प्रबोधनकारांचं ‘दगलबाज शिवाजी’ हे पुस्तक फारच लोकप्रिय झालं. त्याला पुण्यातल्या ब्राह्मणी वर्तुळातूनही अनपेक्षितपणे कौतुकाची पावती मिळाली. त्यात एककल्ली हिंदुत्वाचे प्रवक्ते असणारे भालाकार भोपटकर मुख्य होते. या सगळ्या प्रतिसादासह या पुस्तकातल्या चर्चेतल्या मुद्द्यांची ही उजळणी.
लोकमान्यांचं ‘केसरी’ आणि शिवरामपंत परांजपेंचं ‘काळ’ यासारखी ब्राह्मणी वळणाची वर्तमानपत्रं पुण्यात लोकप्रिय असतानाच्या काळात ‘भाला’ नावाचं वर्तमानपत्र सुरू करणं हे मोठंच धाडस होतं. भोपटकर बंधूंनी फक्त ते धाडस केलं नाही, तर भाला हे अधिक कट्टर ब्राह्मणी वळणाचं नियतकालिक चालवलं आणि गाजवलं देखील.या भावांमधले थोरले भास्कर बळवंत उर्फ भोपटकर हेच `भाला`चे संपादक. ते भालाकार भोपटकर म्हणूनच ओळखले जात. सर्वात धाकट्या दिनकररावांना काळाने लवकर ओढून नेलं. मधले लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब हे प्रसिद्ध वकील होते. त्यांचं थोरल्या भावाशी फारसं पटलं नाही. त्यामुळे ते `भाला`मधून लवकरच बाहेर गेले. पुढे केसरीच्या संपादक मंडळात स्थान मिळवलं. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. तिथे धर्मवीर म्हणून ओळख मिळवली.
‘भाला`ची सुरवात झाली १९०५ला आणि शेवटचा अंक १९३४ला प्रसिद्ध झाला. इतकी वर्षं त्याचे सलग नियमित अंक आले असं नाही. पण काळाच्या मानाने `भाला’ बराच टिकला. त्या अर्थाने ‘भाला’ आणि भालाकार हे दोन्ही प्रबोधनकारांचे समकालीन. पुण्यात भालाकार भोपटकर प्रबोधनकारांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर पोस्ट ऑफिसच्या जवळ राहत. प्रबोधनकारांच्या रोजच्या फेरफटक्यात त्यांची भेट व्हायचीच. एक कट्टर ब्राह्मणी, दुसरा तितकाच कट्टर बहुजनवादी. प्रबोधनकार लिहितात, भेटल्यावर दोनचार खटके मनमोकळे झडल्याशिवाय त्यांना नि मलाही मोकळे वाटत नसे.

विरोधी विचारांच्या अविचारी लोकांनी प्रबोधनकारांना त्रास दिला होताच. पण विरुद्ध विचारांच्या विचारी लोकांनी एकमेकांना शत्रू मानण्याचा आजच्यासारखा काळ तेव्हा नव्हता. प्रबोधनकार लिहितात, दाना दुष्मन चाहिये. विरोधक असावा. पण तो दिलदार मनाचा असावा. वादापुरता वाद. मन निर्मळ नि दुष्टाव्यापासून अलिप्त असावे. भालाकार भाऊसाहेब भोपटकर हे या पठडीतले असल्याचा माझा अनुभव सांगतो. प्रबोधनकारांनी त्याच्या वानगीदाखल एक प्रसंगही सांगितला आहे. पुण्यातल्या कॅम्प भागातल्या भोकरवाडीतल्या अहिल्याश्रमात एकनाथ षष्ठीनिमित्त प्रबोधनकारांचं भाषण होतं. ज्ञानप्रकाश`चे काकासाहेब लिमये यांनी कोकजे नावाच्या बातमीदारांना त्याचा सविस्तर रिपोर्ट करण्यासाठी पाठवलं. प्रबोधनकारांची भाषणं गाजत. त्याचा रिपोर्ट `ज्ञानप्रकाश`मध्ये प्रसिद्धही होई. पण या व्याख्यानादरम्यान अधिकच गंमत झाली. राजेशाही आणि भिक्षुकशाही ही मानवी समाजासमोरची भयंकर संकटं आहेत, असा मुद्दा प्रबोधनकार मांडत होते. त्यात ते म्हणाले, `मी जर व्हाईसरॉय झालो तर प्रथम देशातील सगळी देवळे, मशिदी नि चर्चेस जमीनदोस्त करून टाकीन. देवळाचा धर्म आणि धर्माची देवळें या पुस्तकात त्यांनी हा मुद्दा सविस्तर मांडला आहेच.
