
प्रबोधनकार पुण्याहून दादरला आले आणि आजारपणामुळे त्यांना इथेच अडकून पडावं लागलं. तिथे उभा केलेला प्रबोधनचा सगळा संसार उद्ध्वस्त झाला. अंथरुणावर खिळून पडल्यामुळे त्यांना त्यासाठी काही करताही येत नव्हतं. पण पुन्हा एकदा उभं राहावंच लागणार होतं. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा दादरने हात दिला.
*****
इथे मुंबईत जीवघेण्या आजारपणात प्रबोधनकार अंथरुणाला खिळून हतबल पडलेले होते आणि तिथे पुण्यात अथक संघर्षातून उभं केलेलं प्रबोधनचं अस्तित्व धुक्याप्रमाणे नाहीसं होत होतं. प्रचंड दारिद्र्य ना प्रबोधनकारांना नवीन होतं, ना रमाबाईंना. दोघांनीही लहानपणी ते अनुभवलं होतं. दोन वेळ पोटभर खायला नसल्याचे दिवस दोघांनीही तेव्हा अनुभवले होते. पण १९२७ साली परिस्थिती वेगळी होती. प्रबोधनकारांनी वयाच्या चाळीशीपर्यंत कर्तृत्वाच्या जोरावर कुटुंबाला सुखाचे दिवस आणले होते. ते भरभराटीचे नव्हते, पण समाधानाचे नक्की होते. संकटंही त्यांना नवी नव्हतीच आणि संकटांवर मात करणंही नवं नव्हतं. पण संकटांशी दोन हात करताच येणार नाहीत, अशी परिस्थिती मात्र पहिल्यांदाच उभी होती.
घरातली एकामागून एक आजारपणं संपत नव्हती. स्वतः आजारपणामुळे अंथरुणावर हतबल पडून राहावं लागत होतं. कोर्टाची समन्स येत होती. पण अशा परिस्थितीतही प्रबोधनकारांनी मित्रांकडून पैसे गोळा करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. त्या भीषण परिस्थितीशी झुंजण्याचं वर्णन त्यांनी शनिमाहात्म्य ग्रंथात केलं आहे. ते असं, रात्रंदिवस चिंतेने आणि खेदाने मस्तक पोखरले. त्यात सावकारांचे तगादे आणि समन्सांच्या बजावण्या (जप्त्या आणि पकड वॉरंटाचे विधीच काय ते व्हायचे राहिले आहेत. संस्कारच ते! ते नाहीत झाले तर मी संस्कृत होणार कसा?) आजारी अवस्थेत सुद्धा पैशाची जमवाजमव करून घसरत्या परिस्थितीला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण दोन तीन अपवाद खेरीज करून, बाकीच्या सर्व धनिक मित्रांनी `आज या उद्या या आशीर्वादाने माझी हेटाळणी मात्र केली. निसरडेच ते! त्यावर मी कितीसा कसरत करणार? अखेर पडलोच खाली जमीनदोस्त. विचारयंत्र बंद, लेखणी सांदीला, सभोवार अंधार!`
प्रबोधनकारांसाठी सगळंच जमीनदोस्त झालं होतं. मासिक प्रबोधन, साप्ताहिक लोकहितवादी आणि प्रबोधन छापखाना सगळं बंद पडलं होतं. आपल्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास असणार्या अत्यंत स्वाभिमानी प्रबोधनकारांना नातेवाईकांचं आश्रित बनावं लागलं होतं. दादरला राहणारे लहान भाऊ यशवंतराव ठाकरे आणि मेहुणे कृष्णराव गुप्ते यांनी त्यांना सांभाळलं. आजवर जो सगळ्यांचा आधारवड होता, तोच आता दुसर्याकडे आधाराला आला होता. प्रबोधनकार लिहितात, धाकट्या बंधूने आणि मेहुण्याने मला सहकुटुंब सहपरिवार पोसून शक्य तो योगक्षेम चालवावा आणि मी आकाशाकडे पाहत स्वस्थ बसावे. वाचकांनी या भयंकर स्थित्यंतराची करवेल ती कल्पना करावी.
