गणपती गेले आणि पितृपक्षाला प्रारंभ होईल. माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याच्या म्हणण्याप्रमाणे पितृपक्षात आपले स्वर्गवासी झालेले वंशावळीतील आप्त म्हणजे पितर जागृत होऊन पृथ्वीवर येतात, तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण आणि खाद्यपदार्थ केळीच्या पानात देऊन तृप्त करावे. ते कावळ्याच्या रुपात येतात. ते आले नाही तर काव काव असे आवाहन करून त्यांना साद घालावी. मग ते नक्की येतात. कधी एकटे तर कधी सहकार्यांसह येतात. मान तिरपी करून एका डोळ्याने पानातले पदार्थ न्याहाळतात. कधी नुसती चोच मारून निघून जातात. ते जेवले की आपला आत्मा शांत होतो, असे पोक्या सांगतो. काही मद्यपान करणारे असले तर त्यांची इच्छा पुरी करावी, म्हणून बुचातून किंवा द्रोणातून त्यांच्या आवडीची दारू, ब्रँडी, व्हिस्की, रम ठेवण्याची पद्धत आहे. सर्वपित्री अमावास्येपर्यंत हे जेवण किंवा वाडी ठेवण्याची पद्धत आहे. ते तृप्त झाले की वर्षभर त्यांची कृपा आपल्यावर राहते, असा पोक्याचा दाट विश्वास आहे.
पाश्चात्य देशांत म्हणजे अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रिेलिया इत्यादी राष्ट्रात अशी पद्धत नाही. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही श्राद्धाचा विधी करत नाहीत, ते आपल्या शत्रूराष्ट्रांचेच श्राद्ध घालण्याचे व्रत प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यातही इराणवर त्यांचे जास्त प्रेम असल्यामुळे त्यांना त्यांचे आयुष्य जगू न देता स्वर्गात किंवा नरकात पाठवण्याचे कार्य ते इमानेइतबारे करत असतात.
आपल्याकडचे कावळे प्रामाणिक असल्यामुळे ते घरी पाहुणे येणार असल्यास खिडकीवर बसून काव काव करत वर्दी देतात तसे विदेशातील कावळे करत नाहीत. कारण त्या देशात संस्कृती-बिंस्कृती या गोष्टी गुंडाळून ठेवलेलेल्या असतात. म्हणूनच आपली भारतीय संस्कृती ग्रेट असल्याचे पोक्या सांगतो. यावेळी पोक्याच्या स्वप्नात पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील स्वर्गवासी झालेले काही नेते आले होते. त्यांनी आपल्या व्यथा पोक्याला सांगितल्या. त्याने त्या मला सांगितल्या. त्याच मी तुम्हाला सांगतो.
महात्मा गांधी : त्या गोडशांनी माझी गोळी घालून हत्या केल्यानंतर माझ्या आत्म्याला आजपर्यंत शांती लाभलेली नाही. उलट आपल्या मायभूमीत त्याला देशभक्त ठरवणार्या त्याच्या पक्षाची वंशावळ राज्यकर्ते बनून नागरिकांना कसे हैराण करत आहे हे पाहून जीव तीळतीळ तुटतो. या देशात विकासाच्या नावाखाली जनतेची चाललेली लूटमार म्हणजे सामान्य माणसाला जगणे मुश्कील करण्याचा डाव वाटतो. आमच्या गुजरातचे नाव बदनाम करण्याचा चंगच या राज्यकर्त्यांनी बांधला आहे. आम्ही या देशासाठी काय त्याग केला याचा मागमूसही स्वत:ला बलाढ्य समजणार्या या नेत्यांना नाही. आम्ही केवळ पंचा नेसून जगभर फिरलो आणि यातला एकजण दिवसाला किती उंची ड्रेस बदलून सार्या जगाची सफर करतो, हे पाहून आश्चर्य वाटते. यांनी या देशातले सर्व कायदे आणि न्यायव्यवस्था यंत्रणा आपल्या मर्जीनुसार राबवल्या. भ्रष्टाचाराला इतके उदंड स्थान यापूर्वी कधीही देशात नव्हते. देशाचा ग्रामीण भाग हाच खरा या देशाचा आधार आहे. त्याला यांनी बकाल बनवले. नदीवर पूल नाहीत, गावात रस्ते नाहीत, पुरेशा शाळा नाहीत, शाळा असतील तर शिक्षक नाहीत, वैद्यकीय सोय नाही, इस्पितळे नाहीत. अजूनही गरोदर बाईला झोळीतून इस्पितळात नेले जाते. कसल्याही मूलभूत सुधारणा या सरकारने केल्या नाहीत आणि विकास झाला म्हणतात. स्वर्गातून हे बघताना लाज वाटते.
