
प्रबोधनच्या ऑगस्ट १९२७च्या अंकात गोव्यातल्या मराठा गायक समाजाच्या म्हणजेच देवदासी समाजाविषयीचं महत्त्वाचं लेखन प्रबोधनकारांनी प्रसिद्ध केलं. त्याच अंकात आणखी एक स्फुट लेखांची मालिका लक्ष वेधून घेते, ती आहे समर्थ पांगारकर, कल्याण वाकसकर. जातीच्या नावाने तेव्हाच्या समाजात सुरू असलेल्या ढोंगावर करकचून रट्टे ओढणारे हे लेख आहेत, म्हणून महत्त्वाचे.
ल.रा. पांगारकर आणि वि.स. वाकसकर या महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या अभ्यासकांशी जोडलेला वाद तेव्हा सुरू होता. पांगारकर कोण? असं शोधल्यास मराठी विश्वकोशातल्या नोंदीतलं पहिलं वाक्य असं सापडतं. पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र : प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार, मराठी संतचरित्रकार, हरिभक्तपरायण भागवत धर्म प्रचारक आणि रसाळ वक्ते. वाकसकरांविषयी विश्वकोशात नोंद सापडत नसली तरी इतरत्र त्यांची ओळख सापडते ती अशी, विनायक सदाशिव वाकसकर हे बडोद्यातील एक प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक असून शिवकालीन इतिहासाच्या संशोधनासाठी ओळखले जातात.
पांगारकर हे पदवीधर असूनही नोकरी न करता संतसाहित्यावर रसाळ प्रवचनं करत, संतांची चरित्र आणि काव्य पुस्तरूपाने संकलित करून प्रसिद्ध करत. मुमूक्षू नावाचं संतसाहित्यावरचं त्यांचं मासिक तेव्हा खूप लोकप्रिय होतं. ते महाराष्ट्रभर आणि बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर इथेही प्रवचनं देत फिरत. अशाच एका दौर्यासाठी ते बडोद्याला गेले होते. तिथे ते विनायकराव वाकसकरांच्या घरी जेवले. जवळपास शंभर वर्षांपूर्वी हे घनघोर पाप होतं. कारण पांगारकर देशस्थ ब्राह्मण होते आणि वाकसकर हे कायस्थ म्हणजे सीकेपी होते. खरं तर हे सहभोजन कुणाला कळणारही नव्हतं. पण चिमणराव आणि गुंड्याभाऊच्या गोष्टी लिहिणारे विख्यात विनोदी लेखक चिं.वि जोशी यांना या सहभोजनाचं कौतुक वाटलं आणि त्यांनी लेख लिहून पांगारकरांचं अभिनंदनही केलं. त्यामुळे झालं उलटंच. पांगारकर अडचणीत आले.
पांगारकरांच्या मुखात संत असले, तरी बगलेत सनातनी सुरीच होती. त्यांच्या वर्तनात संतांची समता नव्हती, उलट बुरसटलेली जातिभेदाची कीड होती. ते स्वतःला भागवत धर्माचे प्रवक्ते म्हणवत. पण मुळात ते होते वर्णाश्रम धर्माचे पुरस्कर्ते. प्लेगच्या साथीत मरणोन्मुख झालेली आई मृत होऊन इंग्रजी अधिकार्यांच्या आरोग्य व्यवस्थेत सापडली तर तिच्या देहाला अस्पृश्यांचे हात लागतील, म्हणून मोठ्या हिकमतीने टांग्यात घालून पुण्याबाहेर नेलं होतं, असा संदर्भ डॉ.सदानंद मोरे यांच्या तुकाराम दर्शन या ग्रंथात सापडतो. या घाणेरड्या मानसिकतेमुळे त्यांनी पंचगव्य म्हणजे गायीचं शेणमूत खाऊन आणि टक्कल करून सहभोजनाचं प्रायश्चित्त घेतलं. पण ते करतानाही त्यांनी केल्या कृतीची प्रांजळपणे कबुली दिली नाहीच. उलट वाकसकरांनी आपल्याला निर्लेप फराळाचे म्हणजे ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांकडे चालणार्या पदार्थांचं निमंत्रण दिलं. पण प्रत्यक्षात जेवण देऊन फसवलं, अशी सावरासावर केली. चिं.वि. जोशींच्या माहितीनुसार पांगारकरांनी वाकसकरांकडे श्रीखंड पुरीवर ताव मारला होता.
