इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करताना जे होतं, ते पोलीस खात्यातही होतंच… बर्याचदा आपल्याला अजिबात न आवडणार्या ठिकाणी कामासाठी जावं लागतं… अशा ठिकाणी जावे लागणार आहे, हे ऐकल्यावर आपला हिरमोड तर झालेला असतोच, पण आपल्या मनात एक दूषित पूर्वग्रह असतो, त्यामुळे अशा ठिकाणी काम करताना मन रमत नाही, ते काम खूप कंटाळवाणे वाटते. काम पूर्ण करताना वेळ जाता जात नाही. रोज नाना प्रकारचे पन्नास प्रश्न आ वासून उभे राहिलेले असतात. पण शेवटी प्राप्त परिस्थितीत, प्राप्त साधनांनीच आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो… खरे तर आनंद तिथेच असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. संत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेत ‘बरे झाले…’ या शीर्षकाचे अनेक अभंग आहेत. बरे झाले देवा कुणबी केले, बरे झाले देवा व्यापार बुडाला आणि यामुळेच मला तुझ्या नामाची आणि भक्तीची गोडी लागली असे तुकोबाराय म्हणतात. ही पराकोटीची सकारात्मकता आहे. तुकोबाराय सगळ्या परिस्थितीबद्दल, आयुष्यातल्या वाताहतींबद्दल बोलतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. यात बरे झाले असं म्हणण्यासारखं काय आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण, या सगळ्यांमधून बोध घ्यायची गोष्ट म्हणजे प्राप्त परिस्थितीत, प्राप्त साधनांत तुम्हाला आनंदाने जगता आलं पाहिजे, हेच खरे जगणे होय. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात, त्यातली तुम्ही कुठली घेता यावर सारे अवलंबून असते. माझ्याही नोकरीच्या काळात अशा अनेक घटना, गोष्टी घडल्या… त्यापैकी एक-दोन सांगतो.
२००५मध्ये मी हिंजवडी पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक होतो. चांदणी चौक हा हिंजवडी पोलीस कार्यक्षेत्रात (आमच्या भाषेत आमच्या हद्दीत) येत होता. ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वात जास्त वाहने या चौकातून जात असत. सुमारे आठ दहा हजार कार तेथून जात-येत. त्यावेळी तेथे दुहेरी वाहतूक होती. या पॉइंटवर प्रचंड ताण येत असे. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांना तिथे उपस्थित राहावे लागे. सर्वजण मस्त ‘थर्टी फर्स्ट नाइट’ सेलिब्रेट करताहेत आणि आपण काठी आपटत बंदोबस्त करतोय हे जरा मनाला वेदना देणारे होते.
मग मी गंमत केली, दोन दिवस आधी चौकात गेलो. तिथे एक जागा निवडली, १५ बाय १५ फुटांचा मंडप टाकून घेतला. त्याला रंगीत कमानी लावून घेतल्या, खाली संपूर्ण लाल कार्पेट टाकले, मंडपवाल्यांकडून छान सोफे आणि टीपॉय आणले. उत्तम शामियाना तयार झाला. पब्लिक अॅकड्रेस सिस्टीम (लाऊड स्पीकर) लावला. नवीन वर्षाचे अभिनंदन करणारा फ्लेक्स लावला. लोकांचे अभिनंदन करण्यासाठी आणि बंदोबस्ताच्या सूचना देण्यासाठी एक कर्मचारी नेमला. थोडेसे स्नॅक्स, चहा, कॉफी तिथे ठेवली.
त्यामुळे झाले काय की पेट्रोलिंग करत असताना सर्व वरिष्ठ अधिकारी आले आणि मंडप बघून तिथे येऊन बसले. त्यात अगदी सीपी सर, जॉइन्ट सीपी सरही होते. समाजातील प्रतिष्ठित लोक, पत्रकार हेही थांबून शुभेच्छांची देवाणघेवाण करून जाऊ लागले. म्हणजेच काय एकीकडे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर काटेकोर नजर राहिली, बंदोबस्त तगडा राहिला, चांगला अनुभव मिळाला आणि नववर्षाची धमाल पण आली.
दुसरी आठवण नागपूरच्या बंदोबस्ताची. पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त असताना एकदा नागपूरला हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पाठवले गेले. या कामाला पहिल्यांदाच चाललो होतो, त्यामुळे विशेष वैताग आला नाही. परंतु एका वरिष्ठ अधिकार्यांच्या ‘अतिप्रेमा’मुळे सलग दुसर्या वर्षीही याच बंदोबस्ताला पाठवणी झाली. वास्तविक बाहेरगावचा आणि जास्त दिवस असणारा बंदोबस्त टर्न बाय टर्न दिला जातो… पण असो! एकदा जबाबदारी आलीच म्हटल्यावर ठरवलं की जायचं, कामही करायचं आणि मजाही करायची.
