शहर म्हणजे केवळ सिमेंट, काँक्रीट आणि रस्त्यांचे जाळे नसते. शहर म्हणजे त्याचा श्वास, त्याची ओल, त्याचा थंडावा आणि झाडांमधून वाहणारा जीवनरस असतो. झाडे म्हणजे शहराची फुफ्फुसे. ही फुफ्फुसे जखमी झाली की शहर धाप लागल्यासारखे थबकते. आज ठाणे शहर अशाच एका निर्णायक टप्प्यावर उभे आहे, जिथे विकासाच्या आरशात पाहताना हळूहळू शहराचा श्वास हरवत चालला आहे.
ठाण्याच्या मध्यभागी वसलेला, १२५ वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर पेलणारा मनोरुग्णालय परिसर हे शहराचे एक महत्त्वाचे पर्यावरणीय वारसास्थळ आहे. शेकडो वर्षांची वृक्षसंपदा, घनदाट हिरवळ, पक्ष्यांचे किलबिलाट, जमिनीत मुरणारे पावसाचे पाणी आणि उन्हाळ्यातही टिकून राहणारा थंडावा या सार्यामुळे हा परिसर केवळ वैद्यकीय संस्थेपुरता मर्यादित न राहता, ठाणे शहराचा नैसर्गिक श्वास बनला आहे. १९०१ साली स्थापन झालेल्या या मनोरुग्णालयाने अनेक पिढ्या पाहिल्या. ब्रिटिश काळात उभारलेल्या जुन्या वास्तूंइतकाच इतिहास इथं उभ्या असलेल्या झाडांनीही पाहिला आहे. अनेक झाडे शंभर, दीडशे वर्षांहून अधिक काळ उभी आहेत. त्यांनी काळाच्या ओघात वादळे, दुष्काळ, पूर, माणसांची ये जा पाहिली; पण आज त्यांच्यासमोरचा धोका वेगळाच आहे. तो म्हणजे विकासाच्या नावाखाली होणारी मूक कत्तल. ७२ एकरमध्ये पसरलेल्या या परिसरात तब्बल १,६१४ झाडे आहेत. फणस, उंबर, आंबा, बदाम, चाफा, अशोका, गुलमोहर, कडुनिंब, जांभूळ, रेन ट्री, बकुळ, बहावा, नारळ, ताड, साग, शेवगा, करंज यांसारखी डेरेदार, सावली देणारी, जैवविविधतेला पोषक झाडे येथे आजही उभी आहेत. ही झाडे म्हणजे केवळ वृक्ष नाहीत, तर संपूर्ण परिसंस्थेचा कणा आहेत.
विकास म्हणजे जुने पाडून नवे उभारणे इतकाच मर्यादित अर्थ आज रूढ झाला आहे. मोठ्या इमारती, रुंद रस्ते, अधिक बेड्स, अधिक सुविधा हे सर्व विकासाचे मोजमाप मानले जाते. पण या विकासामध्ये निसर्ग कुठे आहे? झाडे, माती, पाणी, हवा यांचे मूल्य कोणत्या गणितात बसवले जाते? आज मनोरुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी प्रस्तावित आहे. जुन्या इमारती पाडून नवीन भव्य इमारती उभारल्या जाणार आहेत. आधुनिक सुविधा आवश्यक आहेत, यात शंका नाही. पण या विकासाची किंमत जर शहराच्या हरित फुफ्फुसाच्या कत्तलीत मोजली जाणार असेल, तर तो विकास आहे की आत्मघात?

झाडे म्हणजे अडथळे?
विकासकामांच्या आराखड्यात झाडे अनेकदा ‘अडथळा’ म्हणून पाहिली जातात. ती काढून टाकली की जागा मोकळी होते, असे सरळ गणित लावले जाते. पण झाडे काढल्यावर काय नष्ट होते, याचा विचार फार कमी केला जातो. एक प्रौढ झाड दरवर्षी हजारो लिटर पाणी जमिनीत मुरवते. ते तापमान दोन ते चार अंशांनी कमी ठेवते. प्रदूषित हवा शोषून शुद्ध ऑक्सिजन देते. पक्षी, कीटक, साप, खारी यांना निवारा देते. झाड पडले की हे सर्व एकाच वेळी नष्ट होते. त्याची भरपाई एका दिवसात, एका वर्षात, किंवा एका पिढीतही शक्य नसते.
