• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लेखन, लसूण आणि शिट्टी

दीपक मच्याडो (विशेष लेख)

marmik by marmik
March 17, 2026
in विनोदी लेख, विशेष लेख
0
लेखन, लसूण आणि शिट्टी

लेखन आणि लसूण या दोन शब्दांचा काय संबंध असावा? तो असो अथवा नसो, परंतु माझ्या लेखनामधील विघ्नांचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आपण भारत-पाक यांच्यातील अटीतटीच्या लष्करी संघर्षाबद्दल गहन चिंतनात असतो. जागतिक शांती कशी पुनर्स्थापित करता येईल या संदर्भातली आपली उदात्त मते संपादकास पत्रे या सदरातून वृत्तपत्राला कळवण्यास उत्सुक असतो. धार्मिक दुजाभावामुळे देशाचे अपरिमित नुकसान ह्याबाबतचा आपल्या मर्मभेदी आणि प्रक्षोभक लेखाकरिता स्फूर्ती प्राप्त करण्यासाठी आपण डोके खाजवीत असतो आणि त्याखालोखाल वसलेल्या आपल्या मज्जासंस्थेला उतारवयातील त्याच्या शिथिलावस्थेमधून जागे करून आपले लेखन अधिक प्रतिभाशाली होण्यासाठी डिवचत असतो, तेव्हा उभा राहतो तो लसूण!

जेवणाच्या पदार्थांमध्ये अतिशय उपयुक्त असलेला हा लसूण माझ्या लेखन प्रतिभेच्या आड का बरं येत असेल?
एक भाग तर असा होता की कांदा आणि लसणाचा अंतर्भाव असलेल्या झणझणीत मटन किंवा चिकन करीवर ताव मारल्यामुळे ‘जेवल्यावर थोडेसे लेखन करीन’ या माझ्या प्रांजल उद्देशांवर नेहमी पाणी फिरायचं. म्हणजेच त्यानंतर सुपर्णादेवी या माझ्या प्रेमकथेतील पात्राच्या प्रेमविरहाची गाथा रंगवण्याची मनीषा बाजूला सारून निद्रादेवीच्या आमंत्रणाला साथ द्यायला लागायची आणि भूतकाळातील माझ्या जीवनात आलेल्या प्रेमविरहाची स्वप्न रंगवायला लागायची. दिवसा मी करीत असलेल्या उचापतींवर घारीसारखी नजर ठेवणारी माझी पत्नी मी रात्री झोपल्यानंतरही माझं मॉनिटरिंग करीत होती हे त्यावेळी लक्षात यायचं.
‘अहो, रात्री तो ओठांचा चंबू करून कसले आवाज काढत होतात?’
नक्की कुठले आवाज तिने ऐकले होते, मला काही कल्पना नव्हती.
‘अगं, पडलं असेल एखादं बालपणीचे स्वप्न! आजोबांनी रावळगाव चॉकलेट खायला दिले असेल ते चोखत असेन, दुसरं काय?’
‘आणि माझी प्रतिभा, असे तुम्ही झोपेत उद्गारलात त्याचं काय?’ ‘माझी प्रतिभा’ ह्या शब्दांवर खोचकपणाचा अत्युच्च मुलामा चढवत तिने प्रश्न केला.
‘असं का? हो, आता आठवलं,’ मी म्हणालो, ‘एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर मी भाषण करीत होतो असे ते स्वप्न होते. माझी प्रतिभा, माझी प्रज्ञा आणि माझी प्रेरणा या विषयावर मी बोलत होतो असे वाटते.’
‘हो हो, माहित आहे मला प्रतिभा! तुमची ती कॉलेजची मैत्रीण! त्यादिवशी भेटली होती भाजी मार्वेâटमध्ये. रिक्षामध्ये शिरताही येत नव्हते इतका घेर वाढलाय. ‘माझी प्रतिभा’ म्हणे! सांगत होती, तुमच्या महेशची ‘जोडीदार’ नावाची कथा वाचली आणि अगदी कॉलेजमधील त्या गुलाबी आठवणी मनासमोर तरळू लागल्या. तुमचं नाव घेताना उगाचच मुरके मारत होती.’
मी कपाळावर हात मारला. लग्नाच्या आणाभाकांशी प्रामाणिकपणा दाखवण्याची आचारसंहिता केवळ जागेपणातल्या संबंधांनाच लागू होते असे मी गृहीत धरले होते. माझ्या स्वप्नातल्या जीवनातही ही बया ढवळाढवळ करेल ही अपेक्षा नव्हती.

