• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मुका पंडित

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

marmik by marmik
February 13, 2026
in विशेष लेख
0
मुका पंडित

मुका झालो वाचा गेली ।।धृ ।।
होतो पंडित महाज्ञानी।
दशग्रंथ षडशास्त्र पुराणी।
चारी वेद मुखोद्गत वाणी।
गर्वामध्ये झाली सर्व हानी ।।१ ।।
जिव्हा लाचावली भोजना।
दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना।
निंदीले उपान्ना।
तेणे पातलो मुखबंधना ।।२ ।।

साधुसंतांची निंदा केली।
हरिभक्ताची स्तुती नाही केली।
तेणे वाचा पंगु झाली।
एका जनार्दनी कृपा लाधली ।।३ ।।

वारकरी संप्रदायात पहाटे काकडा भजन करण्याची परंपरा आहे. त्यात लागावळीने अभंग म्हणतात. लागावळ म्हणजे क्रमवार ओळीने अभंग म्हणणं. त्यात थोड्याफार फरकाने भूपाळी- काकडा- वैष्णवपर- वासुदेव- आंधळा- पांगळा- मुका- बहिरा आणि त्यानंतर गौळणी असा क्रम असतो. त्यातीलच मुका प्रकरणातील एकनाथ महाराजांचा हा अभंग. एकनाथ महाराज म्हणतात की एखादा पंडित महाज्ञानी असतो, दशग्रंथी असतो. ऋग्वेद या वेदातील संहितेवर भाष्य करणारे विविध ग्रंथ आहेत. त्यांचे पाठांतर आणि अभ्यास असणार्‍या ब्राह्मणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. त्याने ऋग्वेदाच्या १० मंडलातील जवळपास १०,००० ऋचा त्याचबरोबर ब्राह्मण्ये, आरण्यके, शिक्षा, कल्प, व्याकरण, निघंटु, निरुक्त, छंद आणि ज्योतिषशास्त्र अशा ऋग्वेदाच्या दहा अंगांचा अभ्यास केलेला असतो. दशग्रंथी ब्राह्मणाला त्याचा अभिमान असतो. याच दशग्रंथी पंडिताने सहा शास्त्रांचा आणि पुराणांचा अभ्यास केला असेल तर त्याचा आणखी अभिमान वाढतो. काही तत्त्वज्ञ पंडित न्याय, वैशैषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत या सहा आस्तिक दर्शनांचा अभ्यास करतात. काहीजण चारही वेदसंहिता पाठ करतात, तर काहीजण अठरा पुराणांचा अभ्यास करतात. या पंडितांना इतरांशी वादविवाद करत जिंकण्याची खुमखुमी असते. त्यातच त्यांची शक्ती खर्च होते, जीवन वाया जातं. ‘तुका म्हणे वादे। वाया गेली ब्रह्मवृंदे।।’ असं म्हणत तुकोबाराय ब्राह्मण पंडित वाद करण्यातच वाया गेले असं ठामपणे सांगतात.

वादविवादाची चटक लागलेल्या या गर्विष्ठ पंडितांना संतांनी जागेवर आणलं. माणसाचा जन्म वादासाठी नसून अनुभूतीसाठी आहे हे त्यांनी पटवून दिलं. संतांनी पंडितांना पराभूत केल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यात नामदेवरायांचं उदाहरण सांगता येईल. परिसा भागवत हे मोठे भागवतकार होते. त्यांचं मूळ नाव साळ्या रसाळ. परिसा म्हणणे ऐका आणि भागवत म्हणजे भागवत ग्रंथ. भागवत ऐकायला बोलवणारे म्हणून त्यांचं नाव परिसा भागवत असं पडलं. पुराणाचा अभ्यास असल्याचा दंभ त्यांना होता. त्यापोटीच त्यांनी एकदा नामदेवरायांची भेट घेतली. शिंपी जातीतल्या माणसाला लोक मानसन्मान देतात हे त्यांना सहन होत नव्हतं. त्यांनी नामदेवरायांना अपमानित केलं. नामदेवरायांनी मात्र त्यांचा प्रतिकार केला नाही. पुढच्या काळात त्यांना नामदेवरायांचा मोठेपणा लक्षात आला. ते नामदेवरायांना शरण गेले.

