• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

वहिनी, सावध असा!

सुषमा अंधारे (विशेष लेख)

marmik by marmik
February 13, 2026
in विशेष लेख
0
वहिनी, सावध असा!

प्रिय सुनेत्रा वहिनी, आपण खूप कमी वेळा भेटलोय. पण जेव्हा कधी भेटलोय तेव्हा अगदी मनापासून. दादांची आणि माझी असंख्य वेळा भेट झाली, पण मी दादांसोबत एकदाही आवर्जून फोटो काढला नाही. त्याबद्दल पहिल्यांदाच पश्चाताप वाटतोय.

२८ जानेवारीला दादांच्या बाबत जे काही झालं ते अकल्पित होतं. शत्रूवरही अशी वाईट वेळ येऊ नये ती आपल्यावर येऊन ठेपली…
…अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागातल्या एका खाटेवर दादांचे निष्प्राण कलेवर निपचित पडले होते. पार्थ दादा (आता तोच आमच्यासाठी दादा) प्रत्येकाला आत न येण्याची विनवणी करत होते, मात्र गर्दीला आवर घालणं अशक्य होतं. मी फार घायकुतीला येऊन पार्थ दादाला विनंती केली आणि ते मला दादा होते, त्या खाटेपर्यंत घेऊन गेले. आत तुम्ही उभ्या होतात. शांत.. सुन्न… बधिर… नंतर बाजूच्याच खोलीत उदयनराजे, जयंत पाटील, प्रफुल पटेल या सगळ्यांसमवेत बसलेले पवार साहेब दिसले. मी वाकून नमस्कार केला, बाहेर पडले आणि पुन्हा आपण बसलेल्या बाजूच्या खोलीत येऊन थांबले. तब्बल अडीच तास प्रत्येक माणूस त्या खोलीत येऊन तुम्हाला भेटत होता. विठ्ठल मणियार काका, उदयनराजे, असंख्य आमदार, दादांचे स्वीय सहाय्यक ढिकले, दादांचे अंगरक्षक… सगळ्यात शेवटी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला अन् त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री… कुणालाही भेटताना तुमच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले नाहीत. तुम्ही तितक्याच शांत… स्थितप्रज्ञ बसून होतात. तुम्हाला न्याहाळत असताना नियती इतका मोठा अन्याय कसा करू शकते असं वाटून वारंवार हुंदके दाटून येत होते. पण, तुमच्यासमोर रडायचं नाही असं दटावल्यामुळे गपगुमान आवंढा गिळून होते. अन् मग तुम्हीच आपुलकीच्या ओलाव्याने हाक मारली. मी जवळ जवळ झेपावले. तुमच्या मांडीवर डोकं ठेवून रडले. या दुःखातून तुम्ही कशा सावराल असा विचार करत होते.

…पण २९ तारखेला दादांचा अंत्यविधी होता होता दादांच्या राजकीय वारसदाराची चर्चा सुरू झाली. काय आश्चर्य आहे, दादांसारख्या अत्यंत कर्तृत्ववान, निर्णयक्षमता आणि प्रचंड दूरदृष्टीच्या कामाचा आवाका असणार्‍या माणसाची उणीव कुणीही भरून काढू शकणार नाही, असं म्हणणारे भलेभले मातब्बर नेते दादाची उणीव भरून काढण्यासाठी वायुवेगाने कामाला लागले!! माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळं आकलनाच्या पलीकडचं आहे. म्हटलं तर हे अमानवी आणि प्रचंड क्रूर आहे. चिता अजून धड शांतही झाली नाही. मृत्यूला उणेपुरे ४८ तास उलटले नाहीत तोच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव हे माणसाच्या नश्वरतेचे आणि त्याच्या क्षणभंगुरतेचे प्रमाण आहे.

वहिनी, समाजमाध्यमांवर काही लोक आपल्याकडे बघून”Brutus you too” अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. बाजूने आणि विरोधात लिहिलेली मते मतांतरे वाचणे आणि हळहळणे याच्यापलीकडे सामान्य माणसाच्या हातात तसेही फार काही नाही. पण वहिनी, मला मात्र वेगळं वाटतंय. अखंड महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळत आहे, याचा आनंद नक्कीच आहे. पण या आनंदाला कर्तृत्ववान दादा गमावलेल्या दुःखाची झालर आहे.

वहिनी, तुमचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी भावनिक दृष्टिकोनातून चूक वाटत असला तरी दादांनी स्वकर्तृत्वाने जे अफाट साम्राज्य उभं केलं त्यावर कुठल्याही गिधाडांची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला पाऊल उचलणे गरजेचेच आहे! मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर पतिनिधनाचे दुःख करण्यापेक्षा माळवा प्रांताचे शासक म्हणून उभे राहणे महानायिका अहिल्यादेवी होळकरांसाठी क्रमप्राप्त होते. माळव्याचे आतले आणि बाहेरचे शत्रू कोण आहेत आणि ते कोणत्या स्तराला जाऊन क्षति पोहोचवू शकतात याची कल्पना अहिल्यादेवींना फार चांगल्या पद्धतीने होती. त्यामुळे तत्कालीन प्रथा–परंपरांना फाटा देत त्या धीराने कंबर कसून उभ्या राहिल्या आणि आपल्या सासर्‍याने आणि पतीने उभे केलेले साम्राज्य वाचवण्यासाठी प्राणपणाने लढल्या.

