साप्ताहिक मार्मिकचा वर्धापनदिन आणि देशाचा स्वातंत्र्यदिन यांची एक पक्की सांगड आहे. बाळासाहेब आणि श्रीकांतजी या ठाकरे बंधूंनी मार्मिकची गुढी रोवताना मुहूर्त धरला होता तो त्यांना आदरस्थानी असलेले आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जन्मदिनाचा… १३ ऑगस्टचा. पाठोपाठ दोनच दिवसांनी स्वातंत्र्यदिन येतो. त्यामुळे दरवर्षी मार्मिकच्या वर्धापनदिनाचे मुखपृष्ठचित्र एक तर वर्धापन दिनाशी, मार्मिकशी संबंधित असायचे किंवा स्वातंत्र्यदिनाशी संबंधित असायचे. १७ ऑगस्ट १९८० या तारखेच्या अंकाचे हे मुखपृष्ठचित्र मात्र मार्मिकचा वर्धापनदिन आणि देशाचा स्वातंत्र्यदिन या दोहोंचीही सांगड घालणारे आहे, हे त्याचे वैशिष्ट्य. इथे मार्मिकला बाळासाहेबांनी एका संतप्त युवकाचे, आजच्या भाषेत बोलायचे तर जेन झी युवकाचे स्वरूप दिले आहे. स्वातंत्र्याचा झेंडा फडकावण्याचा मान इथे काळाबाजारवाले, साठेबाज, स्मगलर, दारूभट्टीवाले यांना मिळालेला दिसतोय… म्हणजे सगळीकडे त्यांचं प्रस्थ माजलंय, जणू त्यांनाच दोन नंबरचे काळे धंदे करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे… मार्मिक त्यांना संतापून बजावतो आहे की तुमच्या पापी हातांनी तो पवित्र ध्वज मलीन करू नका… नाहीतर जनतेला जागृत करावं लागेल… आज देशाचं स्वातंत्र्य अशाच भांडवलशहांकडे गहाण पडलेलं आहे, अमेरिकेसारखा देश आपल्या सार्वभौमत्वालाच आव्हान देईल, अशा प्रकारे आपल्याला वळवतो, वाकवतो आहे. मात्र, अशा काळात धर्माची भूल पडलेली जनता कोणाच्याही प्रयत्नांनी जागृत होईल का? हा फार मोठा प्रश्नच आहे.

