
‘रस्ताऽऽऽ… रस्त्यात उभी असलेली वाहने तातडीने हलवा!’
मार्केटच्या स्पीकरवरून काही यांसारख्या काही अगम्य सूचना, उद्घोषणा होत आहेत. आणि त्याच रस्त्यावरून नम्या गाडी हाकलत अर्ध्याला घेऊन मार्वेâट यार्डात घुसतो. समोरून आडवे तिडवे येणारे टॅक्टर, पिकअप, छोटा हत्ती हुकवत यार्डातल्या एक खळ्यासमोर गाडी मध्येच उभी करून नम्या कांदे भरणार्या बायांकडे बघतो. इकडे तिकडे बघतो.
‘ओऽऽऽ मावशी! एखादा किलो कांदे मिळतील का?’ नम्या एक बाहेरच्या दिशेला तोंड करून बसलेल्या बाईला विचारतो.
‘तो भाऊ लिलावात गेला, थोड्या वेळानं भेट त्याला! आम्ही मजूर माणसं! आम्ही काय सांगायचं तुला?’ एक दुसरीच दाभनानं गोणी शिवणारी म्हातारी उत्तर देती.
‘आयला किती भारी, मोठमोठे कांंदे आहे रे? भेटला तर एखादं किलो मलाबी घे! घरी गेल्यावर म्हातारीकडून पैशे देतो तुला!’
‘मला नाही पाहिजे रे! माझा बॉस आहे ना? तो काल बोल्ला, आपल्याला कांद्याचा वानोळा आणशील का? मी त्याच्यापुढं फुशारकी मारली, म्हणलं ते आता आणतो. आणि त्याला झाले चार दिवस! रोज त्याला, घाई होती, उशीर झाला. माणूस बाहेर आहे, अश्या थापा मारून दिवस कटवले. पण बॉस आता खळीला आलाय. त्याला नाहीच मिळाले तर गावच्या बाजारातून का होईना, काही कांदे नेऊन द्यावा लागतील.’ नम्या अर्ध्याला डिटेल देतो.
पुन्हा इकडं तिकडं बघत नम्या चक्कर मारतो. त्याच्यामागं अर्ध्या पण गरके हाणतो. कुणी काम करील असं ओळखीचं न दिसल्यानं शेवट नम्या मोटारसायकलवर बसतो, मागं अर्ध्या बसतो अन् लिलावात गाडी निघते. फाळके पाडून शेतकर्यांनी माल खाली ओढून ठेवेले. लिलाव झाल्यानं ते आता भर्यांची वाट बघताय. तिथून दोन लायनीतून नम्या गाडी फोकारतो.
‘ओ, काका कांदे देता का?’ नम्या चालू गाडीवरूनच पांगलेले कांदे सवरणार्या एक वयस्कर बाबाला आवाज देत विचारतो.
‘बिट द्यायला यायचं ना बाबा मग? अख्खे कांदे तुला मिळाले असते.’ बाबा कांदे वेचता वेचता उत्तर देतो.
इथं काही कांदे मिळायचे नाही. हे बघून नम्या गाडी पुढं घेतो.
‘हजार, बारा सौ? तेरा सौ? चौदा सौ? बोला पटपट बिट बोला.’ पुकार्या मोठ्यानं लायनीच्या शेवट बीटा घेतोय. टाकतोय. तिथं लिलाव चालुय. नम्या गाडी त्या दिशेला नेतो. गाडी तिथंवर जाईपर्यंत लिलाव आवरतो. तशे अडत्ये, व्यापारी पांगतात. लिलावासाठीचा कर्मचार्यांचा लवाजमा माघारी निघतो.
त्यातले ओळखीचे एकदोघे गाडी पुढं येतात. नम्या गाडी थांबवतो.
‘काय नमित शेठ? काय काम काढलं, मार्वेâटमधी?’ एकजण गाडी जवळ येत नम्याला प्रश्न करतो.
‘काही नाही रे कांदे पाहिजे होते. भेटतील का?’ नम्या त्याच्याकडं विचारपूस करतो.
‘किती पाहिजे? एकदोन साठी पाहिजे का?’ दुसराच एकजण मध्ये बोलतो.