त्या काळातल्या वर्तमानपत्रांत हा सगळा मूर्खपणा सार्वजनिक चर्चेचा विषय बनला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही यावर टीका केली होती, भागवत धर्माला काही भेदभाव नाही. इतकेच नव्हे, तर काला हा भागवत धर्माचे मुख्य अंग आहे. रा. वाकसकर यांच्याबरोबर झालेले सहभोजन हा तरी कालाच होता. मग भागवत धर्मी पांगारकरांनी त्याबाबत प्रायश्चित्त घेण्याचे काय कारण होते, ते आम्हास कळत नाही. बाबासाहेबांचे वैचारिक समानधर्मा असणारे प्रबोधनकारही या चर्चेत मागे राहणं शक्यच नव्हतं. त्यात वाकसकर हे कायस्थ असल्यामुळे प्रबोधनकारांच्या आसूडांचे फटके पांगारकरांप्रमाणेच त्यांनाही बसले.
समर्थ पांगारकर, कल्याण वाकसकर या स्फुटात प्रबोधनकारांनी पांगारकरांच्या ढोंगाची सगळी कुंडलीच बाहेर काढली आहे, ‘हभप पांगारकर हा मोठा शिकंदर नशिबाचा आधुनिक संताळ्या आहे. वेष धरावा बावळा। अंतरी असाव्या नाना कळा।। ही रामदासी उक्ती सध्याच्या कामदासी कलियुगात जर कोंणी अक्षरशःआचरणांत आणली असेल तर फक्त पांगारकरानेच. आधीच बेट्याला देवाने बावळट वक्रतुंडाची जन्मजात देणगी दिलेली. त्यात बीएच्या विद्वत्तेची भर. जातीचा व हाडाचा भट. अलीकडच्या ग्रॅज्युएटांप्रमाणे पदवीधर होऊन, नोकरीसाठी भयाभया करीत वणवणण्यापेक्षा या भटाने पुढचा मागचा पोक्त विचार करून, `मुमुक्ष`पणाची तुळशीची माळ गळ्यांत लटकवली आणि तुकारामादि संतांच्या नावाने टाळ कुटण्यास प्रारंभ केला… ईठ्ठले माझे आएएई म्हणून नाचत गात, जवळजवळ एक लाख रुपयांची पुंजी कमवणारा जर कोणी संत अवतरला असेल, तर हा एकटा घालवेडा पांगारकर. कनक आणि कांता तुकारामांसारख्या संतांनी जरी विष्ठेसमान मानली असली, तर हा आंग्लपदवीधर संतांचा पायिक कनकाची विष्ठा अनेक हजारांच्या टोपल्यांनी खात आलेला असून, वंशवेलवृद्धीचे याचे निष्काम कर्म अजून अव्याहत चालूच आहे. या बुवाने ग्वालेर इंदोरसारख्या पुराणाळलेल्या संस्थानिकांपुढे आपल्या घसरत्या फेट्याचा आणि निसटत्या काष्ट्याचा भक्तिरंग रंगवून त्यांच्या हजारों रुपयांची विष्ठा आजवर कसकशी चाटली, हे सर्वश्रुतच आहे.‘
