• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नंगे से विश्वगुरू भी डरता है!

विकास झाडे (अधोरेखित)

marmik by marmik
March 10, 2026
in अधोरेखित
0
नंगे से विश्वगुरू भी डरता है!

काँग्रेसला संपविण्याचे स्वप्न पाहणार्‍या भारतीय जनता पक्षाचा सगळा भरवसा दरम्यानच्या काळात सुस्तावलेल्या काँग्रेसवर होता. काँग्रेसचे सरंजामदार तिला बुडवतील याची त्यांना खात्री होती. त्यातले बहुतेक त्यांच्या गळाला लागलेले आहेत आणि बाटग्याच्या धर्माला जागून रोज काँग्रेसविरोधात केविलवाणी बांग देत आहेत. त्यामुळे दिल्लीच्या प्रगती मैदानात युवक काँग्रेसचे आंदोलन पाहिल्यावर भाजपला धक्का बसला असणार. एक तर या कार्यकर्त्यांनी काँग्रेसी नेमस्तपणा बाजूला ठेवून आक्रमकपणे आंदोलन केलं आणि शर्ट उतरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘कॉम्प्रोमाइज पीएम’ ठरवणारी जोरदार घोषणाबाजी केली. हे सगळेच ‘चेहरे’ नसलेले चपळ आणि प्रचंड ऊर्जा असलेले तरुण होते. आपल्या पक्षातल्या, वर्षानुवर्षे ढेरी वाढवून बसलेल्या नेत्यांना वानप्रस्थाश्रमात जाण्याचे फर्मान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडले आहे. यापुढे काँग्रेसची जी आंदोलने होतील तिथे तरुणाईच्या हातात सूत्रे असतील, हे त्यांनी दाखवून दिले आहे. या आंदोलनाने भाजपबरोबरच पंतप्रधान मोदीही गडबडले आणि नेहमीच्या जहरी शिवीगाळीवर आले. काँग्रेसला ‘नंगे’ म्हणणार्‍या मोदींचा सामना आता ‘नंगे से विश्वगुरू भी डरता है’ हे सूत्र सापडलेल्या काँग्रेसच्या ‘जेन-झी’ युवकांशी असणार आहे.

अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी प्रचंड संतापलेले दिसतात. राहुल गांधी त्यांच्या प्रत्येक चुकीच्या पावलावर लाठी हाणतात. मग मोदींच्या अंगाची लाही लाही होते. ‘लोकतंत्र में आलोचना अनिवार्य हैं’ असे मुलाखतींमध्ये सांगणार्‍या मोदींना वास्तवात टीका जराही सहन होत नाही. त्यावर ते अत्यंत वाईट पद्धतीने व्यक्त होतात. मग ते नंगे काँग्रेसी, जर्सी गाय, पचास करोड की गलप्रâेंड, काँग्रेस की विधवा, शूर्पणखा, बच्चे पैदा करने के केंद्र, दीदी ओ दीदी अशा त्यांच्या पक्ष आणि परिवाराला साजेशा सुसंस्कृत भाषेवर घसरतात. काँग्रेस सहसा अशा भाषेवर घसरत नाही. त्यांचा नेमस्तपणा आणि काँग्रेसी सरंजामदारांचा सुस्तपणा यांच्यामुळे आजवर सरकारचा उन्माद चालून गेला. आता मात्र काँग्रेस आक्रमक झालेली दिसते. राहुल गांधी आणि प्रियांका गांधीच लढतात, त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची फळी नाही, असे बोलले जात होते. राहुल गांधी यांनी हे सगळं मागे सारून काँग्रेसमध्ये नवीन चेहर्‍यांची मोठी सेना तयार केली आहे. याचे पहिले उदाहरण ‘भारत एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये दिसून आले. इथे युवक काँग्रेसच्या सदस्यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात अर्धनग्न (शर्टलेस) निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये ते शर्ट काढून ‘कॉम्प्रोमाइज प्रधानमंत्री’ यासारख्या घोषणा देत होते आणि मोदी व ट्रम्प यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट हातात धरून फिरत होते. हे निदर्शन भारत-अमेरिका व्यापार कराराने शेतकरी आणि डेटा सुरक्षेचे नुकसान होत असल्याच्या आरोपावर आधारित होते. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर काँग्रेसने केलेले हे निदर्शन जगभर चर्चेचा विषय ठरला. मुख्यतः युवक काँग्रेसचे उदय भानू चिब, जितेंद्र यादव, राज गुज्जर, अजय कुमार, रितिक शुक्ला, कृष्णा हरि, कुंदन यादव, नरसिम्हा यादव, विमल अजय कुमार, अरबाज खान, सिद्धार्थ अवधूत आदी १५-२० निदर्शनांत सदस्य सहभागी होते. यातील एकही चेहरा चर्चेतील नाही. मोदींच्या मित्रप्रेमाच्या लालची धोरणामुळे देश खड्ड्यात जातोय आणि त्याला वाचवले पाहिजे म्हणून ही तरुणाई एकत्र आली आहे. अर्थातच, मोदींची ‘आलोचना’ केली म्हणून कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांना ही निदर्शने म्हणजे ‘दंगल’ वाटते. परंतु या तरुणांना त्याची पर्वा नाही.

