• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नामयाचा तुका!

ह.भ.प.ज्ञानेश्वर बंडगर (अभंगबोध)

marmik by marmik
February 19, 2026
in विशेष लेख
0
नामयाचा तुका!

 

द्याल ठाव तरि राहेन संगती।
संतांचे पंगती पायापाशी ।।१ ।।
आवडीचा ठाव आलोसे टाकून।
आता उदासीन न धरावे ।।२ ।।
सेवटील स्थळ नीच माझी वृत्ती।
आधारे विश्रांती पावईन ।।३ ।।
नामदेवापायी तुक्या स्वप्नी भेटी।
प्रसाद हा पोटी राहिलासे ।।४ ।।

वारकरी संप्रदायात ‘नामाचा तुका, ज्ञानाचा एका आणि कबीराचा शेखा’ अशी एक लोकोक्ती प्रचलित आहे. नामदेवांचा वारसा तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांचा वारसा एकनाथांनी आणि कबीरांचा वारसा शेख महंमदबाबांनी पुढे चालवला. त्यामुळेच नामदेवांविषयी तुकोबांच्या मनात अपार श्रद्धा होती. नामदेवरायांच्या प्रेरणेनेच तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती झाली होती. त्या स्फूर्तीनंतर तुकोबांनी नामदेवरायांना उद्देशून जो प्रतिसाद दिला तोच हा अभंग आहे. या अभंगातून तुकोबा नामदेवांशी नम्रतेने संवाद साधतात. कवित्वाची स्फूर्ती हा नामदेवांनी दिलेला प्रसाद आहे अशी तुकोबांची धारणा आहे. ही धारणा या अभंगातून प्रकट झालेली आहे.

तुकोबांच्या वयाच्या साधारण विसाव्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. लोकांची अन्नान दशा झाली. त्याच काळात तुकोबा अंतर्मुख होऊन जीवनाचा नव्याने विचार करायला लागले. त्यात त्यांना आधार सापडला तो वारकरी संप्रदायाचा. त्यांच्या घरात वारकरी परंपरा होतीच. त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबाबा वारकरी होते. तेव्हापासून तुकोबांपर्यंत वारकरी संप्रदायाचा वारसा घरातूनच आला होता. दुष्काळात तुकोबाराय डोंगरात जाऊन बसायला लागले. गुंफेत जाऊन एकांतात चिंतन करायला लागले. शाश्वताचा शोध घेत होते. ही शोधयात्रा वारकरी विचारांची स्पष्टता आल्यावर थांबली. तोच त्यांचा साक्षात्काराचा क्षण होता. या काळात त्यांना वारकरी संतांच्या अभंगांची गोडी लागली. त्यांनी संतांचे काही अभंग पाठही केले. ‘काही पाठ केली संतांची उत्तरे। विश्वासे आदरे करोनिया ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. त्यानंतर ते परिसरातल्या कीर्तनांना साथ करायला लागले. इतरांच्या कीर्तनात धृपद म्हणायला लागले. ‘गाती त्यांचे पुढे धरावे धृपद। व्हावे चित्त शुद्ध करोनिया ।।’ असा त्यांचा क्रम होता. या काळात एक विलक्षण घटना घडली. त्यामुळे केवळ तुकोबांच्या जीवनालाच नव्हे तर संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवाहालाही एक नवं वळण मिळालं. ती घटना म्हणजे तुकोबांच्या कवित्वाच्या प्रेरणेची. तुकाराम महाराजांना नामदेवांकडून कवित्व करण्याची स्फूर्ती मिळाली. ‘यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती। पाय धरिले चित्ती विठोबाचे ।।’ असं त्या प्रसंगाचं वर्णन तुकोबाराय करतात.