विधान भवनाच्या परिसरातील व्हीआयपी पार्किंगच्या बंदोबस्ताची ड्युटी मिळाली. जबाबदारीचे काम होते. सदर बाजारात नागपूरच्या मित्राने एक लॉज बुक करून दिला होता. तो विधानभवनापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर होता. मित्राचा एक फर्निश्ड फ्लॅट मिळाला होता, पण तो कामाच्या ठिकाणापासून दूर होता. माझ्याबरोबर आलेल्या कर्मचार्यांना राहण्यासाठी तो दिला. सदर बाजारात लॉजसमोर पुण्यातल्या रूपाली, वैशालीसारखी सुप्रसिद्ध उडपी हॉटेल्स आहेत. सगळे नागपूरकर मॉर्निंग वॉक करून नाश्ता करायला व फिल्टर कॉफी प्यायला तिथे येतात. लॉजपासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर सेमिनरी हिल ही नागपूरची प्रसिद्ध टेकडी आहे. वनखात्याने तिथे उत्तम जंगल मेंटेन केलेले आहे. रोज सकाळी तिथे जायचे, मॉर्निंग वॉक घ्यायचा. पंधरा दिवसांत खूप लोकांची ओळख झाली. नागपुरी भाषेत गप्पा व्हायच्या. परत येऊन फिल्टर कॉफी घ्यायची आणि मग नऊ वाजता पुन्हा ड्युटी सुरू. दुपारच्या जेवणासाठी रोज नवीन सावजी हॉटेल्स शोधायचं. संध्याकाळी ड्युटी आटोपल्यावर नागपुरातील बॅचमेट्स, मित्र, नातेवाईक यांच्या घरी जेवण-गप्पा.
बॅचमेट्सबरोबर गेट टुगेदर असे रोज होत होते. एरवी खास रजा काढून नागपूरला असं जाणं कधी झालं असतं का?
शनिवार-रविवार विधानसभेला सुट्टी असे; पण शाही फर्मान निघाले की तुम्ही सुट्टी घेऊ शकता, पण पुण्याला जाता येणार नाही. मग काय, नागपूरच्या आजुबाजुची बहुतेक जंगले, प्रेक्षणीय स्थळे पालथी घातली. बायकोलाही बोलवून घेतले. ताडोबा अभयारण्यात मस्त फिरलो. मजा केली. बंदोबस्ताचा किंवा घरापासून दूर असण्याचा ताण जाणवलाच नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला लोकसंपर्काची खूप आवड आहे आणि नागपूर अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अधिकारी येतात. गावचे पुढारी, पत्रकार हेही राज्यभरातून येतात. त्यामुळे अनेक जुने अधिकारी मित्र, पत्रकार मित्र, लोकप्रतिनिधी यांची निवांत भेट झाली, तो एक वेगळाच आनंद होता.
खात्याअंतर्गत अनेक ट्रेनिंग्ज, सेमिनार येत असत. त्यांच्यासाठी बाहेर जायला बरेचसे अधिकारी नाखूश असतात. मी मात्र हौसेने ते ट्रेनिंग मागून घेत असे. ते इंटरस्टेट ट्रेनिंग असे किंवा राज्यांतर्गत असे. त्यातून बाहेरून येणार्या अनेक अधिकार्यांशी ओळख, इंटरॅक्शन होते, मैत्री होते, त्यांच्या कामकाजाची माहिती मिळते, त्याने आपल्याला मदतच होते. एक वेगळा चाकोरीबाहेरचा आनंद आपल्याला मिळतो.
आमच्या खात्यात दिवाळीत रजा मिळणे कठीण असते आणि मिळाली तरी ती एक-दोन दिवस मिळते. त्या काळात मी ऑफिसमध्ये चिवडा, लाडू, चकली, करंजी हे फराळाचे पदार्थ आणून ठेवत असे. हाताखालील अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत यांना तो फराळ देऊन दिवाळीचा आनंद घेत असे.
बर्याचदा असे घडते की एखादे जबाबदारीचे कष्टप्रद काम आपल्यावर सोपवले जाते तेव्हा ती आपल्याला आपत्ती वाटते. पण, खरे तर ती तुम्हाला स्वतःला सिद्ध (प्रूव्ह) करण्याची संधी देणारी इष्टापत्ती असते. ते काम केल्याने आपण हे कामही करू शकतो, हा आत्मविश्वास येतो आणि वरिष्ठ अधिकार्यांना आपल्या कर्तृत्वाबद्दल खात्री पटते.