यांत दोष कोणाचा या पुढच्याच स्फुटलेखात प्रबोधनकारांनी कायस्थांच्या पांगारकरी अपमानावर जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांच्या लिखाणातून निखार्यांप्रमाणे फुललेला राग दिसतो, आमच्या मते यांत पांगारकराचा दोष मुळींच नाही. भट अखेर आपल्या अवलादीवरच जातो. खाल्ल्या घरचे वासे मोजणे, हा भट जातीचा जन्मसिद्ध हक्कच आहे. टिळेमाळटाळधारी संत असो, नाही तर पळीपंचपात्री झोळीधारी पंत असो, भट आणि साप यांची करणी एकरकमी एकजिनसी एका गोत्राची!.. आजसुद्धा कायस्थ प्रभूंकडे ब्राम्हणांनी शिजविलेला सत्यनारायणी शिरा भटे खात नाहीत. उकीरड्यावर फेकून देतात… काळ कितीही बदलला, तरी भट बदलत नाही. भटशाही मेली, तरी भटांचा आत्मवर्चस्वाचा तोरा मरत नाही. हे सनातन सिद्धांतही ज्यांच्या गळी उतरत नाही, त्यांनी इतिहास संशोधक म्हणून मिरवावे, हा पागलपणा नसेल, तर भटाळलेल्या सडक्या मनोवृत्तीचा नाचरा प्रकार तरी खास होय… कायस्थ प्रभू भटांच्या घरी कधी काळी जेवायला गेला, तर बायकोच्या किंवा बापाच्या ऑर्थोडक्सीच्या सबबीवर त्याचे पान गाईच्या गोठ्यात, नाहीतर संडासाजवळ वाढतील. त्यांचा त्यांत काय दोष? भटी धर्मच पडला तसा! रोटीबंद भटांच्या जातभाईंनी मटण मासळी महाग केली आणि बेटिबंदांच्या बेट्या मुसलमानांच्या भेटीला गेल्या, तरी भटांचे ब्राम्हण्य पांगारकरांच्या क्षौराइतकेच निर्लेप असते, हे ज्या भटेतरांना अजूनही नीट उमगत नाही, ते हिंदुस्थानात जगण्याच्या लायकीचे लोक खास नव्हेत.
वाकसकरी दूधभाताचा सारांश या स्फुटलेख मालिकेच्या पुढच्या भागात प्रबोधनकार वाकसकरांवर तुटून पडताना दिसतात, वारकरी पेशाच्या टाळाने सोने कुटून संसार करणार्या विरक्त पांगारकरांच्या आजपर्यंतच्या चरित्राला, त्याच्या भटी संस्कृतीला, त्याच्या टाळकुट्या धंद्याच्या बिझनेस एथिक्सला विसंगत असे कांहीच नाही. कायस्थ प्रभू समाज किंवा त्यांतले स्वयंप्रतिष्ठित शहाणे, स्वतःला काहीही समाजत असले, तरी अखिल ब्राम्हण समाज त्यांना सामाजिक संस्कृतीच्या कोणत्या पायरीवर लेखतो, याची या प्रकरणी चांगलीच साक्ष पटली गेली, यांत आम्हाला मोठा आनंद वाटतो… बडोद्याच्या श्रीमंत राजमान्य राजेश्री सकलगुणालंकृत वाकसकरी कायस्थांच्या घरात दुधाचे हौद भरले असतील, तर त्यांनी रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांना रोज कोजागिरी घालावी. आम्ही पैज मारून सांगतो की पांगारकरांपेक्षा किंवा कायस्थी इमानापेक्षा, ती कुत्री मांजरे प्यायल्या दुधाचे इमान विशेष सक्रीय दाखवितील.