पण लसूण माझ्या पाचवीला का पुजलेला आहे त्याचे कारण दुसरे आहे. ट्रम्प यांच्या कोलांटउड्या, चीनचे भारताबरोबरचे (शी, असं काय करता) म्हणायला लावणारे आखडू धोरण आणि पाकिस्तानचा मुनीर कश्मीरच्या नावाने शिजवत असलेला नवीन पनीर या सर्वांच्या कारस्थानांच्या मुळाचे चिकित्सक विश्लेषण मी कागदावर उतरवणार इतक्यात चार-पाच लसूण त्यावर टपकतात. संभाव्य अणुयुद्धाच्या संदर्भात त्यावेळेला विचार चालू असल्यामुळे आणि अणुहल्ल्यानंतर तयार होणारा ‘मशरूम क्लाऊड’ हा लसणाच्या आकारासारखा दिसत असल्यामुळे माझ्या लेखनाच्या मेजावर अणुयुद्ध पेटलेले आहे की काय असा मला भास नसता झाला तरच नवल! पण सत्य त्यापेक्षाही भयानक होते. ते लसूण टेबलावर ठेवणारा दुर्गावतार होता माझ्या पत्नीचा.
‘पटकन ते लसूण सोल आणि मला दे.’

अणुयुद्धामुळे किती देशांचे अस्तित्व नष्ट होईल यापेक्षा आलेल्या आदेशाला न जुमानल्यास माझ्या अस्तित्वावर किती परिणाम होईल याची काळजी मला अधिक सतावू लागली. आता लसूण सोलण्यामुळे एक नव्हे तर अनेक आपत्ती येतात. एक तर त्याची साल उडते म्हणून पंखा बंद करावा लागतो. दुसरे म्हणजे ते सोलल्यामुळे माझ्या बोटांना लागलेला त्याचा खमंग सुगंध सतत माझ्या आसपास दरवळत राहतो. (एकदा एक हस्तलिखित संपादकाला दिले असताना त्यांनी मला आपण लेखन करत नसता तेव्हा लसणाचं दुकान चालवता का अशी विचारणा केली होती.) तिसरे म्हणजे जागतिक शांतीचे पुरस्कर्ते असलेल्या प्रज्ञावंतांच्या यादीत माझे नाव प्रखरतेने झळकण्याच्या माझ्या आकांक्षेची त्या लसणासारखीच अक्षरशः फोडणी मिळते. लसणीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते हे खरे परंतु त्यामुळे मिळालेल्या वाढीव आयुष्यातही लसूणच सोलत राहायला लागतील या विचाराने मात्र मन विषण्ण होऊन जाते.

त्यावर अंतर्गत अश्रू ढाळत असतानाच दुसरा ड्रोन हल्ला येतो- ‘तो कांदा चिरून दे.’ आता मात्र अंतर्गत अश्रू आणि कांदा कापल्यामुळे डोळ्यांनी केलेले आक्रंदन यामुळे अश्रूंचा पूरच वाहू लागतो आणि कापलेल्या कांद्यावर पडत राहतो. अशा वेळी मीठ कमी टाकून देखील भाजी खारट का होते त्याचा बोध माझ्या पत्नीला झालेला नसतो. माझ्यासमोर पसरलेल्या आणि माझ्या प्रचंड बौद्धिक विवेचनशक्तीच्या आधारे सर्जनशील विचारांची मांडणी केलेल्या कागदांवर लसूण ठेवून ते सोलायला सांगणे हे एक वेळ परवडले. परंतु तशा कागदावर लसूणऐवजी बसून केलेले कृत्य मात्र वैचारिक अभिव्यक्तीवर केलेला सगळ्यात घोर अन्याय होता.