खवळलेले मोदी….
या प्रकाराने खवळलेल्या मोदींनी २२ फेब्रुवारीला मेरठमध्ये एका जाहीर सभेत काँग्रेसवर गलिच्छ आणि नग्न राजकारण करणारा पक्ष म्हणून हल्ला चढविला. ‘काँग्रेसचे नेते विदेशी पाहुण्यांसमोर नग्न अवस्थेत पोहोचले. देशाला आधीच माहीत आहे की तुम्ही (काँग्रेस) नग्न आहात; मग कपडे काढण्याची गरज काय पडली? ही घटना म्हणजे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे,’ असे ते म्हणाले. आधीपासून काँग्रेसचे नेते ‘नंगे’ आहेत याचा अर्थ मोदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या वेशभूषेवरून लक्ष्य करत होते का? भारताबाहेर गेल्यावर याच गांधींच्या प्रतिमेसमोर उताणे-उपडे पडण्याशिवाय मोदींना आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना पर्याय नसतो, इथे मात्र गांधींचा द्वेष केल्याशिवाय चैन पडत नाही. आपल्या देशातील महिलांच्या अंगावर पूर्ण वस्त्रे नाहीत या वेदनेने गांधीजींनी त्यांची क्षमता असूनही सुटबुटाचा त्याग करीत अंगावर केवळ केवळ पंचा चढवला. त्यांच्या नंग्या फकिरीतली ताकद मोदींच्या डिझायनर सूट बूट की सरकारमध्ये नाही. भिक्षा मागून अनेक वर्षे काढली असे थोतांड सांगत अंगावर १० लाखांचा सूट चढवणारे बोलबच्चन ते नव्हते. आपल्या देशातील वास्तव काय आहे हे सत्ताधारी ब्रिटिशांना दिसावे म्हणून महात्मा गांधी १९३१मध्ये इंग्लंडमधील दुसर्‍या गोलमेज परिषदेत पारंपरिक पोषाखातच हजर झाले होते. त्यांच्या पंचावर तिथेही टीका झाली, पण, त्यांना परिषदेतून रोखले गेले नाही. ही परिषद औपचारिक होती आणि ब्रिटिश एटिकेटनुसार, प्रतिनिधींना सूट किंवा पाश्चिमात्य औपचारिक पोशाख घालणे अपेक्षित होते. मात्र, महात्मा गांधींनी हा नियम पाळला नाही.

इतरांना नंगे म्हणणार्‍या मोदींच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तब्बल ९० वर्षे हाफ पँटवरच फिरत होते. त्यांनाही मोदींच्या भाषेत ‘नंगे’ म्हणायचे का? मोदींनी काँग्रेसची ‘शर्म’ काढली. यावर राहुल गांधी यांनी ‘शर्म की बात’ कशाला म्हणतात याचे व्हिडिओद्वारे विश्लेषण केले. ‘नंगे तो आप हैं’ असे खणखणीत उत्तर देताना राहुल यांनी काय काय शर्मनाक आहे, हे सांगितले. एपस्टिन फाईल्समध्ये मोदींचे, मंत्र्यांचे आणि त्यांचे मित्र अनिल अंबानींचे नाव एकत्र येणे आणि अशा घृणास्पद गुन्हेगारासोबत मोदींचे नाव जोडले जाणे ही शरमेची गोष्ट आहे. अमेरिकेसोबत केलेली व्यापार डील- ज्यात शेतकर्‍यांचा घाम विकला, ऊर्जा सुरक्षा अमेरिकेच्या हाती सोपवली आणि स्वतःला वाचवण्यासाठी देश अमेरिकेला विकला ही शरमेची गोष्ट आहे, देशाचा डेटा (बहुतेक चीन किंवा अमेरिकेला दिला) दिला ही शरमेची गोष्ट आहे, शेतकर्‍यांना संपवले ही शरमेची गोष्ट आहे, टेक्सटाइल इंडस्ट्री बरबाद केली ही शरमेची गोष्ट आहे. अमेरिकेत अदानीवर चाललेल्या केसवर १४ महिन्यांपासून कोणतीही कारवाई न होणे ही शरमेची गोष्ट आहे. राहुल यांनी या व्हिडिओत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांत बसू नका असे आवाहन आहे. भाजपच्या नेत्यांनीही अशाच प्रकारची शर्टलेस आंदोलने केली होती, हे काँग्रेसच्या नेत्यांनी पुढे आणले.

