
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीनिमित्त रहिमाबाद येथील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर भाजपच्या काही स्थानिक हिंदुत्ववादी तरुणांनी मंदिरात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला. छोट्याशा घटनेलाही हिंदू- मुस्लिम वादाची फोडणी देण्यासाठी भाजप निमित्त शोधत असते, हे पुन्हा एकदा उघड झालं.या घटनेनंतर भाजपच्या तथाकथित आध्यात्मिक आघाडीचा वाचाळ प्रमुख तुषार भोसले (मूळ आडनाव शाळीग्राम) यानेही अब्दुल सत्तार यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? अशी विचारणा केली. त्यावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी (हे डुप्लिकेट) भोसले हे शंकराचार्य आहेत का, असा प्रतिसवाल उपस्थित केला.
महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र उपवास करण्यात येतो. परंतु अब्दुल सत्तार हे सकाळी-सकाळी मांसाहार करून बाहेर पडत असल्याने रविवारी देखील ते तसेच बाहेर पडून दर्शनासाठी दाखल झालेले असतील, असा संशय व्यक्त करून काही तरुणांनी ते येऊन गेल्यानंतर महादेव मंदिरात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत पुजार्यांच्या हस्ते गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा अनाठायी प्रयत्न केला. सत्तारांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले, याचे स्वागतच करायला हवे असे दानवे यांनी म्हटले. भाजपचे हिंदुत्व असेच संकुचित विचाराचे आहे, पण हिंदू धर्म हा सर्वांना सामावून घेणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. हीच शिवसेनेची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. शिवसेना भाजपप्रमाणे हिंदुत्वाचा खोटा मुखवटा धारण करीत नाही.
परभणी येथे सय्यद इक्बाल यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महापौरपदाची संधी दिली. भाजप व शिंदेसेना यांचे नेते अचानक मूळ शिवसेनेला हिंदुत्व शिकवायला लागले. पण प्रश्न असा आहे की, याच परभणी जिल्ह्यात जिंतूर नगरपालिकेत महिन्याभरापूर्वी टिकाखान यांच्या आई मेहमुन्निसा पैâज मोहम्मद यांना उपनगराध्यक्ष केले आणि एकूण शिंदेसेनेचे सहा नगरसेवक मुस्लिम आहेत. तेव्हा तुमचे हे बेगडी हिंदुत्व कुठे गेले होते? अंबड (जि. जालना) येथे सना मुस्तकीम पटेल यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देताना व कुर्डवाडी (जि. सोलापूर) येथे समरुनिसा लतीफ मुलाणी यांना उमेदवारी देताना शिंदेसेनेचे तथाकथित हिंदुत्व गाढ झोपले होते का? अब्दुल सत्तार यांना आमदार व मंत्री करताना आणि सिल्लोड येथील नगराध्यक्षपदी त्यांचे चिरंजीव अब्दुल समीर अब्दुल सत्तार असताना तसेच परभणी जिल्ह्यामधील पाथरी नगर परिषदचे अध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान यांना नेमले. ही सर्व मंडळी शिंदेसेनेचीच आहेत ना?
मालेगाव महानगरपालिकेत इस्लाम पार्टीच्या उपमहापौर ‘शान-ए-हिंद निहाल अहमद’ यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचे तैलचित्र ठेवले. त्यामुळे बेगडी हिंदुत्ववाद्यांनी थैयथयाट केला. सर्वत्र गदारोळ झाला. टिपू सुलतान याने हिंदुंचा अन्यायकारक छळ केला आणि अत्याचारही केला, त्यामुळे तो हिंदूविरोधी आणि राष्ट्रद्रोही होता असा मातम भाजप आणि शिंदेसेनेच्या लोकांनी केला. पण हे भाजपवाले सोयीस्करपणे विसरले की भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी याआधी टिपू सुलतानच्या शौर्याचे गुणगान आणि उदात्तीकरणही केले होते. वीर योद्धा टिपू सुलतानावरून राज्यात गदारोळ सुरू असून मतांच्या धु्रवीकरणासाठी भाजपचे विकृत धर्मांधतेचे राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. टिपू सुलतानला विरोध हा भाजपाचा दुटप्पीपणा असल्याची टीका झाली. कारण टिपू सुलतानचे उदात्तीकरण इतर सर्व पक्षांपेक्षा भाजपने अधिक केले आहे असा इतिहास सांगतो.
