देवदासी समाजाच्या शोषणाविरुद्ध प्रबोधनकारांनी थेट गोव्यातच जागृती सुरू केली. मराठा गायक समाजाची परिषद रद्द झाली तरी, त्यांनी गावोगाव प्रवचनवजा व्याख्यानं दिली. त्यासाठी शिवजयंती उत्सवाचं निमित्त सांगितलं. या समाजप्रबोधनातून पुढे मोठी चळवळ उभी राहिली.
गोव्यातल्या देवदासी समाजाच्या म्हणजे तेव्हाच्या मराठा गायक समाजाच्या तरुणांनी सुधारणेसाठी संघटन सुरू केलं होतं. त्यासाठी त्यांनी दक्षिण गोव्यातल्या काकोडे गावी पहिली परिषद घ्यायची ठरवली. मे १९२७च्या पहिल्या आठवड्याची तारीखही ठरली. अशा शोषित समाजासाठी प्रबोधनकार उभे ठाकणार, याची खात्री असल्यामुळे या परिषदेचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. प्रबोधनकारही त्यासाठी पुण्याहून बेळगावला पोचले. पण प्रबोधनकारांचं नाव बघून गोव्याचं सामाजिक नेतृत्व करणार्या काही उच्चजातीय सज्जन पुढार्यांना चिंता वाटू लागली. प्रबोधनकारांचे जागृतीचे जहाल फटकारे गोव्यात नको असल्यामुळे त्यांनी परिषदेला विरोध केला. परिणामी पोर्तुगीज गव्हर्नर जनरलने परिषद बंद पाडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा पाठवला.
ही बातमी घेऊन आयोजक प्रबोधनकारांच्या आधीच बेळगावला पोचले होते. पुढे स्वातंत्र्यानंतर सीमालढ्याचं नेतृत्व करणार्या डॉ. गोविंदराव कोवाडकरांच्या घरी सगळ्यांची भेट झाली. आयोजकांचे चेहरे पडलेले होते. संघर्षाची सवय नसलेल्या आयोजकांनी मनातून माघार घेतली होती. आता प्रबोधनकारांनी गोव्याला न येता पुन्हा पुण्याला माघारी जावं, अशी आयोजकांची विनंती होती. पण माघार घेतील ते प्रबोधनकार कसले? त्यांनी यातूनही मार्ग सांगितला. ते म्हणाले, हे पहा मंडळी, एकदा पुढे पाऊल मागे घेण्याची माझी पिंडप्रकृतीच नाही. मी पुढे जाणार, परिणामांची मला पर्वा नाही. अहो, तुमच्या सरकारने परिषदेला बंदी घातली. पण शिवजयंती उत्सव साजरा करायला आणि तेथे व्याख्याने द्यायला तर कायद्याची बंदी नाही ना? तीही असेल किंवा आपण तेथे गेल्यावर घातली गेली तरीही श्री समर्थ रामदासांच्या दासबोधावर ठिकठिकाणी पुराणे झोडायला तर काही हरकत नाही ना? त्या पुराणातूनही आपल्या हेतूचा प्रचार खास करता येईल. चला, पुण्याचा एक पुराणिक म्हणून मी येथून निघणार.