‘एवढे काय करायचे? एखादा किलो मिळाले तर पुष्कळ झाले.’ नम्या भाबडेपणानं उत्तर देतो.
‘मला पण सांग रे एखादा किलो.’ अर्ध्या मागून पुटपुटतो.
‘किमान चार-पाच क्विंटल म्हंटला असता तर एखादी छप्पे उडवली असती. बरा तू अर्धा-छटाक मागायला नाही आला?’ पुकार्या चिंतामण मागून नम्याच्या पाठीवर थाप मारत टोमणा मारतो.
‘काय आटपला का लिलाव?’ नम्या मान फिरवून चिंतामणला विचारतो.
‘झाला बाबा! तू काय काम काढलं? अन् हे पाहुणे कोणे?’ चिंतामण अर्ध्याकडे बघत विचारतो.
‘अरे हा अध्वर्यू, माझ्या घराजवळ राहतो. पण माझ्या बॉसला कांदे पाहिजे होते चांगले. मग याला सोबतीला घेऊन आलो इथं!’ नम्या चिंतामणला माहिती देतो. तसे मागचे कर्मचारी दुसरीकडे निघून जातात.
‘मला पण अर्धा-एक किलो कांदे घे बरं का नम्या?’ अर्ध्या बालहट्ट चालू ठेवतो.
‘येड्याहो! इथं एकदोन किलो कांदे मिळायचे आहे का? एखाद्या खळ्यातून दहा-वीस किलोची गोणी देतो थांबा तुम्हाला!’ चिंतामण बोलता बोलता मोबाईल काढतो. काही नंबर शोधू लागतो. तोच एक अडत्या-व्यापारी वाटावा असा एकजण येऊन चिंतामणच्या पाठीवर थाप मारून पँटच्या खिश्यात पाचशेच्या काही नोटा सरकवून डोळा मारून निघून जातो. अर्ध्या एकटक त्या अडत्या-व्यापार्याच्या हालचालीकडे बघत राहतो. किती नोटा असतील त्या? दोन? तीन? की पाचसहा? अर्ध्याला प्रश्न पडतो.
‘चिंताभाऊ तुझ्यामुळं माझा माल उंचात गेला. हे धर.’ म्हणत समोरून एक शेतकरी हात जोडून पुढे येत लगबगीनं खिशातून दोनशे-पाचशेच्या काही नोटा काढून चिंतामणच्या हातावर ठेवतो.
‘अरेऽऽ कश्याऽऽऽला? कामच आहे माझं ते! आणि तुमचा माल पण सुपर होता. तो पाहिल्यावरच धपाधप बीटा पडायला लागल्या. अजून किती बाकी आहे?’ चिंतामण पैसे वरल्या खिश्यात ठेवून विचारपूस करू लागतो.
‘माल डायरेक चाळीत टाकायचा होता, पण भाव बरा वाटला मग ही एक साठी सहज आणून पाहिली. आता कश्याला चाळी भरतो मी? नंतर काय होतं? कुणी पाहिलं? आता आठवडाभरात सगळा कांदा काढूनच टाकतो.’ भावानं हुरळलेला शेतकरी भडाभडा बोलतो.
‘हां या मग! मी आहेच इथं पुकारायला!’ चिंतामण शेतकर्याला भरीला घालतो. शेतकरी आनंदानं हात हलवत आपल्या गाडीकडं निघून जातो. अर्ध्या मात्र बारकाईनं सगळं बघत राहतो.
‘हा, नमित शेठ! तुम्हाला कांदे पाहिजे नाही का? थांब. फोन लावतो एक!’ चिंतामण बोलता बोलता कानाला मोबाईल लावतो, मान-खांद्याच्या बेचक्यात मोबाईल ठेऊन एक हातानं तंबाखू काढतो, दुसर्या हातावर घेऊन ती मळू लागतो. हां, हुं करत गाडीच्या पलीकडं जातो.
‘काय रे हा देईल ना कांदे?’ अर्ध्या भाबडेपणाने विचारतो.
‘अरे तो पुकारायला राहतो. त्याला कोण नाही म्हणंल? तो कुठूनबी कांदे पैदा करील.’ नम्या अर्ध्याला उत्तर देतो, पण तोही त्याच प्रश्नानं टेन्शनमधी येतो.
