• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मैदानापलीकडचा तत्त्ववेत्ता!

प्रशांत केणी (खेळियाड)

Marmik Team by Marmik Team
September 12, 2026
in खेळियाड
0
मैदानापलीकडचा तत्त्ववेत्ता!

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर लिओनेल मेसीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील निवृत्ती तशी अपेक्षितच होती. योग्य वेळी हा निर्णय घेणाऱ्या मेसीच्या एकंदर कारकीर्दीतील त्याच्या अनेक प्रतिक्रिया गांभीर्यानं पाहिल्यास आयुष्य जगण्यासाठी दिशादायी म्हणजेच प्रेरणादायी. त्याच्या दृष्टिकोनाची ही वैचारिक मीमांसा.

लिओनेल मेसीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला पूर्णविराम हा ‘वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्ती’ ह्या ठोकताळ्यात अत्यंत चपखलपणे बसतो. वृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानसिक भूमिका, दृष्टिकोन किंवा मनोवृत्ती, तर प्रवृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीची कृती करण्याची नैसर्गिक ओढ, सवय किंवा कल. याचाच अर्थ वृत्ती ही सैद्धांतिक, तर प्रवृत्ती ही कृतिशील. निवृत्ती ही स्वीकृत कृती. पण वृत्ती आणि प्रवृत्तीतून साकारलेली भूमिका. आपल्याला थांबायला हवं, हे वाटणं इतकं सोप्पं नसतं. जागतिक फुटबॉलमधील सार्वकालिक सर्वोत्तम म्हणजे ‘गोट’ अशी ख्याती असलेल्या मेसीसाठी हा निर्णय घेणं अत्यंत अवघड. त्याचा निवृत्तीचा संदेशही तितकाच स्पष्ट : “ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आता आपल्यात सुधारणेला कोणताही वाव उरलेला नाही, तो खऱ्या अर्थानं एक दुर्दैवी दिवस असतो!” याचा अर्थ असा की, तुम्ही कितीही मोठे झालात, कितीही यश मिळवलंत, तरी आता मला आणखी काही शिकण्यासारखं राहिलं नाही, हाच विचार तुमच्या प्रगतीचा शेवट असतो. कवी बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं तर ‘मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो.’ मेसीच्या कारकीर्दीकडे पाहिलं तर अचाट प्रतिभासंपन्न, दिएगो मॅराडोनाच्या अर्जेंटिनाचा वारसा चालवणारा आणि १० क्रमांकाच्या जर्सीची परंपरा जपणारा एकमेवाद्वितीय फुटबॉलपटू. त्याचा जगज्जेतेपदापर्यंतचा एकंदर प्रवास थक्क करणारा. गुणवत्ता तुम्हाला संधी मिळवून देते; पण सुधारण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती तुम्हाला टिकवते. यश हा प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे, अंतिम ध्येय नाही. ‘मी सर्वोत्तम आहे’ हा विचार धोकादायक आहे. त्यातून अहंकार निर्माण होतो, जो विकासाला घातक ठरतो. मेसीचा दृष्टिकोन हा त्याविरुद्ध. वय वाढतं, पण शिकण्याची क्षमता थांबू नये आणि सुधारणा म्हणजे स्वतःशी स्पर्धा हेच त्याच्या निवृत्तीच्या संदेशाचं सार.

