• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पण आपण कट्टर!

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी)

marmik by marmik
January 2, 2026
in इतर, विशेष लेख
0
पण आपण कट्टर!

अध्वर्यू अर्थात अर्ध्या आज समोरल्या नम्याबरोबर जायचं म्हणून टापटीप तयार होतोय. केसाचा कोंबडा, शर्टाची इन, चेहर्‍याला पावडर, कडक इस्त्रीची पॅन्ट. असं साग्रसंगीत तयार होऊन अर्ध्या बाहेर पडतो. आज शेजारची वहिनी भांडे घासतेय.
‘हं! निघाले गाव कोळपायला! काही घरादारात कामंधामं पाहावा ते नाही!’ वहिनी मुद्दाम चिडवू पाहते.
‘माह्या भावानं लग्न होईपर्यंत हेच केलं होतं! मी तो आदर्श मोडू कसा?’ अर्ध्या खोचकपणे उत्तर देतो.
‘तुमचा भाऊ बहकेल नव्हता तुमच्यावानी, आवरा!’ वहिनी सावरायचा प्रयत्न करते.
‘आता तो बहकेल होता, का सटकेल होता, हे तुम्हाला सांगत बसलो तर भांडे घासायचं सोडून तुम्ही तोंड झोडायला घ्याल. वर आमचीच इज्जत चव्हाट्यावर येईल. तव्हा
बरीय झाकली मूठ सव्वा लाखाची!’
बॉम्ब टाकून अर्ध्या लागलीच सटकतो. वहिनी तणतणत भांडे घासू लागते.
अर्ध्या नम्याच्या घरासमोर पोहोचतो. बाहेर ओट्ट्यावर झाकूनपाकुन मोटरसायकल उभीय. अर्ध्या आत डोकावतो. पुढल्या खोलीत कुणीच दिसत नाही. आता? तो सरळ आत जातो. पलंगावर बसतो. आत टीव्ही चालुय म्हणजे नम्या आतच असेल याचा त्याला अंदाज येतो. पलंगावरचं रिमोट उचलून हातात घेतो, चारदोन चॅनल पुढंमागं करत आत आवाज देतो.
‘नम्या, अजून आवरलं नाही का? लै घुळघुळ असते बाबा तुझी!’ अर्ध्या घड्याळ बघत चॅनल बदलतो.
‘काय घाई आहे?’ नम्या काकडी खात बाहेर येतो.
‘अरे जायचं होतं ना?’ अर्ध्या नवलाने विचारतो.
‘कुठं?’ बेफिकीर नम्या काकडीचा आणखी एक तुकडा तोडतो.
‘अरे तू तर काल सकाळी ये म्हणाला ना मला?’ काहीश्या त्राग्याने अर्ध्या विचारतो.
‘म्हणून दोन्ही कानांना पावडर फासून आला का?’ अर्ध्याच्या कानाच्या पाळीला टिचकी मारत हसत नम्या उत्तर देतो.
‘राहिलं वाटतं.’ अर्ध्या कान पुसत बोलतो.
‘आणि हे शर्ट काय असं अर्धं खोचलेलं?’ नम्या अर्ध्याचं शर्ट खेचत त्याची खेचतो.
‘अरे मी खास तयार होऊन आलो होतो. घाईत राहिलं असंल.’ अर्ध्या खोचलेलं शर्ट ओढून मोकळं करतो. नको टापटीप दिसायला!
‘मग बेत काय आहे? कुठं निघालास?’ नम्या काकडी संपवत उलट प्रश्न करतो.
‘अरे बेत काय आहे म्हणजे? कालच तू म्हंटला ना? बाहेर जाऊ म्हणून? त्याच्यामुळं मी तयार होऊन आलो होतो. आणि आता तूच विचार उलट!’ अध्वर्यू किंचित तापतो.
‘अरे ते होय? आता कुठं जायची गरज नाही. रवी येतोय. पण गावातल्या गावात जायला तू एवढा तयार होऊन आला होता? कमाल आहे तुझी!’ नम्या अर्ध्याकडे आश्चर्याने बघतो.