हा किस्सा काही दशकांपूर्वीचा. त्यावेळी मी नवोन्मेष की काय म्हणतात त्या संकल्पनेत बसणारा लेखक होतो. माझा मुलगा त्यावेळेला दोन वर्षांचा होता. त्याला जेव्हा शौचाला जाण्यासाठी ‘यायचे’ त्याचा काही वेळ काळ नसायचा. चालताना, धावताना, पळताना तो अचानकपणे थांबला म्हणजे पार्श्वक्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा संदेश मिळाला असे समजायचे. असाच एक दिवस घरी मी टेबलावर माझ्या अभिव्यक्तीचे नमुने ठेवले होते. अचानक तो जागेवर उभा राहिला. ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले होते. क्षेपणास्त्र कुठल्याही क्षणी सुटेल अशी जटील परिस्थिती होती. माझ्या पत्नीने ते पाहिले आणि फरशीची शुद्धता राखण्यासाठी तिने टेबलावरचे फुलस्केप कागद उचलले आणि लॉन्च पॅडवरून वर्षाव व्हायच्या आधी ते फरशीवर ठेवले. झाले! सॉक्रेटीसच्या तत्त्वज्ञानापासून शेक्सपियरच्या साहित्यकृतीपर्यंतचा व्यासंगी आढावा असलेल्या त्या बहुमूल्य कागदांवर बेतलेल्या त्या अरिष्टावर बघताच चीनच्या अध्यक्षांचे पहिले नाव माझ्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडले. शी! आपल्या कलेचा कलेवर होताना पाहताना, ‘सोन्याहून पिवळे होते’ या उक्तीचे इतके तीव्र विरोधाभासी रूप मी कधी अनुभवलेले नव्हते. लसूणविषयक आदेश एरव्ही निमूटपणे पेलणारा मी, पण या वेळेला मात्र माझा पारा चढला.
‘अगं काय हे? माझे ते मौल्यवान कागद असे वापरताना तुला काहीच वाटले नाही?’

तुझं डोकं ताळ्यावर आहे की नाही असा प्रश्न मी विचारणार होतो, पण मानहानीची आपत्ती नको म्हणून त्याआधीच मी संपादकीय संस्कार करून माझे उद्गार सौम्य स्वरूपाचे केले. (येथे ‘मानहानी’चा अर्थ लाटण्याने झालेल्या आघातामुळे सरळ दिशेला पाहण्याची क्षमता हरवलेली मान, असा आहे.)

‘अहो सगळी खाडाखोड आणि उभ्या आडव्या रेषा असेच काहीतरी त्या कागदावर आहे. त्यात कसले आलेय मौल्यवान रत्न?’
आता हिला कसे समजावयाचे तेच मला कळेना. लेखनाचा पहिला मसुदा नेहमी आधी लिहिलेल्या मजकुराची काटछाट करून नंतर सुचलेल्या कल्पना आडव्या स्वरूपात समासामध्ये लिहिणे अशा स्वरूपाचा असतो. अंतिम मसुदा तयार करायच्या आधीचा तो वैचारिक खजिना असतो. परंतु शेवटी माझी पत्नी ही तिच्या शिक्षिकेच्या पेशाला जागली. खाडाखोड, समासात उभे आडवे लेखन, दिशासूचक बाणरूपी रेषा असलेला कागद म्हणजे तिच्या मते शून्य गुण मिळालेला आलेख होता. त्यावर आडवी लाल रेघ मारून, पालकांनी येऊन भेटावे असा शेरा मारण्याचा तिचा शिरस्ता! त्या लाल पेनाची शाई देखील वाया न घालवता तिने अभिजात साहित्यनिर्मितीच्या माझ्या प्रयत्नाला उत्सर्जनप्रणालीच्या तोंडी देऊन भाषास्वातंत्र्याची मुस्कुटदाबी केली होती हेच खरे.