मेसीचं वय ३९ वर्षं. म्हणजे कारकी‍र्दीच्या अस्ताकडे आलेलं, हे सत्य. प्रतिष्ठेचा बलून डीओर पुरस्कार मेसीनं ८ वेळा पटकावला, विश्वचषकातील ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार दोनदा जिंकणारा तो एकटाच. पण मोठं जेतेपद हुलकावणी देत होतं. हेच त्याला अस्वस्थ करीत होतं. २०२१मध्ये अर्जेंटिनाचा २८ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ त्यानं संपवला, ते कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवून. मग २०२२च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाचं आणि आपलं तळहातांच्या फोडाप्रमाणे जपलेलं जगज्जेतेपदाचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं. काही दिवसांपूर्वी सलग दुसरं विश्वविजेतेपद त्याच्या दृष्टिपथात होतं. पण स्पेनच्या ‘टिकी-टाका २.०’ रणनीतीपुढे अर्जेंटिनाचा निभाव लागला नाही. अंतिम सामन्यात मेसी आणि त्याचा संघ हे चक्रव्यूह भेदताना झगडताना आढळले. यातूनच आत्मपरीक्षण करीत त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला.
‘तुमची सुरुवात तुमचा शेवट ठरवत नाही,’ हा मेसीनं दिलेला जीवनाला मार्गदर्शक असा पहिला धडा. सुरुवातीला वाट्याला आलेले संघर्ष किंवा कोणत्या कुटुंबात तुमचा जन्म होतो, त्यावर तुमचं भवितव्य ठरत नाही. तुम्ही कोणत्या स्वप्नाच्या ध्यासानं त्या अडथळ्यांवर मात करून कुठवर पोहोचता हे महत्त्वाचं. मेसीला वयाच्या ११व्या वर्षी वाढीच्या संप्रेरकाची कमतरता (ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी) ह्या गंभीर आजारपणानं ग्रासलं होतं. पण त्यावर उपचार घेत तो खेळत राहिला. पुढे २००५मध्ये मेसीचं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील पदार्पणाचं स्वप्न साकारलं. हंगेरीविरुद्धच्या पहिल्याच सामन्याच्या दुसऱ्या सत्रात तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. परंतु लाल कार्ड दाखवण्यात आल्यानं फक्त ४७ सेकंदांत त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. पण इथेच त्याचा प्रवास थांबला नाही. आज आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गोल (२०७ सामन्यांत १२५ गोल) मेसीच्या खात्यावर आहेत. विश्वचषकात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे २१ गोल त्यानं नोंदवले आहेत.

गुणवत्तेच्या बळावर तुम्ही यशापर्यंत जरूर पोहोचता; पण ते टिकवण्यासाठी शिस्त लागते. मेहनत करावी लागते आणि बलिदानही द्यावं लागतं, असं मेसी म्हणतो. मेसीला आपल्या कारकीर्दीतील पहिल्या आंतरराष्ट्रीय गोलसाठी एक वर्ष वाट पाहावी लागली. पण पुढे तब्बल २१ वर्षं तो अर्जेंटिनाकडून खेळला. यात २००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि २०२६ अशा सहा विश्वचषकांचा समावेश आहे. तुमचं कार्य किंवा कर्तृत्व हे तुमच्या शब्दांहून अधिक बोलकं हवं, हे मेसीनं सिद्ध केलं. त्यानं वादांपासून दूर राहून आपल्या कारकीर्दीकडे लक्ष केंद्रित केलं. आपल्या कामगिरीनं त्यानं टिकाकारांची तोंडं बंद केली. “जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू बनण्यापेक्षा एक चांगला माणूस बनावं, हीच माझी इच्छा आहे,” असं मत मेसीनं काही वर्षांपूर्वी मांडलं होतं. सचिन तेंडुलकरच्या विचारांशी साधर्म्य साधणारी ही भावना. “माझे वडील रमेश तेंडुलकर यांनी मला सांगितलं होतं की चांगला क्रिकेटपटू नाही झालास तरी चालेल; पण उत्तम नागरिक हो,” असं सचिननं एका कार्यक्रमात सांगितलं होतं. कारकी‍र्दीच्या अखेरच्या पाच वर्षांत फुटबॉलमधील जवळपास प्रत्येक शिखर त्यानं सर केलं. पण तरीही संघसहकारी, प्रतिस्पर्धी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेळाचा त्यानं निरंतर आदर केला. हीच ती विनयशीलता ज्यामुळे यश तुमचं मांडलिकत्व पत्करतं. जेव्हा तुम्ही सोबतच्या लोकांना यशस्वी होण्यास मदत करता, तेव्हा तुमचं यश अधिक अर्थपूर्ण बनतं, हे मेसीची कारकीर्द पाहून सहज अधोरेखित होते. सांघिकता ही यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची असते, हे सूत्र त्याला खूप लवकर उमगलं. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक ६५ गोलसहाय्य मेसीच्या खात्यावर जमा आहेत. अगदी विश्वचषकातही सर्वाधिक १२ गोलसहाय्यात त्याचं योगदान आहे. मेसी सहकारी खेळाडूंबाबत म्हणतो, “मी स्वतःला अतिशय नशीबवान समजतो की मी अशा एका संघाचा भाग आहे, जे मला उत्तम कामगिरी करण्यास सहाय्य करतात. मैदानावरील सरावात आम्ही सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मिळणाऱ्या माझ्या यशाचं जेवढं श्रेय मला जातं, तेवढंच माझ्या सहकाऱ्यांनाही जातं. वैयक्तिक पुरस्कार किंवा सर्वाधिक गोल नोंदवण्यापेक्षा संघासमवेत जेतेपदावर नाव कोरण्याला मी प्राधान्य दिलं.”