वृक्षतोडीच्या समर्थनार्थ नेहमीच ‘पुनर्रोपण’ हा शब्द वापरला जातो. कत्तल केलेल्या झाडांऐवजी दुसरीकडे झाडे लावली जातील, असे आश्वासन दिले जाते. पण पुनर्रोपण आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये मोठी दरी आहे. मोठ्या, जुनी, डेरेदार झाडे स्थलांतरित केल्यानंतर फारच कमी प्रमाणात जगतात. मुळे तुटतात, माती बदलते, पाण्याचा समतोल बिघडतो. अनेक झाडे काही महिन्यांत वाळतात, तर काही हळूहळू मृतप्राय होतात. कागदावर मात्र ती ‘जिवंत’ दाखवली जातात. याआधी ठाणे शहरात विविध प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या पुनर्रोपणांचे परिणाम आजही पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी स्थलांतरित झाडे उभी असली तरी त्यांची पाने गळलेली, फांद्या सुकलेल्या आणि आयुष्य संपत आलेले दिसते. त्यामुळे ‘उर्वरित झाडांचे पुनर्रोपण केले जाईल’ हा दावा ऐकायला गोड वाटतो, पण अनुभवाने तो फारसा विश्वासार्ह ठरत नाही.
मनोरुग्णालय परिसर हा ठाणे शहराच्या मध्यभागी असलेला महत्त्वाचा हरित पट्टा आहे. आज संपूर्ण शहर सिमेंटच्या जंगलात रूपांतरित होत असताना अशा मोकळ्या, हिरव्या जागा अधिक मौल्यवान ठरतात. येथे तापमान तुलनेने कमी असते, हवा शुद्ध असते आणि जैवविविधता टिकून असते. या परिसरातील मोठ्या प्रमाणावरील झाडतोड म्हणजे केवळ एका जागेचा प्रश्न नाही, तर संपूर्ण शहराच्या पर्यावरणीय संतुलनावर होणारा आघात आहे. उष्णतेच्या लाटा, वाढते तापमान, प्रदूषण, पाणी साचणे, पूर या सर्व समस्यांची तीव्रता भविष्यात अधिक वाढू शकते.
आज ठाणे शहरात घोडबंदर, फ्री-वे, मोठे प्रकल्प, व्यावसायिक संकुले, महापालिका मुख्यालय अशा अनेक विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. प्रत्येक वेळी ‘पर्यायी लागवड’ आणि ‘पुनर्रोपण’ यांची भाषा वापरली गेली. पण शहराचा श्वास मात्र हळूहळू कमी होत गेला. विकास आणि पर्यावरण हे परस्परविरोधी नसतात, असे तत्त्वज्ञान नेहमी मांडले जाते. पण प्रत्यक्षात निर्णय घेताना पर्यावरणाला नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. झाडे तोडणे सोपे असते; त्यांचे संरक्षण करणे कठीण असते. पण खरा शाश्वत विकास हा कठीण मार्ग निवडतो.

विकासाच्या नावाखाली झाडे कापली जातील, तेव्हा केवळ हिरवळ नाही, तर आठवणी, इतिहास आणि शहराची ओळखही हळूहळू पुसली जाईल. शहरातील नागरिकांना स्वच्छ हवा, पाणी आणि स्ाुरक्षित पर्यावरण मिळणे हा मूलभूत हक्क आहे. झाडतोडीच्या प्रत्येक निर्णयामागे पारदर्शकता, वैज्ञानिक अभ्यास आणि दीर्घकालीन विचार असायला हवा. किती झाडे तोडली जाणार, किती वाचवता येऊ शकतात, पर्यायी आराखडे शक्य आहेत का हे सर्व प्रश्न गांभीर्याने विचारले जाणे आवश्यक आहे. आज प्रश्न हा केवळ मनोरुग्णालय परिसरापुरता मर्यादित नाही. प्रश्न हा आहे की आपण विकासाची दिशा कोणती निवडणार आहोत? झाडे तोडून उभा राहणारा विकास की झाडांना सोबत घेऊन पुढे जाणारा शाश्वत विकास?