अटल बिहारी वाजपेयी : हमने कभी सोचा भी नही था की भारत देश की ये हालत होगी। बर्बादीकी तरफ चल रहा है भारत. यहाँ अयोध्याका राममंदिर सुरक्षित नही तो बाकी मंदिरोंका क्या हाल! राममंदिर के दानपेटी मे चोरी और वो भी `मंदिरवाले लोगोंसे मैं सोच भी नही सकता। अयोध्या के लोग संकटमे है। ये तानाशाही कबतक चलेगी पता नहीं। हमने एक आदर्श भारतका सपना देखा था। वो चकनाचूर हो गया है। कितना झूठ बोलते है ये लोग। हिंदुत्व क्या है इसका पता भी नही इन नेताओंको। धर्म के नाम पर समाज मे दंगे फसाद करनेका इनका इरादा रहता है। एक आदमी सिर्फ खुदको बढा-चढा कर दिखानेके लिये सारी जनताको पीडित करता है। उनकी आवाज सुनकर लोग रेडिओ-टीव्ही बंद करते है। सभी न्यूज चैनलोंको लाचार बनाया है उन्होने। पैसा फेको, तमाशा देखो ऐसा कारोबार चल रहा है। आंदोलन करनेवाले युवाओंको बुरी तरहसे पीटनेका आदेश देनेवाले यही नेता है। उनके मनमे ना दया है ना शांती है। मीठा बोलके जख्मपर नमक छिडाते है लोग। फिर कभी भी ये लोग सत्तापर नही आयेंगे, क्योकी देशका युवा अब उनको सबक सिखायेगा और उनके सपने चकनाचूर हो जायेंगे अगले इलेक्शनमे। तुम सिर्फ देखते रहो, उनके बुरे हाल।
वसंतदादा पाटील : कोण कुणाच्या पाठीत खंजीर खुपसतोय तेच कळत नाही. सगळा स्वार्थी नेत्यांचा बाजार आहे. राज्याची पुरी वाट लावलीय या भाजपवाल्यांनी. एवढे अन्याय, अत्याचार, बलात्कार, अपघात, खून, गुंडगिरी ही सारी या राज्यकर्त्यांच्या पापाची फळे आहेत. आमच्या काळात नव्हती इतकी बेबंदशाही. बीडमधल्या, पालघरमधल्या, बदलापूरमधल्या आणि इतर ठिकाणच्या दुर्दैवी घटना पाहा. या राज्यात कायदा-सुव्यवस्था जिवंत आहे की नाही असा प्रश्न पडतो. जो तो आपल्या वरिष्ठांच्ाी चाटूगिरी करण्यात मग्न दिसतो. या राज्याचे कसे भले होणार याचीच चिंता वाटते.
बाळासाहेब ठाकरे : सगळा चोरांचा बाजार चाललाय. ते सगळं मॅनेज करतात. अगदी लंडनसुद्धा. कोणाच्या जिवावर मोठे झाले ते विसरतात हे गद्दार. दिल्लीश्वरांचे पाय चाटून मिळवलेली जहागिरी किती महागात पडेल ते कळेल लवकरच. मग गात राहा, लंडन मम दिसले ऽऽ दिसले ऽऽऽ लंडन मम दिसले ऽऽऽ