‘ब्लूमबर्ग’च्या ताज्या अहवालानुसार, मेसीची संपत्ती एक अब्ज डॉलर्सहून अधिक आहे, त्यामुळे अब्जाधीशांच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. २००९ ते २०१४ अशी सहा वर्षं तो सर्वाधिक मानधन घेणारा फुटबॉलपटू होता. त्याच्या उत्पन्नानं २०१३ (४ कोटी, १० लाख युरो) आणि २०१४मध्ये (६ कोटी, ५० लाख युरो) विक्रम मोडले. २०१९मध्ये तो ‘फोर्ब्स’च्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रीडापटूंच्या यादीत अग्रस्थानावर होता, तर सध्या तो तिसऱ्या स्थानावर आहे. फुटबॉलमुळे ही श्रीमंती मिळाली असली, तरी त्याचे पाय मात्र जमिनीवर आहेत. मेसी म्हणतो, “पैसा हा माझ्यासाठी कधीच प्रेरणादायी घटक ठरला नाही. श्रीमंत असण्याचे अनेक फायदे असले. पण पैसा इतका रोमांचक नसतो की ज्यामुळे माझा खेळ उंचावेल. माझ्या पायाशी फुटबॉल असला की मला खरा आनंद मिळतो. माझा अत्यंत जिव्हाळ्याचा खेळ खेळण्यातूनच मला खरी प्रेरणा मिळते. एक व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून मला पैसे मिळाले नसते, तरीही मी आनंदाने विनामोबदला खेळलो असतो.”

खेळाच्या पल्याड एक सर्वसामान्य व्यक्ती हीच आपली ओळख आहे. कुटुंब आणि मित्र परिवार यांचं आयुष्यातलं महत्त्व तो स्पष्टपणे मांडतो. “मी एक सामान्य माणूस आहे. इतर कोणत्याही मानवासारखंच माझंही आयुष्य आहे. माझं खेळणं आणि माझं काम पूर्ण झाल्यावर, माझ्यासोबत माझं कुटुंब असतं, माझे मित्र असतात आणि मी इतर कोणत्याही व्यक्तीसारखंच जीवन जगतो.” अशा ह्या अवलियाला निवृत्तीनंतरच्या कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
[email protected]

Previous Post

…इथे पिकांसोबत पक्षीही वाढतात!

Next Post

कॅनडाचा मैत्रीचा हात भारत स्वीकारणार का?

Next Post
कॅनडाचा मैत्रीचा हात भारत स्वीकारणार का?

कॅनडाचा मैत्रीचा हात भारत स्वीकारणार का?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.