• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सगळं संपलं…

सचिन परब (प्रबोधन-१००)

marmik by marmik
February 19, 2026
in प्रबोधन १००
0
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे…

कोर्टाच्या नोटिसींना उत्तर देण्यासाठी प्रबोधनकार १९२७च्या नोव्हेंबर महिन्यात पुण्याहून मुंबईला आले. त्यानंतर महिनाभर मुंबईत राहून त्यांनी पुण्यातून प्रबोधन आणि लोकहितवादीचे अंक कसेबसे काढले. संकटांशी ते निधड्या छातीने झुंजत होतेच. त्यात त्यांच्या पत्नी रमाबाईंचीही साथ होती. पण त्यांच्यावर असा आघात झाला की सगळंच संपलं.

***********

१९२७ च्या नोव्हेंबर महिन्यातल्या प्रबोधनच्या अंकात प्रबोधनवर येऊ घातलेल्या संकटांची चाहुल लागली होती. प्रबोधनकार पुण्यात नव्हते. त्यांच्या गैरहजेरीतच अंक लावण्यात आला होता. पण पानापानांवर अडचणी दिसत होत्या. आधीच्या अंकात केलेले नव्या लेखनाचे संकल्प कुठे दिसत नव्हते. आर्थिक परिस्थिती अडचणीची होतीच. अचानक खर्‍याखोट्या देणेकर्‍यांचे खटले कोर्टात उभे राहिले होते. त्यातही प्रबोधनकार कुटुंबाच्या आणि छापखान्यातल्या निष्ठावान कर्मचार्‍यांच्या मदतीने लढत होते.
त्या काळातल्या आर्थिक अडचणींचं वर्णन प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्यात केलंय, त्या १।।। वर्षात लक्ष्मी माझ्यावर इतकी रुष्ट झाली की `नच सुंदरी करू कोपा मजवरी धरि अनुकंपा म्हणून मी तिची परोपरीने समजूत केली; पण व्यर्थ! केलेला प्रत्येक प्रयत्न सपशेल ठेचाळला. पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल मागेच पडू लागले. त्यासाठी प्रबोधनकारांच्या पत्नी रमाबाईंनी केलेला त्यागही त्यांनी सांगितला आहे, `व्यवहाराचा आब सांभाळण्यासाठी गृहलक्ष्मीनेही आपल्या सर्व मौल्यवान स्वधनाचा स्वयंस्फूर्तीने होम करून, ती केवळ मंगळसूत्राची लंकेची पार्वती बनली. उपासमारीचेही काही प्रसंग अनुभवले, तथापि श्री हरीचे नाव घेऊन नेटाने कामभार रेटीत होतो.
प्रबोधनकारांशी संसार म्हणजे पदरात निखारा बांधून जगण्यासारखंच होतं. ते दिवसरात्र व्यासंगात बुडालेले. जगाशी पंगा घेणारे. सत्यासाठी भल्याभल्यांना लेखणीने लोळवणारे. त्यात खोडा न घालता पतीने हाती घेतलेल्या कार्यात त्यागाची आहुती देण्यास रमाबाईंनी मागेपुढे पाहिलं नाही. केवळ आपले दागिने विकले नाहीत, तर उपासमारही सहन केली. महिन्याच्या सुरुवातीला प्रबोधनकारांनी दिलेल्या रकमेवर पाच मुलांचा संसार चालवण्याची कसरत त्या करत होत्या. ते करताना त्यांनी प्रबोधनकारांना संसारात कधी अडकूच दिलं नाही. घराची जबाबदारी उचलून प्रबोधनकारांना प्रबोधनासाठी मोकळीक देण्याचं योगदान त्या निरपेक्षपणे देत होत्या. प्रबोधनकारांनी आपल्या संसांराचं वर्णन आत्मचरित्रात केलं आहे. त्यातून रमाबाईंचंहे योगदान किती महत्त्वाचं आहे आणि त्या होत्या म्हणून प्रबोधनकार होते, हे आपल्या सहज लक्षात येतं-
महिन्याला रोख पगार हाती पडायचा. घरातला देण्याघेण्याचा सारा व्यवहार ती जातीने पाहू लागली. बाजारातला कोणताही जिन्नस आणण्याची माझ्यावर कधी वेळच आली नाही. त्यामुळे आजही कोथिंबिरीपासून तो तांदळापर्यंत, कशाचा किती भाव, नि बरे वाईट कोणते, या ज्ञानात मी अगदी अक्षरश: `ढ`च आहे. अमक्याचा भाव वाढला नि तमक्याचा घसरला, कसे काय दिवस जाणार बुवा, या विषयावर कोणी चर्चा करू लागले का आजही मी नुसता हुंहूं करीत नाइलाजाने ऐकत बसतो झाले. त्यातले अवाक्षरही मला समजत नाही नि उमजतही नाही. सारांश, सौ.ने मला त्या संसारी जंजाळात कधी पडूच दिले नाही. माझ्या दैनंदिन गरजा काय, याचा तिने चोख आढावा घेतल्यामुळे बाह्य जगाच्या दलामलीत मला यथेच्छ भाग घेता आला. मुलेबाळे झाल्यावरही संसाराच्या कसल्याही विवंचना तिने माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत. फक्त दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आम्ही रोख खंडणी भरली की `राज्याचा बंदोबस्त कसा काय आहे? विचारण्याची जरूरच पडायची नाही.`
असा हा संसार रमाबाई चालवत होत्या. प्रबोधनकारांनी मिळवलेलं आणि रमाबाईंनी सांभाळलेलं जे काही होतं ते दोघांनी मिळून प्रबोधनच्या होमात अर्पण केलं होतं. सगळ्या सांसारिक सुखसोयींना आणि आवडीनिवडींना समाजाच्या भल्यासाठी उधळून दिलं होतं. त्यातही दोघे खांद्याला खांदा लावून लढत होते. पण लढताच येणार नाही, असं भयंकर संकट समोर उभं ठाकलं होतं.
बॉम्बे क्रॉनिकलचा खटला सुरू होताच. त्यात आता धनजीशेठ कूपर आणि हिंदू मिशनरी सोसायटीने पाठवलेल्या कोर्टाच्या नोटिसांना उत्तर द्यायचं होतं. त्यासाठी प्रबोधनकार नोव्हेंबर महिन्यातच पुण्यातून मुंबईला निघाले. तेव्हा त्यांच्या डोक्यात कोणताही किंतु नव्हताच. प्रबोधनकारांनी पुण्यातून निघतानाचं वर्णन केलं आहे, साक्षात मानवी शनीने माझ्यावर फेकलेल्या कायदेबाजीच्या अस्त्रांना तोड द्यायला ७ नोव्हेंबर १९२७ रोजी पुण्याच्या घरातून मुंबईस येण्यासाठी पाऊल बाहेर टाकले. हे पाऊल कायमच्या उच्चाटनाचे आहे, माझा छापखाना व प्रबोधन कचेरी पुनरपि त्याच ठिकाणी असलेली पाहण्याचे मला लाभणार नाही आणि नेहमीप्रमाणे टांग्याभोवती जमलेल्या कामगारांचा मुजरा हा शेवटचा, निदान पुण्यातला तरी अखेरचाच मुजरा असेल, अशी मला किंवा कोणालाही कल्पना आली नाही. पण शनि काय करणार नाही? सांगायला अगर लिहायला लागणार्‍या वेळेच्या शतांशात या पुढील घडलेले चमत्कारिक प्रकार इतक्या कल्पनातीत घटनेने घडले की त्याचा यथातथ्य परिचय करून देण्याच्या कामी माझी बुद्धीच पांगळी पडते, मग लेखणी लंगडी का न पडावी?

