छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रातील एकही मराठी माणूस नसेल ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास माहित नसेल. महाराष्ट्रासह हिंदुस्थानाला परकीयांच्या विरोधात लढण्यासाठी ऊर्जा देणार्या छत्रपतींची जयंती महाराष्ट्रात सर्वत्र तसेच महाराष्ट्राबाहेर आनंदाने, जल्लोषाने साजरी होते.
१ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ‘महाराष्ट्रात मुंबई आली पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता,’ ही परिस्थिती होती. पण ही परिस्थिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बदलली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेमुळे मुंबईवरचा मराठी ठसा गडद झाला. महाराष्ट्रातील सण, उत्सव तसेच शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी होऊ लागली. शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समितीमुळे सरकारी-निम सरकारी कार्यालये, बँका, विमा आदी आस्थापनांत शिवजयंती साजरी करण्याचे ठरले. काही ठिकाणी ती सुलभपणे उत्साहात साजरी झाली. पण काही ठिकाणी अमराठी अधिकार्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे, अरेरावीमुळे अडथळा होऊ लागला. विरोधही झाला. लोकाधिकाराचे कार्यकर्ते सुशिक्षित, पण अशा घटनांमुळे त्यांचेही पित्त खवळले. महाराष्ट्राच्या राजधानीत शिवजयंती साजरी करायला विरोध करणार्यांना लोकाधिकाराच्या सुशिक्षित कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी शिवसेना स्टाईलने धडा शिकवला. आता सर्व आस्थापनामध्ये शिवजयंती उत्सव समितीतर्पेâ साजरा केला जातो. त्यात मराठी कर्मचार्यांसह इतर अमराठी कर्मचारीही सहभागी होतात. १९७०च्या दशकात दिलेल्या लढ्याला मिळालेले हे यश आहे.
साधारण १९७५ साली नेव्हल डॉकयार्डमधील ‘महाराष्ट्र मित्र मंडळातर्फे तेथील कर्मचारी व सेनेचा पाईक, निधड्या छातीचा तरुण शरदचंद्र आमोणकर हा ‘जहांगीर कलादालन ते गेटवे ऑफ इंडिया’पर्यंत मर्यादित स्वरूपाचे शिवराय संचलन करीत असे. नेव्हल डॉकयार्ड ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था. त्यावेळी मराठी माणूस व मराठी संस्कृतीविषयी द्वेषाचे धोरण सर्व केंद्र सरकारी आस्थापनात कटाक्षाने पाळले जायचे. मराठीला विरोध हा एकच केंद्रबिंदू असायचा. पण शरदचंद्र आमोणकर हा मराठी तरुण शिवराय व पर्यायाने शिवसेनेच्या विचारसरणीने भारलेला, परिणामांची तमा न बाळगता व सर्व विरोध झुगारून तो महाराष्ट्र मित्र मंडळाच्या जिवावर शिवराय संचलन यशस्वी करीत होता.
त्याच काळात सर्वत्र स्थानीय लोकाधिकार समितीतर्पेâ आंदोलने होत होती. शिवसेनेची ध्येयधोरणे व मराठी माणसांना नोकरीत प्राधान्य ही भूमिका जनसामान्यांत रुजत होती, लोकांना पटत होती व तिला जनमान्यता मिळत होती. हळूहळू पांढरपेशा चाकरमानी या चळवळीकडे झुकू लागला होता. चळवळीला सक्रिय पाठिंबा देऊ लागला होता. लोकाधिकार चळवळ फोफावत होती. मुंबईतील बर्याच आस्थापनांत लोकाधिकार समिती स्थापन झाली होती. एक दिवस शरदचंद्र आमोणकरांकडून प्रस्ताव आला की, फोर्ट, नरिमन पॉईंट, कुलाबा हा मुंबईचा आर्थिक केंद्रबिंदू असलेला परिसर आहे. या भागात मराठी अस्मितेचा ठसा उमटविणे, शिवरायांचे शौर्य तेजाने झळाळून यावे व त्यांचे महत्त्व अमराठी लोकांच्या मनात बिंबावे यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्पेâ शिवराय संचलनाने भव्य आयोजन फोर्ट परिसरात व्हावे. या त्यांच्या भूमिकेला व भावनेला महासंघाचे अध्यक्ष सुधीरभाऊ जोशी, गजानन कीर्तिकर, स्व. रामराय वळंजू, स्व. सूर्यकांत महाडिक, स्व. विठ्ठल चव्हाण यांनीही दुजोरा दिला. ‘आपण शिवरायांचे व शिवसेनेचे पाईक आहोत हे सर्वांना कळू दे’ हे त्यांचे मत सर्वांना पटले. मग कै. विठ्ठल चव्हाण यांनी पुढाकार घेतला आणि पाठपुरावा केला. १९७८ साली महासंघातर्पेâ प्रथम ‘शिवराय संचलन’ भव्य प्रमाणात आयोजित केले गेले आणि आजपर्यंत ते अव्याहतपणे सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज एकाच वेळी कुशल संघटक, सेनापती, द्रष्टे प्रशासक, बहुजनांचे नेते, गोरगरिबांचे आश्रयदाते होते. दक्षता, कणखरता आणि तत्परता असा त्यांचा स्थायीभाव होता. लोकहितदक्ष, कर्तव्यदक्ष तसेच स्वाभिमानी परंतु सहिष्णू, चारित्रसंपन्न, आदर्श राजकर्ता असा जाणता राजा होते. रयतेला पोटच्या मुलांप्रमाणे वागवणारे, सदैव रात्रंदिवस राष्ट्राची चिंता वाहणारे, स्वदेश, स्वभाषा व स्वधर्माचे रक्षण करणारे एकमेवाद्वितीय राज्यकर्ते होते. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची उदाहरणे पाहून इतिहासकार आणि पाश्चिमात्य इतिहास संशोधकांनाही अचंबा वाटत होता. त्यांच्या नावाचा जयघोष मोठ्या अभिमानाने आपण करतो. त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि रोमांचित आठवणींचा जयजयकार करतो. या आदर्श युगपुरुषाचा संघर्षाचा यशस्वी इतिहास तरुण पिढीपुढे राहावा आणि त्याच्या गुणवैशिष्ट्यांची शिकवण जीवनात अंगीकारली जावी म्हणून हे शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते.