प्रबोधनकार कमालीचे अस्वस्थ झाले होते. ही परिस्थिती वर्णन करताना त्यांना होणार्या प्रचंड वेदना शब्दाशब्दांतून जाणवतात, शनिमाहात्म्यातील विक्रमाचे हात पाय एकदाच तुटले. वर्तमान हिंदी परिस्थितीच्या वातावरणात शेकडो विक्रमांचे हात पाय शेकडो वेळा तुटत आहेत. माझीच कर्मकहाणी पहा. सात आठ कामगारांच्या संसाराची जबाबदारी सतत चार वर्षे पार पाडणारा मी अखेर सहकुटुंब सहपरिवार धाकट्या भावा, मेहुण्याच्या कृपाछत्राखाली येऊन पडलो. त्यांनी कर्ज करावे आणि आमचा योगक्षेम चालवावा. काल प्रबोधन आणि लोकहितवादी या दुघोडी रथात आरूढ होऊन, कलम- समशेरीच्या तडाक्याने मोठमोठ्या झब्बूंची रग जिरविणारा, भिक्षुकशाहीला दे माय धरणी ठाय करणारा आणि विचारक्रांतीच्या प्रचलित तुफानी वावटळात हजारो वाचकांना निश्चित विचारांची दिशा दाखवून त्यांच्या चित्ताचे रोखठोक प्रबोधन करणारा प्रबोधनकार `आज कसे करू, काय करू`च्या चक्रव्यूहात घायाळ होऊन पडावा काय?
प्रबोधनकार ना कोणत्या एका वैचारिक गटात अडकणारे, ना संघटनेच्या चौकटीत बसणारे. ना एका जातीच्या वर्तुळात स्वत:ला बांधून ठेवणारे. उलट खर्याला खरं म्हणायची वेळ येईल तेव्हा कसलाही विचार न करता आपल्या लोकांवरही टीकेचा आसूड ओढायला मागेपुढे न बघणारे, कमालीचे प्रामाणिक. स्वतःला पटतील त्या विचारांची मशाल घेऊन चालणारे एकांडे शिलेदार. त्यांनी जोडलेली माणसं किती तरी, पण ती ही त्यांच्यासारखीच फाटकी. अनेकदा दुखावलेलीही. बावला मुमताज प्रकरणात त्यांनी होळकरांसारख्या संस्थानिकांची बाजू घेतली होती. पण त्यासाठी त्याच्याकडून एका छदामाचीही अपेक्षा ठेवली नव्हती. जे योग्य वाटलं त्यासाठी खरोखरच सर्वस्व पणाला लावून लढण्याचा संघर्ष त्यांनी अनेकदा केला. त्यामुळे कधी यशाच्या शिखरावर असणारे प्रबोधनकार एका फटक्यात जमिनीवर कोसळल्याची परिस्थिती त्यांच्यावर अनेकदा आली होतीच.
या परिस्थितीचं वर्णनही प्रबोधनकारांनी केलं आहेच, काल घोड्यावर, आज खंदकाच्या धुळीत. काल चांगला सशक्त, आज सर्वस्वी अशक्त. काल चेक खरडीत होतो, आज कोणालाही कार्ड खरडीन तर तर दोन पैशांसाठी बत्तीस दातांची विचकणी. विनंतीचा एक शब्द ऐकताच जो मी माझ्या गरजू मित्रांना ५ ते २०० रुपयांच्या रकमा झटकन उसनवार देणारा, त्या मला आज माझ्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनकार्यासाठी मुर्दाड धनिकांच्या दाढीचे केस मोजण्याचा प्रसंग यावा काय? असे किती आणखी प्रसंग सांगावे!