कवित्वाची स्फूर्ती होण्यापूर्वी तुकाराम महाराजांनी अनेक संतांचे अभंग पाठ केलेले होते. त्यात त्यांनी नामदेवांचेही अभंग पाठ केले असणार. त्यांना अनेक कारणांनी नामदेवराय जवळचे वाटलेले होते. निर्मळ विठ्ठलभक्ती, सहजस्फूर्त अभंगरचना, कर्मकांडाऐवजी प्रेमभक्तीला प्राधान्य आणि बहुजन जातीतला जन्म अशा अनेक गोष्टी नामदेव आणि तुकोबारायांना जोडणार्‍या आहेत. नामदेवरायांनी त्यांच्या काळात शतकोटी अभंग रचण्याचा संकल्प केला होता. एकदा वाळवंटातून फिरत असताना नामदेवरायांना वाल्मिकीच्या शतकोटी रामायणाची माहिती मिळाली. तेव्हाच नामदेवांनी वाल्मिकींनी जसं शतकोटी श्लोकाचं रामायण लिहिलं तसं शतकोटी अभंगातून विठ्ठलभक्तीचा अविष्कार घडवण्याचा संकल्प केला. इथे शतकोटी अभंग हा शब्द प्रतीकात्मक अर्थाने आहे. विपुल अभंगरचनेचा संकल्प त्यांनी केला असा त्याचा अर्थ लावता येतो. या संकल्पाला अनुसरुन नामदेवरायांनी विपुल अभंगरचना केली. त्यांच्या या अभंगरचनेच्या उपक्रमात त्यांच्या घरातील लोकही सहभागी झाले. पुढे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर वारकरी संतांनीही अभंग रचना केली. तरीही तो संकल्प पूर्ण झाला नाही. तो संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे अशी तुकोबांची भावना झाली. त्याला कारण ठरलं स्वप्नोपदिष्ट कवित्वाच्या स्फूर्तीचं. एकदा नामदेवराय तुकोबांच्या स्वप्नात आले. त्यांनी तुकोबांना कवित्व करण्याची आज्ञा केली. त्या प्रसंगाचं वर्णन करणारा एक अभंगच तुकोबारायांनी लिहिला आहे.
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे।
सवे पांडुरंगे येवोनिया ।।१ ।।
सांगितले काम करावे कवित्व।
वाऊगे निमित्त बोलू नको ।।२ ।।
माप टाकी सळ धरिली विठ्ठले।
थापटोनी केले सावधान ।।३ ।।
प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी।
उरले शेवटी लावे तुका ।।४ ।।

खरंतर नामदेवरायांविषयी तुकोबारायांच्या मनात सतत चिंतन चाललं असणार. नामदेवांचा वारसा पुढे न्यावा ही तळमळ तुकोबांना लागून राहिली असणार. त्याचाच परिणाम म्हणून नामदेवराय त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना कवित्वाची प्रेरणा दिली. कोणतंही कारण न सांगता कवित्व करायला सुरुवात कर असा आदेशच नामदेवांनी तुकोबांना दिला. त्यानंतर तुकोबांनी नामदेवांना उद्देशून प्रस्तुत अभंग लिहिला. ‘जर तुम्ही मला तुमच्या संगतीत जागा दिली तर मी संतांच्या पंगतीत त्यांच्या पायापाशी आनंदाने राहीन’ असं तुकोबाराय म्हणतात. ‘माझ्या आवडीचं ठिकाण मी टाकून आलो आहे, त्यामुळे आता मला दूर करु नका’ अशी विनंती तुकोबाराय करतात. ‘तुमच्या आधाराने या संतांच्या संगतीत अखेरची जागा मला मिळेल आणि त्यातून माझ्या जिवाला खरी विश्रांती मिळेल’ असं ते म्हणतात. स्वप्नात झालेल्या नामदेवांच्या या भेटीने कवित्वाच्या प्रेरणेचा प्रसाद मिळाला, अशी तुकोबांची भावना आहे.