पोटात भीतीचा गोळा उभं करणारं हे शनिमाहात्म्य पुस्तकातलं वर्णन आहे. या अचानक येऊ घातलेल्या संकटांचा घाव इतका अनपेक्षित होता की त्याचं वर्णन आपण करू शकणार नाही, असं प्रबोधनकारांना वाटलं, कादंबरीकाराच्या आणि कवीच्या कल्पनेलाही चकविणारे रूपाचे आणि वेदनांचे चित्र रेखाटण्याच्या कामी मी, सरधोपट निबंधकार, माझा कमकुवतपणा बिनशर्त कबूल करतो. ग्रहदशेने असो वा व्यावहारिक अडचणीने असो, पण परिस्थिती एकदा बिथरली की तिच्या शतमुखी तोंडात लगाम चढविताना मोठमोठ्या विक्रमी पुरुषांची मति आणि कृती कशी कुंठित होते, त्यांची धोरणे त्यांना कशी नडतात आणि मित्रसुद्धा शत्रू होऊन त्याच्या होळीने आली दिवाळी कशी साजरी करू पाहतात, याचा इतिहास मी पुष्कळ वाचलेला आहे, प्रत्यक्ष पाहिलेला आहे, आणि आता तर डोळे उघडे ठेवून जिवंतपणी अनुभवला आहे. श्रीहरी! तुझी माझ्यावर अशीच कृपादृष्टी असू दे. संकटांच्या भट्टीत माझ्या आचारविचार उच्चाराला चांगले खरपूस भाजून, त्यांच्याद्वारे जनता-जनादर्नाची माझ्याकडून अखंड सेवा घडावी.