आश्चर्य म्हणजे शनिमाहात्म्य या पुस्तकात अस्वस्थ होऊन हे वर्णन करणारे प्रबोधनकार या सगळ्या काळाबद्दल आत्मचरित्रात माझी जीवनगाथामध्ये मात्र काहीच लिहीत नाहीत. त्यातल्या आधीच्या प्रकरणाच्या शेवटी गोवा दौर्याचं वर्णन करून प्रबोधनकार अठराव्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच सांगतात, पुणे सोडले, दादरला आलो. पण यातल्या स्वल्पविरामात सामावलेलं प्रचंड दुःख ते उघड होऊ देत नाहीत. ते चार ओळीत हा काळ संपवतात. तितकं ते सहज नव्हतं. प्रबोधनकार लिहतात, लोकमान्यांच्या अवसानानंतर पुण्याचा आणि राजकारणाचा काहीच संबंध राहिला नाही. राजकारण नावाखाली पुणेकर जे ‘राजकारण’ चालवतात त्याचे खरे स्वरूप म्हणजे ‘नागडा उघडा’ जातीयवाद. त्या वादाला कंटाळून म्हणजे त्या वादाचा कडवा उपसर्ग भोगून मी पुण्याला रामराम ठोकला. छापखाना बंद करून दादरला आलो.
हे वर्णन खोटं नाही. पण अर्धसत्य आहे. शनिमाहात्म्य पुस्तकात त्यांनीच या काळाचं पूर्ण सत्य सांगितलं आहे. पुण्यातल्या जातीयवादी राजकारणाला प्रबोधनकार कंटाळले होते हे निर्विवादच. त्याचा त्रासही प्रबोधनकारांना होत होताच. पण त्यामुळे प्रबोधनकार हरले नव्हते. त्यांनी स्वतःहून प्रबोधन छापखाना बंद केला नव्हता. परिस्थितीच अशी आली होती की त्यांच्या नकळत पुण्यात छापखाना बंद केला गेला होता. कोर्टात लढण्यासाठी ते मुंबईला आले होते आणि आजारपणामुळे हतबल होऊन ते दादरला अडकले होते. पण ते या कशाचाच उल्लेख जीवनगाथेत करत नाहीत. बहुतेक त्या वेदनादायी दुःखद आठवणी त्यांना नकोशा असतील. पण शनिमाहात्म्यामुळे त्यांचा हा संघर्षाचा काळ आपल्याला आज माहीत आहे आणि जीवनगाथेमुळे त्यामागचं मूळ कारणही लक्षात येतं. पुण्यातल्या प्रचंड जातीयवादी ब्राह्मणी राजकारणाने त्यांना पुण्यातून दादरला येण्यास भाग पाडलं होतं.
शनिमाहात्म्यांत प्रबोधनकार आपल्यावर आलेल्या या संकटांचं विश्लेषणही करताना दिसतात. या आपत्ती टाळता आल्या नसत्या काय? हा प्रश्न स्वतःच विचारून स्वतःच त्याचं उत्तरही देतात, सगळ्याच नाही, तरी बर्याच खास टाळता आल्या असत्या. मी ज्या आपत्तीच्या चरकात पिळून निघालो, त्याला ग्रहदशा जरी कारण असली, तरी मी त्याचा सर्व दोष माझ्या स्वतःच्या अज्ञानाला देतो. माझे अज्ञानच माझ्या आपत्तींना कारण. ग्रह, ग्रहदशा आणि त्यांचे फेरे या चिजा काय आहेत, या बाबतीत माझी `सबझूट वृत्ती आणि तद्विषयक चिकित्सापूर्वक विचार किंवा अभ्यास करण्याची निवृत्ती, हीच मला विशेष भोवली. आज या ग्रंथात ग्रहदशेच्या फेर्याचा उलगडा करताना मी ज्या निरनिराळ्या दृष्टीकोनांनी माझ्या स्वतःच्याच चरित्राचे आत्मनिरीक्षण केले, त्या दृष्टीकोनांचा ज्योतिषी लोकांच्या अकलेत पुरा खडखडाट. ज्योतिषविषयक मराठी व देशी ग्रंथ पाहिले, तो त्यात सारा पारिभाषिक शब्दांच्या काथ्याकुट्याचा खरकटवाडा! असे का होते? का व्हावे? होत असेल तर कसे टाळावे? असल्या चिकित्सेचा त्यात भरपूर अभाव.`
त्यापुढे जाऊन ते लिहितात, काही कल्पनातीत घटनेचे चमत्कार आणि अपघात वगळले, तर ग्रहदशेच्या बहुतेक आपत्त्या मनुष्यकृत असतात. आणि त्या तशा असल्यामुळे शेराला सव्वाशेर या नात्याने, किंवा परस्पर पावणेतेरा धोरणाने, मनुष्याला त्याच्याशी झुंज घेता येणे शक्य आहे. प्रतिकाराचा मारलेला फटका किंवा प्रयत्नांची हाणलेली डुक्करमुसंडी प्रतिकूल ग्रहदशेमुळे यशस्वी झाली नाही, तर ‘मी प्रतिकाराची आणि प्रयत्नांची शिकस्त केली एवढे समाधानसुद्धा कमी महत्त्वाचे नव्हे.` अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणार्या प्रबोधनकारांना हे समाधान नक्की मिळालेलं असेलच.