मोदीजी यालाही नग्नता म्हणतात!
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हे धडक अभियान राबविण्यात आले. परंतु अनेक अडचणींवर मात करीत, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावणार्‍या हरयाणातील आतंरराष्ट्रीय ख्यातीच्या सात महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचा तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचा माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ब्रिजभूषणवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून केलेल्या आंदोलनातल्या या कुस्तीपटू महिलांना पोलिसांनी फरफटत नेले. ही कोणाची नग्नता आहे? शेतमालाला किमान हमीभावाच्या कायद्यासह कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी, तीन कृषी कायद्याच्या विरोधात लाखो शेतकर्‍यांनी दिल्लीच्या चारही सीमा अडविल्या होत्या, तेव्हा मोदी सरकारने रस्त्यांवर खिळे ठोकले. हे आंदोलन तब्बल अकरा महिने चालले. या काळात जवळपास सातशे शेतकरी शहीद झाले. इतके होऊनही मोदी एकदाही आंदोलनस्थळी गेले नाहीत. ही कोणाची नग्नता आहे? नोटबंदीच्या वेळी देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली. मोदींनी सामान्य जनतेला रांगेत उभे केले. शेकडो लोक मेले त्यालाही वैचारिक दिवाळखोरी आणि नग्नता म्हणावे काय? मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली गेली तेव्हाही मोदींचे काळीज द्रवले नाही. पर्यावरणासाठी लढा देणारा सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक तुमच्या स्वार्थाला अडसर ठरतो म्हणून त्यांना तुरुंगात डांबले जाते. दिल्लीकरांशी एकरूप होत सरकार चालवणार्‍या अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवत त्यांची रवानगी कोठडीत होते. ही नग्नता नाही का? बलात्कारी रामरहीमने तुरुंगातून पॅरोलवर सुटण्याचा विश्वविक्रम केला आहे, हा नग्नतेचा कळस नाही! संस्कारी संघाचा स्वयंसेवक, पुण्यातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) माजी संचालक प्रदीप कुरुलकर हा पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. त्याच्यावर देशद्रोहाचे कलम लावले गेले नाही. ही नग्नता नाही?
हे लोक कोण आहेत?

समाजमाध्यमांवर मोदीविरोधी पोस्ट टाकल्या की काम झाले, अशा प्रकारे सतत सर्वांना ग्यान वाटणार्‍या पुरोगाम्यांनी या आंदोलनाबद्दल नाराजी व्यक्त केली. देशात भाजपची नाचक्की होत असताना काँग्रेसने पुन्हा त्यांच्या हातात कोलीत दिले, असे यांचे विश्लेषण होते. यांची गंमत म्हणजे काँग्रेस काही करत नाही, विरोधी पक्ष म्हणून ती अकार्यक्षम आहे, असं सतत म्हणत राहायचं आणि काँग्रेसने काही केलं की हे चुकीचं केलं, असं बोलायचं. डुकराशी लढायचं तर चिखलात उतरावं लागतं, हे यांना अमान्य असावं. काँग्रेसला उशिराने का होईना ते कळलं आहे, हे महत्त्वाचं.

बदललेली काँग्रेस!
काँग्रेसमधील असंख्य नेत्यांचे शरीर काँग्रेसमध्ये दिसत असले तरी त्यांचा मेंदू चमडी बचाव उपक्रमाअंतर्गत भाजपमध्ये भरकटतो हे राहुल गांधी यांनी मागच्या वर्षी गुजरातमध्ये जाऊन स्वतःच सांगून टाकले. ज्यांचा राजकारणाशी जराही संबंध नाही, जे विवेकवादी आहेत, ज्यांना देशाबद्दल चिंता वाटते, देश भाजपच्या हाती गेल्याने संपूर्ण वाटोळे होईल अशी भीती वाटते असे देशातील तमाम लोक गेल्या दहा वर्षांपासून राहुल यांना वेगवेगळ्या माध्यमातून सतर्क करीतच होते. भारत जोडो यात्रेत अनेकांनी राहुल यांना भेटून पक्षातील घातक नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवा तरच तुमच्या पक्षाचे भले होईल असा सल्लाही दिला होता. परंतु संयम हा काँग्रेसचा गुणधर्म असल्याने पाणी नाकातोंडात गेल्यावर राहुल गांधी खडबडून जागे झालेले दिसतात. काँग्रेस हा केवळ नेहरू-गांधी कुटुंबीयांचा पक्ष म्हणून विरोधी पक्ष भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका होत असते. काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल, कर्तृत्व नसताना राज्यसभेचे खासदार, पक्ष संघटनेत अनेकवर्षे मलईदार पदे उपभोगल्यानंतर अजीर्ण होईपर्यंत माया जमवणार्‍या नेत्यांना ईडी, सीबीआय, आयटीच्या धाकात काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करावी लागते. नेहरू कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधान होते अशा पोस्ट काँग्रेसमध्ये अनेक वर्ष मंत्री असलेल्या आणि तुरुंगाच्या भीतीने भाजपमध्ये गेलेल्या बिचार्‍या राधाकृष्ण विखे पाटलांना टाकाव्या लागतात आणि त्याच्यावर सडकून मारही खावा लागतो कमेंट्सच्या माध्यमातून. लोक अशांची लाज काढतात.