ठाण्याच्या या हरित फुफ्फुसाचे भवितव्य काय असेल, हे येणार्या काळात ठरेल. पण आज घेतले जाणारे निर्णय पुढील अनेक दशकांवर परिणाम करणारे असतील. झाड एकदा पडले की ते पुन्हा उभे राहत नाही किमान माणसाच्या आयुष्यात तरी नाही. विकास आवश्यक आहे, पण तो निसर्गाचा गळा दाबून नाही. शहर जिवंत ठेवायचे असेल, तर त्याचा श्वास जपावा लागेल. कारण ‘झाडांची कापणी म्हणजे फक्त लाकूड कमी होणे नाही…ती शहराच्या श्वासाची दोरी कापण्यासारखी आहे.’
या प्रस्तावित झाडतोडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात अस्वस्थता वाढत चालली आहे. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पर्यावरण अभ्यासक, प्राणी-पक्षी मित्र, निसर्गप्रेमी नागरिक आणि सामाजिक संस्था यांनी या निर्णयाबाबत तीव्र खंत व्यक्त केली आहे. ‘विकास हवाच, पण तो निसर्गाचा बळी देऊन नको,’ अशी भूमिका घेत अनेकांनी या संदर्भात एकत्र येत विरोध नोंदवला आहे. काही ठिकाणी प्रतीकात्मक आंदोलने, मानवी साखळी, झाडांना राखी बांधणे, शांततामय निदर्शने आणि निवेदनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनांमधून केवळ झाडांचीच नाही, तर पक्षी, प्राणी आणि संपूर्ण जैवविविधतेच्या अस्तित्वाची चिंता व्यक्त करण्यात आली. झाडतोड झाल्यास केवळ हिरवळ नाही, तर पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचे आश्रयस्थान आणि शहराचा नैसर्गिक समतोलही नष्ट होईल, अशी भीती या सर्वांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ विकासाचा नसून, शहराच्या पर्यावरणीय भविष्याचा आणि नैतिक जबाबदारीचा बनत चालला आहे.
वृक्षसंपदेभोवती विकास गुंफावा
‘शहरातील झाडे या सजावटीची वस्तू नसून शहराच्या आरोग्यासाठी आणि राहण्यायोग्य वातावरणासाठी आवश्यक अशी जिवंत पायाभूत सुविधा आहेत. विशेषतः शंभर वर्षांहून अधिक जुनी झाडे ही जैवविविधतेची चालती-बोलती प्रयोगशाळा असतात. अशा झाडांवर अनेक पक्षी, कीटक, बुरशी आणि सूक्ष्मजीवांचे संपूर्ण जीवनचक्र अवलंबून असते. एक झाड तोडले की संपूर्ण परिसंस्था उद्ध्वस्त होते. शहरी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत झाडतोड हा ‘सोप्पा पर्याय’ मानला जातो, कारण त्याचा परिणाम तात्काळ दिसत नाही. पण त्याचे दुष्परिणाम दीर्घकालीन आणि गंभीर असतात. प्रौढ झाडांचे स्थलांतर अत्यंत कमी प्रमाणात यशस्वी ठरते.खरा शाश्वत विकास म्हणजे विद्यमान वृक्षसंपदा वाचवून, तिच्याभोवती विकास आराखडे आखणे. झाडांना जागा देणारे शहरच उद्या माणसांना जगण्याची जागा देऊ शकते.’
डॉ. प्रमोद साळसकर (ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ ठाणे)