प्रबोधनकार मुंबईत आले ते त्यांच्या धाकट्या भावाकडे यशवंतरावांकडे दादरच्या खांडके बिल्डिंगमधे उतरले होते. ती खरं तर तात्पुरती सोय होती. तसं त्यांचं घरं जवळच मिरांडा चाळीत होतं. १९१० साली लग्नाच्या आसपास त्यांनी तिथे बिर्हाड वसवलं होतं. पण दादर सोडून सातार्याला जाताना किंवा त्यानंतर कधीतरी प्रबोधनकारांनी ती जागा त्यांच्या मेहुण्यांना, कृष्णराव गुप्तेंना दिली होती. त्यामुळे तिथे जाता येत नव्हतं. पण दरम्यान पुण्यात काहीच उरलं नव्हतं. पुण्यात पुन्हा सगळं उभारायचं म्हटलं तरी वेळ जाणार होता. त्याआधी मुंबईत पुन्हा एकदा घर शोधावं लागणार होतं. पण तो प्रश्न मिरांडा साहेबाने सोडवला. अनेक मित्र जेव्हा हात वर करत होते, तेव्हा एका ख्रिश्चन माणसाने त्यांना आधार दिला.
प्रबोधनकारांनी या प्रसंगाचं भारी वर्णन केलंय. अंधारात अचानक प्रकाशाचा कवडसा दिसावा, तसा हा प्रसंग प्रबोधनकारांच्या आयुष्यात आलाय. तो त्यांच्याच शब्दांत वाचायला हवा, `संध्याकाळी साहजिकच सौभाग्यवती आपल्या भावाकडे मिरांडा चाळीत जात असताना वाटेत मिरांडा साहेबाची भेट झाली. `काय ताई. केव्हा आलीस? आणि उतरलीस कुठेस?`असे त्याने विचारले.
सौ. : सध्या खांडके बिल्डिंगमध्ये.
मिरांडा : का? तुझी जागा आहे ना वर?
सौ. : पण ती माझ्या भावाला दिली आहे. त्याचाही संसार आहेच ना?
मिरांडा : ते काही नाही. माझ्या एवढ्या चाळी असताना तुम्ही दुसरीकडे रहाणार?
मिरांडाने ताबडतोब माळ्याला हाक मारून तळमजल्यावरचा दोन खोल्यांचा ब्लॉक व्हाईटवॉश करून तयार व्ाâरायला सांगितला. सौ.ला मिरांडा म्हणाले, ही तुझी जागा. उद्याच्या उद्या इथे बिर्हाड घेऊन ये, मी सकाळी येऊन पहातो. अग पोरी, ही चाळ बांधून तयार झाली आणि तुझे लग्न होऊन प्रथम तू पहिलेच बिर्हाड म्हणून या जागेत आलीस. २०-२२ वर्स झाली त्याला. तेव्हापासून या मिरांडाने चार नव्या चाळी उठवल्या. पाहिल्यास ना! हा तुझा पायगुण मी विसरणार नाही. दादरला तू माझ्याच चाळीत राहिलं पाहिजेस. आम्ही दहा महिने त्या जागेत राहिलो. पण मिरांडाने एक छदामही भाडे आमच्याकडून घेतले नाही. एकदा मी भाड्याचा प्रश्न काढताच माझ्यावर उसळून म्हणाला, तुला काय करायचंय. जागा मी ताईला दिली आहे. तुझा संबंध काय. पुन्हा हा प्रश्न माझ्याजवळ काढू नकोस. अशी जिव्हाळ्याची माणसे चालू जमान्यात भेटतील का कधी कुणाला?

