उडी मारली. ते पाहून दादा महाराज हसले. त्यानं हसण्याचं कारण विचारताच दादा महाराजांनी त्याला प्रतिप्रश्न विचारला,’वाळलेल्या हाडाचा विटाळ होत असेल तर आपल्या शरीरातही चर्म-मांसयुक्त अशी दुर्गंधाची हाडे असतात त्याचा विटाळ कसा मानणार?’ त्यांचा प्रश्न त्या पुजार्‍याला निरुत्तर करणारा होता. दादा महाराजांनी त्याला सोवळे-ओवळे आणि बाट विटाळाच्या कल्पना नाकारण्यामागची वारकरी भूमिका स्पष्ट करून सांगितली आणि म्हणाले,’एक विशेष प्रकारचे वस्त्र लावले की मनुष्य स्वतःला सोवळे मानतो व आपणाला जगाहून श्रेष्ठ समजतो. मग वस्तूंमध्ये काही पवित्र व काही अपवित्र ठरवितो व त्याप्रमाणे कर्मे आखून त्या कर्मावरुन पुण्यवान अगर पापी ठरवतो. तो फक्त म्हणतो ‘कर्मे करावी, चित्त शुद्ध होईल- मग पुढे ज्ञान’ पण ‘सोवळे मिरविता विधिनिषेध आगळा’ वाढतो इकडे त्याचे कुठे लक्ष आहे़ सोवळे पाळणारा बाहेरून पवित्र वाटतो, पण त्याच्या अंतःकरणात सतत अपवित्र वस्तू कोणत्या व त्या कशा टाळाव्या याचे ध्यान. म्हणजे पवित्र वस्त्र गुंडाळून अंतरात ध्यान अपवित्र वस्तूंचे. शिवाय हे सोवळे पाळणारा स्वतःला इतरांहून श्रेष्ठ समजतो. हा अहंकार वाढतो… त्यामुळे हिंदुजातीत अनेकत्व आले. उच्चनीचत्व वाढले. व हीन दृष्टीने एकमेकांकडे पाहून प्रेमाला हीनत्व आले. चैतन्य दुबळे व भेदमय झाले.’

मुळात वारकरी संप्रदायाच्या ईश्वरविषयक कल्पनेत सोवळेपणाला जागा नाही. विठ्ठलाजवळ सोवळं-ओवळं नाही. त्यामुळेच तो भक्तांची, हीन मानली गेलेली, कामं करत असल्याच्या कथा आहेत. वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना कोणतंही सोवळं घालत नाहीत. पूर्वी तर वारकरी गावाकडून पंढरपुरात आल्यानंतर हातपाय न धुता पायाच्या धुळीसह देवाच्या दर्शनाला जात असत. त्याला ‘धूळभेटीचं दर्शन’ म्हणत. वारकरी परंपरा ही अंतरातल्या प्रेमाला महत्त्व देणारी परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमाला पात्र झालेल्या गोपाळांना सोवळ्या-ओवळ्याचा बाह्याचार नव्हताच. त्यासंदर्भात निळोबारायांनी लिहिलेली काल्याची कथा फारच महत्त्वाची आहे. गोपाळांच्या हातून काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून आलेला ब्रह्मदेव जेव्हा गोपाळांना पाहतो तेव्हा त्याच्या मनात हाच विकल्प येतो. गोपाळांना सोवळं नाही म्हणून स्वतःचं सोवळं बाटेल असा विचार तो करतो. त्याची प्रतिक्रिया निळोबाराय नोंदवतात.
याते नाही यज्ञाचार।
दीक्षा अथवा शिखासूत्र।
आम्ही सोवळे निरंतर।
करु उच्चार वेदाचा ।।
सोवळे ओवळे नाही यासी।
केले आपोषण कर्मासी।
सेविता याचिया उच्छिष्टासी।
होईल प्रत्यवायासी निजमूळ ।।

निळोबारायांनी आणखी एका अभंगातही ‘सोवळे मिरविता विधिनिषेध आगळा।’ असं म्हणून सोवळ्या-ओवळ्याच्या मार्गाने ईश्वराचं प्रेम मिळवता येत नाही हे स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर शेख महंमद बाबांनीही ‘ऐसे केले त्या गोपाळे। नाही सोवळे ओवळे।।’ असं म्हटलं आहे. इथे जन्माला आलेला कोणीच सोवळा नाही असं सोयराबाई म्हणतात. प्रत्येकाच्या जन्ममृत्यूचा विटाळ मानला जात असेल तर ‘सोवळा तो झाला कवण धर्म’ असा रास्त प्रश्न सोयराबाईंनी विचारला आहे.

तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात सोवळेधारी पुरोहिताचा बाह्याचार सांगून मनाची निर्मळता गरजेची आहे हे स्पष्ट करतात. दुसर्‍या चरणात प्रतिष्ठेसाठी ग्रंथांचा व्यासंग करणार्‍या पंडिताला सुनावतात. एखादा पंडित ऊर फुटेपर्यंत ग्रंथाची घोकंपट्टी करत राहिला तरी त्याच्या हातात काहीच येत नाही असं ते म्हणतात. तुकोबाराय तिसर्‍या चरणात वारकरी कीर्तनकाराच्या बाह्याचाराचाही समाचार घेतात. कीर्तनात आतून भगवंताविषयी प्रेम निर्माण होत नसेल केवळ टाळ-मृदंग वाजवून उपयोग होणार नाही. पांडुरंगाचं प्रेम मिळवण्यासाठी भाव महत्त्वाचा आहे. यासंदर्भात तुकडोजी महाराजांचा एक प्रसंग सांगता येईल. जत संस्थानच्या राणीची वारकरी संप्रदायावर अतीव श्रद्धा होती. त्या वारकरी कीर्तनकारांना राजवाड्यात आमंत्रित करत असत. त्यात तुकडोजी महाराजही असायचे. एकदा महाराजांनी भजन करताना ‘केवळ टाळ मृदंग वाजवून देव मिळत नाही’ असं म्हटलं. समोरच्या एका वारकरी कीर्तनकारांनी त्यांच्या बोलण्याचा रोख आपल्यावरच आहे असा गैरसमज करून घेतला. आधीच तुकडोजी महाराजांनी अस्पृश्यतेविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे ते त्यांच्यावर नाराज होते. त्यात ही भर पडली. ते त्यांच्या कीर्तनात तुकडोजी महाराजांच्या रोखाने म्हणाले, ‘टाळ मृदंग वाजवून देव मिळत नसेल तर मग काय डफडी वाजवून मिळतो का?’ तुकडोजी महाराज डफडीवर भजन करत. कीर्तनकारांच्या या बोलण्यावर तुकडोजी महाराजांचे एक अनुयायी खवळले. त्यांची समजूत घालताना तुकडोजी महाराजांनी सांगितलं की खरंतर डफडी वाजवूनही देव मिळत न्ााही. मुळात डफडी, एकतारी, मृदंग, टाळ, वीणा ही भजनाची बाह्य साधनं आहेत. भजनाचं मूळ साधन ईश्वराचं प्रेम आहे. प्रेमाने केलेलं भजन ईश्वराला प्रिय होतं. एरवी केवळ गायकीच्या आणि वादनकौशल्याच्या दंभाने केलेल्या भजनाला अर्थ राहत नाही. ‘राग आळवितो नाना। काय गातो हे कळेना ।।’ अशा भजनाला वारकरी संप्रदायात जागा नाही.

तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात म्हणतात की करणी नसेल तर केवळ ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याला काही अर्थ नाही. ज्ञानाची गोष्ट सांगणारा पुराणिक या चरणात अभिप्रेत आहे. ‘नव्हे पुराणिक। करणे सांगणे आणिक ।।’ असं एका अभंगात तुकोबाराय म्हणतात. ‘पुराणातील वांगी (वानगी) पुराणात’ ही म्हण यासंदर्भात फारच बोलकी आहे. या संपूर्ण अभंगात तुकोबारायांनी पुरोहित, पंडित, कीर्तनकार आणि पुराणिक अशा चार प्रातिनिधिकांची चिकित्सा केलेली आहे. पुरोहिताचा सोवळेपणा, पंडिताचा ग्रंथव्यासंग, कीर्तनातला टाळ-मृदंग गजर आणि पुराणिकाच्या ज्ञानगोष्टी अशा बाह्याचाराकडे लक्ष न देता त्यांच्या अंतरातलं प्रेम महत्त्वाचं आहे हे तुकोबाराय सुचवतात.

Previous Post

आजार नेहरूंचा, आजार भागवतांचा!

Next Post

पुन्हा एकदा मुक्काम दादर

Next Post
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे…

पुन्हा एकदा मुक्काम दादर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.