झालं असं की व्याख्यानाला उपस्थित असणार्या सुभेदार घाडगे यांनी त्यावर आक्षेप घेतला की देवळात फार छान छान मूर्ती असतात. त्यावर प्रबोधनकारांनी खास ठाकरी शैलीतलं उत्तर दिलं, त्या मूर्ती एका ठिकाणी सावडून त्यांचे प्रदर्शन करावे आणि बाहेर भिक्षुकशाहीच्या कारस्थानाचे पुरावे अशी पाटी ठोकावी. त्यावर सुभेदारांनी पुन्हा आपलं मत मांडलं, रिकाम्या देवळात शाळा काढाव्या. त्यावर प्रबोधनकारांनी मल्लिनाथी केली, छे, छे, तेथे दारूचे पिठे उघडावे. दारू पिऊन माणसाचा जितका अधःपात होतो, त्यापेक्षा शतपट अधःपात भिक्षुकशाही पुराणांनी नि देवळांनी केलेला आहे.
या सगळ्याचा सविस्तर रिपोर्ट ज्ञानप्रकाश`मध्ये छापून आला. मवाळांचं मुखपत्र असणारं `ज्ञानप्रकाश तेव्हा अतिशय लोकप्रिय होतं. त्याच दिवशी नेहमीच्या भेटीत भालाकारांनी प्रबोधनकारांना हाक मारून सांगितलं, केशवराव, येत्या भाल्यात चामडे लोळवतो. पाठीला तेल लावून बसा बरं! त्याच आठवड्याच्या भाला`च्या अंकात प्रबोधनकारांच्या व्याख्यानावर स्फुट आलं, `करतो कोण ठाकर्यांना व्हाईसरॉय? त्यात देवळाचं महत्त्व लिहिलेलं होतं. पण प्रबोधनकारांचा उल्लेख फक्त मथळ्यात होता, लेखात नाहीच.
दगलबाज शिवाजी ही पुस्तिका ज्या दिवशी प्रसिद्ध झाली त्या दिवशीही असाच प्रकार घडला. ती विकण्यासाठी प्रबोधन छापखान्यातले कर्मचारी प्रभाकर चित्रे इतर सहकार्यांसह सायकलवर बाहेर पडले. दगलबाज शिवाजी अशी आरोळी ऐकून भालाकार एकदम बाहेर आले. म्हणाले, काय रे प्रभाकर. काय दगलबाज शिवाजी? आता ठाकर्यांची मजल येथवर गेली का? दे पाहू एक कापी, वाचलीच पाहिजे. दुपारी दीड दोनच्या सुमारास चित्रे विक्री करून प्रबोधन कचेरीत परतत होते. तेव्हा भालाकारांनी त्यांना जोरात हाक मारून बोलावलं. म्हणाले, ए प्रभाकर, झक्क पुस्तक लिहिलं आहे रे, त्या केशवरावाला जाऊन सांग, या कर्मठ ब्राह्मणाचा तुझ्या लेखणीला आशीर्वाद आहे म्हणून. आणि बघ, आत्ताच्या आत्ता मला एक ग्रोस काप्या आणून दे. भेटेल त्याला एकेक मी बक्षीस देणार आहे. हे घे दहा रुपये. दोन तीन दिवसांनी प्रत्यक्ष भेटीतही भालाकारांनी प्रबोधनकारांची मनसोक्त स्तुती केली. पाठीवर थाप मारून दाद दिली. प्रबोधनकार म्हणतात, असे होते फणसासारखे भालाकार भाऊसाहेब भोपटकर.