लेखनाचा दुसरा मोठा हितशत्रू म्हणजे शिट्टी. शिट्टीचे तीन प्रकार आहेत. एक म्हणजे तरुण मुलांनी, मुलींचा घोळका बघून मारलेली शिट्टी. ही शिट्टी स्वलेखनास मारक नव्हती परंतु शिट्टी ज्यांना मारली होती, त्यापैकी एखाद्या मुलीचा भाऊ पोलीस सब-इन्स्पेक्टर निघाला तर आपल्या सुवाच्च अक्षरात आमच्याविरुद्ध फिर्याद नोंद करणार्‍या हवालदार लिपिकाचे लेखनकौशल्य आजमावयाला मिळायचे. दुसरी म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी आपली दुचाकी उभी करून स्टॅन्ड पाडताय एवढ्यात पलीकडच्या कोपर्‍यातून हवालदाराची आलेली शिट्टी आणि तिसरी जी समग्र विवाहित पुरुष लेखकांना चक्रावून टाकते ती असते कुकरची शिट्टी. आपण प्रेम कथेतल्या पात्रांचे मीलन रंगवत असतो. तो तिच्या कपाळावरची बट सारतो. तिच्या कंपित ओठांकडे बघून तो पुढे सरतो तेवढ्यात, ‘कुकरच्या दोन शिट्ट्या आल्या की बंद करा’ असा हुकूम स्वयंपाकघरातून येतो. अहो येथे दोन जीवांचे उत्कट मिलन होत असते आणि त्या प्रणयरम्य वातावरणाला साज चढवण्याचे सोडून आम्हाला दोन शिट्ट्यांची वाट बघत राहावे लागते.

कुकरवर पाकपदार्थ चढवल्यावर पहिली शिट्टी आणि नंतरच्या दोन शिट्ट्या यामधील काळात आंघोळ घ्यायलाच पाहिजे हा कुठल्या पाकप्रणालीचा रिवाज आहे ठाऊक नाही, पण माझ्या पत्नीने तो चोख पाळला आहे. एकदा तो सदाशिव कपूर की कोणतरी मोठा शेफ आहे त्याला फोन करून विचारले होते. त्याने उलट, ‘तुमचे बाथरूम आणि किचन एकत्र आहे का’ असे विचारून माझं टाळकं गरम केलं. ‘एकत्र असेल तुझ्या काकांचं!’ असे मी त्याला जोरदार उत्तर दिले होते. अर्थात फोन बंद केल्यानंतर. असो! कदाचित माझ्या कथेतील पात्रांमधील प्रेमप्रसंग कागदावर उतरवताना माझ्या चेहर्‍यावरती साकारणारे उत्कट भाव बघून आणि तिच्या बाबतीत असे अविर्भाव कधीच कसे येत नाही याचा बदला म्हणून, थांब मी याला आता शिट्ट्या मोजायला लावते असला काहीतरी माझ्या पत्नीचा हेतू असावा.
नुकताच कर्नाटक मधील बानू मुश्ताक ह्यांना साहित्याचा आंतरराष्ट्रीय बुकर अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. मला तर अजूनपर्यंत आमच्या परिसरात दिला जाणारा स. दा. बुकरे स्मृती पुरस्कार देखील मिळण्याचे भाग्य लाभले नाही. आता या स्व. बुकरे साहेबांची आपल्या अखंड आयुष्यातील साहित्यसेवा ही त्यांनी कधीकाळी एसटी महामंडळाला आमच्या गावात एसटी सेवा सुरू अशा आशयाचे लिहिलेले पत्र यापुरती सीमित होताr हा भाग वेगळा. पुरस्कार हा शेवटी पुरस्कार असतो. खांद्यावरून निसटत राहणारी लोकरीची नसलेली स्वस्त शाल सांभाळत, दोन्ही हातांत सोनेरी पत्र्याने सजवलेले सन्मानचिन्ह तथा प्रमाणपत्र घेऊन काढलेला फोटो दुसर्‍या दिवशी स्थानिक वृत्तपत्रात झळकताच तुम्ही त्या दिवसापुरते आपल्या पंचक्रोशीत आणि जवळच्या नात्यागोत्यात ‘लिओनेल मेस्सी’ बनतात हे नक्की. हा बुकरे पुरस्कार न मिळाल्यामुळे नाउमेद न होता मी बुकरसाठी प्रयत्न जरूर करीत होतो, परंतु तो पुरस्कार मला न मिळाल्याचे मूळ कारण हे कुकर आहे हे मला आता कानीकपाळी ओरडून सांगावे लागत आहे. ‘वेअर देर इज अ कुकर, फर्गेट अबाऊट अ बुकर’ ह्या तालमय उक्तीचा जनक होण्याचा बहुमान मात्र मी मिळवलाय ह्याचा मला अभिमान आहे.