तुकोबांनी नामदेवांच्या प्रेरणेने कवित्वाला सुरुवात केली. तुकोबांची ही वाणी आम जनतेत लोकप्रिय झाली. तुकोबांच्या हयातीतच वडगावचे जयराम गोसावी त्यांच्या कीर्तनात तुकोबांचे अभंग घेत असत. जयराम गोसावींच्या कोल्हापुरातल्या कीर्तनात तुकोबांचे बहिणाबाईंनी ऐकले आणि त्यांनी तुकोबांना गुरु मानलं. यावरुन आपल्याला तुकोबारायांच्या काव्याचा तत्कालीन प्रभाव दिसून येतो. गावोगावी तुकोबारायांचे अभंग पोचले होते. तुकोबांची वाणी ही प्रसादाची वाणी होती. त्यामुळेच ‘प्रसादाची वाणी वदतो उत्तरे। नाही मतांतरे जोडियेली ।।’ असं ते म्हणत होते. तुकोबारायांना त्यांच्या कवित्वाविषयी अपार आत्मीयता होती. त्यांच्या लेखी तो नामदेवांचा प्रसाद होता.

तुकोबांच्या या अस्सल प्रासादिक अभंगांवर पुढच्या काळात बरेच आघात झाले. त्यातील तुकोबारायांच्या हयातीत झालेले दोन आघात तर फारच भयंकर होते. पहिला आघात होता वाड़मयचौर्याचा. सालोमालो नावाच्या एक तोतयाने तुकोबांच्या अभंगात त्याची स्वतःची नाममुद्रा उमटवली. वाड़मयचौर्याचा हा प्रकार त्याने केलेला होता. त्यामुळे तुकोबारायांना संताप आला. त्यांनी या वाड़मयचौर्याच्या विरोधातही काही अभंग लिहिले. ‘कालवूनी विष केला अमृताचा नाश।’ असं तुकोबाराय म्हणतात. नामदेवांचा हा प्रसाद त्याने चिवडला असं तुकोबारायांना वाटलं. ‘प्रसाद अमंगळ चिवडती।’ असं म्हणून तुकोबाराय तो संताप व्यक्त करतात. तुकोबांच्या काव्यावर दुसरा आघात केला तो रामेश्वर भट्टाने. त्याने तुकोबांच्या अभंगात वेदांचा अर्थ प्रकट होतो हा आरोप केला. शूद्रांना वेदांचा अधिकार नसताना तुकोबांनी त्यांच्या अभंगातून वेदांचा अर्थ प्रकट करणं हा वैदिक धर्मशास्त्राच्या लेखी गंभीर आणि भयंकर गुन्हा होता. त्यामुळे रामेश्वर भट्टाने तुकोबांना त्यांचे काव्य इंद्रायणीत बुडवण्याचा आदेश दिला. त्यानुसार हे काव्य इंद्रायणीत बुडवण्यात आलं. साहजिकच तुकोबारायांसाठी हा फार मोठा धक्का होता. त्यांनी त्यासाठी इंद्रायणीच्या काठावर बसून तेरा दिवस उपोषण केलं. हे पहिलं सत्याग्रही उपोषण होतं. या उपोषणाला भाविकांचा पाठिंबा वाढत गेला. अखेर जनतेचा दबाव वाढत जाऊन धर्मपीठाने तुकोबारायांच्या काव्यावर घातलेली बंदी उठवली. तुकोबारायांच्या गाथेतील अभंग लोकांना पाठ होते. ते संकलित करुन तुकोबारायांच्या अभंगांच्या हस्तलिखित प्रती गावोगावी तयार करण्यात आल्या.
तुकोबारायांनी त्यांच्या सावकारीचे गहाणखताचे कागद स्वतःहून इंद्रायणीत बुडवले होते. त्याच इंद्रायणीत तुकोबारायांना त्यांची गाथा बुडवावी लागली. सावकारीचे कागद त्यांनी स्वतःहून बुडवले तर अभंगाचे कागद धर्मपीठाच्या आदेशाने बुडवले गेले होते. तुकोबारायांना त्यांची खरी संपत्ती सावकारीच्या कागदांची नव्हे तर अभंगांच्या कागदांची वाटत होती. त्यामुळेच ते इंद्रायणीच्या काठावर शोकमग्न होऊन तेरा दिवस बसले. इंद्रायणीत बुडवले गेलेले अभंगांचे कागद केवळ कागद नव्हते तर ती नामदेवांच्या संकल्पित कार्याच्या पूर्ततेची निशाणी होती. ती प्रसादाची वाणी होती. राजारामशास्त्री भागवतांच्या भाषेत तो महाराष्ट्राचा ‘राष्ट्रीय ग्रंथ’ होता. गाथा इंद्रायणीत बुडवायला लावणं म्हणजे केवळ तुकोबारायांवर आलेले संकट नव्हतं तर वारकरी संप्रदायावर आणि पर्यायाने महाराष्ट्रावर आलेली ती राष्ट्रीय आपत्ती होती. ‘निषेधाचा काही पडिला आघात।’ असं त्या आघाताचं वर्णन तुकोबाराय करतात.