‘मला वाटलं बाहेर जायचं आहे. म्हणून मी पार ममाकडून २३० रुपये घेऊन आलो होतो खर्चायला. माहितेय का?’ अर्ध्या निरागसपणे सांगतो. ते बघून नम्याला हसू फुटतं. तोच रवी आत येतो. रवी राकट गडी. टी-शर्ट,
पॅन्ट घातलेला. काळा सावळा. त्याला बघून घाईनं नम्या पुढं सरकतो. त्याला बसण्यासाठी कोपर्‍यातील लोखंडी फोल्डची खुर्ची उघडून पलंगाशेजारी ठेवतो.
‘बस रवी!’ नम्या सौजन्य दाखवतो. रवी लागलीच खुर्चीवर बसतो. अर्ध्या मात्र पलंगावर शिल्लक असलेली जागा नजरेनं मोजतो अन् विचारात पडतो. ‘हा इथेही बसू शकला असता की? आहे तर वर्गमित्रच!’ नम्या मात्र घाईने आत जातो.
‘काय रे अर्ध्या? तू काय करतोय इथं?’ रवी अर्ध्याला पडलेला प्रश्न स्वतः विचारून मोकळा होतो.
‘अरे नम्या मला बाहेर जाऊ म्हणला, म्हणून मी आलो होतो.’ अर्ध्या तक्रारीच्या सुरात रवीला सांगतो.
‘त्याला काय सांगतो? त्याच्याकडंच काम होतं आपलं! त्याचा नंबर मिळाला मग त्याला थेट बोलवून घेतलं. मग जाणं कॅन्सल!’ नम्या स्टीलचा अर्धापाऊण लिटरचा पाण्याचा तांब्या रव्याला देतो. अर्ध्या तो मोठ्ठा तांब्या बघतच राहतो.
‘काय बघतो? तुझ्यासारखं पळी पळी पाणी लागतं का मला? कामात असताना बघायचं! एक टायमाला जगभर पाणी पिऊन जातो मी!’ बोलता बोलता रवी तांब्याभर पाणी एक घोटात संपवतो.
‘पण तू का आलास? असं काय काम होतं नम्याचं?’ अर्ध्या रव्यावर प्रश्नांची सरबत्ती करतो.
‘अरे घरातला नळ आहे ना? त्याचं कनेक्शन पलीकडल्या सोसायटीपासून घेतलंय ना? ते पुढल्या रस्त्याखालून चांगल्या नळ्या टाकून आणलंय, पण हे गाड्यांच्या भारानं त्या प्लास्टिकच्या नळ्या कचकड्यागत फुटून जाताय. मग म्हंटलं रस्त्याच्या खाली सात-आठ फूट लांबीचा लोखंडी पाईप टाकू, त्याच्यातून नळी येईल. तेवढाच फुटायचा त्रास वाचंल.’ नम्या एक श्वासात सगळी कथा वाचून दाखवतो.
‘मग याला का बोलावलं? हा काय पुढल्या सोसायटीचा चेअरमन आहे का?’ अर्ध्या रवीकडे बोट दाखवून विचारतो.
‘अर्ध्या, तुझा अर्धा भेजा सरकेल आहे का रे? आता हा सात-आठ फूट रस्त्यासह दहा पंधरा फूट चर खणायचा म्हणजे तुझ्या अंगात आहे का तेवढं बळ? त्याला रव्याच लागंल!’ नम्या आवाज वाढवतो.
‘पण हा तर शिपाई म्हणून जायचा ना? शाळेत? आपल्या हायस्कुलला?’ अर्ध्या नवलानं विचारतो.
‘तिथं डायरेक्टर मंडळानी त्यांच्याच कास्टचा नवीन मेंबर शोधलाय. तो गब्बर पैशेवाला आहे. एक जागेला पंधरा-वीस सहज भरील परमनंट व्हायला. मग काय सध्या त्यालाच घेतलंय. मला तोंडी पुढल्या वेळी विचार करू म्हंटले.’ रव्या त्याची ष्टोरी सांगायला घेतो.
‘पण तो एवढे पैशे भरतोय म्हंटल्यावर तिथं झाड-झटक करील का नीट?’ अर्ध्याला लॉजिकल मुद्दा सुचतो.
