
बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत ७ नोव्हेंबर १८७५ रोजी ‘बंगदर्शन’ नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले. नंतर १८८२ मध्ये हे गीत ‘आनंदमठ’ कादंबरीत प्रकाशित करण्यात आले. १८९६ रोजी गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात पहिल्यांदा गायले. १९०५च्या बंगालच्या फाळणीनंतर हे गीत क्रांतिकारकांची ऊर्जा बनले, हे गीत स्वातंत्र्यासाठी एक ऊर्जास्त्रोत बनले. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या गीतगायनाने आपल्या जीवनाचे भारतभूमीसाठी बलिदान दिले. १९३७ साली काँँग्रेसने या गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तत्पूर्वी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी १९४६च्या ‘कॅबिनेट मिशन योजने’अंतर्गत घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने २ वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीत २६ नोव्हेंबर १९४८ रोजी भारताचे संविधान पूर्ण केले. डॉ राजेंद्र प्रसाद हे समितीचे अध्यक्ष तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारण्यात आले आणि २६ जानेवारी १९५० रोजी या संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. २४ जानेवारी १९५० रोजी जन गण मन या राष्ट्रगीताच्या बरोबरीने घटना समितीने वंदे मातरम्च्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा दिला. परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाच्या आधिपत्याखाली असलेल्या केंद्र सरकारने वंदे मातरम् हे संपूर्ण सहा कडव्यांचे राष्ट्रीय गीत सरकारी कार्यक्रमात म्हणणे अनिवार्य केले.
भाजपने २६ मे २०१४ रोजी केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर याच दिवशी जणू काही देशाला स्वातंत्र्य मिळाले अशा पद्धतीने १४० कोटी जनतेसमोर आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. देशपातळीवर तसेच राज्य पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अहमहमिका सुरू झाली. संघाच्या मान्यवरांची मांदियाळी देशपातळीवर तसेच राज्य पातळीवर सरकारी कागदपत्रांमध्ये झळकू लागली. १९४७ साली घटना समितीने संघराज्य व्यवस्था निर्माण केली ते आता वेगळ्या पद्धतीने (रा. स्व.) ‘संघ’ राज्य अस्तित्वात येऊ लागले. भावनेच्या भरात भरकटत चाललेल्या या सरकारने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाच मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याऐवजी ‘हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ असा नारा देत सर्वत्र तिरंगा फडकविण्यास सुरुवात केली. परंतु जो हैं भूखा नंगा, वह क्या फहराएगा तिरंगा, हेच कळेनासे झाले आहे.
वंदे मातरम् ला दीडशे वर्षे पूर्ण होत असताना त्याचा सन्मान करण्यात येणे ही अभिमानाची बाब आहे. बंकिमचंद्र चटर्जी आणि वंदे मातरम्ची महती सर्वदूर पसरविणे अगत्याचे आहे. परंतु ज्यावेळी हे गीत रेल्वेच्या सर्व फलाटांवर ध्वनिक्षेपकांवरून वाजू लागले तेव्हा त्या राष्ट्रीय गीताचा सन्मान कसा आणि कोण ठेवणार? एके दिवशी चर्नी रोड येथे तर दुसर्या दिवशी चर्चगेट रेल्वे स्थानकावर हे राष्ट्रीय गीत वाजत असताना मी एकटा या राष्ट्रीय गीताच्या सन्मानार्थ स्तब्ध उभा राहिलो. परंतु गाड्या चालत होत्या, प्रवासी चालत होते, धावत होते. तडक मी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार संजय उपाध्याय यांना भ्रमणध्वनी करून हा राष्ट्रीय गीताचा अवमान थांबविण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले हे काही काळापूर्वी मंत्रालयातील पत्रकार कक्षात आले असताना गप्पा मारत असताना संघ राज्य संकल्पना हा विषय निघाला तेंव्हा मी बाजूलाच बसलो होतो आणि पटकन म्हणालो, बरोबर आहे नाना आता संघ राज्यच आहे. हे म्हणतांना संघ या शब्दावर जोर दिला. त्याबरोबर सर्वांना त्यातील खोच कळली आणि सारेच जण हसायला लागले. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तसेच ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तेव्हापासून भारतात तसेच महाराष्ट्रात कुणाला ‘अच्छे दिन’ आले हे माहीत नाही, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र अच्छे दिन निश्चितच आल्याचे गेल्या ११ वर्षांतील एकेका निर्णयांमुळे दिसून येत आहे. देशपातळीवर तसेच राज्य पातळीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, नानाजी देशमुख यांच्यापासून तर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची नावे सरसकट योजनांना देण्याचा सपाटाच लागला. सरकारी समित्यांवरही संघनिष्ठ कार्यकर्त्यांची वर्णी लागू लागली. पंतप्रधान मोदी हे काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत अशा घोषणा लाल किल्ल्यावरून देतात, परंतु वस्तुस्थिती पाहता काँग्रेसयुक्त भाजप आणि भ्रष्टाचारयुक्त भाजप हेच होत असल्याचे दिसून येते.
तिरंगा, राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राज्यगीत, शिवकालीन गडकिल्ल्यांच्या नावांसाठी, ही नांवे मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना देण्यासाठी चढाओढ लागली असताना या बंगल्यामध्ये राहणारे कोण आहेत? ते शुद्ध चारित्र्याचे आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोय. करोडोंची उधळण करुन ऐतिहासिक, अभूतपूर्व अशी शेखी मिरविण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रगीत म्हणताना त्याचा योग्य सन्मान राखण्यात येतो की नाही, हे कोण पाहणार? राष्ट्रीय गीत दोन कडव्याचे मान्यताप्राप्त असताना अट्टहासाने सहा कडवी सरकारी कार्यक्रमात गाणे हा निर्णय ठीक, परंतु ती संपूर्ण पाठ कुणाला आहेत? की त्याची ध्वनीफीत वाजविणार? संपूर्ण वंदे मातरम् आलेच, आता भविष्यात संघाच्या शाखेत गायले जाणारे ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ हे सुद्धा राजमान्यता प्राप्त करील, यात शंका नाही.
जय जय महाराष्ट्र माझा या कविवर्य राजा बढे यांच्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, परंतु या राज्यगीताचा सन्मान ठेवणे ही महाराष्ट्रातील सुमारे तेरा कोटी नागरिकांची जबाबदारी आहे. या जनतेच्या प्रबोधनाची कोणती व्यवस्था करण्यात आली आहे? गडकिल्ल्यांना हेरिटेज, ऐतिहासिक दर्जा, जागतिक वारसा, जगविख्यात दर्जा मिळत असताना या गडकिल्ल्यांच्या परिस्थितीचे काय? पर्यटनाच्या नावाखाली वाट्टेल तसा धुडगूस घालणे, मद्याच्या बाटल्या ठिकठिकाणी आढळणे, पोवाड्यांऐवजी झिंग झिंग झिंगाटची गाणी लावून हिडीस पद्धतीने अंगविक्षेप करीत नाचणे, योग्य आहे काय? याचा विचार कोण करणार?
जय संघराज्य! जय संविधान!
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

