• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

संकटांची चाहूल

सचिन परब (प्रबोधन-१००)

marmik by marmik
February 13, 2026
in प्रबोधन १००
0
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे…

पाचव्या वर्षाच्या नवव्या अंकात प्रबोधनकार तडाखेबाज लिखाण करत होते. नव्या योजना आखताना आणि नव्या लेखनाचे वायदे करताना दिसत होते. पण दहाव्या अंकात मात्र अचानक वेगाने धावणारी प्रबोधनची गाडी अचानक ब्रेक लागून ठेचकळताना दिसू लागली. त्यात प्रबोधनकारांवर आलेल्या संकटांची स्पष्ट चाहूल दिसली.

प्रबोधनच्या पाचव्या वर्षाच्या नवव्या अंकात म्हणजे १९२७ सप्टेंबरच्या अंकात प्रबोधनकारांची लेखणी झळाळून उठलेली आपण पाहिली. अंकाच्या पहिल्या पानावरच मानला तर विनोद, नाहीतर – ? अशा मथळ्याखाली छोटासा मजकूर आहे, तो असा,
संत : दिल्लीच्या पेशवा पत्राने शिवछत्रपतींची बीभत्स निंदा केल्यामुळे महाराष्ट्रांतले मराठे म्हणे बरेच खवळणार आहेत?
पंत : मराठे? आणि ते खवळणार? अहो संत, संत आहात तुम्ही. मराठे लोकांत खवळण्यातकी जर तडफेची खवळणी असती, तर गेल्या इंदोर प्रकरणांत ती कुठें दडून बसली होती? अखेर आम्हा ब्राम्हणांच्या पोरांनी लेखणीच्या फटकार्‍यासरसा मराठ्यांचा होळकर उखडलाच की नाही? म्हणे मराठे खवळणार आहेत?
एका चुटकुल्याच्या पद्धतीने लिहिलेल्या या तुकड्याने प्रबोधनकारांनी महाराष्ट्राच्या बहुजन समाजाला ललकारले आहे. त्याच्या स्वाभिमानाला चिथावणी दिली आहे. या दोन चार ओळी मोठ्या लेखांपेक्षाही प्रभावी ठरतात. आणि हे सगळं त्यांनी बावला मुमताज प्रकरणावरच्या लिखाणासाठी बॉम्बे क्रॉनिकलचा खटला सुरू असताना केलं आहे. पण ते इथेच थांबत नाहीत. या मजकुराखाली आणखी एक छोटी टीप आहे, ती अशी, पोटार्थी आणि गोटार्थी लेखक– लेखनवृत्तीवरच जे पोट भरतात ते पोटार्थी लेखक. प्रबोधनकार ठाकरे या वर्गातील होत. ज्याच्या पोटापाण्याचा प्रश्न एखाद्या देशी संस्थानिकाच्या मानकरीपणाच्या मासिक तनख्यावर, वकीलीवर किंवा वैद्यकीवर सुटलेला असतो आणि एखाद्या विशिष्ट गोटात शिरून केवळ विरंगुळा किंवा देशभक्तीचा चाळा म्हणून, जे फावल्या वेळांत वृत्तपत्र लेखन करतात, ते गोटार्थी लेखक होत.

आपल्या कमाईचं साधन फक्त प्रबोधन आणि प्रबोधन छापखाना आहे, हे प्रबोधनकार स्पष्ट करतात. बावला मुमताज प्रकरणात प्रबोधनने होळकरांची बाजू घेतली ती काही संस्थानिकांकडून काही मिळेल या लालसेपोटी नाही, तर फक्त सत्यासाठी हे त्यांनी इथे स्पष्ट केलंय. शिवाय प्रबोधन हे स्वतंत्रमतवादी आहे, अशी त्यांची धारणा सुरुवातीपासूनच आहे. ते सत्यशोधक चळवळीच्या विचारांचे असले, तरी कुणाच्याही गोटाचा भाग बनणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. त्यामुळे त्यांनी हे डिस्क्लेमर आधीच देऊन ठेवलं आहे.

सप्टेंबर १९२७चा हा अंक अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. मुळात त्यात वाचनीय आणि विचारप्रवर्तक लिखाणाचा दारूगोळा ठासून भरलेला होता. त्यात प्रबोधनकारांनी गोव्याच्या देवदासी समाजाचा प्रश्न त्यांनी तडफेने आणि अभ्यासपूर्वक मांडला होता. प्रायश्चित्त् वादात ल.रा. पांगारकरांशी पंगा घेऊन बहुजनांच्या अस्मितेसाठी खंबीर भूमिका मांडली होती. प्रख्यात इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांनी डॉ. जॉन फ्रायर या इंग्रज प्रवाशाने केलेलं शिवकालीन महाराष्ट्राचं वर्णन मराठीत आणलं होतं. त्याचा तिसरा भागदेखील या अंकात आहे. धनजीशा कूपर यांनी प्रबोधनकारांना सातार्‍यातून घालवण्यासाठी कोणतं षडयंत्र केलं, हे सांगण्याचं आवाहन सातार्‍याच्या ब्राह्मणेतर चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अनावृत्त पत्र लिहून केलं होतं. ते पत्र आणि त्यावर एक प्राथमिक खुलासाही त्यांनी केला होता. पुढील अंकांपासून तो सातार्‍याचा सगळा इतिहास लिहिणार असल्याची घोषणा त्यात केली होती. शिवाय देवदासी समाजाविषयीची गोवेकरीण ही लेखमालिकाही ते पुढे लिहिणार होते. फ्रायरच्या प्रवासाचे भागही पुढे येणार होते. नेपोलियनच्या विजयी सूत्रांचं भाषांतर लवकरच छापण्याची मनीषाही त्यांनी व्यक्त केली होती.