एकीकडे इतर बहुसंख्य ब्राह्मणी पुढारी प्रबोधनकारांना पाण्यात पाहात होते. त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि प्रबोधन बंद पाडण्यासाठी कारस्थानं करत होते, तेव्हा भालाकारांचं हे वर्तन उठून दिसतं हे नक्की. आश्चर्य म्हणजे भालाकार एकटे नव्हते. अनेक पुणेरी ब्राह्मण वाचकांनी या पुस्तकाच्या निमित्ताने प्रबोधनकारांचं छापखान्यात येऊन कौतुक केलं. ब्राह्मणविरोधी म्हणून गवगवा झालेला असल्यामुळे अनेक ब्राह्मण मंडळी प्रबोधनकारांना भेटायला संकोचत असत. पण या पुस्तकाने तो दुरावा काही अंशी संपवला. अर्थात त्यामुळे प्रबोधनकारांच्या विचारांत मवाळपणा आला नाही आणि ब्राह्मणी कंपूच्या विरोधातही. पण विरोधकाच्या आवडलेल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची दानत तेव्हा लोकांच्यात होती, ती आता नाही.
या पुस्तकातला एक मुद्दा अनेकांना खटकला होता. तो प्रबोधनकारांनी इतिहास संशोधक दत्तोपंत आपटे यांच्या निमित्ताने प्रकाशात आणला आहे. दत्तात्रेय विष्णू आपटे हे त्या काळातले फारच मोठे विद्वान संशोधक. ‘राष्ट्रमत’ आणि ‘चित्रमय’ जगत या गाजलेल्या नियतकालिकांचे संपादक म्हणून ते ओळखले जातात. उच्चशिक्षित असूनही लोकमान्यांच्या प्रेरणेने त्यांनी यवतमाळ आणि गोवा इथल्या राष्ट्रीय शाळांमध्ये मास्तरकी केली. गोव्यात असताना इतिहासाचार्य राजवाडेंच्या संपर्कात आल्यानंतर मूळ गणिती असणार्या दत्तोपंतांना इतिहास संशोधनाचा नाद लागला. त्यांनी इतिहासावर अनेक गाजलेले लेख आणि पुस्तकं लिहिली. भारतीय इतिहास संशोधन मंडळाचे ते एक आधारस्तंभ बनले. छत्रपती शिवरायांची आता मान्य असणारी जन्मतिथी मांडण्याचं कामही त्यांनी ‘शिवभारत’ ग्रंथाच्या संदर्भात केलं.
राजवाडे कंपूच्या इतर इतिहास संशोधकांची कायम धुलाई करणारे प्रबोधनकार दत्तोपंतांविषयी फारच प्रेमाने लिहितात, दत्तोपंत म्हणजे अत्यंत विनयशाली, प्रकांड विद्वत्तेचा मूर्तिमंत अवतार. कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. आपण बरे आपले काम बरे, अशा वृत्तीचा इतिहास संशोधक. असे दत्तोपंत एका सकाळी प्रबोधनकारांना भेटायला प्रबोधन कचेरीच्या माडीवर आले. म्हणाले, वाहवा केशवराव, गोड पुस्तक लिहिलेत. आवडले मला. पण एक मुद्दा टाळता आला असता तर बरं होतं. तो वाचताच मला कसंच वाटलं. नको होता लिहायला तो. तो मुद्दा होता, शहाजी महाराजांविषयीचा. फार काय, पण विजापुराहून अफझुलखान आला, त्याच प्रतिज्ञेने व तयारीने शिवाजीचा प्रत्यक्ष बाप शहाजी जरी आला असता, तरी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचाही कोथळा फोडून, आपल्या हाताने आपल्या मातोश्रींच्या कपाळचे कुंकू पुसायला कमी केले नसते. राष्ट्रोद्धाराच्या पवित्र कर्तव्यक्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी `आडवा आला की काप’ हाच जेथे नीतीचा दण्डक आहे, तेथे `मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या संसारी लोकांच्या आंबटवरणी नीतीचे नियम काय होत? आपण याआधीच्या एका भागात त्यावर चर्चा केलेली आहेच.