‘का रे? त्या माणसानं चिंतामणच्या खिश्यात अलगद पाचशेच्या काही नोटा का टाकल्या?’ अर्ध्या निरागसपणे त्याला डाचणारा सवाल करतो.
‘तो व्यापारी होता. त्याला काही नग स्वस्तात नाहीतर कमी भावात सुटले असतील. त्याच्यामुळं त्यानं पैशे दिले असतील.’ नम्या केवळ उत्तर देतो.
‘एवढे?’ अर्ध्याला प्रश्न पडतो.
‘हा बाजार आहे. इथं हरेक गोष्टीची किंमत रहाते. फुकट काहीच मिळत नाही. आणि तो चिंत्या परमनंट थोडीच आहे का? रोजंदारीवर आहे तो. अशे वरच्यावर तो पैशे घेणारच. तरच परवडंल त्याला. ह्या एवढ्या रोजावर खळ्यात मजूर मिळत नाही. वरकमाई नसती तर यानी हे केलं असतं का?’ नम्या अर्ध्याला विस्कटून सांगतो. तसा अर्ध्याच्या डोक्यात प्रकाश पडतो.
‘झालं बरं का काम? दोन वीस किलोच्या गोण्या येतील. एक माझी! एक तू घेऊन जाय.’ चिंतामण कानाचा मोबाईल खिश्यात ठेवत त्यांच्याकडं पुन्हा येतो.
‘मला अर्धा-किलो…’ अर्ध्या मध्येच गागून उठतो.
‘अरे येड्या, एव्हढे थोडेच देयचे आहे का? बॉसला कांदे? ते मी घरीच नेईन. तुला त्याच्यातून घेयचे तेव्हढे ने.’ नम्या अर्ध्याला चूप करत बोलतो.
‘अन् पैशे?’ अर्ध्या काही गप्प बसायचं नाव घेत नाही.
‘अय पैशेवाल्या! नम्याकडं बघून गोणी देतोय. मैत्रीखातर! मैत्री विकायला नाही काढली मी! काय?’ चिंतामण खवळतो.
‘अय गप्प!’ नम्या अर्ध्याचा हात दाबत त्याला दटावतो. ‘तुझं परमनंट व्हायचं कुठंवर आलं चिंत्या?’ नम्या झटकन विषय बदलतो.
चिंत्या केवळ हसतो. तोंडातला गुटखा थुकत बोलू लागतो. ‘ह्या पहाय! इथं चेअरमन बनायला पेट्या-गड्ड्यांच्या बाता होतात. इलेक्शनला एक एक मेंबर निवडून यायला कमसे कम दर मताला हजार-दोन हजार भाव चालुय! तव्हा नवीन भरती करायला कमीतकमी कॅटेगरीवाल्याला बी वीस मोजावे लागतील. तर आपल्या सारख्या ओपनवाल्याला ते ओपनमधीच…’ चिंतामण भेसूर हसत तीच हाताची मूठ मिशीवरून फिरवतो.
‘पण पात्रता बघून, काम पाहून काही..?’अर्ध्या पुन्हा मध्येच तोंड मारतो.
‘इथं फक्त दामच पाहिलं जातं. तो गनमन्या पाहिला का? एक कामाला चार चक्कर मारील. पण क्ष्टं काही करणार नाही. तो बापानं पैशे भरून सौदेलिपीक केलाय. इथं ज्याचा सौदा मोठा, बोली मोठी. माल त्याचा. हे पहाय, नवीन हमाल-मापारी भवन बांधू राहिले. त्याच्या विटा सहाय्यक सचिवाच्या हॉटेलला जात्याय, अन् शिमेंट कोषापाल खातोय. टेंडर चेअरमनच्या साल्यानं घेतलंय. ज्याची बोली मोठी, त्याची झोळी मोठी! इथं सगळं विकाऊ आहे.’ पुकार्या पुकारून जातो.
अर्ध्या शेतकरी हिताचं कुठलंसं बाजार समितीच्या बोर्डवरचं ब्रीद वाक्य वाचून बघू लागतो.
.