त्यापुढच्या स्फुटलेखात प्रबोधनकार वेगळाच मुद्दा मांडतात. तो असा, पांगारकरांचा आणि वाकसकरांचा `बहोत घरोबा २५ वर्षांचा असो, नाही तर २५ मिनिटांचा असो, जेवण जेऊन त्याच्या पापनिरसनार्थ क्षौरपूर्वक शेणमुताचा प्रायश्चित्त विधी जेवणाराने करणे, म्हणजे यजमानाच्या घरांतील पाकनिष्पत्ती करणार्या व पाहुण्याचा परामर्ष घेणार्या पवित्र स्त्रीवर्गाची तीव्र मानखंडना व बदनामी करण्यासारखे आहे. याचा शहाण्या वाकसकरांनी कधी विचार केला आहे काय? तुम्ही पुरुष मोठे अकलेचे कांदे असाल, विद्वत्तेत बृहस्पतीचे सावत्र बाप असाल, आणि वृत्तपत्री पत्रव्यवहाराची भांडणे लढविण्यांत चिटणीशी लेखणीचे औरस दांड असाल, परंतु तुमच्या कृतीमुळे स्त्रियांच्या भावना कशा व कितपत जखमी होतात, याचा तरी दाद घ्याल की नाही?`
प्रबोधनकारांचे समकालीन असणारे कायस्थ समाजातले एक सत्पुरुष राममारुती महाराज यांच्या पुण्यतिथीचा उत्सव कल्याण इथे भाद्रपत महिन्यात आजही मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्या उत्सवात दरवर्षी ल.रा. पांगारकरांचं प्रवचन असे, शिवाय ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या वेगवेगळ्या पंगती उठत. त्यावरही प्रबोधनकारांनी टीका केली आहे, संतांच्या उत्सवात कसलाही पंक्तिप्रपंच मानणे, हा घमेंडखोर भटांचा आणि बावळट भटाळलेल्यांचा शुद्ध पागलपणा होय. जे श्रीराममारुती महाराज अभेदभावी संप्रदायाचे प्रणेते, त्यांच्याच पुण्यतिथीला उपरोक्त भटी वर्चस्वाची चिळस आणणारी चाण्डाळ कर्मे उत्सवाच्या चालकांकडून बिनविरोध केली जावी, ही मोठी बेशरमपणाची गोष्ट होय… शेणमुताच्या प्रायश्चित्ताने कायस्थ प्रभूंना चाण्डाळाप्रमाणे हीन लेखणार्या पाजी पांगारकराची प्रवचने पुराणे जर यंदा व पुढेही कल्याणच्या या उत्सवात व्हायची असतील आणि प्रसादाच्या भंडार्यांतही भटांच्या जन्मप्राप्त वर्चस्वाचे चोचले पूर्वीप्रमाणेच चालणार असतील, तर स्वाभिमानी ब्राम्हणेतर भक्तांनी व विशेषतः आपल्या आयाबहिणींच्या संस्कृतीची थोडीतरी चाड असणार्या सर्व कायस्थ प्रभूंनी या उत्सवाला एक कवडीही वर्गणी देऊ नये. इतकेच नव्हे, तर त्यांनी सध्याच्या भटी पिंडाच्या कायस्थ चालकांना श्रीराममारुती संस्थानांतून लाथ मारून हुसकून बाहेर काढावे व कारभार आपल्या हाती घ्यावा, अशी आमची आग्रहाची विनंती आहे.
प्रबोधनकारांनी बहुजन समाजाला जातिभेदातून होणार्या अपमानाची जाणीव करून देण्यासाठी या वादाचा उपयोग करून घेतलेला दिसतो. ते करताना त्यामागचं सांस्कृतिक राजकराण उलगडून सांगितलं आहे. गुलामगिरीच्या साखळदंडांतून मोकळं होण्यासाठी उचकवलं आहे. विशेषतः वारकरी संप्रदायाशी जोडलेल्या समकालीन गोष्टींवर अशीच टिप्पणी करताना प्रबोधनकार असेच आक्रमक होताना दिसतात. वारकरी संप्रदायातले एक विद्वान विनायकबुवा साखरे यांनी १९२३ साली ब्राह्मण्यसंरक्षक परिषदेला हजेरी लावून जातिभेदाची उकळी काढली होत्ाी. त्यावरून प्रबोधनकारांनी साखर्या भटाची वानी, आक्षी निरमल गंग्येचं पानी हा लेख लिहून त्यांची धुलाई केली होती. शिवाय वारकर्यांच्या दिंड्या बघून ही संघशक्ती देशकार्यासाठी वापरली जावी, असं चिंतनही एका ठिकाणी मांडलं आहे. तसंच एका पुस्तक परीक्षणाच्या निमित्ताने त्यांनी संत नामदेवांच्या वंशजांवर पंढरपूरच्या बडव्यांनी केलेल्या अत्याचाराचा परामर्श घेतलेलाही दिसतो. या सगळ्यात ब्राह्मणी विळख्यात अडकलेल्या तत्कालीन वारकरी परंपरेला तिची आत्मजाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे. तो आजही महत्त्वाचा आहे.