अकोला महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाचे नाव ‘शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान’ ठेवण्याचा प्रस्ताव माजी महापौर आणि भाजपचे अकोला महापालिका निवडणूक प्रमुख विजय अग्रवाल यांनी २०१२मध्ये मांडला होता. मुंबईतील एम-पूर्व प्रभागातील रस्त्याला ‘शहीद टिपू सुलतान मार्ग’ नाव देण्याच्या २०१३मधील प्रस्तावाला सध्याच्या महापौर रितू तावडेंसह २१ भाजप नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. या ठरावाचे अनुमोदक भाजपचे अमित साटम होते. २००१ साली अंधेरीतील मार्गाचे ‘शेरे म्हैसूर टिपू सुलतान मार्ग’ नामकरण करण्यासाठी भाजपचे गोपाळ शेट्टींच्या उपस्थितीत ठराव पास केला होता.
गंमत म्हणजे भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टिपू सुलतानच्या शौर्याचा उदो-उदो केला आहे. संघ पुरस्कृत प्रकाशन संस्थेने मुलांसाठी काढलेल्या ‘भारत भारती’ या मालिकेत टिपू सुलतानवर कथा लिहिली होती. तर १९९१ ते ९४दरम्यान भाजपचे उपाध्यक्ष असलेले के.आर. मलकानी यांनी आपल्या ‘इंडिया फर्स्ट’ या पुस्तकात द ग्रेटनेस ऑफ टिपू सुलतान या शीर्षकाचे एक प्रकरण लिहून टिपूवर स्तुतीसुमने उधळली होती.
शिवसेना फोडणार्या शिंदेसेनेच्या गद्दार लोकांपेक्षा मूळ शिवसेनेचा परभणी शहराचा निष्ठावान महापौर सय्यद इक्बाल केव्हाही चांगला. परभणीमध्ये २०२३ साली शिवपुरा महाकथेसाठी त्याने स्वतःच्या उभ्या ६० एकर पिकांवर ट्रॅक्टर फिरवून हिंदुंसाठी शिवपुराण कथेचा कार्यक्रम केला होता. सय्याद इक्बाल आधी तालुकाप्रमुख होता. त्याचे शिवसेनेतील कार्य, निष्ठा पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी शहराच्या महापौरपदाची उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले.
१९९५-९९दरम्यान महाराष्ट्रात शिवशाही सरकार होते. तेव्हा वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबीरभाई शेख यांना कामगार मंत्री केले होते. साबीर शेख जन्माने मुस्लीम होते. परंतु त्यांच्या तोंडी अभंग, कवन, हिंदू देवतांच्या आरत्या सतत असत. ते ज्वलंत शिवप्रेमी होते. शिवाजी महाराजांवर अस्खलित मराठी भाषेतून स्फूर्तिदायक कथाकथन करीत असत. शिवसेनेचे हिंदुत्व हे तोंडापुरते नाही आणि निवडणुकांपुरते नाहीच नाही. राष्ट्रप्रेमी मुसलमानांचा शिवसेनेने नेहमीच आदर-सन्मान केला आहे. शिवसेनेचे वर्सोवाचे विद्यमान आमदार हारुन खान आहेत. तर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी हे मुस्लिम आहेत.
भाजपने या देशात मुसलमान नको म्हणायचे, त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणायचे आणि दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानात जाऊन हिंदुस्तानच्या फाळणीचे जनक असलेल्या महमद अली जीना यांच्या कबरीवर चादर चढवायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिनाबुलाये पाकिस्तानात जाऊन नवाब शरीफ यांच्या वाढदिवशी केक कापला आणि खाल्ला. पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करतो असे म्हणायचे आणि पैशासाठी आशिया आणि वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचे. पाक दहशतवाद्यांनी पहलगामची क्रूर घटना घडवून आणली. स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणवणारे भाजप सरकार हिंदू महिलांच्या ़कुंकवाचे रक्षण करू शकले नाही. तरी भाजप नेते म्हणतात की, आम्ही हिंदूंचे रक्षणकर्ते आहोत. भाजपाचा हा दुतोंडीपणा आहे म्हणूनच भाजप हा दोन तोंडाचे ‘मांडूळ’ आहे असा आरोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता.