असाच प्रसंग कबीरांच्या बाबतीतही सांगितला जातो. सुरतगोपाल नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. तात्त्विक वादविवादात इतरांना पराभूत करण्याचं व्यसन त्यांना लागलं होतं. त्यांच्या कानावर कबीरांची कीर्ती गेली. कबीरांना पराभूत करण्यासाठी ते निघाले. १६ बैलांवर ग्रंथ लादून पांडित्याचं प्रदर्शन करत निघाले होते. वाटेत कबीरांची मुलगी कमाली त्यांना दिसली. त्यांनी तिला पाणी मागितलं. पाणी पिता पिता तिला कबीरांच्या घराचा पत्ता विचारला. हा पंडित वादविवाद करण्यासाठी कबीरांकडे निघाला आहे हे कमालीच्या लक्षात आलं. कबीरांचीच मुलगी ती. तिने एका दोह्यात उत्तर दिलं. ‘कबीरांच्या घराचा रस्ता फार चढाचा आहे. त्यावरून मुंगीलाही चढता येत नाही. तुमचे १६ बैल आणि त्यावरचे ग्रंथ तिथे पोहोचणार नाहीत.’ कबीरांजवळ तत्त्वचर्चेला नव्हे तर प्रेमाला महत्त्व हे त्यातून कमालीला सुचवायचं होतं. पुढे हे सुरतगोपाल कबीरांकडे गेले. तेव्हा कबीरांनी त्यांचा वादविवादाचा प्रस्ताव नाकारला. आपला पराभव झाल्याचं लिहून देतो असं ते म्हणाले. पुढच्या काळात हेच सुरतगोपाल कबीरांचे शिष्य झाले. कबीर पंथाच्या काशी शाखेचे प्रमुख म्हणून कबीरपंथाचा प्रसार करण्यात सुरतगोपालांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संतांची परंपरा ही मुळात खर्‍या सुखाचा अनुभव देणारी परंपरा. पंडितांना पांडित्य दाखवून प्रतिष्ठा, पद आणि पैसा मिळत असला तरी सुखाचा अनुभव नव्हता. ‘पंडित म्हणता थोर सुख। परि पाहता अवघाची मूर्ख।।’ असं तुकोबाराय म्हणतात तेच वास्तव होतं. या पंडितांना खरा सुखाचा अनुभव मिळाला तो संतांच्या सहवासातून आणि भक्तिप्रेमाच्या रसरशीत अनुभूतीतून. त्यामुळेच हे पंडित पांडित्य त्यागून संतत्वाला शरण गेले. हे पंडित उच्चवर्णीय जातीचे, तरीही त्यांनी विद्वतेच्या आणि जातीच्या अहंकारावर मात केली. ते बहुजन संतांना शरण गेले. त्यांचे शिष्य झाले. वर्णगुरू म्हणून मिळत असलेली शतकानुशतकाची प्रतिष्ठा सोडायला ते तयार झाले.

पांडित्य आणि संतत्व यातला आणखी एक फरक एकनाथ महाराजांनी नोंदवला आहे. पंडितांना आहारात दूध, तूप आणि साखर लागते. संतांना त्यांच्या आहारात कण्या-भाकरी असली तरी चालते. ‘कण्या भाकरीचे खाणे। गाठी रामनाम गाणे ।।’ असं नामदेवराय वैष्णवांचं वर्णन करतात. वैदिक धर्मशास्त्रात आणि ग्रंथात सातत्याने ब्राह्मणभोजनाचा महिमा सांगितला आहे. त्याचाच फायदा घेत पंडितांनी लोकांकडून दूध, तूप आणि साखर मिळवली. रोज पंचपक्वानाचा बेत मिळत गेला. पंडिताला भोजन देणं हे किती पवित्र आणि पुण्यकारक मानलं जात होतं याचा दाखला एकनाथ महाराजांच्या अभंगातच सापडतो. ‘गांवढे सहस्त्र ब्राह्मण । तृप्त केलिया भोजन । पुण्यक्षेत्रांचे एकचि जाण । सुकृत तितुकेंचि जोडे ।।१ ।। ऐसे पुण्यक्षेत्रांचे दशशतक। तृप्त केलिया पाठक । पाहता सुकृत । तितुकेचि जोडे ।।२ ।। ऐसे सहस्त्र वेदपाठक। तृप्त केलिया पंडित एक । पहाता सुकृत। तितुकेचि जोडे ।।३ ।।’ या अभंगानुसार त्या काळात एक हजार गावंढळ ब्राह्मणांना भोजन आणि पुण्यक्षेत्रीच्या एका ब्राह्मणाला भोजन हे समान मानलं जात होतं. असे एक हजार पुण्यक्षेत्रीचे ब्राह्मण आणि एक वेदपाठक यांच्या भोजनाचं पुण्य समान. असे एक हजार वेदपाठक आणि एक पंडित यांच्या भोजनाचं पुण्य समान. साहजिकच पैठणसारख्या पुण्यक्षेत्रातल्या वेदपाठक आणि पंडित ब्राह्मणांना जेवण देण्यात श्रीमंत लोक धन्यता मानत असणार हे उघड आहे. पंडितांच्या भोजनाच्या पुण्यप्राप्तीचं हे गणित एकनाथ महाराजांनी बरोबर उलटवलं. त्यांनी पंडितांपेक्षा संन्यासी, संन्याशांपेक्षा परमहंसी, परमहंसांपेक्षा ब्रह्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञान्यांपेक्षा नामधारक वारकर्‍याला भोजन देणं हे पुण्यकारक असल्याचं सांगितलं. त्या अभंगाचा शेवट ‘ऐसे ब्रह्मवेत्ते अपरंपार। न ये नामधारका बरोबर। नामधारका सादर। पाहे एका जनार्दनी ।।’ असा आहे. अगणित ब्रह्मवेत्यांना भोजन दिलं तरी ते नामधारक वारकर्‍यांची बरोबरी करणार नाही, असं एकनाथ महाराज म्हणतात. नामधारक वारकरी कोणत्याही जातीधर्माचा असतो. ‘नामधारकासी नाही वर्णावर्ण।’ असं तुकाराम महाराज म्हणतात.