असं प्रबोधनकारांनी सांगताच आयोजकांचे चेहरे खुलले. त्यांच्यात उत्साह भरला. त्यांनी प्रबोधनकारांचा गोवा दौरा नीट पार पाडण्याच्या प्रतिज्ञा केल्या. आम्ही प्रबोधनकारांना सोबत घेऊन येतोय, असं कळवणार्या ताराही गोव्याला पाठवण्यात आल्या. ते दुसर्या दिवशी सकाळी बेळगावहून लोंढामार्गे गोव्याच्या दिशेने निघाले. कॅसल रॉक हे ब्रिटिश हद्दीतलं शेवटचं स्टेशन होते आणि कोळे हे पोर्तुगीज सीमेनंतरचं पहिलं स्टेशन. तेव्हा मेंदूज्वराची साथ सुरू होती आणि ती संसर्गामुळे पसरत असल्यामुळे या स्टेशनवर संपूर्ण गाडीचं आणि प्रवाशांच्या सामानाचंही निर्जंतुकीकरण करण्यात आलं. त्यांना सावर्डे स्टेशनवर उतरायचं होतं. तिथे सर्व प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून नाकाने कसला तरी धूर हुंगवण्यात आला. स्टेशनबाहेरच पुण्याच्या प्रसिद्ध द पूना ड्रग हाऊसच्या मालकांचा मुलगा प्रबोधनकारांना भेटला. त्याचं औषधांचं दुकान सावर्डे स्टेशनबाहेरच होतं. त्याने सगळ्यांना कोल्डड्रिंक पाजलं. पुढे काकोड्याला जाण्यासाठी वाहन उपलब्ध झालं नाही. त्यामुळे प्रबोधनकारांच्या सूचनेनुसार सगळे पायीच चालत गेले.
प्रबोधनकार काकोड्याला जाऊन बघतात तर काय, परिषदेसाठी उभारलेल्या मांडवाला ४०-५० पोर्तुगीज पोलिसांनी गराडा घातला होता. प्रबोधनकारांच्या राहण्याची व्यवस्था शेजारच्या एका घरात केली होती. पुण्याहून पाहुणा पोचल्याचं कळताच पोलिसांची चलबिचल झाली. कुणी मांडवात शिरू नये म्हणून ते मांडवाच्या भोवती फेर्या घालू लागले. तो काळ गोव्यातल्या पोर्तुगीजांच्या घट्ट पोलादी पकडीचा होता. काकोड्यासारख्या छोट्या गावात परिषदा वगैरे कशा होत असणार? तिथे आलेल्या पोलिसांना तरी परिषद म्हणजे काय ते कसं कळणार? ते बघून प्रबोधनकारांना गंमत वाटली. त्यांनी त्याचं वर्णन केलं आहे, वास्तविक मंडपात कसलेच काही फर्निचर नव्हते. तो अगदी रिकामा होता. पण त्याला घेरे मारून पहारा करणार्या त्या पोलिसांची कीव आली. कदाचित त्यांना असे वाटले असावे आता जमलेले हे सारे लोक पुण्याच्या पाहुण्याला घेऊन मंडपात घुसतील आणि परिषद चालू करतील. परिषद म्हणजे पटकन काडी पेटवून चटकन विडी ओढण्याइतके सोपे काम, अशी त्या येडपटांची समजून झाली असावी.
प्रबोधनकारांच्या भाषेत घाण्याच्या बैलासारखे मंडपाभोवती गरगर फिरणारे पोलिस बघून एक बडा अधिकारी आला. त्याने प्रबोधनकारांसोबत बसलेल्या आयोजक कार्यकर्त्यांना कोकणीत फर्मावलं की आत्ताच्या आत्ता हा मंडप मोडून टाका. नाहीतर आम्ही तो मोडू. त्यावर थोडावेळ बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी सांगितलं, आम्ही मंडप मोडणार नाही, हवं तर तुम्हीच मोडा. थोडावेळ आणखी बाचाबाची होऊन पोलिसांनी रागारागाने मांडव मोडला आणि निघून गेले. मांडव उभारणारा कंत्राटदार तिथेच उभा होता. त्याने एक बैलगाडी आणली. त्यात मांडवाचं सगळं सामान भरलं आणि तोही निघून गेला. निघन जाताना मिस्कीलपणे हसत म्हणाला, बरं झालं, माझा मांडव मोडण्याचा खर्च वाचला.