असो! पण अनेकदा मी दुसरी शिट्टी येऊनसुद्धा कुकर बंद केलेला नाही हे बाथरूममध्ये असून देखील माझ्या अंतर्ज्ञानी पत्नीच्या लक्षात येते.
‘अहो, कुकर बंद केलाय की नाही’ अशी तेथून सूचना येते.
‘हो, केलाय ना!’ असे खोटेच सांगून मी मग कुकर बंद करतो. एकदा असे झाले, की दुसर्‍या शिट्टीची वाट बघावी लागू नये म्हणून मी तोंडानेच शिट्टीसारखा आवाज काढून एकदाचे ते कुकर बंद करून टाकले होते. कसे बनवले या आनंदात मश्गुल होऊन मी माझ्या सुपीक डोक्याची स्वतःच मनोमन स्तुती करीत होतो इतक्यात
बॉम्बगोळा पडला.

‘मला काही दुसर्‍या शिट्टीचा आवाज नेहमीप्रमाणे चांगला वाटला नाही. कुकरमध्ये काहीतरी दोष असावा. आत्ताच्या आता कुकर पलीकडच्या खुशी इलेक्ट्रिकल्सकडे घेऊन जा आणि शिट्टीची दुरुस्ती करून घ्या!’
‘पण,’ मी तिला म्हणालो, ‘माझ्या रहस्यकथेत खुन्याने आपल्या सावजाच्या डोक्यात हाणलेले अवजार कोणते याचा शोध लागलेला आहे. तेव्हा तो परिच्छेद पूर्ण करून नंतर मी कुकर नेतो.’

तिच्याकडून काहीच उत्तर न आल्यामुळे, माझ्या साहित्यसेवेला मी देत असलेल्या प्राधान्याबद्दल तिच्याशी एकमत झाले असावे असे मी गृहीत धरतो तोच, त्यावेळेस पोळ्या करायची वेळ नसताना देखील ती लाटणं का पुसत होती हा संशय माझ्या मनात जागृत झाला.
‘अरे बापरे!’ मी स्वतःशीच म्हणालो. खुन्याने माझ्या कथेत कोणते अवजार वापरले त्याऐवजी माझ्या टाळक्यात कुठले अवजार पडणार याची नेमकी कल्पना आल्यामुळे, ‘तू कुकर पिशवीत घाल मी घेऊन जातो’ म्हणून मी लवकरच तेथून सटकलो. लेखन काय, कधीही होईल, शेवटी ‘सर सलामत तर पोथी पचास’ या उक्तीपासून धडा घेतला आणि बाहेर पडल्यावर कपाळावर हात मारला. करायला गेलो एक आणि…