एकनाथ महाराजांनी अशी ‘शांतीत क्रांती’ केली. त्याचा परिणाम त्यावेळच्या पंडितांच्या भोजनावर झाला असणारच. पैठणातले हे पंडित एकनाथ महाराजांवर खवळले. कहर म्हणजे त्यांचा पोटचा मुलगाही त्यांच्यावर रागावला. तो पंडितांच्या बाजूला गेला, कारण मुळात तोही स्वतःला पंडित म्हणवून घेत होता. ‘हरिपंडित’ ही त्याची ओळख होती. तो नाथरायांवर रुसून काशीला गेला. नाथांनी त्याची समजूत घालून त्याला परत पैठणला आणलं. त्यावेळच्या एका कथेत नाथांनी त्याला हजार पंडितापेक्षा एका वारकर्‍याला जेवण देणं अधिक श्रेष्ठ असल्याचं पटवून दिल्याचा संदर्भ आहे. आणखी दोन कथेतही नाथरायांची हीच भूमिका दिसते. नाथरायांनी एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या चोराची सेवा केली होती आणि एकदा श्राद्धात अस्पृश्यांना जेवण दिलं होतं. या दोन्ही घटनेत अस्पृश्याची सेवा करण्याचं आणि अस्पृश्यांना जेवण देण्याचं पुण्य ब्राह्मणभोजनाच्या पुण्यापेक्षा अधिक असल्याचं नाथरायांनी सांगितलं होतं, असं त्यांच्या चरित्रकारांनी नोंदवलं आहे.
संतांच्या प्रबोधनाने ब्राह्मण भोजनाचा हा प्रकार कमी झाला असला तरी पुढे पेशवाईत तो वाढला. पेशवाईत राज्याचा बराचसा खर्च ब्राह्मण भोजनावर होत होता. त्याच्या अत्यंत गंभीर आणि अनिष्ट परिणामांची जाणीव पहिल्यांदा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांना झाली. त्यांनी ब्राह्मणभोजनाची चिकित्सा करणारी पत्रमालाच लिहिली होती. त्यातला एक तुकडा जरी वाचला तरी हे प्रकरण आपल्या लक्षात येईल. लोकहितवादी लिहितात -‘पोटार्थी भटांनी गोड खाण्याशिवाय दुसरे काही मनात आणलेच नाही. गोड खाण्यास मिळाले, म्हणजे सर्व ब्राह्मण एकत्र डोंगळ्याप्रमाणे जमतात व मग त्याचे अवधान फार लागते. कोठे मुक्तद्वार किंवा ब्राह्मण – संतर्पण किंवा उत्सव आहे, अशी वार्ता आली की ब्राह्मण मोठ्या हौसेने तेथे जमतात. दुसरी काही राज्यकारभाराची किंवा ज्ञानवृद्धीसाठी सभा असेल, तर हालणार नाहीत? तात्पर्य, या जातीची नजर जेवण आणि दक्षिणा याहून पलीकडे जात नाही व याहून दुसरा मोठा कारभार पृथ्वीवर आहे, असे या जातीस वाटत नाही. पेशव्यांचे राज्य गेले, हे वाईट जाहले, असे जे ब्राह्मण लोक म्हणतात, ते एवढ्याच कारणाने म्हणतात की, त्यास खावयास मिळत नाही. ब्राह्मण लोक इतके दुर्बुद्धी आहेत की, त्यास खावयास द्या व मग काही करा, चिंता नाही. पोटास घालावे आणि पायपोस मारावे, त्यास लज्जा वाटणार नाही. आणि त्यांची म्हण अशी आहे की, पोटावर मारू नका, पाठीवर मारा, म्हणजे जेवावयास घाला मग काही करा. याप्रमाणे फक्त जेवणाची मात्र काळजी.’ लोकहितवादींच्या लिखाणातील हे तत्कालीन वास्तवदर्शी विवेचन पाहिले असता आपल्याला एकनाथ महाराजांची दूरदृष्टी दिसून येते.