वाचकांनी पत्र पाठवून प्रबोधनमधल्या विचारांवर चर्चा करावी, असंही आवाहन त्यांनी केलंय. त्या आवाहनात ते म्हणतात, `कोणत्याही चळवळीकडे हंगामी फायद्या तोट्याच्या दृष्टीने न पाहतां, गतेतिहास आणि वर्तमान परिस्थिती यांचा विवेकपूर्ण ताळमेळ घालून, भविष्यकाळच्या जीवनक्रमाला प्रबोधक असेच टिकाऊ विचार व्यक्त करण्याचे प्रबोधनाचे ध्येय आहे. त्याला वाचकांनीही सहकार्याचे व सहविचारांचे पाठबळ देणे अगत्याचे नव्हे काय? `प्रबोधनच्या पुस्तकविक्रीची जाहिरात यात आहे. आंतरजातीय लग्न, हुंड्याशिवायची लग्न, गरीबाच्या मुलींची लग्न अशांच्या छोट्या जाहिरातींवजा आवाहनंही यात आहे. त्यात संपर्क म्हणून थेट स्वतःचा नावपत्ता दिलेला आहे. मुंबईतले भांड्यांचे प्रसिद्ध उत्पादक बाबाजी तारकर यांनी पितळी भांड्यांचा एक सेट भेट म्हणून पाठवल्याचा उल्लेखही आहे.
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे या अंकापर्यंत प्रबोधनकार अगदी उत्साहात होते. नवनव्या योजना आखत होते. वाचकांना नव्या लिखाणाचे वायदे करत होते. एकीकडे मासिक प्रबोधनच्या जोडीला साप्ताहिक लोकहितवादीही सुरू झाला होता. पण पुढच्याच दहाव्या म्हणजे नोव्हेंबर १९२७च्या अंकाची पानं उलटताच आपल्याला वेगळंच चित्र दिसतं. वेगाने चाललेल्या प्रबोधनच्या गाडीला ब्रेक लागलाय असं वाटतं. संकटांची चाहूल लागते. नवव्या अंकात पहिल्याच पानावर स्वतःच्या खुमारीचा परिचय देणारं प्रबोधन दहाव्या अंकाच्या पहिल्या पानात काकुळतीला आलेलं दिसतं. पहिल्या पानावर व्यवस्थापक प्रबोधन यांच्या नावाने एक विनंतीचा मजकूर छापलेला आहे,

सध्या प्रबोधनाच्या मार्गात अनेक अडचणी येत आहेत. त्याचा जेव्हाच्या तेव्हा फडशा पडतही आहे. परंतु नियमितपणाच्या बाबतीत, चालू पाचव्या अंकाचे बारा अंक बाहेर पडेपर्यंत बराच त्रास पडणार आहे. श्रीयुत ठाकरे सध्या बाहेरगावी असल्यामुळे तर बरीच अडचण होणे क्रमप्राप्त आहे. अकरावा अंक छापण्यास घेतला आहे. आणि डिसेंबर १५च्या आत ११ आणि १२ अंक (जोड) काढून चालू वर्ष पूर्ण करण्याची खटपट करीत आहो. प्रिय आश्रयदात्यांनी सांभाळून घ्यावे.

हे वाचताच मनात शंकेची पाल चुकचुकू लागते. पण आत प्रबोधनकाराचं सविस्तर आणि स्फुट दोन्ही प्रकारचं लिखाण वाचून आपण थोडं आश्वस्त होत नाही, तोच प्रबोधन कार्यातली विघ्ने हे मनोगत समोर येतं. सातारच्या धनजीशेठ कूपरने त्यांना जुन्या व्यवहारातल्या वसुलीसाठी कोर्टात खेचलं होतं. त्यात प्रबोधनकारांनी मांडलेली बाजू आपण यापूर्वी पाहिलेली आहे. तसंच गजानन वैद्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीच्या नव्या कमिटीने प्रबोधनला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी थेट हायकोर्टात धाव घेतल होती. दोन्ही प्रकरणांची सविस्तर माहिती प्रबोधनकारांनी या लेखात दिलेली आढळते.