बरं, पत्नीने वारंवार असे मारलेले शाब्दिक छक्के आणि त्या त्या वेळी मी मारलेली कपाळावर थाप यामुळे कालांतराने माझे थोडेसे अर्धगोल आकाराचे कपाळ मध्यभागी खोलगट झाले आहे. घाटावरच्या रस्त्यांवर वाहने चढताना ती बंद पडू नयेत म्हणून तो घाटाचा भाग सपाट केल्यावर जसा होतो त्याच्याशी साम्य साधणारे असे माझ्या कपाळाचे रूप आता झाले आहे. आता कपाळ हे असे कशामुळे झाले त्याचे कारण मी काय सांगणार कपाळ? काही जण चिंतेने मला विचारतात, अहो कधी अपघात वगैरे झाला होता का? त्याला खेळकरपणाने मी एवढेच उत्तर देतो की बाबांनो, त्या अपघाताच्या वेळेस तुम्ही सर्वजण हजर होतात. तुमच्या साक्षीने बोहोल्यावर एक अबोल अशी बाहुली तुम्ही माझ्या शेजारी उभी केली ती आता बाहुबली बनून, माझी प्रतिभा, माझी प्रज्ञा, माझी प्रेरणा माझ्यापासून अलग करू पाहत आहे. परंतु हे बोलताना पत्नी दूर आहे याचे मला भान ठेवावे लागते. नाहीतर प्रतिभेप्रमाणेच ‘तुमची ती’ प्रज्ञा मला बसमध्ये भेटली, प्रेरणा एका प्रदर्शनात दिसली असे सांगून त्यांच्या प्रस्तुत समयीच्या शरीरयष्टींबाबतची अलंकारिक टिप्पणी मला ऐकायची नसते.
शेवटी एकदा मी ठरवले. या लसूण आणि शिट्टीच्या जाचापासून मुक्त व्हायचे. मी भल्या सकाळी लवकर उठून लेखन करायचे ठरवले, पण व्यत्यय माझ्या पाचवीलाच पुजला होता की काय, दोन ओळी लिहून होत नाहीत इतक्यात मी दचकून उठलो. इमारतीकरता खड्डा खोदण्याच्या यंत्राचा आवाज होता तसा माझ्या कानावर आला. पण आजूबाजूला कुठले काम चालू असल्याचे माझ्या तरी नजरेत आले नव्हते आणि असते तरी इतक्या भल्या सकाळी ते होणे शक्य नव्हते. मी बाहेर उतरलो आणि कपाळावर हात मारतो इतक्यात आठवले. हायवेवरील सपाटीऐवजी आता सिंचन योजनेतील तलावाच्या नावाने बांधलेल्या खड्ड्याचे स्वरूप कपाळाला यायला नको म्हणून मी स्वतःला त्या कृत्यापासून परावृत्त केले. आमच्यापासून दोन घरे दूर राहत असलेला गण्या खाकरे, आपण जागे झाल्याचे जगाच्या निदर्शनास आणून देत होता. गण्या खाकरे जेव्हा तोंड धुवायचा तेव्हा तो आपल्या घशातून कोविड काळापासून शरीरात बाकी राहिलेले सगळे जिवाणू खोकून-खाकरून बाहेर काढतोय की काय असे वाटायचे. दोन्ही बोटे घश्यात घालून तो काढत असलेले आवाज हा कत्तलखान्याच्या दाराशी असलेल्या असंख्य बोकडांनी सामूहिकपणे केलेला आकांत ह्याच्याशी साम्य साधणारा होता. हा कधीकाळी  कैदेमध्ये गेला असता तर सकाळी कैद्यांना उठवण्यासाठी वाजणारा भोंगा बंद करून गण्याला मधल्या चौकात तोंड धुवायला सांगितले असते.

शेवटी, लेखनकार्यास सर्वात योग्य काळ कोणता या संभ्रमात असताना मला साक्षात्कार झाला. मध्यरात्र! निदान त्यावेळेला तरी लसूण पीडा किंवा बोकड-रुदन स्वरूपातला व्यत्यय येणार नाही हे माझे आशादायी अनुमान! एक दिवस उठलो! घरात उजेड दिसला तर रात्रीचे फ्रीजमधून काहीतरी काढून खातोय अशी माझ्या पत्नीला शंका येऊ नये म्हणून गच्चीत जाऊन बसलो. थंडी असल्यामुळे डोक्याला मफलर गुंडाळले होते. ‘कुपोषित भागातील भूकबळी’ यांवरील अभ्यासपूर्वक लेख सुरू करणार इतक्यात खालून भुंकण्याचा आवाज आला. होय, एरव्ही ओळखणारी रस्त्यावरील कुत्रे मंडळी माझ्याकडे बघून भुंकत होती. साहजिकच होते. रात्री बारा वाजता डोके गुंडाळून गच्चीमध्ये असलेली व्यक्ती भुरटा चोर असेल हे त्यांच्या श्वानतार्किक तत्त्वज्ञानाला अनुसरून होते. बरं, हे तेथपर्यंत थांबले असते तर ठीक होते. पण कुठले काय? कुत्र्यांच्या स्थानिक क्षेत्र नेटवर्कअंतर्गत मिळालेल्या संकेतांमुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतले कुत्रागण देखील या सामूहिक ‘भुंकाथॉन’मध्ये सामील झाले. पाश्चात्य संगीतामध्ये आल्टो आणि टेनर हे आवाज प्रकार असतात तसा एक लांबीत विव्हळण्याचा आवाजही जेव्हा त्यात जोडला गेला तेव्हा मला कळून चुकले की मी गाशा गुंडाळून आतमध्ये गेल्याशिवाय हा श्वानश्रवण ‘सिंफनी ऑर्वेâस्ट्रा’ थांबणार नव्हता. भूकबळी हा माझा विषय बाजूलाच पडलाय पण एका लेखकाचा ‘भुंक’बळी कसा झाला त्याबद्दल कोणीतरी लिहावे अशी माझी नम्र विनंती आहे.

Previous Post

साऊथ इंडियन कँटीन…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post
बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.