एकनाथ महाराज अभंगाच्या तिसर्‍या चरणात सांगतात, पंडित लोक साधुसंतांची निंदा करतात. हरिभक्ताची स्तुती करत नाहीत. साधुसंतांनी त्यांच्या अलौकिक प्रतिभेने, अमर्याद प्रेमाने, बौद्धिक शहाणपणाने आणि प्रचंड क्षमाशील विनम्रतेने आम जनतेत लोकप्रियता मिळवली. त्यांचे अभंग मराठी जनतेला जवळचे वाटले. याउलट पंडितांची वाणी जनतेला कळत नव्हती. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दुरावली. साहजिकच त्यांच्या मनात संतांविषयी मत्सराची भावना तयार झाली. त्यामुळेच एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे त्या काळातील पंडित संतांची निंदा करत होते. एकनाथ महाराजांनी या अभंगात पंडितांच्या तोंडाची तीन कामं सांगितली आहेत. पहिलं काम वेदपुराणाचा पाठांतर, दुसरं काम गोड पक्वान खाणं आणि तिसरं काम साधुसंताची निंदा करणं. या तीन कामामुळेच या पंडितांची वाचा बंद झाल्ाी आहे असं नाथराय म्हणतात. वास्तविक पाहता पंडितासाठी मुका हे रूपक वापरणं हे वरकरणी विसंगत वाटतं. पंडित हा सतत बोलणारा आणि ज्ञान पाजळणारा असतो. त्याला मिठू मिठू बोलणार्‍या पोपटाची उपमा द्यायला हवी होती. तुकाराम महाराजांनी ‘मनुष्याचे परी बोले रावा करी।’ असं म्हणत पंडितांना रावाची म्हणजे पोपटाची उपमा दिलेली आहेच. इथे नाथराय मात्र मुका हे रूपक वापरतात. मला त्याचा लागलेला अर्थ असा की मुका माणूस जे बोलतो ते इतरांना समजत नाही त्याचप्रमाणे पंडित जे बोलतो ते इतर लोकांना समजत नाही. पंडितांची बडबड त्यालाच समजत नाही तर इतरांना कशी समजणार? त्यामुळेच एकनाथ महाराज त्यांना मुका हे प्रतिक वापरतात.

संतांची वाणी आणि पंडितांची वाणी याला जनतेचा जो प्रतिसाद मिळाला त्यातला फरक साने गुरुजींनी फार अचूकतेने हेरला आहे. गुरुजी म्हणतात -‘ग्यानबा तुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे वाङ्मय हे खरे राष्ट्रीय वाङ्मय कारण ते सर्व थरात गेले. मोरोपंतांची आर्या व वामनी श्लोक पांढरपेशी लोकात व हरदासात. परंतु आम जनतेत तुकोबांची वाणी गेली.’ साने गुरुजींच्या या प्रतिपादनातून आपल्याला एकनाथ महाराजांनी पंडितांसाठी वापरलेल्या रूपकाची समर्पकता पटते.

Previous Post

संकटांची चाहूल

Next Post

सुनेत्रा वहिनींना सल्ला!

Next Post
सुनेत्रा वहिनींना सल्ला!

सुनेत्रा वहिनींना सल्ला!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.