अपेक्षेप्रमाणे आता परिषद तर होणार नव्हतीच, त्यामुळे ठरल्याप्रमाणे शिवजयंतीचं निमित्त धरून मराठा गायक समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनकारांची प्रवचनवजा व्याख्यानं आयोजित करण्याचा धडाका लावला. बुहतेक परिषदेच्या ठरलेल्या दिवशी काकोड्याच्या एका देवळाला जोडलेल्या हॉलमध्ये महिलांची सभा झाली. त्याला ४० ते ५० महिला आल्या होत्या. प्रबोधनकारांनी खुर्चीवर बसून शिवचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास यावर तासभर प्रवचन केलं. प्रबोधनकार लिहितात त्याप्रमाणे राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि समाजधारणेसाठी निष्कलंक नीतिवान स्त्रियांची आवश्यकता असा प्रवचनाचा मुख्य गाभा होता. या प्रवचनात प्रबोधनकारांनी शिवरायांची थोरवी कशी सांगितली असेल, याचा अंदाज याच दरम्यान झालेल्या दगलबाज शिवाजी या व्याख्यानावरून येऊ शकतो. पण प्रबोधनच्या पाचव्या वर्षांच्या नवव्या अंकात जांबावली इथे झालेल्या अशा एका प्रवचनाचं सार असणारा लेख प्रकाशित झाला आहे. म्हापशाच्या मोतीराम जांबावलीकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या लेखाचं प्रास्ताविक असं आहे, ता. ३ मे १९२७ रोजी जांबावली, गोवा येथे श्री शिवजयंति उत्सवप्रसंगी प्रबोधनकार श्रीयुत ठाकरे यांनी दिलेल्या व्याख्यानातील एक भाग. मराठा गायक समाजाची परिषद गोवे सरकारच्या हुकमावरून ऐन घटकेला बंद पाडण्यांत आल्यामुळे, गायक समाजांत साहजिक पसरलेल्या शोकपूर्ण निराशेला अनुलक्षून हे उद्गार आहेत, एवढा संदर्भ दर्शविला म्हणजे पुरे.
नांव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, या मथळ्याच्या लेखात प्रबोधनकारांनी गोवा दौर्यात मराठा गायक समाजासमोर केलेली मांडणीची झलक पाहता येते. त्यात आलेले त्यांचे विचार असे आहेत, मराठा गायक समाज माणुसकीसाठी धडपडत आहे. त्याला परमेश्वराच्या पावित्र्याची तहान लागली आहे. तो अंधारातून प्रकाशांत येऊं पहात आहे. अखिल सृष्टीला वंद्य अशा स्त्रीवर्गाची होत असलेली बीभत्स विटंबना त्याला रसातळाला न्यावयाची आहे. बेशरम हिंदू समाजांतला स्त्रियांचा शरीरविक्रय कायमचा बंद पाडण्यासाठी त्याला देवाच्या दरबारांत न्याय पाहिजे. त्यासाठी तो तनमनधनानेच काय, पण रक्ताचीही आहुती देण्यास सिद्ध झाला आहे. मग, त्याने काय व्यावहारिक संकटांनी हताश व्हावे? मुळीच नाही. भगवंतावर भार घाला. `मग तो लागूंनेदी शीण। आड घाली सुदर्शन।। संकटांचा अग्नि गिळणार्यांनाच यशप्राप्ती माळ घालीत असते. प्रयत्नांत खंड पाडू नका.` प्रबोधनकारांनी दासबोधावर प्रवचनं करण्याची तयारी दाखवली होती, तरी या भाषणाच्या छोट्या अंशात संत तुकारामांच्या दोन अभंगांचा उल्लेख आलेला आढळतो.