या लेखात मनोगत मांडताना प्रबोधनकार लिहितात, लोकमत प्रबोधनाच्या व्यसनापायी मी सर्वस्वाला किती व कसा मुकलो आहे, याची वाच्यता करून, आत्मश्लाघेच्या पातकाचा धनी मी होऊ इच्छित नाही. तथापि व्यवहाराच्या सरळ चार गोष्टी उघड करून, आश्रयदात्यांच्या तद्विषय कल्पनांवर प्रकाश पाडणे माझे कर्तव्य आहे. प्रबोधनकारांनी प्रबोधनसाठीच सरकारी नोकरी सोडली. कोर्टकचेरीपासून लांब राहण्याच्या निश्चयामुळे अनेकदा दिलेल्या पैशांवर पाणी सोडलं. अशा वेळेस एके काळी मित्र म्हणून प्रबोधनसाठी दिलेल्या निधीसाठी लोक कोर्टात गेले होते. आधीच कफल्लक असणार्‍या प्रबोधनकारांवर ही मोठी संकटं आली होती. पण ते सहजासहजी डगमगणारे नव्हतेच. वाचकांच्या कोर्टात त्यांनी आपली बाजू मांडली होती. आता प्रत्यक्ष कोर्टात लढण्यासाठी ते सज्ज होत होते.

पण त्यातही त्यांची ओढाताण सुरू होती. दहाव्या अंकाच्या शेवटी त्यांनी जाहीर खुलासा म्हणून छापलेला मजकूर त्यांची तेव्हाची परिस्थिती सांगण्यास पुरेसा आहे. तो असा, लेखनव्यवसायापासून तो थेट पत्रव्यवहारापर्यंत, छापखान्याच्या व्यवस्थेपासून तो वर्गणीदारांची लेबले तयार करण्यापर्यंत, सर्व कामे मला एकट्याला करावी लागतात. त्यातच देण्याघेण्याची काळीजतोडी विवंचना. प्रकृति नेहमी तोळ्यामाशावर नादुरस्त. हाताशी चलाख व मेहनती मदतनीस कोणीच नाही. अशा अवस्थेमुळे पत्रांची उत्तरे पाठविण्यास किंवा सर्व कामे वेळच्या वेळी करण्यास मजकडून बरीच दिरंगाई होत आहे. त्याची सर्व आश्रयदात्यांनी क्षमी करावी.

बापूसाहेब चित्रे यांच्या निधनानंतर प्रबोधनकारांना हवा तसा सहकारी मिळाला नाही. त्यात बॉम्बे क्रॉनिकलच्या खटल्याने प्रबोधनकारांची आर्थिक गळचेपीच झाली. प्रबोधनकारांनी त्याचं वर्णन असं केलंय, बापूसाहेबांच्या मृत्यूने माझा उजवा हात लंजूर झाला आणि खटल्याने द्रव्यशोष करून डावा हात तोडला. खलास! पुन्हा मी हातपाय तुटून खास शनीच्या अड्ड्यांत `चौरंगा होऊन पडलो!` शनिमाहात्म्य या पुस्तकात प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्याच्या पोथीतल्या विक्रमादित्याच्या कथेशी स्वतःच्याआयुष्याचं साधर्म्य कसं आहे, ते सांगितलं आहे. त्यात हा उल्लेख येतो. याच संदर्भात ते पुढे सांगतात, प्रबोधन कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी लहान मोठ्या रकमा कर्जाऊ दिल्या होत्या, त्या सर्वांची माणुसकीची काळिजे शनीने खच्ची करून, त्या ठिकाणी कज्जेदलालीची काळिजे उलटी टांगली. भराभर फिर्यादी आणि समन्सांचा माझ्यावर वर्षाव होऊ लागला. सगळ्याच घेणेदारांनी एकदम गिल्ला केला तर मोठमोठ्या बँकांचे चुटकीसरसे दिवाळ्याचे टिंपाड वाजते, मग माझ्यासारख्या व्यक्तीच्या कारभाराची गोष्ट कशाला?

एखादं प्रकरण कोर्टात गेलं की त्याची चौकशी न करता केवळ वसुलीसाठी समन्स पाठवण्यात धन्यता मानली जाते. पण त्यात सामान्य माणसाचं काय होतं, याचा विचार कोर्ट करत नाही, अशी जाहीर नाराजी आपबीती प्रबोधनकारांनी वर्णन केलेली आहे. पण याही अडचणीच्या परिस्थितीत प्रबोधन कचेरी आणि छापखाना पावणेदोन वर्षं सुरू राहिल्याचं श्रेय प्रबोधनकारांनी आपल्या सहकार्‍यांना दिलंय. प्रभाकर पाध्ये, मारुती हराळे, बापूराव वझे आणि दिनकर सुराडकर अशी या सहकार्‍यांची नावं त्यांनी दिली आहेत. त्यांच्या मदतीमुळेच लोकहितवादी साप्ताहिक सुरू होऊ शकलं, असाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख ते करतात.

Previous Post

‘फॅमिली मॅन’ दादांच्या पश्चात फॅमिली एकत्र येणार?

Next Post

मुका पंडित

Next Post
मुका पंडित

मुका पंडित

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.