तुकोबारायांच्या हयातीत त्यांच्या अभंगांवर जसे आघात करण्याचे प्रयत्न झाले तसेच त्यांच्या पश्चातही तसे प्रयत्न होत राहिले. पेशव्यांच्या काळात जातिभेद वाढला. ब्राह्मणांच्या वर्चस्वाचं टोक गाठलं गेलं. तुकोबारायांच्या अभंगांना आम जनतेत मिळणारा सन्मान आणि प्रतिष्ठा पेशव्यांना बोचत होती. बहुजन समाजातल्या या थोर संतांचे हे काव्य पेशव्यांना रुचत नव्हते. त्यांनी तुकोबारायांच्या अभंगाकडे ‘शूद्रकवन’ म्हणून पाहिलं. त्याचा मोरोपंतांनी आर्या लिहून निषेध केला. तुकोबारायांच्या अभंगांना शूद्रकवन म्हणणं म्हणजे ‘भगवंताच्या प्रसादवाणीचा’ अपमान आहे असं मोरोपंत सुचवतात.
शिवाजी राजा सूज्ञ न
म्हणे तुकयास काय साधू निका।
तत्पंडित प्रधाना न कळे गुण
समज फार आधुनिका ।।
भक्तीरसिक शूद्रकवन म्हणवूनि
कशास नाक वाहेल।
भगवत्पदप्रसादा बुध जेवि
तयास नाक वाहेल ।।

मोरोपंतांनी या आर्येत तुकोबांच्या अभंगांना शूद्रकवन म्हणून अपमानित करणार्‍या पेशव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सूज्ञ राजे होते. ते तुकाराम महाराजांना खरा साधू मानत होते. त्यांचा प्रधान असलेला हा आधुनिक पेशवा मात्र तुकाराम महाराजांना मानत नाही, हा फार शहाणा झाला का? असा सवाल मोरोपंत या आर्येतून विचारत आहेत.

श्रीवर्धन हे पेशव्यांचं मूळ गाव. या गावात एका कीर्तनकाराने कीर्तनात ‘तुकाराम तुकाराम’ असं भजन करायला सांगितलं. बहुजन जातीतल्या संताच्या नावाचं भजन करायला सांगितलं म्हणून ब्राह्मण श्रोत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यांचं कीर्तन बंद पाडलं.
तुकोबारायांच्या या अभंगांवर त्यांच्या हयातीपासून ते पेशवाईपर्यंत असे अनेक आघात होत राहिले. तरिही तुकोबारायांची वाणी आजही टिकून आहे. खेड्यापाड्यातल्या करोडो वारकरी भाविकांच्या मुखात आजही तुकोबारायांचे अभंग आहेत. कारण त्या वाणीला नामदेवरायांचा आणि त्यानिमित्ताने वारकरी विचारांचा उज्ज्वल वारसा आहे.

Previous Post

देश (अमेरिकेच्या) मजबूत हातांत!

Next Post

सगळं संपलं…

Next Post
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे…

सगळं संपलं...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.