स्वत: छत्रपती शिवरायांनीही त्यांच्यावर आलेल्या संकटांचा कशाप्रकारे सामना केला, हे या प्रवचनवजा व्याख्यानात सांगत प्रबोधनकारांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचं मार्गदर्शन केल्याचं दिसतं, शाहिस्तेखानावरील छापा, पन्हाळगडाचा कोंडमारा, त्यातून सफाईत निसटण्याची कर्तव्यशैली, इत्यादि अनेक प्रसंगांचा बारकाईने आत्मत्वाच्या जाणिवेने विचार करा, म्हणजे पारमेश्वरी लीलेत आपल्या उद्धाराच्या कामी संकटांचा प्रसाद किती अमृतमय असतो, याचे तुम्हाला प्रत्यंतर पटेल. संकटांचा शरवर्षाव होऊ लागला की खास खूणगांठ बांधावी की आपल्या जीवनावर भगवंताची कृपादृष्टी बिनचूक वळली, ब्रह्मपदी नाचावयाचे तर लोखंडाचेच चणे खाणे प्राप्त आहे. श्रीकृष्ण परमात्म्यावर अढळ निष्ठा ठेऊन, प्रसंगावधानपूर्वक आपण आपापली कर्तव्ये कुशलतेंने पार पाडण्यासाठी झगडू या. शिवरायाचे चरित्र रात्रंदिवस आठवूं या. त्यावरच वाचन मनन निदिध्यासाची प्रामाणिकपणे तपश्चर्या करू या. शिवराय सर्वांचे शिव करीलच करील. नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावें.
या सभेसाठी आलेल्या महिला मराठा गायक समाजातल्या होत्या. देवदासी म्हणून धर्माचा भाग म्हणून जमीनदारांच्या रखेल बनण्यास भाग पाडलेल्या या स्त्रियांविषयी प्रबोधनकारांनी माझी जीवनगाथामध्ये नोंदवलेली निरीक्षणं महत्त्वाची आहेत. बहुतेक महिला मला सुशिक्षित आढळल्या. महाराष्ट्रात आणि मुंबईत प्रकाशित होणार्या अनेक मासिकांचे अंक मला घरोघर आढळले. एकमेकीत त्या जरी कोकणीत बोलत असत, तरी माझ्याशी बोलताना स्वच्छ मराठीत बोलत होत्या. प्रबोधनकारांनी मराठा गायक समाजाच्या ४-५ घरांना भेटी दिल्या. एका घरी त्यांना मासिक मनोरंजनाचा पहिला दिवाळी अंक उत्तम कव्हर घालून जपून ठेवलेला दिसला. प्रबोधनकारांना आश्चर्य वाटलं. त्यांनी हा अंक जपून ठेवण्याचं कारण विचारलं. त्यावर त्या बाईंनी उत्तर दिलं की या अंकात गोव्यातल्या अनेक मोठ्या माणसांची चित्रं छापलेली आहेत, म्हणून ठेवलाय जपून. या महिलांविषयी ते पुढे लिहितात, तेथल्या अनेक तरुणींशी केलेल्या भाषणप्रसंगात मला असे आढळून आले की बहुतेकींना आपल्या परंपरागत रूढ जीवनाची किळस आलेली होती. इतर समाजाप्रमाणे वैवाहिक जीवनाचा मार्ग जितक्या लवकर सापडेल तितका बरा, असे त्या कळवळून सांगत. या बाबतीत मुख्य अडसर म्हणजे जुन्या आचारविचारांनी ग्रस्त झालेल्या त्यांच्या माता आणि त्यांना बहकविणारे इतकेच नव्हे तर चिथावणी देणारे आजूबाजूचे शेकडो शिष्ठ. त्यांच्यातीलच काही विचारवंत तरुणांनी मराठा गायक समाज स्थापन करून अनैतिक जीवनाची कोंडी फोडण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत, तिकडे त्या आशेने आणि आदराने पहात होत्या.
प्रबोधनकारांनी गोव्यात शिवजयंतीच्या निमित्ताने अशी १० ते १२ प्रवचनवजा व्याख्यानं दिली. त्यादरम्यान आलेला अनुभव त्यांनी प्रबोधनमध्ये गोवेकरीण या मथळ्याने लिहिलेल्या लेखात सविस्तर लिहिला. गोव्याच्या देवदासी समाजाच्या शोषणावर महाराष्ट्रात लिहिला गेलेला तो पहिला लेख असावा. प्रबोधनकारांनी देवाधर्माच्या नावावर चालणार्या देहविक्रीला आपल्या लेखणीतून आणि कृतीतून दिलेला तडाखा ऐतिहासिक असाच आहे.