छत्रपती शिवरायांचा मान हाच आमचा स्वाभिमान, तो शिवसैनिकांच्या मनामनात, नसानसात भिनले आहे. फोर्ट, हुतात्मा चौक, नरिमन पॉईंट परिसरातील केंद्र व राज्य सरकारची आस्थापने, बँक आदी आस्थापनाची दारे कधीकाळी मराठी तरुणांच्या नोकरीसाठी अमराठी लोक उघडत नव्हते. शिवसेना व लोकाधिकार समिती महासंघाच्या लढ्यामुळे त्या सर्व आस्थापनात मराठी तरुणांना न्याय मिळाला. आज तीच अमराठी मंडळी त्या आस्थापनाच्या खिडकीतून भव्यदिव्य शिवराय संचलन पाहत असतात. हा शिवसेना आणि लोकाधिकारच्या लढ्याचा व चळवळीचा विजय आहे असे गौरद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका शिवराय संचलनाप्रसंगी मार्गदर्शन करताना काढले होते.
इंग्रज गव्हर्नर लिहितो की, शिवाजी महाराज जर अजून दहा वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्थानचा नीट चेहरा पाहता सुद्धा आला नसता. सतराव्या शतकात लंडनमध्ये तीन वृत्तपत्र प्रकाशित होत होती, त्यामध्ये ‘लंडन गॅझेट’ नावाचे वृत्तपत्र होते. शिवाजी महाराज ज्यावेळी आग्य्राहून निसटले त्यावेळी या लंडन दी गॅझेटमध्ये पहिल्या पानावरची बातमी छापून आलेली होती. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘किंग ऑफ इंडिया’ असा केला होता. अशा पराक्रमी शिवरायांच्या सन्मानार्थ शिवराय संचलन व शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते. दरवर्षी हॉर्निमन सर्कल, दादाभाई नौरोजी मार्ग, हुतात्मा चौक मार्गे हे संचलन गेटवे ऑफ इंडिया येथपर्यंत संपन्न होते. तेथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून संचलनाची सांगता होते. संपूर्ण संचलनात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत, गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या निनादात सर्व चाकरमानी मराठी जनता मोठ्या आनंदात व जल्लोषात सहभागी होत असतात. दक्षिण मुंबई परिसरात भगवे झेंडे, भगवे पताके डौलाने फडकले असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते गेटवे ऑफ इंडिया हा पूर्ण परिसर भगवामय होतो. तेव्हा शिवप्रेमींचे ऊर अभिमानाने भरून येते. शिवजयंती साजरी करणे हा सकल मराठी माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. हा त्यांचा हक्क शिवसेनेने अबाधित राखला आहे.
महासंघातर्फे महासंघाचे अध्यक्ष व खासदार अनिल देसाई, सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि १३ मार्च रोजी ‘शिवराय संचलन’ हे दोन्ही कार्यक्रम दर वर्षी आनंदाने, उत्साहाने आणि एकत्रितपणे साजरे होतात. हे उत्सव दिमाखदारपणे व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महासंघाचे कार्याध्यक्ष आमदार सुनील शिंदे, माजी आमदार विलास पोतनीस यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी दिनेश बोभाटे, अनिल चव्हाण, शरद एक्के, उल्हास बिल्ले , उमेश नाईक, सुधाकर नर, श्रीराम विश्वासराव, अरुणकुमार दुबे, विलास जाधव, हेमंत गुप्ते, गोपाळ शेलार, हेमंत सावंत त्याशिवाय दक्षिण मुंबई शिवसेनेचे विभागप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक अहोरात्र झटत असतात. या शिवराय संचलनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची महती व माहिती अमराठी कर्मचार्यांना आणि मुंबईत पर्यटनाला येणार्या पर्यटकांना कळते. महासंघाचे कार्यकर्ते व शिवसैनिक आषाढी-कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणार्या वारकर्यांप्रमाणे, त्याच भक्तिभावाने मोठ्या उत्साहात आजही या संचलनात सहभागी होतात. १९७८ साली सुरू झालेले हे शिवराय संचलन आजही अव्याहतपणे सुरू आहे, पुढेही असेच सुरू राहणार आहे. कारण मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहास टिकवण्याचे महासंघाचे हे असिधारा व्रत आहे.