असल्या नेत्यांमुळेच काँग्रेस गोत्यात आली आहे. स्वातंत्र्यलढ्यात ओजस्वी कामगिरी करणार्‍या काँग्रेसच्या नंतरच्या नेत्यांच्या पिढ्या स्वतःच्या पलीकडे विचार न करणार्‍याच निपजल्या. आपल्या पूर्वजांनी देशासाठी रक्त सांडले, संघर्ष केला याच माजात हे नेते राहिले. त्यांनी अघोरीपणे शिक्षण संस्था उभारल्या. जमिनी बळकावल्या. हे नेते स्वतःचे दुकान थाटून बसले. पुढच्या अनेक पिढ्यांची चिंता संपविली. देशातील गरीब लोकांचा त्यांनी विचार केला नाही आणि त्यातच काँग्रेसचा आलेख घसरत गेला. १९८९पासून काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९१ ते १९९६ आणि २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसचे सरकार असले तरी ते बहुमताचे नव्हते. या घसरंणीला कारण हे बहुतांश काँग्रेसचे नेते आहेत. परंतु याचे खापर गांधी कुटुंबीयांवर फोडले जाते. २०१४, २०१९ आणि २०२४ या मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यांचा आढावा घ्या. त्यात भाजपचे कमी आणि अन्य पक्षातून आलेले मंत्री अधिक आहेत. परंतु काही नेते जाणीवपूर्वक काँग्रेसमध्ये रखडलेले दिसतात. त्यांना काँग्रेसमध्येच थांबून पक्ष पोखरण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी ते भाजपच्या उमेदवाराला मदत करतात. त्यांना निवडणूक जिंकून देतात. प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या नेत्यांचे आपसात पटत नाही. त्यांचे भांडण विकोपाला गेलेले आहेत. चंद्रपूरसारख्या ठिकाणी महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही आपसातील भांडणात काँग्रेसचा महापौर बनवता येत नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांत काँग्रेसच्या नेत्यांमुळेच काँग्रेस हरली. त्यामुळे, राहुल गांधी यांनी अर्ध्या अधिक नेत्यांना घरी पाठवण्याची भाषा केली ती आता वास्तवात उतरताना दिसते. प्रत्येक राज्यात जाऊन हीच कृती करावी लागणार आहे. नवीन लोकांना संधी द्यावी लागणार आहे.

आज लोकसभेत भाजपचे २४० आणि काँग्रेसचे १०१ खासदार आहेत. २०१९च्या तुलनेत २०२४मध्ये काँग्रेसला दोन कोटींपेक्षा अधिक मतदान झाले. दोन टक्क्यांनी मते वाढली. देशातील १३ कोटी ६८ लाख मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. याउलट मागच्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला एक टक्का मते कमी मिळाली आहे. भाजपकडे संपूर्ण यंत्रणा आहेत. निवडणूक आयोगावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. स्वायत्त संस्थांचा वापर कसा केला जातो हे देश पाहतो आहे. ईव्हीएमवर मते कशी वाढतात हेही दिसून आले आहे. अशाही परिस्थितीत काँग्रेसची मते वाढत असेल तर या देशात काँग्रेसला अनुकूलता आहे. नव्या इंदिरा गांधी भवनात काँग्रेसला नवी पालवी फुटली आहे. या इमारतीत तरुणांमध्ये चैतन्य दिसून येते. देशाला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठीची रणनीती इंदिरा भवनमध्ये राहुल गांधींनी आखली आहे. इंदिराजींसारखे धडाडीचे नेते तयार व्हावे होतील. इंदिरा भवन या देशाच्या लोकशाहीचे, संविधान सुरक्षेचे, सामान्याचे आशास्थान राहावे. युवक काँग्रेसच्या आंदोलनातून त्याची सुरुवात झाली आहे.

Previous Post

ज्योतिषांच्या मगरमिठीत

Next Post

धुके की धोका?

Next Post
धुके की धोका?

धुके की धोका?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.