संकटांचं वर्णन करतानादेखील प्रबोधनकारांनी लोकसेवेचीच प्रार्थना केली आहे. यावरून त्यांची सर्वसामान्य लोकांशी असलेली बांधिलकी समजून घेता येईल. ७ नोव्हेंबरला पुण्याहून निघाल्यानंतर जवळपास महिनाभर मुंबईत राहून प्रबोधनकार पुण्यातला किल्ला लढवत होते, असं दिसतंय. त्या काळात त्यांनी मुंबईहूनच नोव्हेंबरचा प्रबोधनचा अंक काढला. संपादक पुण्यात नसल्याचा खुलासाच त्या अंकात प्रसिद्ध झाला होता. पण मासिक प्रबोधनाबरोबरच तेव्हा साप्ताहिक लोकहितवादीची नवी जबाबदारीही त्यांनी घेतली होती. प्रबोधनकारांनी सांगितलंय तसं १० डिसेंबरचा लोकहितवादीचा शेवटचा तेरावा अंक निघाला. १० डिसेंबर ही प्रकाशनाची तारीख आहे. म्हणजे त्याच्या आधीच्या पाच सहा दिवस आधी अंक प्रिंटिंगसाठी गेला असावा. म्हणजे तोपर्यंत प्रबोधनकार सक्रिय होते. बहुदा त्यांनी या अंकाचं काम मुंबईत बसूनच केलं असावं. लोकहितवादीचे अंक उपलब्ध नसल्यामुळे त्याविषयी आपल्याला त्याविषयी काही ठोस विधान करता येत नाही.
१० डिसेंबरनंतर अचानक आकाश कोसळलं. प्रबोधनकारांची तब्येत प्रचंड ढासळली. त्यांना बिछान्यातून उठताही येईना. ते पुरेसं नव्हतं, म्हणून ठाकरेंच्या घरावर संकटांची मालिका कोसळली. प्रबोधनकारांच्या तब्येतीमुळे पुण्याहून मुंबईला आलेला एकेक सदस्य एकामागून एक आजारी पडू लागला. प्रबोधनकार त्याचं वर्णन करतात, १९२७च्या नोव्हेंबरपासून परिस्थितीच्या पालटाचे फेरे इतक्या आश्चर्यचकित वेगाने फिरू लागले की अवघ्या दीड महिन्यात होत्याचे नव्हते झाले. १० डिसेंबरला लोकहितवादीचा १३वा अंक निघेपर्यंत जो मी महाराष्ट्राच्या विचारक्षेत्रात क्रांतीचा धुमाकूळ घालीत होतो, तो मी अवचित निष्क्रिय बनलो. प्रकृती अनपेक्षित बिघडली, म्हणून घरची मंडळी पुण्याहून दादरला धावून आली. घरात पाऊल ठेवतात तोच एकुलते एक चिरंजिवास ब्रांकोन्युमोनिया! एका मुलीस डांग्या खोकला. दुसरीला मलेरिया. कुटुंबाला डिसपेपसिया.