याच धर्तीचा पारंपरिक विचारांच्या लोकांना खटकणारा आणखी एक मुद्दा लेखाच्या सुरवातीलाच येतो, महाराष्ट्रापुरताच विचार केला, तर आज हिंदूंची तेहतीस कोटी देवांची फलटण पेनशनीत निघून, त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मर्हाठ्याच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे. शिवाजी म्हणजे मर्हाठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव. यात प्रबोधनकारांनी देवळात पुजल्या जाणार्या रूढ देवांपेक्षा महाराष्ट्राचा खरा देव शिवरायच असल्याचं ठासून सांगितलं आहे. त्यासाठी ते तेहतीस कोटी देवांना निवृत्त करायचं म्हणताहेत. हे जुन्या वळणाच्या कोणाला मान्य होईल? पण ते मांडलंय असं की प्रत्येकाला त्यावर मान डोलवावीशीच वाटते.
दगलबाज शिवाजीमध्ये आणखी एक मुद्दा परंपरावाद्यांना धक्का देऊन जातो. शिवाजीचे ध्येय काय होते? शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून, तिला रसातळाला नेण्याचा यत्न करणे, हा तर प्रत्येक मनुष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्रस्वातंत्र्याचा धर्म उद्दिपित करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय. शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे होते. महाराष्ट्र मर्हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? मर्हाठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी मर्हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्त्वाकांक्षेने बालवयातच फुरफुरलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणार्या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारीकडे एकाग्र लक्ष ठेवून, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्यप्राप्तच होते. त्याने अफझुलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय.
छत्रपती शिवरायांविषयी ही फारच वेगळी मांडणी होते. प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते हे निःसंशय. पण त्यांना शिवाजी महाराजांना हिंदू मुसलमान झगड्यापुरतं संकुचित करणं मान्य नव्हतं. त्यांच्यासाठी महाराज हे राष्ट्रनिर्माते होते. सर्वसामान्य माणसाच्या स्वराज्याचे निर्माते. राष्ट्रस्वातंत्र्याचे धर्माचे प्रवर्तक. त्यामुळे त्यांनी या पुस्तकात शिवरायांच्या परधर्मसहिष्णुतेचे दाखले देऊन युरोपियन हल्लेखोरांना त्यांनी जागा दाखवून दिली होती. त्याच काळातील स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे इतिहासकार शिवरायांच्या परधर्मसहिष्णुतेला ‘सद्गुण विकृती’ म्हणत असताना, प्रबोधनकारांचा स्वतंत्र बाणा जास्त ठळकपणे जाणवतो. प्रबोधनकारांना कोणत्याही विचारधारेच्या चौकटीत कोंडणं म्हणूनच अवघड जातं. पुढच्या काळात आधुनिक संशोधकांनी छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाची हिंदू–मुस्लिम बायनरीच्या पलीकडे मांडणी केली. त्याचं बीज प्रबोधनकारांच्या या विचारांत तर नाही ना, याचा शोध घ्यायला हवा.
`दगलबाज शिवाजी`चं सर्वत्र कौतुक होत असताना खुद्द प्रबोधनमध्येच त्याच्यावर टीका छापून आली होते, हे ऐकून धक्का बसू शकतो. पण तसं झालं खरं. त्याविषयी पुढच्या भागात.
