शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचे आयुष्य हे कादंबरीसारखे आहे. त्यांनी कधी आत्मचरित्र लिहिले नाही. त्यांची गरजही त्यांना वाटली नाही. कारण रोखठोक भूमिका, सडेतोड लिखाण आणि स्पष्टवक्तेपणा हेच आयुष्यभर त्यांच्या समाजकारण आणि राजकारणाचे सूत्र होते. बाळासाहेबांना समाजकारणाचे ‘बाळकडू’घरातच लाभले होते. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा पाया हा समाजकारण हाच होता. म्हणूनच त्यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण आयुष्यभर केले.
राज्यात समाजकारण व राजकारण करताना त्यांच्यातील हाडाचा कलाकार, व्यंगचित्रकार, निर्भीड पत्रकार आणि स्पष्टपणा हे गुण वेळोवेळी दिसले. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’असे मतलबी राजकारण दिसले नाही. त्यामुळे राजकारणात विरोधक असले तरी साहेबांनी त्यांच्या प्रती वैरभाव कधीच जपला नाही. त्यामुळे समाजातील सर्व क्षेत्रातील मंडळींशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या गुणवैशिष्ट्यांमुळे बाळासाहेबांच्या राजकीय विरोधकांनाही त्यांची मैत्री हवीशी-हवीशी वाटायची. त्यांच्याविषयी आदर वाटायचा. बाळासाहेबांच्या गुणवैशिष्ट्यांचा हा करिश्मा होता. बाळासाहेबांसारखा दिलदार विरोधक हवा असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाटायचे ते उगाचच नाही.
बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाला मिळालेले एक शक्तिस्थान आहे आणि मराठी माणसाने त्यासाठी जगन्नियंत्याचे कायम आभार मानायला हवेत! देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या गुणवैशिष्ट्यांचा प्रभाव पाडणारी जी काही मोजकी चिरायू व्यक्तिमत्त्वं आहेत त्यातील बाळासाहेब हे एक व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेब ठाकरे हे मराठी मनाचं अभिमान स्थळ आहे. म्हणूनच भाजपाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी हे ‘बाळ ठाकरे अ फोटो बायोग्राफी’या राज ठाकरे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी म्हणाले होते की, बाळासाहेबांचे जीवन हा एखाद्या कादंबरीचा विषय आहे. बाळासाहेबांच्या सान्निध्यात जो येतो त्याचे खर्या अर्थाने सोने होते. बाळासाहेबांचे अग्रलेख म्हणजे ‘अक्षय साहित्य’आहे. ते लोकांसमोर आले पाहिजे. तर ‘प्रखरता, तेजस्विता, नेतृत्वक्षमता, दृढता व निर्भतया’हे सर्व गुण, जे यशस्वी नेत्याकडे हवेत ते सारे बाळासाहेबांकडे आहेत म्हणून ते प्रदीर्घ काळ आदरास पात्र राहिले आहेत, असे बाळासाहेबांचे गुणवैशिष्ट्य अधोरेखित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले आहे.
त्यामुळेच जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची गुणवैशिष्ट्यांचे पारायण करून आजच्या पिढीपुढे ठेवणे अगत्याचे ठरते.

कला, क्रीडा, साहित्य, चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, उद्योजक, पत्रकार, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रांत मैत्री आणि विषयांचा सखोल अभ्यास यांचा संगम म्हणजे शिवसेनाप्रमुख.
‘वक्ता दशसहस्त्रेषु’म्हणजे शिवसेनाप्रमुख.
अमोघ वाणी-प्रभावी लेखणी आणि कुंचल्याचे मर्मभेदी फटकारे यांचा मिलाप म्हणजे शिवसेनाप्रमुख.
‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणजे शिवसेनाप्रमुख.
दुसर्या महायुद्धाच्या काळातील ब्रिटिश पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांच्यावरील पुस्तकामध्ये व्यंगचित्राचा समावेश झाला असे एकमेव आशियाई वा भारतीय व्यंगचित्रकार म्हणजे शिवसेनाप्रमुख.
आपल्या कुंचल्याने मनमुराद हसायला लावणारे आणि त्याच वेळी दुष्ट, सुष्ट, भ्रष्टांना दरदरून घाम फुटायला लावणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
शब्दाचे पक्के! शब्द दिला की त्याची पूर्तता करेपर्यंत शांत न बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.