वहिनी, तुम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागतोय. वरवर तो क्रूर वाटतोय. मात्र त्याची कारण लक्षात येत आहेत. दहा दिवस थांबलो असतो तर काय फरक पडला असता, असं दादांवर प्रेम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. पण फरक पडला असता! कदाचित दादांचा राजकीय वारसदार कोण ही चर्चा सुरू झाली नसती तर अजूनही दादांचा अपघात हा घातपातच कसा आहे, यावर लोक खल करत राहिले असते! कदाचित माध्यमांनी पुढचे तीन-चार दिवस दादांच्या जुन्या मुलाखती.दादांनी कुणाला कशी कशी मदत केली याचे किस्से… दादांच्या सहवासातील काही महत्त्वाच्या लोकांच्या मुलाखती… दादांनी उभे केलेले उद्योग… एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग… बारामतीत व नंतर पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण केलेले रस्ते, वाहतूक व्यवस्था… त्यांनी मांडलेले अर्थसंकल्प यावर माध्यमांनी चर्चा केली असती! अशा चर्चेतून कदाचित दादांचं कर्तृत्व अजून अधिक उजळून उफाळून वर आलं असतं. कदाचित त्याचा फायदा एका फार मोठ्या काळासाठी दादांच्या पुढच्या पिढीला झाला असता! पण हे भाजपाला सहन झालं असतं का?
दादा म्हणजे कालातीत नेतृत्व. ते नेतृत्व आणि नेतृत्वाची अफाट दूरदृष्टी नुसती अधोरेखित झाले नसती तर असा अफाट दूरदृष्टीचा नेता अचानक कसा काय गेला की कोणी घालवला याबद्दल लोकांनी अधिक चौकसपणे प्रश्न विचारले असते, कदाचित काही व्यक्ती, संस्था अडचणीतही आल्या असत्या!

कोणी सांगावं अजून चार-आठ दिवस थांबले असते तर कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्रही आल्या असत्या! या सगळ्यांना जर फाटा द्यायचा असेल तर दादांचा राजकीय वारसदार कोण ही चर्चा तात्काळ घडवून आणणं गरजेचं होतं… आणि त्यासाठी तितकी दबावाची परिस्थिती सुद्धा निर्माण करणे गरजेचे होतं. अर्थात अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखी माणसं तयारच होती म्हणा… भाजपाला हवा असणारा दबाव तयार करण्यात यांची भूमिका तितकीच महत्त्वाची!

वहिनी, अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत उपमुख्यमंत्री होत आहात. विरोधी पक्षातील महिला राजकारणी म्हणून नाही तर ज्या आपुलकीने आपल्याला वहिनी म्हणून संबोधत आहे त्या नात्याने विनंती करावीशी वाटतेय, ‘वहिनी सावध असा. पटेल, तटकरे यांसारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला ‘गुंगी गुडिया’ समजून मनमानी करायचा प्रयत्न करतील. पण आपण दादांच्या तालमीत तयार झाला आहात. याचा ठसा उमटवण्याची नियतीने आपल्याला संधी दिली आहे. संधी मिळाली तर महिलासुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते. आपण त्यास पात्र आहात. आपल्याला मिळालेली संधी ही निव्वळ अनुकंपा तत्वावरची संधी नाही तर खर्‍या अर्थाने आपल्या नेतृत्वगुणांना न्याय देणारी संधी आहे हे सिद्ध करण्याची हीच ती वेळ.

आम्ही दादांचे विरोधक. पण दादांनी विरोधकांबद्दल कधी कपटबुद्धी बाळगली नाही. टीका केली तरी त्याचा कडवटपणा मनात साठवला नाही. पण म्हणून कुणाचं निष्कारण लांगूलचलनही केलं नाही. दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते. वहिनी, ते आपल्याला सुद्धा माहीत असतील. आपण त्यांचा योग्य तो बंदोबस्त कराल अशी अपेक्षा आहे.
वहिनी, विरोधक म्हणून प्रश्न विचारायला आम्ही कायम आघाडीवर असू. पण महिला म्हणून जर कोणी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र भगिनीभाव जपत आपल्यासोबत असू.

Previous Post

कोणी तिऱ्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के!

Next Post

‘फॅमिली मॅन’ दादांच्या पश्चात फॅमिली एकत्र येणार?

Next Post
‘फॅमिली मॅन’ दादांच्या पश्चात फॅमिली एकत्र येणार?

‘फॅमिली मॅन’ दादांच्या पश्चात फॅमिली एकत्र येणार?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.