‘आता शिपाई म्हंटल्यावर कामच ते आलं. ते करावा लागतंच! पण जाम कामचुकार आहे. नीट कामच करत नाही. झाड-झटक सगळा बॉम्बे हात. वरवरचं. मी होतो तोवर बेंचवर धूळ दिसू देत नव्हतो. मास्तर माझ्यासाठी भांडायचे, त्यांच्या क्लासरूमला मी झाडायला पाहिजे म्हणून. शेवट प्रिन्सिपल केबिन झाडायलाच मी होतो. पण काढला एक दिवस!’ रवी कातर आवाजात सांगत जातो.
‘आवर तेवढं खणून घे बाबा! एकदाचा पाईप टाकला म्हणजे काम मिटंल.’ नम्या विषय बदलू पाहतो.
‘थांब रे! तो काय परत भेटायचा आहे का? तो उद्या जाईल कामावर, मी बशील खड्डे खणीत. तुझं काम काय आहे अर्ध्या तासाचं. ते झटक्यात करून दिलं म्हणजे बास ना?’ रव्या नम्याला हटकतो.
‘पण तुझं चांगलं एमए झालं तरी तू हे खड्डे खणीत का बसतो? चांगली नोकरी पहायची. हे शिपायाच्या नोकरीत काय ठेवलंय?’ अर्ध्या वर्मावर बोट ठेवतो.
‘बाबा, बाहेर कोण जाईल? गाव सोडायचं म्हणजे खर्च किती लागतो मागं? आणि आर्टवाल्यांना कुठं मिळात्या नोकर्‍या? त्यापेक्षा हे खड्डे खणणं बरं! दिवसात दोन-तीन हजार सहज मोकळे होतात. नाहीतरी बापबी खड्डेच खणायचा. भाऊबंद बी हेच काम करित्या. मग आपल्याला काय लाज? अन् नोकरीपाण्यापेक्षा बराय ना? आपण आपले मालक. कुणाची ताबेदारी नाही. वर महिन्याचा पगार आठवड्याला माती उपसून मिळतो.’ रव्या फार टेचात बोलतो, नम्याच्या चेहर्‍यावर मात्र आठ्या! अर्ध्या कवतिकानं पाहतोय.
‘मागं गावाबाहेरच्या ‘त्यांनी’ बोलावलं होतं ना? काय प्यून…’ नम्याला काही आठवतं.
‘हां मी जातो तिथं बाटायला! आपण कट्टरे! पैश्याला भाळून धर्माशी खेळ करत नाही मी! गाडीवर नाव पाह्यलं का आपल्या?’ रव्या दारात उभं राहून गाडीवरचं भगवं नाव दाखवू लागतो.
‘अरे तिथं बरेच जण काम करतात इकडचे… बसल्याचं काम प्रतिष्ठेचं…’ अर्ध्या समजावू बघतो.
‘आपल्याला प्रतिष्ठा नसली तरी चालंल. आपण कट्टर! आता हा नम्या माझ्या माघारी हातातला तांब्या निरमानं धुईल, पण आपण कट्टर. नम्या फावडं कुठंय? टिकाव बरा दे बरं का?’ रव्या मनगटावरच्या कड्यावरून हात फिरवत बाहेर जातो. नम्या हातातला तांब्या खाली कोपर्‍यात ठेऊन बाहेर पळतो.
अर्ध्या मात्र जातवास्तव, जातीभेद, जातीची भासणारी अपरिहार्यता, श्रमप्रतिष्ठा, ब्राह्मण्य असल्या कुठं ऐकलेल्या संज्ञा दोर्‍याच्या गुंत्यागत एक एक धरून मोकळ्या करून मानवी व्यवहारामागचं तर्कट शोधू बघतो. त्याला ती लोखंडी फोल्डची खुर्ची, कोपर्‍यातला तांब्या आणि प्यूनची चालून आलेली नोकरी मात्र करपट ढेकरासारखी डाचत राहते.

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!

Next Post
भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!

भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.