दहा वर्षांपूर्वी याच भाजपाने सत्तेसाठी पाकिस्तानी आतंकवाद्यांची तळी उचलणार्या पीडीपी पक्षाच्या मेहबूब मुफ्तीबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली होती. काश्मिरी पंडितांची घरे उद्ध्वस्त होत असताना दहशतवाद्यांचे समर्थन करणर्या पक्षांच्या नेत्यांबरोबर ते इफ्तार पार्ट्या झोडत होते. तेव्हा कुठे गेले होते यांचे कट्टर हिंदुत्व?
काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले. काश्मीरचा राज्य दर्जा बरखास्त केला. तरी काश्मीरमधील दहशतवाद काही थांबला नाही. भाजप सरकार हिंदू काश्मीरी पंडितांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करू शकले नाहीत. कारण भाजपला हिंदू काश्मीर पंडिताच्या पुनर्वसनाचा प्रश्न जिवंत ठेवायचा आहे आणि पेटता ठेवायचा आहे. म्हणजे निवडणुकीसाठी त्याचा वापर करता येईल. तेव्हा भाजपचे हिंदुत्व हे निवडणुका जिंकण्यापुरते असते.
हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्यासाठी भाजप निमित्तच शोधत असतो. जुलै २०२५मध्ये ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरून महाराष्ट्रात वादळ उठलं होतं. या चित्रपटाच्या टीझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लीम होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ मुस्लीम अंगरक्षक होते असे उद्गार एका व्यक्तिरेखेने काढले आहेत. यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी या सिनेमाचे प्रदर्शन रोखले. छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखविल्याचा त्यांचा आरोप होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महायुती सरकारने तत्परतेने कारवाई करून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. तेवढी तत्परता भाजपने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल काळी टोपीवाले भगतसिंग कोश्यारी यांनी जिजामाता, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी काढलेल्या गैरउद्गारांविषयी दाखविली नाही. साधा निषेधही नोंदवला नाही. अभिनेते राहुल सोलापूरकर आणि तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर या दोघांनी तरी शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य केलं होतं. तेव्हा महायुती सरकार आणि या तथाकथित हिंदुत्ववादी संघटना कोणत्या बिळात लपल्या होत्या? शिवप्रेमींचा संताप आणि तीव्र विरोध पाहिल्यानंतर कोरटकर आणि सोलापूरकरवर सौम्य कारवाई केल्याचे नाटक भाजपाच्या सरकारने मात्र केले.
नुकतेच संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मुंबईत येऊन गेले. संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त संघ कसा आहे, संघाचे उद्दिष्ट काय आणि संघाविषयी अन्य माहिती देण्यासाठी मुंबईतील सेलिब्रिटी आणि भक्तगणांच्या उपस्थितींची जत्रा भरवली होती. या जत्रेत हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान आणि गायक-संगीतकार अदनान सामी यांना आवर्जून आमंत्रण दिले होते. नुसते आमंत्रण नव्हते तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांच्याबरोबर डिनरही केले. सलमान खानवर ‘हिट अँड रन’ व ‘हरणाची बेकायदा शिकार’ असे आरोप आहेत. अदनान सामीचे आजोबा यांनी पाकिस्तान हवाई दलाचे अधिकारी असताना १९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतावर हवाई हल्ला करणार्या एका तुकडीचे नेतृत्व त्यांनी केले होते. अशा राष्ट्रद्रोही कृत्य करणार्या मुसलमानांना संघाच्या कार्यक्रमाला आवर्जून बोलावून खाऊ-पिऊ घातले जाते, हे भाजप व संघाने भारतीय सैनिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.
तुम्ही केलंत तर चमत्कार आणि दुसर्यांनी केला तर अत्याचार? राजकारणात एकच मापदंड असावा. सत्ता मिळाली की ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणायचं आणि विरोधकांनी सर्वसमावेशक निर्णय घेतला की आक्षेप घ्यायचे हा दुतोंडीपणा भाजपा आणि शिंदेसेनेलाच शोभतो!