एकदा मी पुण्यात एसीपी ट्रॅफिक होतो, त्यावेळी माझ्या कामाचा कोणताही भाग नसलेली एक जबाबदारी आयुक्तांनी माझ्यावर टाकली. गणेशोत्सव जवळ येत होता. पुण्यातला उत्सव तर जगभर प्रसिद्ध आहे. उत्सवकाळात घातपात होण्याची शक्यता होती. यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसराची अतिरेक्यांनी रेकी केल्याचे समोर आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार होता. पोलीस संख्याबळ अपुरे होते, म्हणून आयुक्तांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच हजार विद्यार्थ्यांना मदतीसाठी घेण्याचे ठरवले. या मुलांना जुजबी कायद्याचे प्रशिक्षण, बंदोबस्ताचा वेळी काय करावे-काय करू नये, याबाबतचे प्रशिक्षण, मोटिवेशन देणारे व्याख्यान द्यायचे, असा कार्यक्रम ठरला. त्यासाठी पोलीस मुख्यालयाची जागा निश्चित करण्यात आली. रोज ५०० मुलांना प्रशिक्षण सुरू केले. त्यात त्यांची नावे नोंदवणे, रोज एक मोटिवेशनल स्पीकर आणणे, बाँबशोधक आणि नाशक पथकाकडून बाँबसंदर्भातले प्रशिक्षण, ब्रेकफास्ट, लंच अरेंज करणे, अशी दिनचर्या होती. ती दहा दिवस विनाखंड सुरू होती. रोज त्यांना प्रशस्तीपत्र द्यावे लागे, तसेच प्रायोजक गाठून या पाच हजार मुलांना टी शर्ट, कॅप आणि शिट्टी देऊन त्यांचा युनिफॉर्म तयार करण्यात आला होता. गणपती उत्सवाच्या वेळी ही मुले ज्या ठिकाणी राहत होती, त्याच्या जवळचे बंदोबस्ताचे ठिकाण त्यांना देण्यात आले. बंदोबस्ताच्या काळात मुलांना येणार्या अडीअडचणी सोडवणे, रात्री उशीर झाल्यास मुलींची घरी जाण्याची व्यवस्था करणे, इत्यादी कामे करावी लागली. हे खूप अवघड काम होते. परंतु पहिल्या दिवसापासूनच मी या कामात रुची घेतली होती; त्यामुळे या काळात मला अजिबात त्रास झाला नाही. हाताखालील अधिकारी आणि कर्मचार्यांची एक मस्त टीम तयार झाली होती. अर्थात त्यांच्याखेरीज हे टीमवर्क शक्य नव्हते, माझा देखील आत्मविश्वास वाढला. याला कोणतेही काम दिले तर ते चोखपणे पार पडते, असा विश्वास वरिष्ठांमध्ये निर्माण झाला.
बर्याचदा मनासारखे, चांगले पोस्टिंग मिळत नाही, म्हणून लोक कुढतात. पण, चांगले पोस्टिंग वगैरे काहीही नसते, तुम्ही त्या पोस्टिंगला न्याय देऊन तुमचे काम किती उंचीवर नेऊन ठेवता यातच त्या पोस्टिंगचे यश दडलेले असते. आहे ते काम अधिक ऊर्जेने, प्रामाणिकपणे केले तर आणि तरच त्याचा आनंद तुम्हाला मनापासून घेता येते.
तालुक्याच्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून काम करताना अन्य सरकारी खात्यांतील अधिकारी कॉम्प्लेक्स ठेवून वागतात. त्यामुळे सुसंवाद राहत नाही. यासाठी मी जिथे जिथे पोस्टिंगला गेलो आहे, तिथे तहसीलदार, बीडीओ, सरकारी डॉक्टर, सरकारी वकील आणि शक्य झाल्यास न्यायाधीश, फॉरेस्ट ऑफिसर, राज्य उत्पादन शुल्क प्रमुख, जनावरांचे डॉक्टर इत्यादी अधिकार्यांचा एक क्लब निर्माण करून महिन्यातून एकदा गेट टुगेदर ठेवत असे. आळीपाळीने यापैकी एकाकडे त्याचे यजमानपद असे. त्यामुळे सर्व अधिकार्यांमध्ये अहंकार न राहता मैत्री होत असे, त्याचा चांगला फायदा प्रत्येकाच्या कामात होत असे.
थोडक्यात काय, एखाद्या कामाकडे आपण कसे बघतो हे महत्त्वाचे. तेव्हा कामामध्ये सकारात्मकता कायम असू देत! तुम्ही कुठेही असा.