ही सगळी परिस्थिती हादरवून टाकणारीच होती. दादरला भाऊ यशवंतरावांच्या बिर्‍हाडात बहुतेक सगळी उतरली असावीत. प्रबोधनकारांची प्रकृती मुळातच तोळामासा होती. ते अधूनमधून आजारी पडत असत. त्यांना तेव्हा नेमकं काय झालं होतं, ते त्यांनी कुठे लिहिलेलं नाही. पण त्यांना निद्रानाश आणि मूळव्याध हे दोन आजार पूर्वीपासून होतेच. त्यांच्या पत्नीही डिसपेपसिया म्हणजे वेदनादायीअपचनाने बिछान्याला खिळल्या होत्या. पाचपैकी तीन मुलं आजारी. एका मुलीला मलेरिया आणि दुसरीला डांग्या खोकला. दोन्ही आजार तेव्हा जीवघेणेच होते. एकुलता एक मुलगा म्हणजे बाळासाहेब तेव्हा फक्त ११ महिन्यांचे होते. त्यांना ब्रांकोन्युमोनिया झाला होता. न्युमोनियाच्या या प्रकारात फुफ्फुस आणि श्वासनलिकेत जंतुसंसर्ग होऊन प्रचंड दाह होतो. थंडीताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणाने रुग्ण मेटाकुटीला येतो. आज इतकी वैद्यकीय प्रगती झालेली असतानाही लहान मुलांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. शंभर वर्षांपूर्वी तर पाच मुलींनंतर जन्मलेल्या एकुलत्या एका मुलाला हा जीवघेणा आजार झालेला बघून ठाकरे कुटुंब हादरलंच असेल.
तरीही असा अंदाज लावता येतो की या आजारांच्या चक्रामधून प्रबोधनकार वगळता कुटुंबातली इतर सगळी मंडळी बरी झाली. प्रबोधनकार बराच काळ बिछान्याला खिळून होते. पण कोर्टाला त्यांच्या या आजारपणाशी कोणतंही घेणंदेणं नसणारच. ते कोणासाठी थांबणार नव्हतंच. जप्ती आणि समन्स बजावली गेली. देणेकर्‍यांचे तगादे सुरू होतेच. प्रबोधनकारांच्या हातात काहीच नव्हतं. ते निपचित पडून होते. खरीखोटी देणी फेडण्याचं आश्वासन देण्यासाठी प्रबोधनकार कोर्टात जाऊ शकले नाहीत. मोठ्या मेहनतीने पुण्यात उभा केलेला प्रबोधनचा सगळा डोलारा अचानक कोसळताना बघण्याखेरीज त्यांच्या हातात काही नव्हतं. प्रबोधन बंद पडलं. त्याची कचेरी बंद पडली. छापखान्यावर जप्ती आली. सगळं संपलं. पुण्यातल्या धर्ममार्तंडांनी ज्यासाठी देव पाण्यात ठेवले होते, ते सगळे एकाच वेळेस पावले म्हणायचे. प्रबोधनला पुण्यातून हुसकावून लावण्याचा त्यांचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले होते. आता या मोठ्या आजारपणाने प्रबोधन्ा हे नाव पुण्यातून पुसलं गेलं.
प्रबोधनकार लिहितात, तिकडे पुण्यास छापखाना हातचा गेला. प्रबोधन कचेरीचे दरवाजे लागले. इमानी कामगार घरी बसले. बोलबोलता पुण्यातले अस्तित्व धुक्याप्रमाणे नाहीसे झाले. मी तर दादरला बिछान्यात! या पाच वाक्यांत प्रबोधनकारांची हतबलता बघून आपल्याही मनावर ओरखडा उमटतो. सगळ्या जगाशी दोन हात करण्यासाठी कायम सरसावून उभा राहणारा हा जिगरबाज माणूस काही न करता निपचित पडून आहे आणि त्याने उभं केलेलं सगळं त्याच्या दृष्टीआड उद्ध्वस्त होत आहे, हे भयंकर दुःखद होतं. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कायम संकटांना शिंगावर घेणार्‍या प्रबोधनकारांना प्रकृतीने असहाय्य केलं होतं. बोलता बोलता पुण्यातले अस्तित्व धुक्याप्रमाणे नाहीसे झाले, हे प्रबोधनकारांचं वाक्य तर चटका देऊन जातं. त्यांना मुळात पुण्यात यायचंच नव्हतं. तरीही परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांना सातार्‍यातून पुण्याला यावं लागलं. तिथे त्यांची फसवणूक झाली. छापखान्याचा फलक जाळण्यात आला, जर्मनीतून मागवलेली प्रिंटिंग मशीन तुटली. त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले. कायद्याच्या कचाट्यात अडवण्यात आलं. पण ते कशालाच बधले नव्हते. त्या सगळ्याच्या नाकावर टिच्चून त्यांनी पुण्यात प्रबोधन उभं केलं होतं. आता ते सारं नाहीसं होताना प्रबोधनकारांना काय वेदना होत असतील, याचा विचार करणं देखील आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडचं आहे.

Previous Post

नामयाचा तुका!

Next Post

कशापासून पळ काढताय?

Next Post
कशापासून पळ काढताय?

कशापासून पळ काढताय?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.